सेनेबिए (सेनेबायर), झां : (६ मे १७४२-२२ जुलै १८०९). स्विस वनस्पतिवैज्ञानिक व निसर्गवैज्ञानिक. हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या प्रभावाखाली कार्बन डाय-ऑक्साइड वायू घेतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात, असे त्यांनी प्रयोगांद्वारे दाखविले.

सेनेबिए यांचा जन्म जिनीव्हा येथे झाला. त्यांचे वडील श्रीमंत व्यापारी होते. सेनेबिए यांनी धर्मशास्त्राचे अध्ययन केले. १७६५ मध्ये त्यांना आचार्यपदाची दीक्षा देण्यात आली. १७६९ मध्ये ते स्वित्झर्लंडमधील चॅन्सी येथील चर्चचे पॅस्टर (ख्रिस्ती पालक) झाले व १७७३ पर्यंत ते तेथे होते. त्याच वर्षी त्यांची जिनीव्हा येथे नगर वाचनालयाचे ग्रंथपाल म्हणून नेमणूक झाली. १७८६ मध्ये त्यांचा साहित्यविषयक महत्त्वाचा ग्रंथ Historie Litteraire de Geneve प्रसिद्ध झाला.

दरम्यानच्या काळात सेनेबिए यांनी वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. १७८७ मध्ये ते Encyclopedie Methodique या विश्वकोश कर्मचारीवृंदात दाखल झाले. तेथे वनस्पती शारीरक्रियाविज्ञानावरील विभाग उभारण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी वनस्पतिविज्ञानात मोलाची भर घातली. या दृष्टीने त्यांचे पुढील शीर्षकार्थ असलेले लेखन महत्त्वाचे आहे : वनस्पतींवरील सूर्यप्रकाशाच्या प्रभावाविषयीची भौतिक-रासायनिक टिपणे (१७८२), वनश्रीवरील सूर्यप्रकाशाच्या क्रियेसंबंधीचे प्रयोग (१७८८). त्यांचा प्रमुख ग्रंथ Physiologie Vegetale (‘वनस्पतींचे शारीरक्रियाविज्ञान’) १८०० मध्ये पूर्ण झाला.

कार्बन डाय-ऑक्साइड वायूच्या वनस्पतींमधील स्थिरीकरणाला कारणीभूत असणारा कारक म्हणजे सूर्यप्रकाश होय आणि केवळ कार्बन डाय-ऑक्साइड वायूच्या उपस्थितीतच हिरव्या वनस्पतींतून ऑक्सिजन मुक्त होतो, हे त्यांनी या ग्रंथाद्वारे जगासमोर आणले. नंतरच्या काळात प्रकाशसंश्लेषणाविषयी झालेल्या संशोधनकार्याच्या दृष्टीने सेनेबिए यांचे हे संशोधनकार्य मूलभूत महत्त्वाचे होते. कारण प्रकाशसंश्लेषणात प्रकाशीय ऊर्जेचा उपयोग करून वनस्पती हरितद्रव्याच्या साहाय्याने कार्बन डाय-ऑक्साइड वायू आणि पाणी यांच्यापासून साधी कार्बोहायड्रेटे तयार करतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात.

सेनेबिए यांचे जिनीव्हा येथे निधन झाले.

पहा : प्रकाशसंश्लेषण.

जमदाडे, ज. वि.