समुद्रपुष्प : हे नाव अँथोझोआ वर्गातील ॲक्टिनियारिया गणातील आंतरगुही (सीलेंटेरेट) प्राण्यांच्या सु. एक हजार जातींना दिले जाते. हे प्राणी फुलांसारखे असून त्यांचे रंग चमकदार असतात. ते सर्वत्र सागरांत आढळतात, अधिक मोठे प्राणी समशीतोष्ण प्रदेशात उष्ण सागरांत सापडतात. बहुतेक प्राणी एकएकटे राहतात, पण काहींच्या वसाहती असतात.

अश्म प्रवाळाशी त्यांचे जवळचे नाते असते. पण समुद्रपुष्पात कधीही अंतर्गत चुनकळीचे कंकाल (सांगाडा) नसते. मात्र बाह्यावरणात पृष्ठस्थ कंकाल तयार झालेले असते. सामान्यतः ते खडकाला किंवा दगडांच्या ढिगाऱ्याला चिकटलेले असतात पण काही वाळू किंवा चिखलात बिळे पाडून राहतात. शंखवासी खेकडा राहत असलेल्या शंखावर काही प्राणी सहभोजी (आधार घेऊन एकत्रित अन्न मिळविणे) म्हणून चिकटलेले असतात. काही थोडे जेलिफिशामध्ये खरे परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारे) असतात.

त्यांचे नाव जरी समुद्रपुष्प असले, तरी अगदी थोडे प्राणीच अनिमोन वनस्पतीच्या अनिमोन क्विंकिफोलिया फुलोऱ्यासारखे असतात. बहुसंख्य प्राणी डेलिया किंवा शेवंतीच्या फुलांसारखे दिसतात. आदर्श समुद्रपुष्पाचे शरीर धडधाकट व कमी-जास्त प्रमाणात दंडगोलाकार असते. त्याच्यावरच्या भागात रूंद, पसरट तबकडी (बिंब) असते. तबकडीमध्ये फटीसारखे तोंड असते. ते साध्या पोकळ संस्पर्शकांनी वेढलेले असते. संस्पर्शक फुलांच्या पाकळ्यांसारखे दिसतात. तोंडापासून आखूड नलिकाकार अन्ननलिका शरीरपोकळीत जाते. ती देहभित्तीला अरीय (त्रिज्यीय) आंत्रबंधांनी (पटलांनी) जोडलेली असते. आंत्रबंधांनी देहगुहा अनेक संबंधित कोशांत विभागलेली असते. सायफोनोग्लिफांची (पक्ष्माभिकीय खाचा) एक जोडी अन्ननलिकेच्या विरूद्ध बाजूंनी पुढे व संबंधित मुखाच्या कोपऱ्यात जाते. ते नेहमी उघडे असतात व त्यातूनच पाण्याचा प्रवाह आत-बाहेर जात असतो. त्यातूनच शरीरातील टाकाऊ द्रव्ये बाहेर टाकली जातात.

देहभित्ती, तसेच संस्पर्शक हे त्यांच्यापासून आलेले प्रवर्ध (वाढी) असतात. हे दोन्ही आकुंचनशील असून त्यांचे स्नायू गोल व उभ्या स्तरांत रचलेले असतात. गोल स्तरांमुळे विस्तारण होते व उभ्या स्तरांमुळे प्रतिकर्षण (आत ओढून घेणे) होते. या स्नायूंच्या आंत्रबंधाशी विशेष संबंध असतो. आंत्रबंध उदग (ऊर्ध्व) अरीय पटल असून मुखबिंबापासून तळापर्यंत जाते व देहभित्तीपासून अन्ननलिकेपर्यंत जाते. त्यांची रचना अगदी अरीय असते असे नाही पण बहुधा संस्पर्शकांसारखे त्यांच्या जोडयंचे गट असतात. आंतरआंत्रबंध कोश पुढे प्रत्येक आंत्रबंधाशी एक किंवा दोन छिद्रांनी जोडलेले असतात.

पटलाच्या कडेने वृषण व अंडकोश विकसित होतात. ते जठर-गुहेच्या अस्तर कोशिकांपासून विकसित होतात. याच भागात पाचक कोशिका आढळतात. त्यांच्या जोडीला दंश-कोशिकांनी (चावा घेणाऱ्या आणि संरक्षक व भक्ष्य पकडणाऱ्या दोरीसारख्या अवयवांनी) भरलेला भाग असतो.

समुद्रपुष्पातील फरक ओळखण्यासाठी पटल व संस्पर्शकांची रचना यांचा उपयोग होतो, मात्र रंग व आकार यांना या कामी कमी महत्त्व असते.

विशेषत: उष्ण कटिबंधातील प्रकारांचे रंग खूप सुंदर असतात. त्यांचा सरासरी व्यास ६४-७६ मिमी. व उंची १०० मिमी. असते.

समुद्रपुष्पे मांसाहारी असतात, पण हालचालींवर मर्यादा पडत असल्यामुळे त्यांच्या संस्पर्शकांवर पडणाऱ्या अन्नावरच ते अवलंबून असतात. दंशकोशिकांनी अन्नाची हालचाल बंद पडते किंवा संस्पर्शकांनी ते पकडून पचनासाठी जठरकोष्ठात ढकलले जाते. न पचलेले अन्न मुखावाटेच बाहेर टाकले जाते. ते भरपूर अन्न खातात व झटपट आकाराने मोठे होतात. उपासमार झाल्यास आकसून ते बिंदुवत होतात पण त्यांचे स्वरूप बदलत नाही.

समुद्रपुष्पांचे प्रजोत्पादन अलैंगिक व लैंगिक पद्धतींनी होते. अलैंगिक पद्धतीत मुकुलन व विभाजन होते. लैंगिक पद्धतीत भिन्न प्राण्यांकडून शुकाणू व अंडकोश निर्माण केले जातात. अंडयंचे फलन जठरकोष्ठात होते. ती तोंडावाटे बाहेर पडतात व त्यांचे प्लॅन्यूला डिंभ पाण्यात मुक्त संचार करतात. लवकरच हे डिंभ आधाराला चिकटतात आणि प्रौढदशा प्राप्त होईपर्यंत मुख, संस्पर्शिका व आंत्रबंध विकास पावतात.

संदर्भ : Hyman, L. H. The Invertebrates (Vol. I), New York, 1940.

चिन्मुळगुंद, वासंती रा. जमदाडे, ज. वि.