स्ट्रस वंशातील (लिंबू वंशातील) झाडांवरील पांढरी माशी.पांढरी माशी : हेमिप्टेरा गणाच्या ॲल्युरोडिडी कुलात या माशीचा समावेश होतो. डायॲल्युरोडिस सिट्री  हे तिचे शास्त्रीय नाव आहे. भारत हे तिचे मूलस्थान असून यूरोप खंडाशिवाय जगात सर्वत्र ती आढळते. पन्हेरीतील कलमांद्वारे तिचा प्रसार जपान, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत फ्लॉरिडा आणि कॅलिफोर्निया येथे झाला आहे. प्रौढ माशी अगदी बारीक असून सु. ०·५ मिमी. लांब असते. पंख पांढरे किंवा करडे असतात. शरीर पिवळसर व डोळे लाल असतात. शरीराच्या कडेवर झालरीसारखे राठ केस असतात. अळ्या एकदा पानावर स्थिरावल्यावर तेथेच राहतात.

पांढऱ्या माशीची मादी कोवळ्या पानांच्या पाठीमागे सु. १५०–२०० अंडी घालते. ती १० दिवसांत फुटून अळ्या बाहेर पडतात. स्थिरावण्यास योग्य जागा सापडेपर्यंत अळ्या पानांवर फिरत राहतात, त्यांना सरपटणारी अवस्था म्हणतात. ही अवस्था ३–१० आठवडे राहून त्यांचे कोश बनतात. कोश अंडाकृती, काळसर असून त्यांच्या कडा झालरीसारख्या किंवा दातेरी असतात. काही जातींत त्यांचा मध्यभाग नारिंगी पिवळा असतो.  

पांढऱ्या माशीच्या अनेक जाती असून त्यांचा उपद्रव कागदी लिंबू, संत्रे, मोसंबी, तसेच कापूस, कॉफी, केळी, एरंड ह्या पिकांना व काही शोभेच्या वनस्पतींना होतो. पूर्णावस्थेतील कीटक व अळ्या पानांतील रस शोषतात त्यामुळे ती सुकतात व शेवटी तपकिरी होतात. झाडांची वाढ खुंटते, फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो व फळे लहान आकारमानाची येतात. अळ्या अन्ननलिकेतून मधासारखा स्राव बाहेर टाकतात त्यावर कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) वाढून झाडे काळसर दिसू लागतात. 

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पॅरॅथिऑन फवारतात. तसेच आदर्श हवामानात कीटकांवर किंवा त्यांच्या शरीरात वाढणाऱ्या एजिरिटा ॲशरसोनिया वंशांतील कवकांमुळे पांढऱ्या माशीचा संहार होतो.  

जमदाडे, ज. वि.