मेणाचा किडा : या कीटकाचा (किड्याचा) समावेश हेमिप्टेरा गणाच्या कॉक्सीडी कुलांतील सेरोप्लॅस्टीस या प्रजातीत केला जातो. याची मादी लाबंट किंवा अंडाकृती व पसरट आकाराची असते. याचे बाह्य कवच कठीण, गुळगुळीत व मेणाने आच्छादिलेले असते. स्पर्शिका (सांधेयुक्त स्पर्शोद्रिंये) ऱ्हास पावलेल्या असतात किंवा नसतात. नरास पंख असतात किंवा नसतात.

मेणाच्या किड्यांची वसाहत : सेरोप्लॅस्टीस सेरिफेरस जातीच्या किड्याचे झाडाच्या फांदीला कणकेचे गोळे चिकटल्यासारखे दिसतात.

सेरोप्लॅस्टीस सेरिफेरससे. रूबेन्स या जाती भारतात आढळतात. चीनमध्ये से. सेरिफेरस व मेणाच्या पैदाशीकरिता जोपासलेली एरिसेरस पे-ला या जाती आढळतात. हे किडे झाडाच्या फांदीस चिकटून राहतात व कणकेचे लहान गोळे चिकटविल्यासारखे दिसतात. यांचे मेण पांढरे असते व ते सर्व अंगावर पसरलेले असते. हे किडे जसे उपयुक्त तसे उपद्रवीही आहेत. ज्या प्रदेशांत हे आढळतात तेथील लिंबू वर्गीय फळझाडे, आंबा, फणस, चहा, कॉफी इ. झाडांवर यांची कीड पडते व पिकांचा नाश होतो. या किडीचे नियंत्रण व नाश करण्यास काही कीटकनाशके उपयुक्त ठरली आहेत.

चीनच्या शँटुंग प्रांतात मेणाच्या पैदाशीकरिता ए. पे-ला या जातीची जोपसना केली जाते. हे किडे पांढरे मेण स्त्रवत व हे मेण त्यांच्या शरीरावर पसरलेले असते. हे मेण प्रामुख्याने मेणबत्त्या बनविण्यासाठी वापरले जाते. ऱ्हस, लिगुस्ट्रम, हिबिस्कसफ्रॅक्सिनस या प्रजातींतील वनस्पतींवर हे किडे जगतात. हिवाळ्यात यांना घरात ठेवण्यात येते व वसंत ऋतूत त्यांना जंगलात झाडांवर सोडण्यात येते. जिआंगसी प्रांतात हे किडे पाळण्याची वेगळीच पद्धत आहे. प्रथम सदाहरित वृक्षावर यांना सोडले जाते. नंतर काही काळाने रात्री सेचवानच्या दक्षिण भागातील ज्याडिंगफू पर्वतावर त्यांना नेऊन तेथील लिगुस्ट्रमफ्रॅक्सिनस या प्रजातींतील वृक्षांवर यांच्या वसाहती तयार केल्या जातात. उन्हाळ्याच्या शेवटी यांची वाढ पूर्ण होऊन यांच्या अंगावर कमाल मर्यादेपर्यंत मेण पसरलेले असते. या सुमारास सर्व किडे पकडून त्यांच्या अंगावरील मेण जमा केले जाते. या वेळी सर्व वसाहत नष्ट होते. वसंत ऋतू आला म्हणजे मागीलप्रमाणे या किड्यांच्या नवीन वसाहती पुन्हा तयार केल्या जातात. सेचवान प्रांतात या रीतीने प्रतिवर्षी २,८०० टन मेणाचे उत्पादन होते. गेली कित्येक शतके हा व्यवसाय चालू आहे पण आता यापेक्षा स्वस्त असे पॅराफीन मेण मिळू लागल्यामुळे या मेणाचे उत्पादन घटू लागले आहे.

पहा : खवले किडे मेण.

संदर्भ : 1. Essig, E. O. College Entomology, New York, 1958.

              2. Nayar, K. K. Ananthakrishnan, T. N. David, B. V. General and Applied Entomology, New Delhi, 1976.

जमदाडे, ज. वि.