व्हर्जिल : (१५ ऑक्टोबर ७० –२१ सप्टेंबर १९ इ. स. पू.). थोर रोमन महाकवी. लॅटिन भाषेतील ⇨ईनिड ह्या रोमनांच्या राष्ट्रीय महा- काव्याचा कर्ता. सिसॅल्पाइन गॉल ह्या रोमन प्रांतातील अँडीझ ह्या लहानशा गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मला. ह्याचे शिक्षण क्रेमोना, मिलान, नेपल्स आणि रोम येथे झाले. रोम येथे त्याने तत्त्वज्ञान, वक्तृत्वशास्त्र ह्यांसारख्या विषयांचा अभ्यास केला.⇨एपिक्यूरस मताचा अनुयायी असलेला सायरॉन हा रोम येथे त्याचा एक शिक्षक होता. व्हर्जिलच्या आरंभीच्या काही कवितेवर एपिक्यूरस मताचा काही प्रभावही दिसून येतो. ग्रीक व रोमन साहित्याचा –विशेषतः ग्रीक –रोमन कवींचा – त्याने उत्तम अभ्यास केला होता. शिक्षण संपवून व्हर्जिल पुन्हा आपल्या घरी परतला असे दिसते. त्याचे शेतीचे ज्ञान जॉर्जिक्स ह्या त्याच्या कृषिकाव्यात स्पष्टपणे प्रतिबिंबित झाले आहे.

व्हर्जिल

व्हर्जिलच्या तरुणपणी इटलीतील वातावरण गोंधळाचे होते. तेथे सतत यादवी युद्धे चालू होती. इ. स. पू. ३१ मध्ये ऑक्टियमच्या आरमारी युद्धात ऑक्टेव्हिअनने अँटोनीचा पराभव केल्यानंतर इटलीतील अशांतता आणि अस्वस्थता संपुष्टात आली. हे होण्यापूर्वीच्या काळात व्हर्जिलच्या वडिलांचे शेत, त्यांच्या भागातल्या इतरांच्या जमिनींबरोबरच सरकारजमा करण्यात आले होते. व्हर्जिलला कवी म्हणून मान्यता मिळू लागल्यानंतर राजकीय प्रभाव असलेल्या तसेच विद्याकलांविषयी प्रेम असलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची मैत्री त्याला लाभली. अशाच काही मित्रांच्या साहाय्याने व्हर्जिलला त्याचे घरचे शेत परत मिळाले असे दिसते. ऑक्टेव्हिअनची (हाच पुढे सम्राट ऑगस्टस म्हणून ओळखला जाऊ लागला) मर्जीही व्हर्जिलला लाभली. रोम, कांपानीया, नेपल्स आणि नोला येथे त्याला वेळोवेळी राहण्यासाठी सम्राट ऑगस्टसने निवासस्थानेही उपलब्ध करून दिली होती.

व्हर्जिलची उपलब्ध असलेली अगदी आरंभीची काव्यरचना म्हणजे ‘एक्लॉग्ज’ हा दहा गोपकवितांचा संग्रह होय (रचना ४२ ते ३७ इ. स. पू.). गोपगीतांचा जनक समजला जाणारा ग्रीक कवी ⇨थिऑक्रिटस ह्याचा प्रभाव ह्या गोपगीतांवर दिसून येतो. मेंढपाळांचे संथ, शांत जीवन, त्यांच्या जीवनातील सुखदु:खे, त्यांचे खेळ ह्यांचे चित्रण व्हर्जिलने ह्या गोपगीतांतून केलेले आहे. प्रत्यक्षात मात्र इटलीतले मेंढपाळांचे जीवन कवितांतील मेंढपाळांच्या जीवनासारखे संथ, शांत नव्हते. पाचव्या गोपगीतात धनगरांचा राजा डॅफ्नीस ह्याच्या मृत्यूचा विषय आहे.

