वाळवी : लाकडातील सेल्युलोज खाणारे हे कीटक उधई (संस्कृत- वल्म )या नावानेही ओळखले जातात. या समाजप्रिय कीटकांचा समावेश आयसॉप्टेरा गणात केला जातो. सामान्यतः ‘पांढऱ्या मुंग्या’ म्हणून ओळखल्या जात असल्या, तरी यांचे खऱ्या मुंग्यांशी निकटचे आप्तभाव नाहीत. खऱ्या मुंग्यांचा समावेश मधमाश्या व गांधीलमाश्या यांच्याबरोबर हायमेनॉप्टेरा या उच्च गणात केला जातो. वाळवीमधील समाजव्यवस्थेचे हायमेनॉप्टेरा गणातील समाजव्यवस्थेशी खूपच साम्य असले, तरी वाळवीचा क्रमविकास (उत्क्रांती) स्वतंत्रपणे झालेला आहे.

प्रसार : वाळवीच्या सु. दोन हजार (काहींच्या मते १,९००) जाती असून त्यांचा प्रसार जगभर विस्तृत प्रदेशांत आहे तरीही उष्ण व उपोष्ण कटिबंधांत त्यांच्या जाती व संख्या सर्वात जास्त आहेत. उष्ण कटिबंधातील वर्षावनांत ती विपुल प्रमाणात आढळते व ओसाड प्रदेशात तुलनात्मक दृष्ट्या कमी असते. भारतात तिच्या २६० जातींची नोंद झाली असून २,७४० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात ती सर्वत्र आढळते.

उत्तर अमेरिकेत वाळवीचा प्रसार व्हँकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, पॅसिफिक किनारा, पूर्व कॅनडा व मेन येथे आहे. यूरोपात तिचा स्वाभाविक प्रसार उत्तरेस फ्रान्सच्या अटलांटिक किनाऱ्यापर्यंत आहे. यूरोपात मुख्यतः तिचा प्रसार भूमध्य सामुद्रिक प्रदेशात असून निसर्गतः ती ग्रेट ब्रिटन, स्कँडिनेव्हिया, स्वित्झर्लंड, जर्मनी व उत्तर रशियात आढळत नाही. अती पूर्वेकडे दक्षिण कोरिया, बीजिंगलगतचा प्रदेश आणि उत्तर जपान येथे तिचा प्रसार आहे. तसेच तिचा प्रसार दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या केप प्रॉव्हिन्समध्ये, ऑस्ट्रेलियात, टास्मानियात व न्यूझीलंडमध्येही आहे.

यांशिवाय वाळवीच्या अनेक जाती मानवाने निर्हेतुकपणे त्यांच्या मूळस्थानापासून जगात अन्यत्र नेल्या आहेत. त्यामुळे निसर्गतः तेथे आढळणाऱ्या वाळवीमध्ये भरच पडली आहे. जहाजावरील मालाची खोकी (पेटारे), बोटीचे लाकूड, लाकडाचे ओंडके व फर्निचर यांच्यासारख्या लाकडी सामानाद्वारे वाळवीचा प्रसार नव्या ठिकाणी होतो. वाळक्या लाकडातील वाळवीच्या छोट्या वसाहती लाकडामध्येच असतात आणि त्या दीर्घकाळ कोरडा काळ सहन करू शकतात. ती रापविलेले लाकूड व फर्निचरमध्ये जीवंत राहते आणि त्यांद्वारे ती सहज वाहून नेली जाते. ऱ्हिनोटर्मिटिजी कुलातील वाळवी (उदा., कॉप्टोटर्मिस) ही ओलाव्याशी संपर्क असलेल्या जहाजावरील पेटाऱ्यांतून वाहून नेली जाते. कॉप्टोटर्मिस फॉर्मोसॅनस ही जाती जपान, तैवान, दक्षिण चीन येथे विस्तृतपणे आढळत असून आता तिचा प्रवेश श्रीलंका, पॅसिफिक बेटे, दक्षिण व पूर्व आफ्रिका, हवाई बेटे आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडील राज्यांत झालेला आहे.

शरीरवर्णन : प्रौढ वाळवीचे पापुद्र्यासारखे पंख उदराच्या टोकापेक्षा लांब असतात. शरीर खूप मऊ असते. स्पर्शक मणिरूपी किंवा सूत्रवत (सुतासारखे) असतात. तोंडाचे अवयव चघळून खाण्यासाठी  असतात. संयुक्त नेत्रांची एक जोडी असते व बहुतेक गटांत भक्षिकांची एक जोडी असते [⟶ डोळा]. वाळवी उडत नसताना तिचे पंख उदरावर पसरलेले असतात. उड्डाण जोरदार नसते व त्याचा पल्ला सामान्यतः कमी असतो. सपक्ष वाळवी उड्डाण संपवून जमिनीवर उतरताना तिचे पंख तळाच्या शिवणीपासून गळून पडतात व प्रत्येक पंखाचा वण टिकून राहतो. सपक्ष वाळवीचे रंग पिवळ्यापासून तपकिरी ते दगडी कोळशासारखा काळा असे विविध असतात. काही जाती (सामान्यतः फिकट रंगाच्या) रात्रीच्या वेळी उड्डाण करतात व इतर जाती (सामान्यतः गडद रंगाच्या)दिवसा उड्डाण करतात. जातिपरत्वे उड्डाणाचा काळ बदलतो व तो वर्षातील हंगाम आणि दिवस वा रात्रीची वेळ यांवर अवलंबून असतो.

वसाहत : वाळवीची वसाहत हा उत्तम प्रकारे संघटित व एकरूप असा घटक असून तिच्यातील सदस्यांमध्ये किंवा जातीजातींमध्ये शरीर संरचना, कार्य व वर्तन यांना अनुसरून कामांची विभागणी झालेली असते. प्रजोत्पादक, सैनिक व कामकरी या वसाहतीतील प्रमुख जाती होत. सैनिक व कामकरी जातीची वाळवी वांझ असते. कार्यक्षम प्रजोत्पादक प्राणी दोन प्रकारांचे म्हणजे प्राथमिक व द्वितीयक असतात.

