ल्यूशस अनीअस सेनिकासेनिका, ल्यूशस अनीअस : (इ. स. पू. ४ – इ. स. ६५). रोमन नाटककार, तत्त्वज्ञ आणि वक्ता. जन्म स्पेनमधील कॉरद्यूबा (आजचे कॉर्दीव्हा) येथे एका श्रीमंत, प्रतिष्ठित कुटुंबात. सेनिकाचे संपूर्ण नाव ल्यूशस अनीअस सेनिका ऊर्फ धाकटा सेनिका. त्याचे वडील मार्कस किंवा ल्यूशस अनीअस सेनिका (इ. स. पू. सु. ५५ – इ. स. ३७ थोरला सेनिका) हे त्यांच्या वक्तृत्वशास्त्रावरील लेखनाबद्दल प्रसिद्ध होते. त्याचा मोठा भाऊ जूनिअस अनीअस गॅल्लिओ हा प्राचीन ग्रीसमधील अकीअ ह्या प्रदेशाचा प्रिकॉन्सल (एक सन्माननीय रोमन अधिकारपद) होता. त्याची आई हेल्विया ही सुसंस्कृत, विद्यावंत होती. फार्सालिया हे महाकाव्य लिहिणारा प्रसिद्ध रोमन कवी ⇨ ल्यूकन हा सेनिकाच्या धाकट्या भावाचा मुलगा.

बालपणीच सेनिका रोमला आला. तेथे एक वक्ता म्हणून त्याने प्रशिक्षण घेतले. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाचा–विशेषतः ⇨ स्टोइक मताचा–त्याने अभ्यास केला. इ. स. ३२ मध्ये तो क्वेस्टर (प्राचीन रोममधला अर्थविषयक प्रशासक) झाला. कॅलिगुला हा रोमचा सम्राट झाला (इ. स. ३७). एक प्रभावी वक्ता आणि लेखक म्हणून सेनिकाची ख्याती झालेली होती. त्याच्याबद्दल मत्सरग्रस्त होऊन विक्षिप्त स्वभावाच्या कॅलिगुलाने त्याला ठार मारण्याचा बेत केला होता तथापि त्यावेळी सेनिकाची प्रकृती इतकी ढासळलेली होती, की त्या अवस्थेतच तो मरेल, असे वाटल्यामुळे कॅलिगुलाने आपला बेत अमलात आणला नाही.

कॅलिगुलानंतर सम्राटपदी आलेल्या (इ. स. ४१) क्लॉडिअसने जूलिया ह्या त्याच्या निकटच्या नात्यातील मुलीशी व्यभिचार केल्याच्या आरोपावरून सेनिकाला हद्दपार करून कॉर्सिका येथे पाठविले पण हा आरोप बिनबुडाचा होता. क्लॉडिअसची बायको ॲग्रिप्पिना हिने बरेच प्रयत्न करून त्याला रोमला परत आणवले (इ. स. ४९) आणि आपला मुलगा नीरो ह्याचा शिक्षक म्हणून नेमले. इ. स. ५४ मध्ये क्लॉडिअसचा खून झाला आणि नीरो हा रोमचा सम्राट झाला. सेनिका आणि ‘प्रिफेक्ट ऑफ द गार्ड’ ह्या लष्करी अधिकारपदावर असलेल्या आणि सेनिकाच्या शक्तिमान मित्रवर्तुळातील एक असलेल्या सेक्स्टस अफ्रेनीअस बरस ह्यांचा प्रभाव त्यानंतर बराच वाढला आणि नीरोचे प्रशासन चांगल्या प्रकारे चालले. समर्थ आणि न्यायी प्रशासनव्यवस्था त्यांनी निर्माण केली तथापि नीरोला आवरणे त्यांना अवघड होत चालले. त्याच्यापुढे हतबल होऊन त्याच्या हट्टामुळे त्यांनी त्याच्या आईच्या–ॲग्रिप्पिनाच्या–खुनात सहभाग घेतला किंवा त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. इ. स. ६२ मध्ये बरस मरण पावल्यावर सम्राटाच्या सेवेत इत:पर राहणे अशक्य होणार ह्याची जाणीव होऊन सेनिकाने त्या सेवेतून निवृत्ती पत्करली. आपल्या निवृत्तीनंतरची वर्षे त्याने लेखन-वाचनात व्यतीत केली. तथापि इ. स. ६५ मध्ये सम्राट नीरोच्या खुनाच्या कटात सामील असल्याचा आरोप ठेवून त्याला आत्महत्या करावयास सांगितले गेले. अत्यंत शांतपणे तो मृत्यूला सामोरा गेला.

