फोड  :  तीव्र त्वचाशोथामुळे  ( त्वचेच्या दाहयुक्त सुजेमुळे )  त्वचेत उद् ‌ भवणाऱ्या तात्पुरत्या विकृतीला  ‘ फोड ’  म्हणतात .  सर्वसाधारण भाषेत  ‘ फोड ’  हा शब्द त्वचेच्या पृष्ठभागावर ,  बुडबुड्याच्या आकाराच्या ,  आत पू किंवा इतर द्रव पदार्थ जमून ठणका लागलेल्या विकृतीसाठी वापरला जातो  उदा .,  खरजेचे फोड ,  भाजल्याचे फोड वगैरे .

 ⇨  पुरळ , ⇨  विद्रधी आणि फोड यांमध्ये सकृ त् दर्शनी साम्य वाटले ,  तरी हे तिन्ही शब्द निरनिराळ्या अर्थाने वापरले जातात .  पुरळाच्या एका अवस्थेला फोड ही संज्ञा लावता येते आणि तीमध्ये पू – संचय असल्यामुळे तिला शास्‍त्रीय भाषेत  ‘ पूयिका ’  म्हणतात  उदा .,  देवीचे फोड  [⟶  देवी ].  फोड याच अर्थाचा गळू हा शब्दही सर्वसाधारण भाषेत वापरला जातो .  त्वचेखाली अथवा अन्य ठिकाणी असलेल्या परिसीमित पू – संचयाला विद्रधी म्हणतात .  बाह्यत्वचा व अंतस्त्वचा यांच्या दरम्यान होणाऱ्या पू – संचयाला सर्वसाधारणपणे फोड म्हणतात .

फोड : (१) बाह्यत्वचा, (२) अंतस्त्वचा, (३) पू-संचय, (४) फोड.

 फोड बहुधा सूक्ष्मजंतु – संक्रामणजन्य असतो .  त्वचेत प्रवेश केल्यानंतर संक्रामण केशपुटकात  ( केसाचे मूळ जेथे असते त्या त्वचेवरील  खोलगट भागात )  किंवा ⇨  त्वक् ‌- स्‍ने ह ग्रंथी त वाढते .  या विकृतीला ⇨  केस तू ट असेही म्हणतात .  संक्रामणास प्रतिरोध करण्याकरिता रक्तप्रवाहाद्वारे त्या ठिकाणी पुष्कळ श्वेत कोशिका  ( पांढऱ्या पेशी )  गोळा होतात व त्या सूक्ष्मजंतूंचा नाश करू लागतात .  या प्रतिक्रियेच्या वेळी सूक्ष्मजंतूंबरोबर काही कोशिकाही नाश पावतात .  मृत सूक्ष्मजंतू व मृत श्वेत कोशिका आणि त्यांपासून तयार होणारा द्रव पदार्थ मिळून पू तयार होतो .  शरीराच्या संरक्षणात्मक प्रतिक्रिया क्रियाशील असल्यास फोड पूर्णपणे बरा होतो .  अनेक वेळा पू वाढून त्याचा फोडावरील त्वचेवरील दाब वाढून फोड फुटतो आणि पू बाहेर पडल्यानंतर फोड बरा होतो .

 फोड येणे सर्वसाधारणपणे शारीरिक प्रतिकारक्षमता कमी झाल्याचे लक्षण असते. त्वचा शो थ  किंवा  ⇨  इसब  यासारख्या विकृतीमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रवेश सुलभ बनून फोड येतात. मधुमेहाच्या रोग्यामध्ये योग्य उपचार चालू नसल्यास फोड येण्याचा धोका असतो. इतर कारणांमध्ये भौतिक व रासायनिक त्वचाक्षोभ  व्हायरसजन्य त्वचाशोथ  आत्यंतिक गारठा  [उदा. , ⇨  हिमदाह ] किंवा ऊष्मा  अन्न ,  औषधे किंवा सौं दर्यप्रसाधने  यांची अधिहृषता  [ ⟶ ॲलर्जी ] आणि विशिष्ट जीवनस त्त्व न्यू न ता  यांचा समावेश होतो.