सैनिक : वाळवीच्या बहुतेक सर्व जातींमध्ये सैनिक हे क्रमांक दोनचे प्राणी निर्माण केले जातात. ते पंखहीन असून प्रजोत्पादन करीत नाहीत व संरक्षणासाठी त्यांच्यात विविध प्रकारचे बदल झालेले असतात. त्यांच्या मँडिब्युलेट (जंभधारी), फ्रॅग्मोटिक, नॅस्यूटॉइड व नॅस्यूट अशा चार उपजाती आहेत. जंभधारी म्हणजे जबडेवाल्या सैनिकाचे डोके व जंभ (जबडे) खूपच मोठे असून त्यांचे भरपूर दृढीभवन झालेले असते. जंभ चावा घेण्यास वा झटका मारण्यास योग्य किंवा चिमट्यासारखे व कमीअधिक एकसमान अथवा खूपच असमान असतात. फ्रॅग्मोटिक सैनिकाचे जंभ वरील जातीसारखे मोठे नसतात. त्याचे डोके उंच व भोके पाडण्याच्या कामी उपयुक्त असते.

ऱ्हिनोटर्मिटिडी व टर्मिटिडी कुलांतील वाळवीमध्ये डोक्याच्या पृष्ठभागाच्या वरच्या बाजूवर शीर्ष ग्रंथी असून तिला एक लहान छिद्र असते. काही गटांच्या सैनिकांमध्ये ही ग्रंथी व तिचे छिद्र यांचे संरक्षणासाठी विविध प्रकारे रूपांतरण (बदल) झालेले असते. ऱ्हिनोटर्मिटिडी कुलातील काही सैनिकांत या ग्रंथीचे छिद्र डोक्याच्या पुढच्या कडेवर असते व ग्रंथीचा द्रव उघड्या द्रोणीसारख्या संरचनेमध्ये पडतो. ही संरचना शीर्ष संपुटाच्या (डोक्याच्या पेटीसारख्या भागाच्या) पुढे आलेली असते. अशा सैनिकांना नॅस्यूटॉइड सैनिक म्हणतात. विशिष्ट जातीत जंभधारी व नॅस्यूटॉइड प्रकार असतात. न्यॅस्यूटिटर्मिटिनी उपकुलातील वाळवीमध्ये शीर्ष ग्रंथी पुढे झुकलेल्या लांबट नलिकेच्या टोकाला उघडते. त्यामुळे डोक्याला नासपतीच्या आकाराचा पिचकारीसारखा आकार येतो. असे सैनिक नॅस्यूट सैनिक होत.


आ. १. वाळवीच्या जाती : (१) प्राथमिक राणी, (२) द्वितीयक राणी, (३) कामकरी, (४) सैनिक, (५) सलिंग सपक्ष प्रौढ.विकासामध्ये सैनिकांच्या आधी एक मध्यस्थ अवस्था (सैनिक अर्भक किंवा पांढरे सैनिक) येऊन जाते. तिच्यातील वाळवी सैनिकाच्या रूपाची पण दृढीकरण न झालेली असते. सामान्यतः वसाहतीमधील जंभधारी सैनिक मोठ्या आकारमानाचे व सापेक्षतः संख्येने कमी असतात, तर नॅस्यूट सैनिक सापेक्षतः बारीक असतात आणि त्यांची संख्या एकूण संख्येच्या जवळजवळ ३०% एवढी असते.

सैनिक स्वसंरक्षणासाठी घुसखोरांवर क्षोभक, विषे, क्लथनरोधक (साखळण्यास विरोध करणारे) व सरस अशा अत्याधुनिक रसायनांचा मारा करतात. त्या रसायनांच्या अध्ययनांवरून वाळवी नियंत्रक कीटकनाशक निर्माण करणे शक्य होईल.

कामकरी : अधिक विकसित वाळवीमध्ये कामकरी ही तिसरी जात असते. खऱ्या कामकरी वाळवीला सामान्यतः कोणता तरी रंग असतो. मात्र प्रौढावस्थेपूर्वी वाळवीला रंग नसतो व ती सामान्यतः पांढरी असते. कामकरी वाळवीला पंख नसतात. ती प्रजोत्पादनक्षम नसते व तिचे जंभ प्रौढासारखे असतात. ती सामान्यतः आंधळी असते. बऱ्याच अविकसित वाळवींमध्ये कामकरी ही जात नसते व वसाहतीचे कामकाज प्रौढावस्थेपूर्वीच्या किमान दोन विकासावस्थांमधील कीटक करतात. त्या अवस्था सपक्ष किंवा सैनिक होऊ शकतात परंतु तरीही विभेदन न होता कात टाकणे सुरू असते. सरतेशेवटी स्थानिक कात टाकण्याची क्रिया होते पण त्यांच्या आकारमानात व संरचनेत विशेष लक्षणीय बदल होत नाही. ही स्थिरावलेली वाळवी कामकरी जातीची कामे करते पण ती अन्य जातींत बदलण्याची शक्यता असते. अशांना ‘खोटी वा छद्म कामकरी’ वाळवी म्हणतात.

बदली प्रजोत्पादक : विशिष्ट परिस्थितीत सपंख, सैनिक व कामकरी या जातींच्या जोडीला वसाहतीमध्ये अन्य प्रकारची वाळवी आढळते तिला पूरक किंवा बदली प्रजोत्पादक म्हणतात. मूळ जोडी (राणी व राजा) २०-३० वर्षे  जगत असली, तरी वसाहतीचे आयुष्य त्यांच्या जगण्यामुळे मर्यादित होत नाही. दोन्ही किंवा दोहोंपैकी एक नष्ट झाले की, वसाहतीतील अन्य सदस्य प्रजोत्पादक होतात. अशा नव्या प्रजोत्पादक सदस्यांना पक्ष (पंख) कलिका असतील, तर त्यांना अर्भकाभ (निंफॉइड, ब्रॅकिप्टेरस किंवा द्वितीयक रूप) प्रजोत्पादक म्हणतात. पक्ष कलिका नसतील, तर त्यांना एर्गँटॉइड (अपक्ष किंवा तृतीय रूप) प्रजोत्पादक म्हणतात.