सेनिकाच्या ग्रंथांचे दोन विभाग पडतात : (१) तात्त्विक आणि (२) नाट्यकृती. पण ह्या दोन्ही विभागांत न बसणारा असा एक ग्रंथ त्याने लिहिला आहे, तो म्हणजे ‘पंप्किनिफिकेशन ऑफ द डिव्हाइन क्लॉडिअस’ (इं. शी.). हे एक राजकीय स्वरूपाचे औपरोधिक लेखन आहे. क्लॉडिअसचे दैवतीकरण हा त्याचा विषय असला, तरी पंप्किनिफिकेशन म्हणजे गोल गरगरीत भोपळ्यात रूपांतर करणे हा अर्थ लक्षात घेतला, म्हणजे या ‘दैवतीकरणा’ चा औपरोधिक आशय कळून येतो.

सेनिकाच्या तत्त्वज्ञानपर लेखनात आपले विचार मांडण्याचा उत्साह दिसून येतो. मानवी स्वभावातले दोष आणि जीवनाच्या व्यावहारिक मर्यादा ह्यांची जाण ह्या लेखनातून व्यक्त होते. त्याच्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांचा कालक्रम निश्‍चित करणे शक्य झालेले नाही तथापि त्यांतील अगदी थोडे त्याच्या हद्दपारीच्या आधी लिहिलेले आहेत, असे सामान्यतः मानले जाते.

‘डायलॉग्ज’ (इं. शी.) ह्या नावाने त्याचे दहा ग्रंथ (त्याचे एकूण खंड १२) आपल्यापर्यंत आलेले आहेत तथापि ‘डायलॉग’ म्हणता येईल, असा त्यांत एकच ग्रंथ आहे. अन्य ग्रंथांपैकी तीन हे अंशतः तत्त्वज्ञानात्मक आणि अंशतः काही व्यक्तींच्या शोकनिवारणार्थ आहेत. तीन ग्रंथ ‘क्रोध’ ह्या विषयावर आहेत. सुखी जीवनावरचे त्याचे विचार स्टोइक मताशी सुसंगत आहेत. निसर्गानुसार जगणे आणि सद्‌गुणांचे आचरण करणे म्हणजे सुख, असे तो मानतो. शहाण्या माणसाने संपादन केलेली संपत्ती आणि तिचा सदुपयोग ह्यांचे त्याने समर्थन केले आहे. आणखी तीन ग्रंथ एनीअस सेरेनस ह्याला उद्देशून लिहिलेले आहेत : (सर्व इं. शी.) ‘ऑन कॉन्स्टन्सी ऑफ वाइज मॅन’, ‘ऑन ट्रँक्विलिटी ऑफ माइंड’ आणि त्रोटक स्वरूपात मिळालेले ‘ऑन लेझर’.

सेनिकाच्या अन्य ग्रंथांत ‘नॅचरल क्वेश्‍चन्स’ (रचना इ. स. ६२–६३ इं. शी.) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सात ग्रंथांच्या समूहाचा अंतर्भाव होतो. काहीशा सैलपणाने रचलेल्या ह्या ग्रंथांत निसर्गविज्ञानावरची माहिती आहे. मध्ययुगात विश्वस्थितिशास्त्रावरचे प्रमाणग्रंथ म्हणून हे ग्रंथ मान्यता पावले.

सेनिकाच्या लेखनाचा दुसरा भाग म्हणजे त्याचे नाट्यलेखन. सेनिकाच्या नावावर एकूण दहा नाटके असून रोमन शोकात्मिकेची तेवढीच उदाहरणे आज उपलब्ध आहेत. ही दहा नाटके अशी : (सर्व इं. शी.) (१) ‘ॲगमेम्नॉन’, (२) ‘मॅड हर्क्यूलीज’, (३)‘ हर्क्यूलीजऑन इटा’, (४) ‘मीडिअ’, (५) ‘ईडिपस’, (६) ‘फीट्रा’, (७) ‘द फिनिशिअन विमेन’, (८) ‘थाय्‌स्टीज’,(९) ‘द ट्रोजन विमेन’, (१०) ‘ऑक्टेव्हिआ’.

