पालक – २ : पालेभाजीसाठी भारतात पालक या नावाखाली ⇨चिनोपोडिएसी  कुलातील (चाकवत कुलातील) दोन भिन्न वंशांतील वनस्पतींची लागवड करण्यात येते : (१) बीटा व्हल्गॅरिस  प्रकार बेंगालेन्सिस  (इं. इंडियन स्पिनिच हिं. पालक) आणि (२) स्पिनॅशिया ओलेरॅशिया   (इं. स्पिनिच हिं. विलायती पालक). यांची फक्त पाने भाजीकरिता अथवा सॅलडकरिता वापरतात.

देशी पालक : या वनस्पतीची शारीरिक लक्षणे सर्वसामान्यपणे ⇨ बीटप्रमाणे आहेत. भारतात निरनिराळ्या हवामानांत हे पीक लागवडीत आहे. तीव्र उन्हाळा आणि कडाक्याची थंडी वगळता जवळजवळ वर्षभर या पिकाची लागवड करता येते परंतु हिवाळ्याच्या हंगामात ते जास्त चांगले वाढते. उन्हाळ्यात त्याला लवकर फुले येत असल्यामुळे पानांचे उत्पन्न कमी येते. त्याचे निरनिराळे प्रकार भारतात लागवडीत आहेत परंतु ‘ऑल ग्रीन’ हा प्रकार सुधारित आहे. वाफ्यात बी फोकून वर्षातून तीन अगर जास्त वेळा पेरणी करतात (मार्च-एप्रिलमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला व मुख्य पीक म्हणून सप्टेंबर-नोव्हेंबरात). हेक्टरी ३० किग्रॅ. बी लागते. जमिनीच्या मशागतीच्या वेळी हेक्टरी ३५ – ४० टन शेणखत देतात आणि पानांच्या प्रत्येक तोडणीनंतर २० किग्रॅ. नायट्रोजन दिल्याने नवी पाने लवकर व जास्त संख्येने फुटतात व चांगली वाढतात. तोडणीच्या वेळी १५ – ३० सेंमी. लांबीची रसदार पाने, ती जून होण्यापूर्वी, देठासह तोडतात. सर्वांत जास्त पीक येणाऱ्या हंगामात हेक्टरी ८,००० ते १०,००० किग्रॅ. पाने मिळतात. भारतात सपाट प्रदेशात द्विलिंगी, बिनदेठाची व वायुपरागित (वाऱ्याच्या द्वारे परागसिंचन झालेली) फुले येतात नंतर फळे व बिया मिळतात.

या पिकावर सर्कोस्पोरा बेटीकोला   ह्या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होणारा रोग सर्वांत महत्त्वाचा आहे. पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व रोगट भाग पुष्कळ वेळा गळून पडतो. पिकाची काढणी केल्यावर पालापाचोळा गोळा करून जाळणे व पिकाची फेरपालट करणे हे जास्त महत्त्वाचे उपाय आहेत. ताम्रयुक्त कवकनाशकांची फवारणी फायदेशीर असते परंतु पाने भाजीसाठी वापरण्यात येत असल्यामुळे ती पाण्यात चांगली धुवून वापरणे आवश्यक असते.

विलायती पालक : ही वर्षायू (एक वर्षपर्यंत जगणारी) ⇨ओषधी मूळची आशियातील आहे. वाढीच्या सुरुवातीच्या काळात खोड फार आखूड व जमिनीलगत असून त्यावर झुबक्याप्रमाणे पाने येतात. काही काळानंतर खोड उंच वाढते व पानांच्या बगलेतून त्यावर शाखा फुटतात आणि मुख्य खोडावरील व शाखांच्या पानांच्या बगलेतून फुलोरा बाहेर पडतो. पाने साधी, काही प्रकारांत गुळगुळीत व काही प्रकारांत ती खडबडीत (फोड आल्यासाररखी) असतात. पानाचा देठ लांब, लालसर व पन्हळासारखा पाते मोठे, खंडित, जाड व त्रिकोणी असते. शेंड्याकडील पाने अखंडित व आखूड देठाची असतात. बी काही प्रकारांत गुळगुळीत व काही प्रकारांत काटेरी असते. इतर सामान्य लक्षणे चिनोपोडिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. उ. व द. भारतात या पालेभाजीची लागवड डोंगराळ भागात मर्यादित प्रमाणात होते. हे मुख्यतः थंड हवामानात वाढणारे पीक आहे. 

विलायती पालक (स्पिनॅशिया ओलेरॅशिया)

सुधारित प्रकार : (अ) व्हर्जिनिया सॅव्हॉय : यात पाने मोठी व काळसर हिरवी असून जागोजाग फोडाप्रमाणे दिसतात. बी काटेरी असते. (आ) अर्ली स्मूथ लीफ : यात पाने फिकट हिरवी, टोकाकडे निमुळती, गुळगुळीत व व्हर्जिनिया सॅव्हायपेक्षा लहान असतात. बी गोल व गुळगुळीत असते. व्हर्जिनिया सॅव्हॉय याचे बीजोत्पादन डोंगराळ भागात आणि अर्ली स्मूथ लीफचे सपाट प्रदेशात होते. देशी पालकाप्रमाणे फुले वायुपरागित असतात. मशागत देशी पालकाप्रमाणे करतात.

संदर्भ : Chaudhari, B. Vegetables, New Delhi, 1967.

पाटील, शा.दा. पाटील, ह .चिं.