चौथे गोपगीत हे भविष्यसूचक म्हणून महत्त्व पावलेले आहे. एक बालक जन्माला येणार असून त्याच्या आगमनामुळे सुवर्णयुग अवतरणार आहे आणि पाप नष्ट होऊन सर्वत्र शांती पसरणार आहे, अशी भविष्यवाणी ह्या गोपगीतात दिसते. ख्रिस्तजन्माच्या आणि ख्रिस्ती धर्माच्या उदयाचे सूचन ह्या कवितेतून केले आहे, असा याचा अर्थ काही ख्रिस्ती लेखकांनी लावला. ह्या गोपगीताचे इतरही काही अर्थ लावले गेलेले आहेत. उदा., मार्क अँटोनी आणि त्याची पत्नी ऑक्टेव्हिया यांना होऊ घातलेल्या अपत्याचा हा निर्देश असावा, असेही मानले जाते. तथापि ह्या कवितेचा आंतरिक आशय कोणत्याही विवक्षित प्रसंगाच्या पलीकडे जाणारा असून सुसंवादित्वाने भारलेल्या जगाचे एक स्वप्न प्रतीकात्मकतेने मांडण्याचा हा प्रयत्न आहे, असेही जाणवते. सहाव्या गीतात विश्वोत्पत्तीचा विषय काहीशा मिथ्यकथात्मक पद्धतीने मांडलेला आहे. थिऑक्रिटस आणि व्हर्जिल ह्यांच्या गोपकविता पुढील कवींना आदर्शवत् ठरल्या.

इटलीतील यादवी युद्धांत भाग घेण्यासाठी आपली शेते सोडून गेलेले शेतकरी, त्यांची उजाड झालेली शेते आणि शांतता प्रस्थापनेनंतर कृषीव्यवस्था सुस्थिर करण्याची आवश्यकता ह्यांचा संदर्भ पाहता व्हर्जिलच्या जॉर्जिक्सचे महत्त्व सहज जाणवण्यासारखे आहे. शेती, वृक्षपालन, पशुपालन असे विषय ह्या कृषिकाव्यात आलेले आहेत.

इटलीतील यादवी युद्धे संपल्यानंतर रोमन जगताचा एकमेव सत्ताधीश ह्या नात्याने रोमन जगात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करणे, रोमनांमधील राष्ट्राभिमानाचे पुनरुज्जीवन करणे, ह्यांसाठी सम्राट ऑगस्टस प्रयत्नशील होता. ह्या पार्श्वभूमीवर व्हर्जिलने ईनिड रचले. ह्या काव्यात रोमन साम्राज्याचा उदय आणि विकास गौरवण्याची, रोमन राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्याची आणि ऑगस्टसच्या राजवटीचे समर्थन करण्याची भावना दिसून येते. रोमनांना ह्या महाकाव्यात त्यांचे आदर्श, त्यांची मूल्ये, त्यांचे कर्तृत्व ह्यांचा प्रत्यय आला. त्यांनी व्हर्जिलला राष्ट्रीय महाकवी मानले. ईनिडमध्ये रूपकार्थ शोधण्याचे-विशेषत: ख्रिस्ती दृष्टिकोणातून-प्रयत्न झाले. व्हर्जिल हे महाकाव्य पूर्ण करू शकला नाही. याचे बाराच सर्ग आज आपल्यासमोर आहेत. ब्रंड्यूझिअम येथे तो निधन पावला.

व्हर्जिलचा प्रभाव त्याच्या नंतरच्या कवींवर-विशेषत: ऑव्हिडवर पडला. महाकवी दान्तेने आपल्या ’डिव्हाइन कॉमेडी’ (इं. शी.) मध्ये व्हर्जिलचा गौरव केला. एडमंड स्पेन्सर, जॉन ड्रायडन, जॉन ड्रायडन, जॉन मिल्टन इ. इंग्रजी कवीही व्हर्जिलच्या काव्याने प्रभावित झालेले होते.

संदर्भ : 1. Berg, William, Early Virgil, 1974.

            2. Camps, W. A. An Introduction to Virgil’s Aeneid, Oxford, 1969.

            3. Miles, Gary B. Virgil’s Georgics : A New Interpretation, London, 1980.

            4. Otis, Brooks, Virgil : A Study in Civilized Poetry, Oxford, 1963.

            5. Rose, Herbert J. Eclogues of Virgil, 1942.

कुलकर्णी, अ. र.