टिलापिया : हा मासा सिक्लिडी या मत्स्यकुलातील आहे. याची भारतात असणारी जाती टिलापिया मोझँबिका ही होय. ही एक परदेशी जाती असून भारतात तिचा प्रवेश १९५२ साली झाला. दक्षिण भारतातील मंडपम् येथील ‘सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च स्टेशन’च्या मार्फत ती आणली गेली. या माशाचे मूळ निवासस्थान आफ्रिका हे होय. आग्नेय आशियातील थायलंड, मलाया वगैरे प्रदेशांतही त्याचा प्रवेश झाला आहे. विशेष प्रयास न पडता त्याचे लहान हौदात किंवा पल्वलात (टाक्यात) संवर्धन होऊ शकत असल्यामुळे व तो बहुप्रसव असल्यामुळे त्याचा पुष्कळच प्रसार झालेला आहे.

टिलापिया (टिलापिया मोझँबिका)

याचे शरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असून त्यावर कंकताभ शल्क (फणीसारखे खवले) असतात. रंग सामान्यतः मळकट तपकिरी, हिरवा किंवा काळपट असतो. पृष्ठपक्षात (पक्ष म्हणजे हालचालीस वा तोल सांभाळण्यात उपयुक्त अशी स्नायुमय घडी, पर) पुष्कळ आणि पुच्छपक्षात तीन-चार कंटक असतात. या पक्षांचे काठ पिवळे असतात. कडांच्या मागच्या भागावर तीन फिक्कट पट्टे असतात.

खाण्याकरिता या माशांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. केरळमधील लोक मुख्यतः भात खाणारे असल्यामुळे प्रथिनयुक्त अन्न म्हणून हे मासे खातात.

मादी वाळूत खळगा करून त्यात दर खेपेस १००–१५० अंडी घालते. या ठिकाणीच अंड्यांचे निषेचन (फलन) होते. नर (आणि कधीकधी मादीदेखील) ही अंडी उचलून घेऊन तोंडात साठवितो व तेथे ती उबवितो. सुमारे १४ दिवसांनी अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात. थोडी मोठी होईपर्यंत ती तोंडातच राहतात.

यार्दी, ह. व्यं.