   भाजण्यामुळे किंवा पोळण्यामुळे  [ ⟶  भाजणे व पोळणे  ] विशिष्ट प्रकारचे फोड उत्पन्न होतात. त्यामध्ये त्वचेतील केशवाहिन्यांची पारगम्यता वाढल्यामुळे बाहेर पडलेला रक्तद्रव  ( ज्यात कोशिका लोंबकळत्या अवस्थेत असतात असा रक्ताचा द्रवरूप भाग )  साचतो. तीव्र सूर्यदाहामध्ये आणि हिमदाहामध्ये जे फोड येतात ,  त्यांतही असाच द्रवसंचय असतो. स्पॅनिश माशी (कॅथॅरिस व्हेसिकॅटोरिया) किंवा सर्वसाधारण भाषेत  ‘ ब्लिस्टर माशी ’  या नावाने ओळखल्या जाणा ऱ्या  कीटकापासून मिळणा ऱ्या ⇨  कँ थर्डिन  अथवा कँ थरिडिक  अम्‍लाचे लॅक्टोन  [C8H12 O(CO2)O] या पदार्थामुळे त्याचा जेथे त्वचासंपर्क येतो तेथे फोड येतो. पूर्वी विशिष्ट जागी प्रतिक्षोभन प्रतिक्रिया उत्पन्न करण्याकरिता या पदार्थापासून बनविलेला द्रव किंवा चिकटपट्टी वापरात होती. माशी त्वचेवर चिरडली गेल्यासही तेथे फोड येतो. उत्तर भारत आणि काश्मीर या भागांत आढळणाऱ्या या माशीच्या प्रकाराला मायलॅब्रिस सिकोराय (हरिभृंग) म्हणतात. बंगलोरच्या आसपास आढळणाऱ्या या माशी प्रकाराला मा. प श्‍चु लॅटा  म्हणतात.

 फोडावर उपचार करताना त्याचे स्वरूप ,  कारण ,  सोबत असणारी इतर लक्षणे ,  रूग्णाचे वय इत्यादींचा विचार करावा लागतो. लहान वयात विशेषेक रू न  वयाच्या पहिल्या दोन वर्षात त्वचा अधिक क्रियाशील असल्यामुळे आणि एकामागून एक नवनवीन सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्याशी शरीराचा नव्यानेच संपर्क येत असल्यामुळे फोडांचे प्रमाण अधिक आढळते. फोडातील पू काढून टाकणे हा सर्वोत्तम उपाय असला ,  तरी घरगुती इलाज टाळणे जरूरीचे असते ,  कारण अशा अशास्‍त्रीय उपायांमध्ये निसर्गाने मर्यादित केलेले सूक्ष्मजंतु-संक्रामण रक्तप्रवाहाद्वारे शरीरभर पसरण्याचा धोका असतो. वरचा ओठ ,  नाक ,  चेहऱ्यावरील  मुरुमाचे फोड  [ तारूण्य पीटिका   ⟶ त्वचा  ] आणि  बा ह्यकर्णमार्गातील  फोड हाताने दाबून त्यांतील पू काढून टाकण्याचा प्रयत्‍न केव्हाही करू नये. तसे केल्यास रक्तप्रवाहाद्वारे संक्रामण मेंदूपर्यंत पोहोचून गंभीर आजार उत्पन्न होण्याचा धोका असतो. त्वचेची स्वच्छता राखणे व त्वचाक्षोभ टाळणे हे प्रतिबंधात्मक उपाय उपयुक्त आहेत.

 संदर्भ :  1. Modi, N. J., Ed., Modi’s Texbook of Medical Jurisprudence and Toxlcology, Bombay, 1977.

           2. Rains, A. J.H. Ritchie, H. D. Ed., Baily and Love’s Short Practice of Surgery, London, 1977.

 कुलकर्णी ,  श्यामकांत  भालेराव ,  य. त्र्यं .