भुवनेश्वर – २ : भारतातील ओरिसा राज्याची राजधानी आणि इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या २,१९,४१९ (१९८१). हे कलकत्त्यापासून सु. ४३८ किमी. दक्षिणेला वसलेले आहे. हे मद्रास–कलकत्ता लोहमार्गावर असून रस्ते, हवाईमार्ग यांद्वारे मोठमोठ्या शहरांशी जोडलेले आहे. येथे महादेवाची व इतर अनेक मंदिरे आहेत. त्यांमुळे ‘मंदिराचे नगर’ म्हणून हे ओळखले जाते.

राजाराणी मंदिर, भुवनेश्वर, ११ वे शतक.

सम्राट अशोक, चेदी वंशाचा तिसरा राजा खारवेल, केसरी कुलातील ययाती, गंग वंशातील राजे वज्रहस्त व अनंतवर्मन, सूर्यवंशी कपिलेश्वर देव इत्यादींच्या कारकीर्दीत या प्राचीन नगरीचे वैभव दिसून येते. भुवनेश्वराचे महत्त्व मोगल, बंगालचा नबाब, मराठे, ब्रिटीश यांच्या अंमलातही कायम होते. स्वातंत्र्योत्तर काळात भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली. शहराचे नवे व जुने शहर असे दोन भाग आहेत. नवीन राजधानीचा आराखडा १९४८ मध्ये डॉ. ओटो एच्. केएन्गीसबर्गर या वास्तुविशारदाने तयार केला. शहराच्या नव्या भागात मोठे चौक, रुंद रस्ते, सरकारी कार्यालये, राजभवन, ओरिसा विधानभवन तसेच इतर इमारती आहेत.

ओरिसातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणूनही यास महत्त्व आहे. येथे उत्कल विद्यापीठ, कृषी व तंत्रविद्या विद्यापीठ, तसेच सैनिकी शाळा, अभियांत्रिकी संचालन संस्था, प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था इ. अनेक शैक्षणिक संस्था आहेत. यांशिवाय गोपबंधू दास, स्वामी विवेकानंद इत्यादींचे पुतळे, अनेक उद्याने, नंदन-कानन हे प्रसिद्ध अभयारण्य, राज्य संग्रहालय इ. विशेष उल्लेखनीय आहेत.