आ. २. वाळवीचे जीवनचक्र : (१) अंडी, (२) तरुण अर्भक, (३) वयस्क अर्भक, (४) पूरक प्रजोत्पादक, (५) प्रजोत्पादक अर्भक, (६) सैनिक, (७) कामकरी, (८) सपक्ष किंवा प्रजोत्पादक, (९) पंख गळून पडलेले प्रजोत्पादक, (१०) राणी, (११) राजा.वाळवीचे निरनिराळ्या जातींमध्ये विभेदन करणारी नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे समजलेली नाही. जन्माच्या वेळी जननिक दृष्ट्या (आनुवंशिकपणे) सर्व अर्भके एकसारखी असतात आणि त्या सर्वांचा विकास कोणत्याही प्रकारच्या (प्रजोत्पादक, सैनिक किंवा कामकरी) वाळवीत होऊ शकतो, हे माहीत झालेले आहे. वसाहतीतील जातींचा समतोल राखला जातो व त्यांचे नियमन काटेकोरपणे केले जाते. सामान्यतः प्रजोत्पादकांची एक जोडी असते आणि सैनिकांचे कामकरी व अर्भकाशी ठराविक प्रमाम असते. कोणत्याही जातीचे काही कीटक नष्ट झाले, तर समतोल राखण्यासाठी अर्भकांपासून त्या जातीचे अतिरिक्त कीटक निर्माण केले जातात. याउलट जातीची संख्या प्रमाणाबाहेर वाढली, तर समतोल बिघडू नये म्हणून स्वजातिभक्षितेद्वारे म्हणजे त्याच जातीच्या कीटकांकडून त्यांचा संहार केला जातो.

फेरोमोने व हॉर्मोने यांसारखी रासायनिक द्रव्ये जातींचे विभेदन, निर्मिती व नियमन या बाबतींत महत्त्वाची असतात. प्रजोत्पादक व सैनिक या दोन्ही जातींची वाळवी फेरोमोन स्त्रवतात. या फेरोमोनाचा प्रसार वसाहतीतील अन्य सदस्यांमध्ये एकमेकांना चाटून केला जातो आणि त्यामुळे प्रजोत्पादक व सैनिक यांच्या विकासाला (निर्मितीला) प्रतिबंध केला जातो. वसाहतीतील जातींचा समतोल बिघडला, तर ज्यांना ‘फेरोमोनांचा संदेश’ मिळाला नाही अशी काही अविभेदित अर्भके प्रजोत्पादक वा सैनिक जातीमध्ये विकास पावतात व अशा तऱ्हेने समतोल राखला जातो. [⟶ फेरोमोने हॉर्मोने].

हा प्रतिबंध सिद्धांत कॅलोटर्मिसझुटर्मोप्सिस या प्रजातीतील पूरक प्रजोत्पादकांच्या विकासाच्या प्रयोगांनी सिद्ध झाला आहे.

हॉर्मोन क्रियेद्वारे फेरेमोने जाती विभेदनावर नियंत्रण ठेवीत असावीत पण ही यंत्रणा कशी कार्य करते, हे स्पष्ट झालेले नाही. मेंदूजवळच्या कार्पोरा ॲलाटा चेतवून हॉर्मोन मुक्त होत असावे. ते बाल हॉर्मोनापेक्षा भिन्न असते व त्याच्यामुळे अर्भकाचे सैनिकात विभेदन घडून येते. त्याचप्रमाणे निर्मोचन ग्रंथीची क्रियाशीलता प्रजोत्पादन जातीच्या विभेदनाला कारणीभूत होत असावी, म्हणून वाळवीमध्ये इतर कीटकांप्रमाणे हॉर्मोने फक्त निर्मोचन व रूपांतरण यांवर नियंत्रण ठेवीत नाहीत, तर जाती विभेदनामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात.


वसाहतीची स्थापना व विकास : वाळवीच्या नव्या वसाहतीची स्थापना सामान्यतः सपक्ष प्रौढ वाळवीपासून होते. सपक्ष प्रौढ वर्षाच्या विशिष्ट हंगामात वसाहतीत तयार होतात. सपक्ष प्रौढ निर्मोचन झाल्यानंतर वारुळाच्या सीमारेषेजवळ विशेष कोठीत खूप दिवस किंवा आठवडे एकत्र जमतात. सामान्यतः वातावरणातील आर्द्रता व तिच्या जोडीला तापमान, पर्यावरण, हंगामाचे घटक यांनुसार ते तेथून बाहेर पडतात वा उड्डाण करतात. हे जातिपरत्वे बदलते. काही जातींत वर्षातून एकदा असे घडते. इतर जातींत एकामागून एक असे अनेक वेळा घडते.

