वडा: या माशाचा समावेश स्कॅटोफॅगिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव स्कॅटोफॅगस आर्गस असे आहे. त्याचा प्रसार पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ते चीन व ऑस्ट्रेलियापर्यंत आहे. भक्ष्य मिळविण्यासाठी तो नदी मुखखाड्यांत प्रवेश करतो. तो कोठेही अगदी सर्रास आढळत नसला, करी मचूळ व गोड्या पाण्यात त्याचे अल्प प्रमाणाच संवर्धन करता येणे शक्य आहे. तो पापलेटासारखा उभा, चापट आकाराचा, लहान व नकट्या नाकाचा असतो. त्याचा रंग जांभळट असून पोटाकडे तो पांढरा होत जातो. शरीरावर मोठे गोल काळसर किंवा हिरवट ठिपके असतात. पाटीवर असे ठिपके असंख्य असतात व ते विविध आकार मानांचे व छटांचे असतात. पाठीवरील पहिला पर फिकट तपकिरी निळा असतो व त्यावर थोडेसे सूक्ष्म ठिपके असतात, तर पाठीवरील दुसरा पर पिवळसर असून त्याच्या अरांच्या (काट्यांच्या) मधला भाग थोडासा तपकिरी असतो. विशेषतः पाणवनस्पतींवर व पॉलिकीट प्राण्यांवर हा मासा आपली गुजराण करतो. त्याचे दात भक्कम असतात व खडकावरील शेवाळी तो दातांनी कुरतडून खातो. पूर्ण वाढलेला मोठा प्रौढ मासा ३० सेमी. लांब व १−१.५ किग्रॅ. वजनाचा असतो. याचा स्वाद ट्राउटसारखा असल्यामुळे याला भरपूर मागणी असते.

वडालहान असताना म्हजे लांबी तीन सेंमी. होईपर्यंत त्याच्या अंगावरचे ठिपके तांबूस काळसर रंगाचे व निरानिराळ्या आकारांचे असतात. त्यामुळे अशी पिले मोठी सुंदर दिसतात व हौशी मत्स्यपालक ही पिले आपल्या जलजीवालयात (काचपात्रात) शोभेसाठी पाळतात. ही पिले परदेशांत पाठविली जातात. पाळलेल्या स्थितीत याची पैदास करणे अजून तरी शक्य झालेले नाही. याचे कारण म्हणजे नैसर्गिक अवस्थेतील याची स्थलांतरीय प्रजोत्पादन तऱ्हा हे असावे. खाऱ्या पाण्याच्या जलजीवालयांत प्रौढ मासे चांगले दिसतात. जलजीवालयांत त्याला भरपूर छोटे सजीव, तसेच सालीट (सॅलड) खाऊ घालतात. पाण्याचे तापमान २०°−२८° से. असावे लागते व त्यात दर दहा लिटरमागे एक चमचा सैंधव घालावे लागते.

कुलकर्णी, चं. वि. जमदाडे, ज. वि.