पाणबुडा: (ॲनहिंगा रूफा)पाणबुडा: पाणकावळा  ज्या पक्षी कुलातील आहे त्याच फॅलॅक्रोकोरॅसिडी कुलातील हा पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव ॲनहिंगा रूफा  असे आहे. हा भारतात सगळीकडे आढळतो. नद्या, सरोवरे, तलाव, तळी वगैरे गोड्या पाण्याच्या जलाशयांच्या काठावर हा नेहमी राहणारा आहे. खाड्या आणि नदीमुखांच्या जवळ हा क्वचित दिसून येतो पण समुद्रकिनाऱ्यावर तो केव्हाही आढळत नाही.

घारी पेक्षा हा थोडा मोठा असतो. लांबी सु. ९० सेंमी. असते मान पुष्कळ लांब आणि तपकिरी डोळ्याच्या वर एक बारीक पांढरी रेषा मानेच्या दोन्ही बाजूंवर डोळ्यापासून निघून मानेच्या सु. अर्ध्या भागापर्यंत गेलेली एक पांढरी रेषा हनुवटी आणि गळा पांढरा शरीराचा रंग काळा आणि पाठीवर रुपेरी करड्या रेषा चोच सरळ, लांब, बारीक, अणकुचीदार व काळी पाय काळे, बोटे पातळ कातडीने जोडलेली शेपटी लांब व ताठ नर व मादी दिसायला सारखी असतात. हे एकेकटे किंवा यांच्या लहान टोळ्या असतात.

हा उत्तम पोहणारा, बुड्या मारणारा व उडणारा पाणपक्षी असून तो झाडावरही बसू शकतो. पोहताना याचे डोके आणि मान पाण्याच्या वर असतात. मासे हे याचे भक्ष्य होय. पाण्यात बुड्या मारून तो माशांचा पाठलाग करतो व त्यांना पकडतो. कधीकधी बसल्या जागेवरून सूर मारून तो मासा पकडतो. पाण्याच्या काठावरील एखाद्या झाडाच्या पुढे आलेल्या फांदीवर विश्रांती घेत असताना जर आपण यांना हुसकले, तर ते झाडावरून धडाधड धोंड्याप्रमाणे पाण्यात पडतात व बुडी मारून निरनिराळ्या दिशांना जातात. बऱ्याच अंतरावर जाऊन मग ते पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. यांचा आवाज घोगरा असतो. प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात जून–ऑगस्ट आणि दक्षिणेत नोव्हेंबर–फेब्रुवारी असतो. पाणकावळे व बगळे ज्या झाडांवर घरटी बांधतात. त्याच झाडांवर पाणबुडेही आपली घरटी बांधतात. सामन्यतः या वसाहती पाण्याच्या काठावरील झाडांवर असतात. घरटे काटक्याकुटक्यांचे व ओबडधोबड असते. मादी फिक्कट हिरव्या-निळ्या रंगाची ३ किंवा ४ अंडी घालते. 

कर्वे, ज. नी.