मंदिरकला : उत्तर भारतातील नागर मंदिर-शैलीचे विविध आविष्कार निरनिराळ्या प्रदेशांत पहावयास मिळतात. त्यांपैकी कलिंग देशातील म्हणजे ओरिसातील शैली अत्यंत प्रगल्भ व प्रेक्षणीय मानण्यात येते. या उपशैलीस ‘कलिंग शैली’ असे म्हणतात. ओरिसातील मंदिरे ही विशिष्ट बांधणीची असून त्यांचे प्रकार भुवनेश्वर, ⇨ जगन्नाथपुरी, ⇨ कोनारक येथे पहावयास सापडतात. खुद्द भुवनेश्वरच्या आसपास अनेक मंदिरे असून त्यांपैकी शंभर-सव्वाशे तरी उत्तम स्थितीत आहेत. येथील कलिंग शैलीच्या मंदिरांच्या बांधणीस इ. स. सु. सातव्या शतकात प्रारंभ झाला असावा. काही मंदिरे आठव्या शतकातील आहेत व त्या शैलीच्या उत्कर्षाची परिणती तेराव्या शतकात, येथून नजीकच असणाऱ्या कोनारकच्या सूर्यमंदिरात झालेली दिसते. कालदृष्ट्या या मंदिराची विभागणी तीन खंडात करता येईल : (१) पूर्वकाल–७५० ते ९०० (२) मध्यकाल–९०० ते ११०० (३) उत्तरकाल–११०० ते १२५०. सुरुवातीला सर्वच मंदिराचे वास्तुविधान व दर्शन हे गुजरात, कर्नाटक येथील नागर मंदिरासारखेच होते. पण पुढे विधानांत व मंदिररचनेत बदल होत गेले. त्यांनुसार मंदिराचे वास्तुशिल्पाच्या दृष्टीने तीन उपप्रकार निर्माण झाले, ते असे : (१) रेखा, (२) पीढा व (३) खाखरा. ‘रेखा देऊळ’ या प्रकारात शिखराची बाह्याकृती सलग आमलकापर्यंत जाते. ‘पीढा’ या प्रकारात छप्पर अनेक टप्प्यांचे किंवा मजल्यांचे मिळून होते तर ‘खाखरा’ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असणाऱ्या पूर्वीच्या शाला या आयताकार वास्तूचे नवे रूप होय. सुरुवातीचे वास्तुविधान म्हणजे मंदिराला चौरस गाभारा व त्यासमोर आयताकार मंडप असे. या दगडी मंडपाला सहसा खांब वापरत नसत. पण पुढे मंडपात व विधानात झालेल्या बदलाने मंडपाचा आकार वाढल्यावर आधारासाठी खांब वापरले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळात छप्पर हे मध्यभागी सपाट व ओवऱ्यांच्या दिशेने उतरते केलेले असे. गाभाऱ्यावर त्रिरथ पद्धतीचे शिखर असे. नंतर त्यात बदल झाले. ‘जगमोहन’ या नावाने ओळखला जाणारा चौरस मंडप झाला. त्यावर पीढा पद्धतीचे छप्पर असे. मंदिरातील धार्मिक उपचार व आन्हिके वाढत गेली, तसे आणखी मंडप जोडण्यात येऊ लागले. हे सगळे बहुधा जगमोहनला जोडून व त्याच ओळीत असत. क्वचित मंदिराच्या आवारातच, पण मुख्य वास्तूपासून अलग असत. अशा मंडपात भोगमंडप व नृत्यमंडप हे प्रमुख होत. विधानातील फरकाबरोबर दर्शनातही बदल होत गेले. पीठांच्या थरात वाढ झाली. शिखरांची उंचीही वाढली. तिसऱ्या प्रकारची म्हणजे खाखरा पद्धतीची देवळे दुर्मिळ असून, फक्त सहा देवळेच भुवनेश्वरात आहेत. यांत प्राचीन पद्धतीची गजपृष्ठाकार छपरे आढळतात. या तिन्ही प्रकारच्या देवळांत कालदृष्ट्या सर्वांत प्राचीन देऊळ पहिल्या गटातील परशुरामेश्वराचे होय. आठव्या शतकात बांधलेल्या या देवळाची लांबी १४.६३ मी. व उंची ४२.८० मी. आहे. त्रिरथ गाभारा असून आयताकार जगमोहन खांबावर आधारलेला आहे. शिखराच्या रेषा आधी बऱ्याच उंचीपर्यंत सरळ जाऊन नंतर आमलकाच्या दिशेने एकदम आत वळतात. इतरत्र त्या आरंभापासून आत झुकलेल्या दिसतात. जगमोहनाच्या भिंतीत जाळ्या बसवून आत उजेडाची सोय केली आहे. मंडपाचे छप्पर सपाट असून ओवऱ्याचे मात्र बाहेरच्या बाजूला उतरत गेले आहे. गाभाऱ्यावर रेखा पद्धतीचे शिखर असून तिन्ही दिशांच्या रथांवर देवमूर्तीसाठी चैत्यतोरणाकार कोनाडे आहेत. देवळाच्या आतील भागावर मूर्तिकाम नाही फक्त द्वारशाखा सुशोभित आहे. ललाटपटावर नवग्रह आहेत, मात्र त्यांत केतू नाही. शिल्पांपैकी हिंदू देव-देवतांची म्हणजे शिव, हरिहर, लकुलीश, वरुण, गंगा-यमुना यांची शिल्पे आहेत. शत्रुघ्नेश्वर व स्वर्णजालेश्वर ही मंदिरे परशुरामेश्वरासारखीच आहेत. खाखरा पद्धतीच्या देवळांपैकी वेताळ देऊळ (७०० ते ९००) हेही या कालखंडातील दुसरे उल्लेखनीय देऊळ होय. चामुंडेच्या या देवळाचा गाभारा व मंडप आयताकार असून ते एकमेकांना इंग्रजी ‘टी’ या अक्षराप्रमाणे जोडलेले आहेत. या देवळाच्या गाभाऱ्याचे शिखर गजपृष्ठाकार आहे. गाभारा हा आयताकार असून थोड्याफार फरकाने शाला या वास्तूप्रकाराचाच अवतार आहे. येथेही मंडपाचे छप्पर परशुरामेश्वरासारखेच सपाट, त्याच्या चारही कोपऱ्यांत एकेक देवळी असून त्यावर त्रिरथ पद्धतीचे शिखर आहे. जंघा व शिखरावरील शिल्प उल्लेखनीय आहे. मद्धकालखंडातील उल्लेखनीय देऊळ म्हणजे मुक्तेश्वर (नवव्या शतकाचा मद्धकाळ). नागरशैलीच्या प्राथमिक