बेर्नार, क्लोद : (१२ जुलै १८१३-१० फेब्रुवारी १८७८). फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिक. आधुनिक शरीरक्रियाविज्ञानातील पचनतंत्र (पचनसंस्था) व वाहिनी-प्रेरक तंत्र (रक्तवाहिन्यांच्या भित्तींच्या आकुंचनावर व प्रसरणावर नियंत्रण ठेवणारे तंत्र) यांवरील मूलभूत संशोधनाद्वारे या विषयांचा पाया घालणारे शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध. ते प्रायोगिक वैद्यकाचे संस्थापक मानले जातात.

बेर्नार यांचा जन्म फ्रान्स मधील सीं झ्युली येथे झाला. लीआँ येथील महाविद्यालयात त्यांनी शिक्षणास प्रारंभ केला पण एका औषधाच्या दुकानात सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी शिक्षण सोडून दिले. पुढे १८३४ मध्ये ते साहित्यक्षेत्रात नाटककार म्हणून नाव मिळविण्याच्या उद्देशाने पॅरिसला गेले पण तेथे सॅं-मार्क झीरारदॅं या नावाजलेल्या टीकाकारांनी सुचविल्यावरून ते वैद्यकाकडे वळले. त्याच वर्षी त्यांनी पॅरिस मधील वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळविला. १८३९ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते फ्रान्स्वा माझॅंदी या सुप्रसिद्ध शरीरक्रियावैज्ञानिकाच्या हाताखाली हॉतेल द्यू या रुगणालयात काम करू लागले.माझॅंदी यांच्या उपरुग्ण वैद्यकिय ज्ञानापेक्षा त्यांच्या प्रायोगिक शरीरक्रियावैज्ञानिक कार्याकडे, विशेषेकरून त्यांच्या प्रयोगशाळेकडे, बेर्नार अधिक आकर्षित झाले. १८४१-४४ मध्ये माझॅंदी यांनी केलेल्या तंत्रिका तंत्रावरील (मज्जा संस्थेवरील) व इतर काही प्रयोगांमध्ये बेर्नार यांनी मदतनीसाचे काम केले. १८४३ मध्ये त्यांनी पॅरिसची एम्‌. डी. पदवी  मिळविली पण त्यांनी वैद्यकीय व्यवसाय कधीच केला नाही. कॉलेज द फ्रान्समध्ये १८४८ साली माझॅंदी यांचे सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८५२ मध्ये माझॅंदी निवृत्त झाले व त्यांनी आपली प्रयोगशाळा व अध्यासन बेर्नार यांच्याकडे सुपूर्त केले. १८५३ मध्ये त्यांनी सॉर्बॉन विद्यापीठाची प्राणिविज्ञान विषयातील डॉक्टरेट  मिळविली. १८५५ मध्ये माझॅंदी मृत्यू पावल्यावर बेर्नार कॉलेज द फ्रान्समध्ये वैद्यकाचे पूर्ण प्राध्यापक झाले. तत्पूर्वी सॉर्बॉन येथे नवीनच स्थापन केलेल्या शरीरक्रियाविज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची निवड झाली तथापि तेथे प्रयोगशाळेची सोय नव्हती. पुढे सम्राट लूई (ल्वी) नेपोलियन यांनी त्यांची १८६४ मध्ये मुलाखत घेऊन ही अडचण दूर केली. १८६८ मध्ये म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमध्ये बेर्नार यांच्याकरिता एक प्रयोगशाळा व अध्यासन स्थापन करण्यात आले.

बेर्नार यांनी आपले शरीरक्रियाविज्ञानातील शोध १८५४-६० या काळात पूर्णावस्थेस नेले. तत्पुर्वी १८४३-४५ या काळात त्यांनी जठरातील पचनक्रियेसंबंधी संशोधन केले होते. यामध्ये जठरातील रासायनिक प्रक्रिया आणि जठराचे तंत्रिकाजन्य नियंत्रण या दोहोंचा समावेश होता. जठररसातील एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारे प्रथिन), जठररस-स्त्रवणाचे तंत्रिकेद्वारे नियंत्रण, जठरभित्तीची जठररसाविरुद्ध स्वपचन होऊ न देण्याची विशिष्ट संरक्षणक्षमता इ.वर त्यांनी संशोधन केले.

