पिसारी पतंग : या कीटकाचा समावेश लेपिडॉप्टेरा गणाच्या टेरोफोरिडी कुलात करतात. पतंग निमुळते १·५ मिमी. लांब, हिरवट करड्या रंगाचे असतात. त्यांचे पंख चिंचोळे असून पुढील पंखांचे दोन भागांत, तर मागील पंखांचे तीन भागांत विभाजन झालेले असते. पंखाच्या कडांवर केस असल्यामुळे ते पिसाऱ्यासारखे दिसतात. त्यामुळे या कीटकांना पिसारी पतंग म्हणतात. एक्सेलास्टीस अटोमोसा  हे त्याचे शास्त्रीय नावआहे.पिसारी पतंग (एक्सेलास्टीस अटोमोसा)

मादी पतंग कोवळ्या शेंड्यावर, पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर अंडी घालते. ती पाच दिवसांत उबून त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या प्रथम शेगांवरील साल कुरडतात व भोके पाडून आत घुसून कोवळे दाणे खातात. या कीटकाच्या अळ्या तुरीच्या शेंगेला उपद्रव देतात. त्यामुळे त्यांना तुरीच्या शेंगातील अळी असेही म्हणतात. अळी हिरवट पिवळी असून तिच्या अंगावर केस असतात.

चार आठवड्यांत अळ्यांची पूर्ण वाढ होते आणि त्या शेंगांवर किंवा भोके पाडलेल्या शेंगांतच कोशावस्थेत जातात. कोशांतून दोन आठवड्यांत पतंग बाहेर पडतात. अशा रीतीने या कीटकाचा जीवनक्रम सु. सात आठवड्यांचा असतो.

या कीटकांच्या नियंत्रणासाठी डीडीटी, बीएचसी वा कार्बारिलाचा फवारा तुरीला शेंगा लागावयास सुरुवात झाल्याबरोबर देतात. तसेच अळ्या गोळा करून त्यांचा नाश करतात.

पोखरकर, रा. ना.