कोचिनियल कीटक : हेमिप्टेरा गणाच्या कॉक्सिडी कुलातील पिठ्या किड्यांना (डॅक्टिलोपियस कॉक्स) कोचिनियल कीटक म्हणतात. या कीटकाच्या मादीच्या शरीरापासून कोचिनियल नावाचा गर्द तांबडा रंग तयार करतात व त्याचा मुख्यत: खाद्यपेये, औषधे व सौंदर्यप्रसाधने यांमध्ये उपयोग करतात. मादी लांबट अंडाकृती बहिर्गोल असून तिचे पाय आणि स्पर्शेंद्रिये लहान असतात. या कीटकांची कोरड्या हवेत निवडुंगावर जोपासना करतात. मेक्सिकोमधील ॲझटेक या वन्य जमातीच्या लोकांनी सु. तेराव्या शतकात या कीटकांपासून मिळणाऱ्या रंगाचा प्रथम उपयोग केला. या कीटकांपासून रंग मिळविण्याचे काम हाँडुरस, कानेरी बेटे, मेक्सिको, अल्जिअर्स, स्पेन व पेरू या देशांत चालते.

वसंत ऋतूमध्ये मादी कीटक निवडुंगावर सोडतात. तीन महिन्यांत त्यांची पूर्ण वाढ होते. नंतर त्या गोळा करून गरम पाण्याने किंवा वाफेने मारतात व शुद्ध करून त्यांच्या शरीरापासून रंग तयार करतात. एक किग्रॅ. रंग निर्मितीसाठी सु. दोन लाख कीटकांची आवश्यकता असते.

दोरगे, सं. कृ.