सपक्ष प्रौढ बाहेर पडण्यापूर्वी कामकरी वाळवी पृष्ठभागाकडे येण्यास बोगदे व बाहेर पडण्यासाठी छिद्रे तयार करते. बाहेर पडण्याच्या काळात सैनिक वाळवी छिद्रांवर पहारा ठेवते. त्यामुळे शत्रूलाच काय पण सपक्ष प्रौढांनाही घरट्यात प्रवेश करणे शक्य होत नाही. बाहेर पडण्याच्या वेळी सपक्ष प्रौढ सामान्यतः प्रकाश टाळतात, तरीही प्रकाशाकडे आकर्षिले जातात व घरट्याकडे झेपावतात. याला समागम उड्डाण म्हणतात व त्यानंतर नरमादीचा समागम होतो. एखाद्या प्रदेशात अनेक वसाहतींतील प्रौढांचे एकाच वेळी उड्डाण होते व शेकडो किलोमीटर दूर असलेल्या प्रदेशांतील भिन्न वसाहतींमधील वाळवीत समागम होऊ शकतो. सपक्ष प्रौढ जमिनीवर उतरल्यावर लवकरच त्याचे पंख गळून पडतात. अल्पकालिक प्रणयाराधनामध्ये मादी आपले उदर उंचावते व लैंगिक आकर्षक द्रव्य बाहेर सोडते. नर मादीच्या जवळून मागे जातो व नरमादीची जोडी जमते. नंतर जोडी घरट्यासाठी जागा शोधते. एखादी भेग सापडल्यावर किंवा पावसाने मऊ झालेल्या लाकडात किंवा जमिनीत ते भोक पाडतात व ते विष्ठेने बंद करतात. अशी कोठी तयार केल्यावरच नरमादी मैथुन करतात. राणी (मादी) व राजा (नर) यांच्यात आयुष्यभर थांबून थांबून मैथुन होत राहते व त्यामध्ये शुक्राणूंचे (पुं-जनन कोशिकांचे-पेशींचे) स्खलन होऊन ते मादीच्या शुक्राणूग्राहिकेत (शुक्राणू साठविण्याच्या पिशवीत) साठविले जातात. नराला बाह्य मैथुन-अंग नसल्यामुळे नवव्या अधरकावर किंवा उदर पट्ट्यावर असलेल्या मध्यस्थ रंध्रातून (छिद्रातून) शुक्राणू सोडले जातात.

मैथुनानंतर प्रथम अंडी घातली जातात. ती साधारणतः कमी असतात. २-५ वर्षांच्या अवधीत वसाहत प्रौढ होते, तशी राणीची अंडी घालण्याची क्षमता खूप वाढते व तिचे अंडकोश व चरबी वाढते आणि तिचे पोट मोठे होते. अशी राणी अधिक विकसित कुलांमध्ये(उदा., टर्मिटिडी, विशेषतः मॅक्रोटर्मिसओडोंटोटर्मिस) ११ सेंमी. लांब असते. ही राणी दररोज ३६ हजारापर्यंत अंडी घालण्याचे काम कित्येक वर्षे करते. राजा १ किंवा २ सेंमी. लांब असतो. समशीतोष्ण कटिबंधात हिवाळ्यात अंडी घालणे थांबते पण उष्ण कटिबंधातील जातीत ते वर्षभर सुरूच असते.

पहिल्या जन्मलेल्या अर्भकांचा विकास कामकरी व सैनिकांमध्ये होतो. वसाहत प्रौढ दशेला पोहोचल्यावरच सपक्ष वाळवी विकास पावते. वसाहतीच्या सुरुवातीच्या स्थापनेच्या अवस्थांमध्ये प्रजोत्पादक वाळवी अर्भकांना खाऊ घालते व वारुळाची काळजी घेते पण जसजशी वसाहत सुस्थितीला येते अशी ही कामे अर्भके करतात.

आदिम (आद्य) कुलांतील वाळवीच्या वसाहती छोट्या असतात व त्यातील वाळवीची संख्या काही शेकडे ते हजार असते. अधिक विकसित कुलांतील (उदा., ऱ्हिनोटर्मिटिडी, टर्मिटिडी) वाळवींच्या वसाहतीची संख्या लाखो ते कोट्यवधी असते व ही सर्व निर्मिती एका प्रजोत्पादक जोडीपासून होते. कामकरी व सैनिकांचे आयुष्य २-५ वर्षांचे असू शकते. विकसित कुलांतील प्रारंभिक राजा व राणी ६०-७० वर्षे जगतात. ज्या जातींमध्ये प्रारंभिक राणी व राजा द्वितीयक प्रजोत्पादक वाळवीने बदली केले जातात, अशी संपूर्ण वसाहत कित्येक वर्षे अस्तित्वात राहते.

वसाहत स्थापण्याचे काही अन्य मार्गही आहेत. कधीकधी मुकुलनाने म्हणजे एका वसाहतीचे विभाजन होऊन किंवा अपघाताने घरट्यापासून (वारुळापासून) वसाहतीचा एखादा भाग अलग होऊन नव्या वसाहती अस्तित्वात येतात. पूरक प्रजोत्पादक वाळवी प्रजोत्पादक जोडीची जागा घेत. समाजविच्छेदनाने किंवा सामाजीक विघटन वा अन्य मार्गानेही वसाहती स्थापन केल्या जातात. कामकरी, सैनिक व अर्भके नवीन घरट्याच्या ठिकाणाकडे स्थलांतर करतात व या नव्या घटकात पूरक प्रजोत्पादक विकास पावतात. कधीकधी मूल प्रजोत्पादक जोडी स्थलांतर करणाऱ्या गटामध्ये सामील होते.

पोषण : सेल्युलोज हे वाळवीचे मुख्य अन्न असून ते लाकूड, गवत, पाने, ह्यूमस शेणखत व वनस्पतिज द्रव्यांपासून (उदा., कागद, कार्डबोर्ड, कापूस इ.) मिळविले जाते. खालच्या दर्जाची बहुतेक सर्व वाळवी व उच्च दर्जाची बरीच वाळवी चांगले किंवा कुजके लाकूड खाते. वाळवीच्या काही जाती गवत, पालापाचोळा व काष्ठ किंवा पेंढा गोळा करतात व खातात. टर्मिटिडी कुलातील उच्च दर्जाची वाळवी फक्त ह्यूमस खाते.

