पो, एडगर ॲलन : (१९ जानेवारी १८०९ – ७ ऑक्टोबर १८४९). अमेरिकन कवी, कथाकार आणि समीक्षक. बॉस्टन येथे जन्म. वडिलांचे नाव डेव्हिड आईचे एलिझाबेथ. दोघेही नाटकांतून कामे करीत. आईच्या निधनानंतर रिचमंड येथील एक व्यापारी जॉन ॲलन ह्याने त्याचा सांभाळ केला. व्हर्जिनिया विद्यापीठात ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, स्पॅनिश आणि इटालियन भाषांचा अभ्यास तो करीत होता परंतु तेथे असताना जुगार खेळून बराच पैसा घालविल्यामुळे जॉन ॲलन ह्याने त्याला शिक्षण सोडावयास लावले. पुढे सैन्यात आणि सैनिकी अकादमीत त्याने काही काळ काढला. त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे सैनिकी अकादमीतून त्याला काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही नियतकालिकांच्या संपादकीय विभागांत त्याने वेळोवेळी कामे केली आणि लेखनही केले. ब्रॉडवे जर्नल ह्या नियतकालिकातून त्याच्या बऱ्याचशा कथा प्रसिद्ध झाल्या. ‘द रेव्हन’ ही त्याची विख्यात कविता न्यूयॉर्क मिररमधून प्रथम प्रकाशित झाली. व्हर्जिनिया क्लेम ह्या आपल्या नात्यातील अल्पवयीन मुलीशी त्याने १८३६ मध्ये विवाह केला १८४७ मध्ये ती मरण पावली. १८४९ मध्ये सॅरा एल्मिरा रॉयस्टर ह्या विधवेशी-ही त्याची एके काळची प्रेयसीच-त्याने लग्न जमविले तथापि हा विवाह पार पडण्यापूर्वीच बॉल्टिमोर येथे अतिरिक्त मद्यपानामुळे तो निधन पावला.
आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ पोने काव्यलेखनाने केला. १८२७मध्ये टॅमर्लेन अँड अदर पोएम्स हा त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. पोएम्स (१८३१) आणि रेव्हन अँड अदर पोएम्स (१८४५) हे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह. बायरन, शेली आणि कोलरिज ह्या इंग्रज स्वच्छंदतावादी कवींचा प्रभाव त्याच्या कवितेवर–विशेषतः आरंभीच्या कवितेवर–दिसून येतो. तथापि काव्यासंबंधी त्याची स्वतंत्र अशी भूमिका होती. ‘द फिलॉसफी ऑफ काँपोझिशन’ (१८४६) व ‘द पोएटिक प्रिन्सिपल’(१८५०) ह्या दोन निबंधांतून ती व्यक्त झालेली आहे. भावकाव्य हेच खरे काव्य दीर्घकाव्य म्हणजे अनेक छोट्याछोट्या भावकाव्यांची साखळीच सौंदर्य हाच कवितेचा खरा प्रांत होय सौंदर्याची लयतालबद्ध निर्मिती म्हणजे कविता विषण्णता हा कवितेचा खरा सूर होय हरपले श्रेय हाय काव्याचा श्रेष्ठ विषय आदी विचार त्यांतून मांडलेले आहेत.
वाच्यार्थाखालून वाहणाऱ्या सूचक ध्वन्यर्थाचा अंतःस्रोत ललित साहित्यातील रचनाबंधांतून प्रत्ययास आला पाहिजे, अशी पोची भूमिका होती. गुप्तहेरांचे चातुर्य, रोमहर्षण घटना आणि मानसिक विकृतींनी पछाडलेली माणसे असे विषय त्याने आपल्या कथांतून हाताळले असले, तरी त्यांतून एक रूपकार्थ सतत जाणवत राहतो, असे काही समीक्षकांनी दाखवून दिले आहे. मृत्यू आणि विनाश ह्यांच्याशी अटळ नियतीने बांधल्या गेलेल्या पार्थिवतेतून विमुक्त होऊन, स्वप्नाच्या वाटेने काही क्षण तरी अतिमानुष सौंदर्याचा अनुभव घेण्याची कांक्षा ह्या कथांतून सूचित होते, असे त्यांना वाटते. त्या दृष्टीने पो हा एक प्रतीकवादी लेखक ठरतो. अर्थात केवळ वाच्यार्थाचाच विचार केला, तर निखळ मनोविनोदनाच्या दृष्टिकोणातूनही त्याच्या कथांकडे पाहता येईल. ह्या कथांतून सूक्ष्म निरीक्षणाचे आणि परिणामकारक वातावरण निर्माण करण्याचे त्याचे सामर्थ्यही प्रत्ययास येते. ‘द फॉल ऑफ द हाउस ऑफ अशर’, ‘हाँटेड पॅलेस’, ‘द मास्क ऑफ द रेड डेथ’, ‘द ब्लॅक कॅट’, ‘द टेल्-टेल हार्ट’, ‘द मर्डर्स इन द ऱ्यू मॉर्ग’ आदी कथांनी भयकथेचा आणि गुप्तहेरकथेचा एक प्रणेता म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित केलेली आहेच. टेल्स ऑफ द ग्रोटेस्ट अँड ॲरबेस्क (१८४०) हा त्याचा गाजलेला कथासंग्रह.
पो हा एक वादग्रस्त लेखक ठरला. बोदलेअर आणि स्तेफान मालार्मे ह्यांच्यासारख्या फ्रेंच साहित्यिकांनी पोच्या श्रेष्ठत्वाचा निर्वाळा दिला फ्रेंच प्रतीकवाद्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतली त्याच्या प्रतिमासृष्टीने ते प्रभावित झाले. तथापि टी. एस्. एलियट, ॲलन टेट ह्यांसारख्या समीक्षकांनी त्याच्याबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. मात्र अषा समीक्षकांनाही पोचा प्रभाव मान्य करावाच लागला. इंग्लंडमधील प्री-रॅफेएलाइट कवी आणि प्रतिमावादी कवी अमेरिकन कवी हार्ट क्रेन आणि निकाराग्वातील कवी रूबेन दारीओ आदींनी पोकडून स्फूर्ती घेतल्याचे दिसते. पोच्या समग्र कथा व कविता ‘मॉडर्न लायब्ररी’ ह्या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या आहेत.
संदर्भ : 1. Addison, Hibbard, Ed. The Book of Poe, New York, 1929.
2. Allan, Hervey, Israfel The Life and Times of Edger Allan Poe, Garden City (N.Y.), 1926.
3. Alterton, M. Craig, H. Ed. Representative Selections, New York, 1962.
4. Carlson, E. W. The Recognition of E. A. Poe, New York, 1967.
5. Harrison, J. A. Ed. The Complete Works, 17 Vols., New York, 1902.
6. Krutch, J. W. Edgar Allan Poe : A Study in Genius, New York, 1926.
7. Phillips, Mary, E. Edgar Allan Poe : the Man, 2 Vols., Philadelphia, 1926.
8. Quinn, A. H. Edgar Allan Poe, A Critical Biography, New York, 1941.
9. Rans, Geoffrey, Edgar Allan Poe, Edinburgh and London, 1965.
10. Winwar, Frances, The Haunted Palace, A Life of Edgar Allan Poe, New York, 1959.
11. Woodberry, George E. The Life of Edgar Allan Poe, Personal and Literary rev.Ed., 2 Vols., Boston, 1909.
नाईक, म. कृ.
“