वालुमक्षिका: या लहान, केसाळ व खवलेदार माशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या सायकोडिडी कुलात होतो. हिच्या असंख्य जाती आहेत. त्या अडखळत धावल्यासारख्या चालतात व उत्तम प्रकारे उडतात. सामान्यतः यांचा रंग तपकिरी असून पंखावर ठिपके असतात. याचे डोके लहान असतात. यांना अक्षिका (नेत्रक, लहान डोळे) नसतात. शृंगिकांची (सांधेयुक्त स्पर्शेद्रियांची) लांबी शरीराच्या लांबीच्या निम्मी असते. त्यांवर केस विखुरलेले असतात किंवा त्यांचे झुपके असतात. मुखांगांची (तोंडाच्या अवयवांची) सोंड तयार होते. स्पर्शिका केसाळ व चार खंडांची असते. यांचे पंख मोठे, केसाळ, खवलेदार, अंडाकृती किंवा टोकदार असून त्यांत लांबीला अनुसरून पुष्कळ शिरा असतात व तळाशी थोड्या आडव्या शिरा असतात. उदर ६ – ८ खंडांचे असते अंडनिक्षेपक (अंडी घालण्याचे साधन) बहिरागत (बाहेर वळलेला) असतो आणि नराची जननेंद्रिये मोठी व उघडी असतात.

वालुमक्षिका (फ्ले. व्हेरूकॅरम) : (१) अंडी, (२) अळी, (३) कोष, (४) प्रौढ मादी, (५) प्रौढ नर.वालुमक्षिका दिवसा कानाकोपऱ्यात व पडद्यांमागे लपून बसतात आणि गोठे व तबेल्यांत यांची ये-जा सुरू असते. यांची अंडी पाणतीराच्या आकाराची व जरा मोठीच असतात. अंड्याच्या वरच्या बाजूवर एक नागमोडी रेघ असते. ती एकएकटी किंवा पुंजक्याने इमारतीलगतच्या जमिनीतील भेगांत किंवा फटींत अथवा सेंद्रिय द्रव्याच्या ढिगाऱ्याजवळ घातलेली असतात. १० दिवसांत अंडी फुटून त्यांतून दंडगोलाकार अळ्या बाहेर पडतात. अळीचे शरीर बारा खंडाचे असते व प्रत्येक खंडावर दंतुर काट्यांची आडवी  ओळ असते. तिचे डोके व डोळे विकसित असतात. त्या स्थलवासी व जलवासी असून मृत पदार्थ खाऊन जगतात. काही जाती सांडपाण्याच्या नळांत राहतात व त्यांतून घरात येतात. जलवासी अळ्या संथ पाण्यात किंवा जलसोपानांत आढळतात. अळीच्या चार अवस्था असतात. पहिल्या दोन अवस्थांतील अळीला दोन पुच्छरोम (शेपटीवरील राठ केस) व पुढच्या दोन अवस्थांतील अळीला चार पुच्छरोम असतात. अळी अवस्था ३ – ८ आठवडे टिकते. शेवटच्या अवस्थेतील अळीची त्वचा कोषाला चिकटलेली असते. कोषांचे मागील टोक वरच्या  बाजूस वाकलेले असते. ७ -१० दिवसांच्या कोषावस्थेनंतर कोषांतून प्रौढ बाहेर पडतात. प्रौढ माश्या दमट जागी व ओलसर विष्ठा, लाकडांचे ओंडके, झाडोरा व वृक्षांच्या खोडांवर फिरताना आढळतात. यांचे आयुष्य साधारणतः १५ दिवसांचे असते. या रात्रीच्या वेळी क्रियाशील असतात व चालू लागल्यावर त्यांचे अस्तित्व जाणवते. त्यांचे चावे वेदनाकारक असतात. फक्त मादीच चावून रक्तशोषण करते.

सायकोडा फ्लीनॉइडस ही यूरोपियन जाती लहान असते. तिच्या पंखांचा विस्तार १.५० – २.२५ मिमी. असतो, तर पेरिकोमा फ्यूनेबिस ही ऑस्ट्रेलियन जाती मोठी असून तिच्या पंखांचा विस्तार १० मिमी. असतो. फ्लेबोटोमस प्रजातीतील माश्या रक्तशोषक आहेत. त्या सरपटणारे प्राणी व मानवाचे रक्त शोषतात आणि विशिष्ट जाती मानवी रोगांच्या वाहक आहेत. फ्ले. पॅपाटासी ही जाती वालुमक्षिका, पॅपाटासी किंवा तीन दिवसांच्या ज्वराचा फैलाव दक्षिण यूरोप व उत्तर आफ्रिकेत करते. दक्षिण अमेरिकी ओरोया ज्वर किंवा कॅरियन रोग आणि दक्षिण व मध्य अमेरिकी एस्पुंडिया ज्वर यांचा प्रसार फ्लेबोटोमस प्रजातीतील इतर जातीमुळे होतो. लिशमॅनियसिस किंवा काळा आजार हा पौर्वात्य रोग भारतात फ्ले. आर्जेंटिपीस या जातीद्वारे, तर चीनमध्ये फ्ले. मेजरफ्ले. चायनेन्सिस या जातीमुळे फैलावतो. कुत्र्यातील लिशमॅनियासिस हा रोग या माशीमुळेच फैलावतो.

वालुमक्षिकांच्या नियंत्रणासाठी पायरेथ्रमाची फवारणी उपयुक्त असते. तसेच बीएचसी वा एंडोसल्फान याची फवारणी प्रभावी असते.

पहा – काळा आजार रोगवाहक वालुमक्षिका ज्वर.

गर्दे, बा. रा. जमदाडे, ज. वि.