इतर सामाजिक कीटकांप्रमाणे वसाहतीतील सर्व कीटक प्रत्यक्षपणे अन्नभक्षण करू शकत नाहीत, कारण खालच्या दर्जाच्या कुलांतील प्रजोत्पादक, सैनिक व तरुण (बाल) अर्भके प्रत्यक्षपणे स्वतः अन्नभक्षण करू शकत नाहीत, तर कामकरी वाळवीने त्यांना अन्न भरवावे लागते. कामकरी सर्व वसाहतीसाठी अन्न खातात व नंतर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या जातींना तोंडाने किंवा गुदातून बाहेर टाकलेले अन्न भरवितात. तोंडाने भरविल्या जाणाऱ्या अन्नात ओकून परत काढलेले आणि चघळलेले लाकूड व लाळ किंवा स्वच्छ द्रव असतो. ही पद्धती वाळवीच्या सर्व कुलांत आढळते. गुदभरणाच्या पद्धतीत खळीसारखा द्रव किंवा छोटे थेंब कामकरी वाळवीच्या गुदावाटे बाहेर टाकले जातात व ते अन्य जाती चाटून खातात. हे द्रवरूप अन्न विष्ठेहून भिन्न असते व त्यामध्ये पश्चांत्रातील (आतड्याच्या मागच्या भागातील) द्रवासह आदिजीव (प्रोटोझोआ) पचनोत्पाद व लाकडाचे तुकडे असतात.

खालच्या दर्जाच्या कुलांतील वाळवीचे सेल्युलोजाचे पचन हे कशाभिकायुक्त सहजीवी आदिजीवांवर अवलंबून असते. हे आदिजीव वाळवीच्या पश्चांत्रामध्ये अनॉक्सिजीवी (ऑक्सिजन नसलेल्या स्थितीत) रूपात राहतात व सेस्युलेज व सेलोबायोज या एंझाइमांचे (पचनास मदत करणाऱ्या प्रथिनांचे) स्त्रवण करून सेल्युलोजाचे ग्लुकोज (साधी साखर) व ॲसिटिक अम्लात रूपांतर करतात. सेल्युलोजाच्या पचनासाठी वाळवी पूर्णपणे आदिजीवांवर अवलंबून असते आणि त्यांच्याशिवाय ती जगू शकत नाही. नवजात अर्भके गुदभरणाच्या वेळी म्हाताऱ्या संसर्गित वाळवींकडून असे आदिजीव मिळवितात. आदिजीव आश्रयदात्या वाळवीमध्ये अशा तऱ्हेची उदरभरण पद्धती आवश्यक असते.

प्रत्येक वेळी कात टाकताना नष्ट झालेले आदिजीव फक्त गुदभरणाने परत मिळविले जातात व त्यासाठी वाळवी गटाने राहून कात टाकणारी अर्भके कात न टाकणाऱ्या अर्भकांशी संपर्क साधून असतात. यातून आदिजीवांची देवघेव होते.


उच्च दर्जाच्या वाळवीमध्ये सहजीवी आदिजीव नसतात. त्यांच्या आतड्यात फक्त बॅक्टिरिया असतात. बॅक्टिरियाजन्य सेल्युलेज व सेलोबायोज यांच्या मदतीने पचन होत असावे  तथापि वाळवी स्वतः एंझाइम स्त्रवू शकत असावीत. सेल्युलोजाच्या जोडीला वाळवीला नायट्रोजनयुक्त अन्नाची ( उदा., प्रथिने) गरज असते. स्वजाती भक्षण व कवक (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पती) भक्षण करून नायट्रोजन मिळविला जातो. अलीकडेच काही सहजीवी बॅक्टिरिया वातावरणातील नायट्रोजनाचे स्थिरीकरण करू शकतात, हे सप्रयोग सिद्ध झाले आहे. यूरिक अम्ल मिळवून त्याचा नायट्रोजनाचा पुरवठा करणारे द्रव्य म्हणून वापर केला जातो.

मॅक्रोटर्मिटिनी उपकुलातील वाळवी सहजीवी कवकांची (टर्मिटोमायसीज) लागवड करतात, तिला ‘कवक उद्यान’ म्हणतात. ते स्पंजांसारखे किंवा फणीसारखे असते. त्यात कार्बोहाड्रेटी लिग्निन भरपूर असून ते विष्टाद्रव्याचे बनविलेले असते. फणीवर कवक वाढते आणि वाळवी कवक व फणी खाऊन टाकते. फणी तयार करण्यासाठी वापरलेल्या विष्टाद्रव्याचे विघटन होऊन वाळवी पुन्हा वापरू शकेल अशा द्रव्यात रूपांतर केले जाते. गळून पडलेली त्वचा आणि वसाहतीतील मृत, जखमी व जादा सदस्य हे वाळवी फस्त करते.

वर्तन व संदेशवहन : अन्य समाजप्रिय कीटकांप्रमाणे वाळवीच्या वर्तनामध्ये संदेशवहन अगदी आवश्यक आहे व त्या दृष्टीने वसाहतीत माहितीची देवाणघेवाण अखंडपणे होत असते. तीमध्ये धोक्याचा इशारा, अन्नाची दिशा व उद्‌गम, संरक्षण, घरट्याची व त्यातील सज्जांची उभारणी इ. गोष्टींचा समावेश होतो. दृष्टी चांगली विकसिक झालेल्या प्रौढांत दृक्‌संदेशवहन होऊ शकते, तर अन्य जातींत ज्यांमध्ये दृष्टी विकसित नसते, त्यांमध्ये संदेशवहन रासायनिक (गंध) व स्पर्शाद्वारे होते.

वाळवीच्या अनेक जाती अन्न मिळविण्यासाठी वारुळाबाहेर पडतात. कामकरी व सैनिकांची जमिनीवर रांग लागते व ते गवत, बी इ. वारुळामध्ये नेतात. वाळवी आपली अधरक ग्रंथी जमिनीवरून ओढून फेरोमोन सोडते. फेरोमोनाचा वास अन्य वाळवीला घ्राणेंद्रिय ग्राहकाद्वारे कळतो.

