गेलेन : (१३१ — २०१). ग्रीक वैद्य. प्रायोगिक शरीरक्रियाविज्ञानाचे संस्थापक व वैद्यकीय इतिहासातील एक प्रमुख शास्त्रज्ञ. हिपॉक्राटीझ यांच्या खालोखाल गेलेन यांनाच मान देतात. 

आशिया मायनरमधील मिशियाची राजधानी पर्‌गमम येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी वैद्यकशास्त्राच्या अभ्यासास १४६ मध्ये सुरुवात केली. दोन वर्षांनंतर त्यांनी स्मर्ना येथे विख्यात वैद्य पेलॉप्स यांची व्याख्याने ऐकली. ज्ञानप्राप्तीकरिता त्यांनी ग्रीस, सिलिशिया, फिनिशिया, पॅलेस्टाईन, क्रीट आणि सायप्रस येथे प्रवास केला. ॲलेक्झांड्रिया येथील त्या काळी प्रसिद्ध असलेल्या वैद्यक विद्यालयातही काही दिवस त्यांनी वास्तव्य केले. १६४ मध्ये ते रोम येथे स्थायिक झाले. तेथे काही सुप्रसिद्ध सरकारी अधिकाऱ्यांशी तसेच भावी काळात रोमचे सम्राट बनलेल्या ल्यूशिअस सेप्टिमिअस सिव्हीरस यांच्याशीही त्यांची ओळख झाली. रोममधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या व्याख्यानांना व प्रात्यक्षिकांना हजर असत. त्या काळात वैद्यकाविषयी निरनिराळी मते अस्तित्वात होती. त्या सर्वांविरुद्ध गेलेन यांनी टीकेची झोड उठविली. त्यामुळे अनेक समव्यवसायी त्यांचे शत्रू बनले. रोम सोडून पर्‌गमम येथे ते रहावयास गेले असताना युद्धाच्या वेळी सम्राट मार्कस ऑरिलियस यांनी त्यांना परत बोलाविले, पण त्यांनी युद्धात सहभागी होण्याचे टाळले. मार्कस यांचे वारस कोमोडस यांच्या प्रकृतीची देखभाल करण्याकरिता मात्र ते रोमला परत आले. त्यांच्या त्यानंतरच्या आयुष्यासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. १९१ च्या मोठ्या आगीच्या वेळी ते रोम येथेच राहत असावेत कारण त्यांचे बरेच लेखन त्या आगीने भस्म झाले, असा उल्लेख आढळतो. २०१ च्या सुमारास ते सिसिलीमध्ये मरण पावले असावेत.

गेलेन यांनी विपुल लेखन केले होते. वैद्यकाशिवाय तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि व्याकरण या विषयांवरही त्यांनी बरेच लेखन केले होते. वैद्यकावरील अस्तित्वात असलेल्या त्यांच्या ग्रंथरचनेपैकी ९८ ग्रंथ मूळ त्यांचेच मानले जातात. १९ ग्रंथांबद्दल मात्र शंका आहे, ४५ ग्रंथ नकली असावेत व १९ केवळ तुटक स्वरूपाचे आहेत. ॲटिक ग्रीक भाषेतील त्यांची ग्रंथरचना सुस्पष्ट आहे. नवव्या शतकात त्यांच्या ग्रंथांची अरबी भाषेत भाषांतरे झाली व पुढे कित्येक शतके ग्रीक, रोमन व अरबी भाषेतील वैद्यकीय आधारभूत ग्रंथांत त्यांच्या ग्रंथांची गणना होई. त्यांच्या कार्याबद्दल पुढील माहिती उपलब्ध आहे.

शरीररचनाशास्त्र : एक अविश्रांत व चिकाटीचे शवविच्छेदक म्हणून ते ओळखले जात. मानवी शरीराचे विच्छेदन त्यांनी केले नसले, तरी माकडादी प्राण्यांच्या शरीरविच्छेदनाचे त्यांचे वर्णन तंतोतंत अचूक असे. 

शरीरक्रियाविज्ञान :  या विषयावरील त्यांचे संशोधन क्रांतिकारक मानतात. मेरुरज्जू (मेंदूच्या मागच्या भागातून निघणारी व पाठीच्या कण्यातून जाणारी तंत्रिकांची म्हणजे मज्जातंतूंची दोरी) निरनिराळ्या पातळीवर छेदून त्याचे प्रेरक (स्नायूंच्या हालचाली) आणि संवेदना यांवर होणारे परिणाम तसेच असंयम यांसंबंधी त्यांनी लेखन केले होते. हृदयाबद्दलचे त्यांचे निरीक्षणही महत्त्वाचे होते. हृदयाला पुरवठा करणाऱ्या तंत्रिका छेदल्यानंतरही हृदयक्रिया चालू राहते, तसेच हृदय ज्या पदार्थाचे बनले आहे (हृदय स्नायूंचे बनले आहे हे त्यांना माहीत नव्हते) तो अनिच्छानुवर्ती (इच्छेच्या ताब्यात नसलेला) आहे, हे त्यांनी निरीक्षिले होते. हृदयाच्या कपाटांचे (झडपांचे) त्यांनी उत्तम वर्णन लिहिले आहे. रोहिण्यातून हवा असते असेच सु. ४०० वर्षे ॲलेक्झांड्रियातील वैद्य मानीत होते. गेलेन यांनी त्यांत रक्त असते हे दाखविले.

इतर कार्य : वैद्यकाशिवाय धर्म आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये एक महान ऐतिहासिक व्यक्ती म्हणून गेलेन यांची गणना केली जाते. एकेश्वरवादाचे ते प्रणेते होते. त्यांच्या लिखाणातून ख्रिश्चन व यहुदी धर्मांचा उल्लेख आहे. मात्र त्याबद्दल फारसा आदर असल्याचे आढळत नाही. तर्कशास्त्रावरही त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. 

कानिटकर, बा. मो.