गेंडा भुंगेरा : कोलिऑप्टेरा गणाच्या डायनॅस्टिडी कुलातील गेंड्याप्रमाणे डोक्यावर शिंग असणाऱ्या 

गेंडा भुंगेरा

कीटकाला गेंडा भुंगेरा म्हणतात. त्याचे शिंग थोडे वाकडे असून ते फक्त नरालाच असते. रंग काळा व पोटाचा भाग तपकिरी, लांबी ३५ —४० मिमी., रुंदी १४—२१ मिमी. असते. पायावर लहान केस असतात. त्याचे पुढील पंख चिवट असून ते शरीराचा सर्व भाग झाकू शकत नाहीत. हे भुंगेरे माड, पोफळ व ताड यांच्या खोडांत शिरून आतील भाग खातात. त्याच्या उपद्रवामुळे खोडाला बरीच भोके पडलेली दिसतात आणि त्यातून भुसा बाहेर आलेला दिसतो. कधीकधी झाड वाळूनही जाते. ओरिक्टिस ऱ्हिनोसेरॉस  ही उपद्रव देणारी प्रमुख जाती आहे.

मादी खताच्या ढिगात किंवा कुजणाऱ्या पाल्यापाचोळ्यात लांबट गोलाकार, पांढरी अंडी घालते. ८—१४ दिवसांत अंडी उबून त्यांतून अळ्या बाहेर पडतात. त्या ४-५ महिन्यांच्या वाढीच्या काळानंतर कोषावस्थेत जातात. ती २०—६० दिवसांची असते. एक पिढी पुरी होण्यास १०—१२ महिने लागतात. नियंत्रणासाठी नारळ-सुपारीच्या बागेतील खताच्या खड्ड्यांत ०·१% बीएचसीचे फवारे मारतात. तारेच्या आकड्याने भोकातील भुंगेरे काढून मारतात. तसेच ५% बीएचसी व वाळू समप्रमाणात मिसळून त्या मिश्रणाने भोके बंद करतात. 

पोखरकर, रा. ना.