पचनक्रियेसंबंधीच्या संशोधनातील त्यांचे महत्त्वाचे संशोधन ⇨ अग्निपिंडाच्या कार्याविषयी होते. अग्निपिंड स्त्रावाचे पचनक्रिया व वसा (स्निग्ध पदार्थ) अभिशोषण यांतील महत्त्व त्यांनी कुत्रा व ससा या प्राण्यांवर प्रयोग करून सिद्ध केले. प्राणिशरीरात अन्न शिरल्यापासून त्याचे सात्मीकरण (अन्नाचे कोशिकांच्या – पेशींच्या – समूहात रूपांतर होण्याची क्रिया) व उत्सर्जन (शरीरक्रियेला निरुपयोगी असणारी अन्नातील द्रव्ये बाहेर टाकून देण्याची क्रिया) होईपर्यंतच्या सर्व क्रियांकडे त्यांचे लक्ष ओढले गेले होते. म्हणजे केवळ पचनक्रियेपुरतेच त्यांचे संशोधन मर्यादित नव्हते, तर आज आपण ज्याला चयापचय (शरीरात सतत घडून येणाऱ्या भौतिक – रासायनिक घडामोडी) म्हणतो, तो संपूर्ण विषयच त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र होता.

रक्तामध्ये ग्लुकोज नेहमी असतेच व याचा आहाराशी संबंध नसून यकृत साखर तयार करून रक्तात मिसळते, हा महत्त्वाचा शोध त्यांनी १८४८ साली लावला. यकृताच्या या कार्याला ‘ग्लायकोजेनोत्पादक’ कार्य असे म्हणतात. या कार्याचे दोन आविष्कार त्यांनी स्पष्ट केले. पहिल्यात ग्लायकोजेन उत्पादन व दुसऱ्यात त्याचे ग्लुकोजात रूपांतर अशी ती दोन निरनिराळी कार्ये आहेत. पहिले कार्य जैव क्रिया असून दुसरे पूर्णपणे रासायनिक प्रक्रिया असल्याचे त्यांनी दाखवले.

कार्बोहायड्रेट चयापचयातील त्यांचा सर्वात महत्त्वाचा शोध यकृतबाह्य ग्लायकोजेनाच्या उत्पादनासंबंधीचा होता. त्यात वारेचे कार्य, यकृत काढून टाकलेल्या प्राण्यातील ग्लुकोजनिर्मिती, स्नायुतील कार्बोहायड्रेट चयापचय इत्यादींचा समावेश होता.

बेर्नार यांच्या वाहिनी-प्रेरक तंत्रासंबंधीचा शोध अतिशय महवाचा होता. या तंत्रामध्ये वाहिनी-आकुंचन आणि वाहिनी – विस्फारक अशा दोन प्रकारच्या तंत्रिका असतात व त्यांच्या विरोधी परिणामांमुळे शरीरक्रियात्मक संतुलन राखले जाते.

बेर्नार यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणे येथे अशक्य आहे. वरील संशोधनाशिवाय प्राणिशरीरातील उष्णता उत्पादन व  तिचे नियंत्रण, ऊष्माघाताचे [⟶ उष्णताजन्य विकार] व थंड परिसराचे शरीरक्रियांवर होणारे परिणाम, क्यूरारचे (स्ट्रिक्नॉस लिथॅलिस व स्ट्रि. टॉक्सिफेरा नावाच्या वनस्पतींच्या साली आणि फांद्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचे) शरीराचरील परिणाम, कार्बन मोनॉक्साइडाचे विषारी परिणाम वगैरे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. शरीरातील औषधांच्या परिणामाकडे लक्ष वेधून त्यांनी प्रायोगिक औषधक्रियाविज्ञानाचा पाया घातला.

वैद्यकशास्त्राकडे वळण्यापूर्वी त्यांनी एक पांच अंकी गद्य नाटक (Arthur de Bretagna) लिहिले होते. त्याची शास्त्रीय व्याख्याने सतरा खंडात प्रसिद्ध झाली होती. त्यांनी Introduction a la medicine experimentale &amp Physlologie generale (१८७२) हे ग्रंथ लिहीले होते.

बेर्नार यांना पुढील सन्मान मिळाले होते : सोसायटी ऑफ बायॉलॉजीचे संस्थापक सदस्य व पहिले उपाध्यक्ष (१८४८) आणि अध्यक्ष (१८६७), लिजन ऑफ ऑनरचे सरदार (१८४९), व सेनापती (१८६७), फ्रेंच संसदेचे सिनेटरपद (१८६९), फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य (१८५४) व ॲकॅडेमीच्या प्रायोगिक शरीरक्रियाविज्ञानाचे पारितोषिक (१८४७, १८५०, १८५१ व १८५३), फ्रेंच ॲकॅडेमीचे सदस्य (१८६८) व अध्यक्ष (१८६९), फ्रेंच ॲसोशिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष (१८७२), ॲकॅडेमी ऑफ मेडिसिनचे सदस्य (१८६१), लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य (१८६४) व सोसायटीचे कॉप्ली पदक (१८७६). यांखेरीज यूरोपातील सर्व महत्त्वाच्या शास्त्रीय संस्थांचे ते सदस्य होते.

ते पॅरीस येथे मरण पावले. फ्रान्समध्ये राष्ट्रीय अंत्यविधीचा सन्मान मिळणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ होते.

ढमढेरे, बा. रा.  भालेराव, य. त्र्यं.