व प्रगत या अवस्थांच्या सीमारेषेवरचे हे उदाहरण आहे. मंडपाचे छप्पर सपाट पण शिखर पंचरथ पद्धतीचे आहे. देवळाच्या जंघा व इतर भागांवर शिल्पे असून त्यांत उंदीर व मोर ही वाहने असणारे गणपती व कार्तिकेय तसेच सप्तमातृकापट हे विशेष आहेत. मुक्तेश्वर मंदिराची वास्तू प्रेक्षणीय तर आहेच, पण मंदिरासमोरचे तोरण विशेष उल्लेखनीय आहे. दोन भक्कम खांब व त्यांवर धनुष्याकृती तुळई आहे. यावर पूर्वापारच्या पद्धतीप्रमाणे यक्ष-यक्षी, देवदेवता, गंधर्व आहेत. मुख्य म्हणजे मकरांच्या आकृती सुस्पष्ट आहेत. अशी तोरणे या काळात सर्वत्र उभारीत असावेत, असे गुजरातेतील तोरणांवरून वाटते. तथापि त्यांतील फार थोडी शिल्लक आहेत व त्यांत हे सर्वोकृष्ट आहे. मंदिराच्या इतर भागांवर अप्सरा, नाग-नागी, गजव्याल यांच्या मूर्तीचेही दर्शन होते. द्वारशाखेवर नवग्रह, सप्तमातृका अशी शिल्पे आहेत. दहाव्या शतकातील सिध्देश्वर, केदारेश्वर ह्यापैकी केदारेश्वर हे पंचरथ पद्धतीचे आहे. मुक्तेश्वर, सिध्देश्वर यांच्या संदर्भात वराहमिहिराने उल्लेखिल्याप्रमाणे मंदिराची उंची ही जगमोहनाच्या उंचीच्या तिप्पट आहे. पुढेपुढे ती सातपटीपर्यंत वाढते. याच काळातील आणखी एक उल्लेखनीय देऊळ म्हणजे लिंगराज (सु. ११ वे शतक) हे होय. ते केसरी वंशातील राजाने बांधले. ओरिसा मंदिरशिल्पाचा हा सर्वोत्तम नमुना म्हणता येईल. गाभारा, जगमोहन, भोगमंडप व नृत्यमंडप असे भाग त्यात आहेत. गाभारा पंचरथ पद्धतीचा आहे. गाभाऱ्याच्या भिंतीचे दोन आडवे भाग केलेले आहेत. खालच्या भागात चैत्यतोरणाकृती छपरांचे, तर वरच्या भागात सपाट छपरांचे कोनाडे किंवा देवळ्या आहेत. दोन्हींत देवमूर्ती बसवल्या आहेत. भिंतीच्या वरच्या बाजूला शिल्पपट्टात देव-देवता, अप्सरा, सुरसुंदरी अशा मूर्ती आहेत. तीन दिशांवरील रथांच्या मधल्या पट्‌ट्यात (प्रतिरथ) व्याल आहेत. तिन्हींकडील मुख्य कोनाड्यात गणेश, कार्तिकेय, पार्वती यांच्या मूर्ती आहेत. शिखराची बाह्याकृती मात्र सलग वाटत नाही. शिखर लहान आकारांच्या शिखरांच्या प्रतिकृतींचे मिळून झाले आहे. शिखराची उंची ४५ मी. असून जगमोहनाची उंची २५ मी. आहे. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले राजाराणी देऊळ हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीने वेधक ठरते. त्याचे पूर्वीचे नाव इंद्रेश्वर, पिवळसर वालुकाश्मात बांधलेल्या या देवळाच्या जगमोहनाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन स्तंभ असून त्यांवर नागमूर्ती आहेत. शिखर पंचरथ पद्धतीचे असून शिखरावर शिखराच्याच छोट्या प्रतिकृती आहेत. पश्चिम किंवा मध्य भारतातील देवळांप्रमाणे, विशेषतः खजुराहोच्या शिखराप्रमाणे, ही रचना आहे. यावरील शिल्पकाम लक्षणीय आहे. याचे शिखर भूमि-आमलकाने सात ठिकाणी विभागलेले आहे. भिंतीवर मिथुनशिल्पे आहेत. रथांवर शिल्पपट्ट आहेत. प्रतिरथांवर खालच्या पट्‌ट्यात व्याल, तर वरच्यात मिथुनशिल्पे आहेत. कलिंग शैलीची जोपासना भुवनेश्वर येथेच झाली व येथेच तिच्या वैशिष्ट्यांचे उत्तम दर्शन घडते. मंदिराच्या वास्तूची वृत्ती ही उंच झेपावत जाण्याकडे आहे. रथांची व शिखरांची आखणी व मांडणी या वृत्तीला पोषक अशीच आहे. या उभ्या रेषांचा तोल सांभाळण्यासाठी ठळक असे आडवे थरही आहेत. नागर मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरांच्या वास्तूतून प्रतीत होणारी घनता होय. ती परिणामकारक ठरेल अशाच पद्धतीचे उठावदार मूर्तिकाम या मंदिरांवर दिसते. या सर्व मंदिराकडे बारकाईने पाहिले, तर मंदिरांच्या बांधणीत थर व रथ यांचा वापर छायाप्रकाशाचा खेळ उठावदार करण्यासाठी केलेला असून त्यामुळे मंदिरावरील शिल्पसौंदर्यास उठाव येतो. मंदिराच्या शिखरांच्या बाह्यरेषा जंघेपर्यंत सरळ जाऊन वर एकदम आत वळतात तर काही मंदिरांची शिखरे गजपृष्ठासारखी आहेत. मंदिरावरील मूर्तिकामात मुख्यतः हिंदू देवदेवता, सुरसुंदरी, व्याल ह्या मूर्ती प्रमुख आहेत. सुरसुंदरीपैकी पत्रलेखन करणारी, पायात काटा मोडलेली, पैंजण बांधणारी अशा अनेक अवस्थांतील वेधक शिल्पाकृती आहेत. खजुराहोच्या मंदिराप्रमाणे येथील कामशिल्पांची संख्याही जास्त असून, ती उल्लेखनीय आहेत. या सर्व शिल्पाकृतींच्या बाह्यरेषा लालित्यपूर्ण असून कलिंग शैलीच्या मंदिरांचे ते एक भूषण आहे. वास्तूकला व मूर्तिकला या दोन्ही दृष्टींनी भुवनेश्वर येथील मंदिरांना स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.