आ. ३. झूटर्मोप्सिस अर्भकाची अंगस्थिती : (अ) नेहमीची हालचाल (आ) फेरोमोन जमिनीवर सोडताना : (१) अधरक ग्रंथी.वाळवीमध्ये कंपन, गंध व शारीरिक स्पर्श यांच्याद्वारे धोक्याची सूचना दिली जाते. सूचना मिळालेली वाळवी जमिनीवर आपले डोके आपटते, थरथर कापते व झटके देते किंवा वेडीवाकडी पळते व इतरांना धडका देते. जमिनीवर डोके आपटल्याचा आवाज खुळखुळ्याच्या आवाजासारखा असून माणसाला ऐकू येण्याएवढा मोठा असतो, तरी पण वाळवीला हवेतील आवाज ऐकू येत नाही. फक्त आधाराची कंपने तिला पायावर असणाऱ्या कंपनग्राहकांद्वारे कळतात. वेडेवाकडे व क्षितिज समांतर झटके या हालचालींतून ती स्पर्शाने धोक्याची सूचना देते. सूचना मिळालेली वाळवी इतरांना धडका मारू लागली म्हणजे इतर सावध होतात. अशा धावपळीच्या वेळी  सूचना मिळालेली फेरोमोनाचा वास सोडते. त्यामुळे धोक्याची दिशा कळते व त्या ठिकाणी जादा कामकरी आणि सैनिक पाठविले जातात.

वसाहतीतील नातेसंबंध व सदस्यत्व यांच्यातील संदेशवहन वसाहतीच्या विशिष्ट गंधामुळे होते. फेरोमोने, विविध जाती ओळखण्याचे गंध, पर्यावरण व अन्न यांच्या वासाच्या परिपाकातून हा विशिष्ट संमिश्र गंध तयार झालेला असतो. या गंधामुळे इतर वसाहतीतील घुसखोर ओळखले जातात व त्यांच्यावर हल्ला चढविला जातो. परकी वाळवी ओळखणे, जातीजातीतील स्पर्धा व वसाहतीतील सदस्यांमध्ये नातेसंबंध वाढविणे आणि त्यायोगे अंतःप्रजनन होणे या कामी हा गंध फार महत्त्वाचा आहे. वाळवीसारख्या समाजप्रिय कीटकांमध्ये नातेसंबंधाच्या निवडीबरोबरच सामान्य द्विगुणित (नेहमीच्या दुप्पट) लिंग निश्चिती यांच्यामुळे अंतःप्रजननाचे प्रमाण अतिउच्च राखले जाते व त्यामुळे सामाजिकतेचा क्रमविकास होण्यास मदत होते.

वारुळाचे बांधकाम : वाळवी साध्या सज्ज्यांपासून ते मोठाली द्विपार्श्व सममित (दोन समान भाग होणारी) वारुळे उभारते. या बांधकामाची विविध अंगे आहेत. वारुळे उबदार, दमट, अंधारी असून बाहेरच्या पर्यावरणाशी त्यांचा संबंध नसतो. कामकरी वाळवी अशी वारुळे उभारतात. अंतर्गत परिस्थिती वा वातावरण टिकविण्याबरोबरच आसरा देणे व हल्लेखोरांपासून संरक्षण करणे ही कामे वारुळामुळे साध्य होतात. आतील उच्च दमटपणा (९०-९९%) हा काही अंशी वाळवीच्या शरीरातील घडामोडींद्वारे पाणी निर्माण होऊन टिकविला जातो. आतील तापमान बाहेरच्यापेक्षा नेहमीच जास्त असते.

आदिम वाळवीच्या पश्चांत्रातील अनॉक्सिजीवी आदिजीव ऑक्सिजनाचे उच्च प्रमाण सहन करू शकत नाहीत, अशी वाळवी काही वारुळात ३ टक्क्यांपर्यंत उच्च कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण सहन करू शकतात. वारुळात वायुवीजन आवश्यक असते व ते वारुळाच्या अभिकल्पाद्वारे (आराखड्याद्वारे) साध्य केलेले असते. [⟶ वारुळ].

महत्त्व : वाळवी माणसाला उपद्रव देते व त्याला उपयुक्तही आहे. या दोन्ही दृष्टींनी ती महत्त्वाची आहे. ती जेव्हा मानवाला उपयुक्त लाकडी सामान किंवा वनस्पतीज द्रव्यांचा नाश करते तेव्हा ती उपद्रवी व संहारक असते. नव्याने प्रवेश केलेल्या जाती उभी पिके व इमारती यांसारख्या मानवनिर्मित संरक्षित जागी राहतात, त्यामुळे ती सर्वात गंभीर स्वरूपाची कीड ठरण्याची शक्यता असते. तथापि ती उपयुक्त आहे, कारण ती नवीन वृद्धीस साहाय्य करू शकेल अशा वनस्पतिद्रव्यांत वनस्पती सेल्युलोजाचे रूपांतर करते.

वाळवीच्या माहीत असलेल्या जातींपैकी १०% जातीच उपद्रवी (कीड) आहेत व त्यांतीलच पुष्कळ जाती अतिशय नुकसानकारक आहेत. त्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी त्या जाती जमिनीखाली राहणाऱ्या आहेत की, लाकडामध्ये राहणाऱ्या आहेत, हे समजणे फारच महत्त्वाचे ठरते, कारण त्यांच्या नियंत्रणाचे मार्ग भिन्न असतात.

वाळवी इमारती लाकडाचे खूपच नुकसान करते. तसेच जमिनीशी संपर्क असलेले कुंपणाचे, दूरध्वनीचे व वीजेचे लाकडी खांब, रूळ, मार्गाचे शिळेपाट, लाकडी पूल व ओंडके यांचे वाळवीमुळे नुकसान होते. त्याचप्रमाणे शेतातील महत्त्वाची उभी पिके, फळझाडे, पन्हेरीतील झाडे, चहा, कॉफी, नारळ, रबर, ऊस, कापूस इत्यादींचे मळे, अनेक जंगले यांचे तिच्यामुळे अतोनात नुकसान होते. त्याच्या जोडीला पुस्तके, कागद, सुती कपडे, फर्निचर, गालिचे, लिनोलियम, टोपल्या इ. घरगुती सामानांचेही फार नुकसान होते. विजेच्या तारांचे निरोधक आवरण, होजनळ्यांतील सेल्युलोज द्रव्य, बर्फाच्या कारखान्यातील लाकडी भुसा, चामडे आणि वस्तुसंग्रहालयांतील मौल्यवान वस्तूही त्यांच्या तावडीतून सुटत नाहीत.


