आ. १. हिमालयी ताहर (हेमिट्रॅगस जेम्लाहिकस).ताहर : हा स्तनि–वर्गाच्या समखुरीय (ज्यांच्या खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या) गणातील गो–कुलातील रानबकरा आहे. हा हेमिट्रॅगस वंशाचा असून या वंशात तीन जाती आहेत : (१) हिमालयी ताहर (शास्त्रीय नाव हेमिट्रॅगस जेम्लाहिकस) : हा हिमालयात पीरपंजालपासून सिक्कीम पर्यंत आढळतो (२) निलगिरी ताहर (हेमिट्रॅगस हायलोक्रायस) : निलगिरी, अन्नाइमलई डोंगर आणि यांच्या दक्षिणेस पश्चिम घाटात हा राहतो (३)  अरबी ताहर (हेमिट्रॅगस जयकराय) : हा अरबस्तानात आढळतो.

आ. २. निलगिरी ताहर (हेमिट्रॅगस हायलोक्रायस).

हिमालयी ताहराची  लांबी एक मी. असते खांद्यापाशी नराची उंची ९०–१०० सेंमी. शेपूट ९ सेंमी. डोक्यावर अतिशय आखूड केस शरीरावर खरखरीत, लांब, दाट केस नराच्या मानेवर व खांद्यावर गुडघ्यापर्यंत लोंबणाऱ्या दाट मऊ केसांची आयाळ मादीचा बांधा लहान, रंग तांबूस तपकिरी असतो वयस्क नरांचा रंग गडद असतो नराची शिंगे ३०–४० सेंमी. लांब व मादीची बरीच लहान असतात. शिंगे मागच्या बाजूकडे वाकलेली, असून त्यांची बुडे एकमेकांना लागून असतात, ती दोन्ही बाजूंनी थोडीशी चपटी असतात.

उंच पहाडांचे कडे, दाट झुडपे व अरण्ये यांत जरी ते राहत असले, तरी ३,०५०–३,६६० मी. पेक्षा जास्त उंचीवर ते आढळत नाहीत. यांचे सु. ३० जणांचे कळप असतात. सकाळ–संध्याकाळ चरण्याकरिता ते बाहेर पडतात व दिवसा विश्रांती घेतात. मिळेल तो झाडपाला ते खातात. ताहर चपळ व सावध असून कळपातील काही माद्या नेहमी पहारा करीत असतात. उन्हाळ्यात मोठे नर कळप सोडून वेगळे राहतात, पण हिवाळ्यात कळपात परत येतात. यांचा गर्भावधी ६ महिन्यांचा असून जून–जूलैमध्ये मादीला एक किंवा दोन पिल्ले होतात.

निलगिरी ताहर थोडा मोठा व गडद तपकिरी रंगाचा असतो व त्याच्या पाठीवर करड्या रंगाचे मोठे चकदळ असते. शरीरावर आखूड, राठ केस असतात. अरबी ताहर वरील दोन्ही जातींपेक्षा बराच लहान असून करड्या रंगाचा असतो.

कर्वे, ज. नी.