चास : याला नीळकंठ असेही म्हणतात. कोरॅसिइडी पक्षिकुलात याचा समावेश केला आहे. याचे शास्त्रीय नाव कोरॅसिॲस बेंगॉलेन्सिस  असे आहे. भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, सयाम इ. प्रदेशांत हा आढळतो. भारतात हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे तो आढळतो. हा प्रामुख्याने सपाट प्रदेशातला पक्षी असल्यामुळे हिमालयात १,२२० मी.पेक्षा जास्त उंचीवर तो आढळत नाही. लागवडीखालचा मोकळा प्रदेश आणि विरळ जंगल यांत तो राहतो. दाट जंगलात तो नसतो. 

हा पक्षी कबुतराएवढा असतो. डोके काहीसे मोठे व त्याचा माथा निळसर हिरवा पाठ विटकरी रंगाची पंखात निळा व हिरवा हे दोन्ही रंग पंखांचे गडद आणि फिक्कट निळे भाग उडताना दोन झगझगीत पट्‌ट्यांप्रमाणे दिसतात शेपटी गडद निळी गळा जांभळट तांबूस छाती तांबूस तपकिरी पोट व शेपटीची खालची बाजू निळसर चोच काळसर तपकिरी पाय तपकिरी पिवळे. नर आणि मादी यांच्या रूपांत फरक नसतो.

 हे पक्षी एकएकटे असतात. एखाद्या वृक्षाची वाळकी फांदी, तारायंत्राच्या तारा अथवा खांब, एखादे झुडूप किंवा दगडांचे ढीग अशा ठिकाणी हा बसलेला असतो. जरी हा गुपचुप बसलेला दिसला, तरी याची तीक्ष्ण नजर जमिनीकडे लागलेली असते एखादा टोळ, नाकतोडा, बेडूक, उंदीर किंवा सरडा दिसण्याचाच अवकाश की, तो झडप घालून त्याला पकडतो व त्याला आपटून आपटून मारून खाऊन टाकतो. पिकांची नासाडी करणारे कीटक तो खात असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. 

 महादेवाने या पक्ष्याचे रूप घेतले आहे व म्हणून तो पवित्र आहे, अशी पुष्कळ लोकांची भोळी समजूत आहे. तो दिसणे शुभ समजतात.  

चास

यांच्या प्रजोत्पादनाचा काळ मार्चपासून जुलैपर्यंत असतो. नर आणि मादीचा जोडा जमणे मादीच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. मादीला आपण पसंत पडावे म्हणून नराची खटपट चालू असते. मादी बसलेली असताना नर तिच्या समोर भराऱ्या मारून दाखवितो. कधी तो खूप उंच उडतो व डोके खाली करून आणि पंख एकदम मिटून खाली सूर मारतो, पण जमिनीजवळ आल्याबरोबर पुन्हा पंख पसरून वर उडतो कधी उडता उडता तो हवेत कोलांट्या घेतो. बहुधा या सगळ्या कसरतींनी मादी खूष होऊन त्यांची जोडी जमते आणि दोघेही घरट्याकरिता जागा ठरवितात. चासाचे घरटे बहुधा झाडाच्या ढोलीत किंवा कधीकधी भिंतीच्या भोकातही असते. दोघेही वाळलेले गवत, चिंध्या, पिसे वगैरे ढोलीत टाकून ते तयार करतात. मादी तकतकीत पांढऱ्या रंगाची ४-५ अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम तीच करते. पिल्लांना भरविण्याचे काम दोघेही करतात.  

कर्वे, ज. नी.