शहरानजीकचा शिशूपाळगड प्रसिद्ध आहे. उदयगिरी व खंडगिरी ही जैनांची पुण्यक्षेत्रेही जवळच आहेत. उदयगिरी टेकडीतील अनेक गुंफापैकी हत्तीगुंफा ही खारवेल राजाच्या शिलालेखामुळे प्रसिद्ध आहे. खंडगिरी टेकडीत पाच गुंफा आहेत. त्यांतील इंद्रकेसरी गुंफेच्या पाठीमागील गुंफेत जैनांच्या २४ तीर्थकरांच्या मूर्ती आढळतात. तसेच कलिंगावरील स्वारीमुळे अशोकाचे हृदयपरिवर्तन झाले, त्याबाबतचा शिलालेख असलेले धोंली हे स्थळही जवळच आहे. शहरातील आधुनिक वास्तू, प्राचीन मंदिरे, आसमंतातील इतिहासप्रसिद्ध स्थाने इत्यादींमुळे येथे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते.

संदर्भ : 1. Gangooly, O. C. Goswami, A. Ed. Orissan Sculpture and Architecture, Calcutta, 1956.        

            2. Mitra, Debala, Ed. Bhubaneswara, New Delhi, 1976.

            3. Ramachandra Rao, P. R. Bhuvaneswara : Kalinga Temple Architecture, Hyderabad, 1980.

गाडे, ना. स. रानडे, उषा