आन्नालेस: एक लॅटिन इतिहासग्रंथ. ऑगस्टसच्या मृत्यूपासून गॅल्बच्या राज्यप्राप्तीपर्यंत (इ.स. १४-६८) लिहिलेला रोमच्या राज्यकर्त्यांचा इतिहास. हा ð टॅसिटसने इ. स. ११५ -११७च्या सुमारास लिहिला. या ग्रंथामुळे त्याला ताबडतोब प्रसिद्धी मिळाली. या इतिहासाचे एक ते चार हे खंड पूर्णत: उपलब्ध आहेत पाचवा व सहावा खंड अंशतःच उपलब्ध आहे अकराव्या खंडाची सुरुवात व सोळाव्या खंडाचा शेवट सोडून अकरा ते सोळा हे खंड संपूर्णपणे उपलब्ध आहेत. त्याची लेखनशैली साक्षेपी, परंतु काही ठिकाणी दुर्बोध आहे. उपरोधपूर्ण, मार्मिक आणि चटकदार म्हणी वापरून त्याने आपले लेखन सजविले आहे. आपण निःपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ आहोत असा टॅसिटसचा दावा असला, तरी त्याच्या या ग्रंथातून त्याचा तत्कालीन रिपब्लिकन पक्षाकडे असलेला ओढा स्पष्टपणे दिसून येतो. या ग्रंथात काही उत्तम वर्णने आलेली आहेत. उदा., व्हेअरस या सेनापतीवर ओढवलेल्या अरिष्टानंतर त्या ठिकाणी झालेले रोमन सैन्याचे आगमन (खंड पहिला) आणि इ. स. ६४ मधील रोमच्या भीषण आगीचे वर्णन (खंड पंधरावा).

हंबर्ट, जॉ, (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)