मार्शल व्ह3रशिलॉव्ह्व्हरशिलॉव्ह, क्ल्यीम्येंट यिफ्रयमव्ह्यिच : (४ फेब्रुवारी १८८१ –२ डिसेंबर १९६९). सोव्हिएट रशियाचा अध्यक्ष (१९५३-६०) व सेनानी. यिकट्यिरीनस्लाफ प्रांतातील (युक्रेन) व्हेर्कनी या खेड्यात एका श्रमजीवी कुटुंबात जन्म. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्याने कामगार म्हणून विविध ठिकाणी काम केले. पुढे रशियन डेमॉक्रॅटिक पक्षाचा तो सक्रिय सभासद झाला (१९०३). या सुमारास लुगान्स्क (व्होरोशीलव्हग्रॅड) येथे त्याने बोल्शेव्हिकांचा जहाल गट संघटित केला आणि तेलखाणीतील मजुरांचे आंदोलन छेडले. तसेच पेट्रग्राडमध्ये (सेंट पीटर्झबर्ग) भूमिगत क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. या कारवायांमुळे अनेकदा त्यास तुरुंगवास भोगावा लागला व हद्दपारीस तोंड द्यावे लागले. रशियन राज्यक्रांतीनंतरच्या यादवी युद्धात (१९१८ –२०) तो लाल सेनेचा सेनाधिकारी तसेच दक्षिण रशियात आणि युक्रेनमध्ये पोलीसप्रमुख होता. लेनिनच्या मृत्यूनंतर (१९२४) स्टालिन सत्ताधीश झाला. त्याने व्हरशिलॉव्ह याला संरक्षण-मंत्री नेमले (१९२५). दुसर्यां महायुद्धातील रशियाच्या बाल्टिक आघाडीवरील पीछेहाटीस व्हरशिलॉव्हला जबाबदार धरण्यात येऊन त्याचे संरक्षण-मंत्रिपद काढून घेण्यात आले (१९४१). महायुद्धोत्तर काळात हंगेरीतील सोव्हिएट नियंत्रक आयोगाचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झाली (१९४५ – ४७). ⇨ न्यिक्यित खुश्चॉव्हच्या कारकिर्दीत व्हरशिलॉव्हची सोव्हिएट रशियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली (१९५३). १९६० साली त्याने अध्यक्षपदाचा तसेच पक्षकार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. १९५७ मधील पक्षविरोधी गटाच्या कारवायांत भाग घेतल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर जाहीर टीकाही करण्यात आली. मॉस्को येथे त्याचे निधन झाले.

संकपाळ, ज. बा