वाळवीच्या काही थोड्या जाती मानवाला उपयुक्त असल्याची नोंद आहे, कारण त्यांचा अन्न म्हणून व औषधामध्ये उपयोग होतो. काही जाती संमार्जक (सफाई करणाऱ्या) म्हणून आणि जमिनीत हवा खेळती ठेवणे व तिचा पिकाऊपणा वाढणे या कामीही उपयुकत आहेत. उडणारी वाळवी किंवा राणी जिवंत पकडून मीठमिरीबरोबर तळून किंवा परतून आदिवासी लोक खातात. वाळवीबरोबर तिच्या घरट्याचाही औषधी उपयोग होतो. प्वेर्त रीकोमध्ये घरटे जाळून त्याचा धूर छातीच्या विकारांवर हुंगतात. ओरिसामध्ये काही आदिवासी वाळवीची जिवंत राणी खातात, कारण ती तीव्र कामोत्तेजक समजतात. मध्य आशियातील वाळवंटांतील वाळवीच्या घरट्याची माती नायट्रेट जोर खत म्हणून वापरतात. वारुळाच्या मातीचा उपयोग टेनिसचे क्रीडांगण बनविण्यासाठी व झोपड्यांतील जमीन बनविण्यासाठी आफ्रिकेत व ऑस्ट्रेलियात करतात. श्रीलंकेत तिचा उपयोग रत्नांना पॉलिश करण्यासाठी करतात व काही जमाती सैंधवाऐवजी ही माती खातात.

अलीकडील संशोधनात असे आढळून आले आहे की, वाळवी मिथेन, कार्बन डाय-ऑक्साइड आणि रेणवीय हायड्रोजन हे वायू लक्षणीय प्रमाणात बाहेर टाकते. मिथेन वातावरणातील महत्त्वाचा लेशमात्र वायू आहे. वातावरण क्षोभावरण थराच्या रासायनिक अभ्यासाच्या दृष्टीने हा शोध महत्त्वाचा आहे.

वाळवीच्या शरीरात नायट्रोजनाचे स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजंतू (बॅक्टिरिया) असावेत, से १९४६ मध्ये आढळले होते. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या कॉप्टोटर्मिस लॅक्टिअस, मॅस्टोटर्मिस डार्विनिएन्सिसनॅस्यूटिटर्मिस एक्झिटिअस या जातींमध्ये सिट्रोबॅक्टर रिउंडी हा सूक्ष्मजंतू आणि अमेरिकेत कॉप्टोटर्मिस फॉर्मोसॅनस जातीमध्ये एंटरोबॅक्टर ॲग्लोमरान्स हा सूक्ष्मजंतू आढळला आहे. ते वाळवीची नायट्रोजनाची गरज भागवितात.

नियंत्रण : इमारतीतील लाकूडकामाला वाळवी लागण्याचा धोका नेहमीच असतो. लाकूडकाम व पाया यांच्यामध्ये पत्रा किंवा काँक्रीट घालणे हा प्रतिबंधात्मक उपाय आहे.

लाकडामध्ये क्रिओसोट, डांबर, मर्क्युरिक क्लोराइड, सोडियम फ्लुओरोसिलिकेट, झिंक क्लोराइड, डीडीटी इ. घुसविणे हाही एक फायदेशीर उपाय आहे.

वाळवीचा उपद्रव फारच असेल, तर जमिनीवर प्रक्रिया करणे गरजेचे असते. जमिनीत अरुंद चर खणून तो कच्चे खनिज तेल किंवा हेप्टॅक्लोर, आल्ड्रीन किंवा लिंडेन (बीएचसी) किंवा क्लोरडान, डायएल्ड्रीन, डीडीटी, सोडियम आर्सेनेट, ट्रायक्लोरोबेंझीन अथवा पेंटाक्लोरोफिनॉल यांच्या तेलातील विद्रावाने भरतात. त्यामुळे लाकूड कुजत नाही.

इमारती लाकडाला वाळवी लागल्यास लाकडाला ३०-३० सेंमी. अंतरावर भोके पाडून त्यांत सोडियम फ्लुओरोसिलिकेट, सोडियम फ्ल्युओराइड, कॅल्शियम आर्सेनट इ. भरून भोके बंद करतात. क्लोरडान, डीडीटी, डायएल्ड्रिन, लिंडेन, पेंटाक्लोरोफिनॉल किंवा ऑर्थोक्लोरोबेंझीन हीसुद्धा दाबाचा वापर करून भोकांत भरतात. जास्त भागाला वाळवी लागल्यास मिथिल ब्रोमाइडाची धुरी देतात. इमारतीच्या पायाभोवती वरील कीटकनाशके जमिनीत ओततात किंवा भोके पाडून त्यांत भरतात. आणखी एक सोपा उपाय म्हणजे वाळवीच्या वसाहतीला ओलावा मिळू न देणे. त्यामुळे वाळवी लोकवस्तीच्या आसपास वारुळे तयार करीत नाही.

पिकाला वाळवी लागल्यास जवळचे वारूळ खणून त्यात वरीलपैकी एखादे कीटकनाशक टाकतात व शेतातही कीटकनाशके टाकतात. पिकाला निंबाची  व करंजाची पेंड घातल्यास वाळवीचा उपद्रव कमी होतो.