ह्या नाट्यकृतींपैकी ‘द फिनिशिअन विमेन’ हे अपूर्ण आहे. ‘हर्क्यूलीज ऑन इटा’ ह्या नाटकाचा लेखक सेनिका की आणखी कोण, ह्याबद्दल वाद आहे. ‘ऑक्टेव्हिया’ (रोमन विषयावरची-नीरोचा घटस्फोट आणि त्याच्या पहिल्या बायकोला मिळालेली देहान्ताची शिक्षा–ही एकमेव उपलब्ध शोकात्मिका) ही नाट्यकृती सेनिकाची नसून ती उत्तरकालीन असण्याचा संभव आहे. पुराणकथांवरील नाट्यकृतींसमोर अभिजात ग्रीक नाट्यकृतींचा मूलादर्श असतो. तथापि सेनिकाने त्याच्या नाट्यकृती ⇨ एस्किलस, ⇨ सॉफोक्लीझ, ⇨ युरिपिडीझ ह्यांसारख्या अभिजात ग्रीक नाटककारांच्या नाट्यकृतींवर थेटपणे आधारल्या नाहीत, तर उत्तरकालीन–हेलेनिस्टिक–कालखंडातील नाट्यकृतींवर आधारल्या, असे दिसते.

सेनिकाच्या शोकात्मिका पाच अंकी आहेत. त्यांना आरंभक आहेत. त्यांत नाटकातल्या घटनांवर भाष्य करणारा आणि त्यांच्यामागची तत्त्व-चिंतनात्मक पार्शभूमी सांगणारा वृंद आहे. त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या भावकविता लॅटिनमधील उत्कृष्ट भावकवितांत मोडतात. नाटकांतली भाषणे आलंकारिक आणि कधी कधी दीर्घ असतात. सेनिकाला माणसांचे विकार चित्रित करण्यात अधिक रस होता. त्या विकारांचे माणसांवर होणारे घातक परिणाम त्याला तुलनेने दुय्यम स्वरूपाचे वाटतात. हिंसा आणि विकृत मानसिकता ह्यांचा त्याच्या नाटकांत दिसणारा प्रभाव ह्यांमुळे त्याच्या नाटकांच्या आवाहनाला काही कालखंडांत मर्यादा पडलेल्या दिसतात. प्रबोधनकाळात यूरोपीय रंगभूमीवर त्याचा प्रभाव मोठा होता. एलिझाबेदन कालखंडातील रक्तपाती सूडांची मुळे सेनिकाच्या नाटकांत आढळतात. त्याचप्रमाणे ह्या कालखंडातील नाटकांतल्या निर्यमक कवितेचे मूळही सेनिकाच्या कवितांपर्यंत नेता येते, असे अभ्यासकांना वाटते. व्हिक्टोरियन कालखंडातील अभ्यासकांना सेनिकाच्या नाटकांतून प्रकट होणारे हिंसाचारी जग अवास्तव वाटले. ह्या मताचे प्रतिध्वनी अजूनही कधी कधी साहित्येतिहासांतून उमटतात तथापि विसाव्या शतकात सेनिकाच्या नाट्यकृतींकडे पुन्हा लक्ष वेधले गेले. समकालीन रंगभूमीवर त्याचा प्रभाव नव्याने जाणवू लागला असून त्याच्यावर नवे अभ्यासपूर्ण लेखनही होत आहे.

संदर्भ : 1. Arnold, E. Vernon, Roman Stoicism, 1911.

           2. Ball, Allen Perley, The Satire of Seneca on the Apotheosis of Claudius, 1902.

           3. Cunliff, John William, The Influence of Seneca on Elilzabethan Tragedy, 1893.

           4. Gummere, Richard Mott, Seneca the Philosopher and His Modern Message, 1922.

           5. Holland, Francis C. Seneca, 1920.

           6. Lucas, Frank Laurence, Seneca and Elizabethan Tragedy, 1922.

           7. Mendell, Charles W. Our Seneca, 1971.

 

 कुलकर्णी, अ. र.