शिंगाळा (मिस्टस सिंघाला)मार्जारमीन : हे मासे सायप्रिनिफॉर्मीस (ऑस्टॅरिओफायझी) या गणातील सिल्युरॉयडी या उपगणात मोडतात. यांच्या तोंडाभोवती मांजराच्या मिशांसारखे दिसणारे लांब अभिमर्श किंवा स्पृशा (स्पर्शग्राही वाढी) असतात. यावरूनच यांना मार्जारमीन हे नाव पडले असावे. सिल्युरॉयडी उपगणातील माशांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीरातील वाताशय (हवेची पिशवी) यांच्या आंतरकर्णाशी लहानलहान अस्थींनी जोडलेला असतो. या रचनेमुळे यांची श्रवणक्षमता वाढत असावी. तोंडाभोवती असलेल्या स्पृशांपैकी एक जोडी नेहमी वरच्या जबड्यावर आढळते. बाकीच्या स्पृशांपैकी एक जोडी हनुवटीखाली तर दुसरी नाकपुडीच्या झडपांवर आढळते. मार्जारमिनांच्या सु. २,००० जाती २८ कुलांत विभागल्या आहेत. हे मासे अपमार्जक आहेत व ते कोणत्याही प्राण्यावर किंवा वनस्पतीवर आपली उपजीविका करतात. मोठ्या आकाराच्या मार्जारमिनांचा मानवाचे अन्न म्हणून उपयोग होतो. यांच्या काट्यांशी संलग्न असलेल्या ग्रंथींतील विष दुःखदायक असते पण त्यामुळे मृत्यू होत नाही. इओसिन काळापासूनचे (सु. ५·५ कोटी वर्षांपूर्वीपासूनचे) यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) सापडले आहेत.

मार्जारमीन गोड्या पाण्यात व खाऱ्या पाण्यातही आढळतात. उत्तर अमेरिकेत आढळणारे गोड्या पाण्यातील मार्जारमीन मुख्यतः इक्टाल्युरिडी कुलातील आहेत. यांच्या पृष्ठपक्षावर (पाठीवरील परावर पर म्हणजे हालचालीस अथवा तोल सावरण्यास उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुमय घडी) काटा असतो व पुच्छपक्ष (शेपटावरील पर) मांसल असतो. डोके सपाट, तोंड टोकास, जबड्यावर दात व तोंडाभोवती आठ स्पृशा असतात. याचे वजन ७० किग्रॅ. पर्यंत असू शकते. हे मासे चिखलात घरटे करतात. मादी त्यात अंडी घालते नर रक्षण करतो व पिल्ले जन्मल्यावर त्यांना घेऊन जातो. या कुलातील काही जातींचे मासे पाच ते सात सेंमी. लांबीचे असतात व त्यांच्या वक्षीय काट्यांनी अत्यंत वेदना देणाऱ्या जखमा होऊ शकतात. यूरोपात आढळणाऱ्या मार्जारमिनांत सिल्युरस ग्लानीस ही जाती प्रसिद्ध आहे. हे मासे ‘वेल्स’ या नावाने जर्मनीत ओळखले जातात. यांची लांबी ३ मी. व वजन २५० किग्रॅ. पर्यंत असू शकते. दक्षिण व मध्य अमेरिकेत यांची आदमासे ११ कुले व पुष्कळ जाती आहेत. आफ्रिका व आशिया खंडांत क्लॅरिडी कुलातील मार्जारमीन मुख्यतः आढळतात. या मार्जारमिनांत क्लोमाच्या (कल्ल्याच्या) वरील भागात एक गुहा असते. क्लॅरिअस प्रजातीच्या मार्जारमिनांच्या या गुहेत वृक्षासारख्या फांद्या असलेली एक वाहक संरचना असते. सॅकोब्रँकस कुलातील मार्जारमिनांत अशी संरचना नसते. त्याचा वाताशय शरीराच्या मागल्या भागात जास्त लांबवर पसरलेला असतो. आशियातील काही मार्जारमिनांच्या शरीरामध्ये खडबडीत डोंगरातून वाहणाऱ्या जलद प्रवाहांत जुळवून घेण्यास योग्य असे अनुकूलन झालेले असते. आफ्रिकेतील काही मार्जारमिनांत विद्युत्‌ अंग असते.

खाऱ्या पाण्यात राहणारे थोडे मार्जारमीन आहेत. हे बव्हंशी ॲरिडी व प्लॅटोसीडी कुलांतील आहेत. यांच्या अंड्यांचा आकार मोठा असतो व ही अंडी नर आपल्या तोंडात बाळगतो.

कीटकांच्या अळ्या, लहान प्राणी व वनस्पती यांवर हे आपली गुजराण करतात. थायलंडमधील एका जातीचा मार्जारमीन शाकाहारी आहे व त्याची लांबी २ मी. इतकी होते. काही लहान सागरी मार्जारमीन इतर मोठ्या मार्जारमीनांच्या तोंडात राहतात व मोठ्या माशांच्या कल्ल्यास जखमा करून त्यांतून येणारे रक्त अन्न म्हणून घेतात.

गोड्या पाण्यातील मार्जारमीन खाद्य म्हणून वापरतात. मिसिसीपी नदीतील मार्जारमिनांचे वजन सु. ६८ किग्रॅ. असते, तर यूरोपीय मार्जारमिनांचे वजन ३१५ किग्रॅ.पर्यंत असू शकते. खाऱ्या पाण्यातील मार्जारमीन खाण्यास वापरत नाहीत. विद्युत्‌ मार्जारमीन मूळचे नाईल प्रदेशातील आहेत. हे व पारदर्शक असणारे काचमार्जारमीन बंदिस्त स्थितीत (मत्स्यालयात) ठेवता येत नाहीत. मार्जारमिनांची आणखी एक जात आहे. या जातीच्या माशांच्या अंगावर खवल्यांऐवजी तकटे असतात. हे मासे बंदिस्त स्थितीत राहू शकतात.

महाराष्ट्रात मार्जारमिनांच्या सु. तेरा जाती आहेत. हे मासे लाँगलाइन वा फास जाळ्यांनी पकडतात. यांपैकी बऱ्याच जातींचा पूरक अन्न म्हणून उपयोग होतो. महाराष्ट्रात दरवर्षी ५,००० टन हे मासे पकडले जातात.

पहा : मत्स्य वर्ग.

जमदाडे, ज. वि.