आधुनिक पद्धती : मेयोप्रीन हा बाल हॉर्मोनसद्दश पदार्थ वाळवीमधील आदिजीवांच्या संख्येवर परिणाम करतो. याच्या ०.०३२-०.६४ मिग्रॅ. मात्रेने सर्व आदिजीव नष्ट होतात. त्यामुळे वसाहतीतील अर्भकांची उपासमार होते. काही लाकडांचे अर्क वाळवीला विषारी असतात. त्यांतील काही क्विनोन अनुजात (त्यापासून बनविलेली अन्य संयुगे) असल्याचे माहीत झाले आहे. हॉली, मॅग्नोलिया, तुती, पिवळा पॉप्लर, ससाफ्रास इत्यादींच्या अर्काने आदिजीव नष्ट होतात व त्यामुळे वाळवी मरते. पक्षी, चतुर, सरडे, बेडूक, मुंग्या माइट, भुंगे, काटेरी मुंगीखाऊ, उंदीर हे वाळवीचे शत्रूही तिचा नाश करतात. ऑस्ट्रेलियात मेटाऱ्हाइझियम ॲनिसोफ्लिई या कीटकामध्ये रोग उत्पन्न करणाऱ्या कवकाचा यशस्वीपणे उपयोग करण्यात आला आहे. त्याची बाधा मॅस्टोटर्मिस डार्विनिएन्सिस, कॉप्टोटर्मिस फ्रेन्चीनॅस्यूटर्मिस एक्झिटिस या वाळवींना ताबडतोब होते. वाळवीच्या नियंत्रणाची पूर्ण समाधानकारक पद्धती अद्याप सापडलेली नाही. बहुसंख्य पद्धती क्लोरिनीकृत हायड्रोकार्बनांवर आधारलेल्या आहेत. त्यामुळे पर्यायी व जादा सुरक्षित पद्धती विकसित केल्या जाण्याची गरज आहे. [⟶ कीटकनियंत्रण].

क्रमविकास : वाळवीचे झुरळांशी नाते आहे व वाळवीचा क्रमविकास बहुधा झरळासारख्या पूर्वजापासून झाला असावा. क्रिप्टोसेरस पंक्टुलेटस हे सर्वांत आद्य व जिवंत, अर्ध समाजप्रिय, लाकूडभक्षक झुरळ कुजक्या लाकडी ओंडक्यात राहते व त्याचे वाळवीशी आप्तसंबंध आहेत. आद्य वाळवीच्या पश्चांत्रात आढळतात त्याच प्रजातीतील सहजीवी, सेल्युलोजाचे पचन करणारे आदिजीव वरील झुरळामध्ये आढळतात. मॅस्टोटर्मिस डार्विनिएन्सिस या ऑस्ट्रेलियातील झुरळाची जननेंद्रिये व विशिष्ट अंतस्त्ये (वक्ष व उदरातील अवयव) यांचे सर्वांत आद्य जिवंत वाळवीच्या मूळ शारीरिक अवयवांशी साम्य आहे. मॅस्टोटर्मिसांचे इतर झुरळांशीही आणखी आप्तसंबंध आहेत. तिच्या मागच्या पंखांचे घडी पडणारे गुदखंड असतात व ती आपली अंडी इतर वाळवीप्रमाणे एकएकटी न घालता झुरळाप्रमाणे पुंजक्यापुंजक्याने घालते.

वाळवीचे आद्य झुरळांशी नातेसंबंध आहेत. या पुराव्यावरून असे सूचित होते की, उत्तर पर्मिनियन काळामध्ये (सु. २३ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) वाळवीचा क्रमविकास झाला आहे तथापि वाळवीचे ज्ञात जीवाश्म (शिळारूप अवशेष) पूर्व क्रिटेशसमधील (सु. १३ कोटी वर्षांपूर्वीचे) आहेत. अन्य कोणत्याही समाजापेक्षा वाळवीचा समाज पुरातन आहे. मुंग्यांचा समाज १० कोटी वर्षांइतका पुरातन आहे.

वर्गीकरण : वाळवीची सहा कुले असून दोन हजार जाती व साठ जीवाश्म जाती आहेत. टर्मिटिडी कुलाखेरीज अन्य पाच कुलांतील वाळवी खालच्या दर्जाची समजली जाते.

मॅस्टोटर्मिटिडी कुल : हे आद्य असून ऑस्ट्रेलियात याची एक जिवंत जाती (मॅ. डार्विनिएन्सिस) आहे. तृतीय कल्पातील (सु. ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) याच्या तेरा जीवाश्म जाती असून हे कुल जगभर सर्वत्र आढळते.

कॅलोटर्मिटिडी कुल : (वाळक्या लाकडातील वाळवी). हे लाकडात राहते व लाकूड खाते. कोरड्या हंगामात जिवंत राहते. याच्या २९२ जिवंत जाती व ११ जीवाश्म जाती आहेत.

होडोटर्मिटिडी कुल : याच्या ३० जिवंत जाती व १३ जीवाश्म जाती आहेत.

ऱ्हिनोटर्मिटिडी कुल : (जमिनीतील वाळवी). याच्या १५८ जिवंत जाती व १३ जीवाश्म जाती आहेत.

सेरीटर्मिटिडी कुल : याची दक्षिण अमेरिकेत एक जाती असून हे विशेषित कुल ऱ्हिनोटर्मिटिडी कुलापासून क्रमविकसित झाले असावे. 

टर्मिटिडी कुल : (उच्च दर्जाची वाळवी). हे सर्वात मोठे कुल (सु. ७५%वाळवी या कुलातील आहे) असून याची चार उपकुले आणि १,४१३ जिवंत जाती व ३ जीवाश्म जाती आहेत. या कुलातील जातींमध्ये आकारविज्ञान, सामाजिक संघटन व घरट्याची रचना या बाबतींत विविधता आढळते.

पहा : वारूळ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X. New Delhi,1976.

           2. Krishna, K. Weesner, F. M., Eds., Biology of Termites, 2 Vols., 1969-70.

पाटील, ह. चिं. जमदाडे, ज. वि.