ॲरॅपायमा ॲरॅपायमा : ऑस्टिओग्‍लॉसिडी कुलातला हा मासा गोड्या पाण्यात राहणारा असून ॲरॅपायमा गायगॅसहे त्याचे प्राणिशास्त्रातले नाव आहे. दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन व ओरिनोको या नद्यांत हा सापडतो. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या सगळ्यांत मोठ्या माशांमध्ये याची गणना होते. याची लांबी ४·५ मी. आणि वजन २०० किग्रॅ. असते. मुखगुहेच्या (तोंडाच्या पोकळीच्या) छताच्या अस्थींवर व जिभेवर खरखरीत दात असतात. याच्या शरीरावरील खवले फार मोठे, वाटोळे, तांबूस व अस्थिमय असतात. पृष्ठ-पक्ष आणि गुद-पक्ष फार मागे असतात. हा एक मौल्यवान खाद्यमत्स्य आहे. याचा जबडा त्यावरील दातांसह वाळवून तद्देशीय लोक त्याचा किसणीसारखा उपयोग करतात.

कर्वे, ज. नी.