ऱ्हायझोम माशी : (गड्डा माशी). या माशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या मायक्रोपेझिडी कुलात होतो. मायमेग्राला सेरूलीफ्रॉन्स हे हिचे शास्त्रीय नाव आहे. आले व हळद या पिकांना या माशीचा उपद्रव कमीजास्त प्रमाणात देशाच्या विविध भागांत होतो. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांत तसेच महाराष्ट्रात सातारा, सांगली या आले व हळद पिकविणाऱ्या जिल्ह्यांत विशेषेकरून ती आढळते व ती बऱ्याच अंशी नुकसानकारक ठरली आहे.

ऱ्हायझोम माशी सर्वसाधारणतः वरकरणी काळ्या मुंगळ्यासारखी, मोठ्या आकाराची, लांब पायांची आणि सडपातळ शरीराची असते. तिचे पुढचे दोन्ही पाय डोक्यासमोर शृंगिकांप्रमाणे (सांधेयुक्त स्पर्शेंद्रियाप्रमाणे) दिसतात व त्यांची एकसारखी हालचाल चाललेली असते. पंखावर बहुधा खुणा किंवा ठिपके असतात.

सडणाऱ्या झाडपाल्यात ही माशी आढळते. मादी पानांच्या पोंग्यांत अंडी घालते. ३-५ दिवसांत अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. त्या आल्याच्या नवीन वाढणाऱ्या शेंड्यांखालील भाग खाण्यास सुरुवात करतात. त्यामुळे गड्ड्यांवरील डोळे मरतात. त्याचप्रमाणे अळ्या हळदीच्या गड्ड्यांतही शिरून आतील भाग खातात. त्यामुळे गड्डे सडतात. ८ ते १२ दिवसांत अळ्यांची वाढ पूर्ण होऊन त्या गड्ड्यांतच कोशावस्थेत जातात. ६ ते १० दिवसांत कोशावस्थेतून प्रौढ माशी बाहेर येते व ती ७ ते ८ दिवस जगते. ऑगस्ट-सप्टेंबर काळात या माश्या पिकांत दिसतात. दुपारच्या उन्हाच्या वेळेला त्या हळदीच्या पानांच्या खाली सावलीत दडून बसतात.

याशिवाय पुढील माश्यांमुळेही आल्याच्या गड्ड्यांचे नुकसान होते : (१) जिम्नोन्यूरस फ्युस्कस ही माशी मायक्रोपेझिडी कुलातील असून वरील माशीशी तिचे साम्य आहे. (२) चाल्सिडोमिया ट्रिकॉर्निसफॉर्मोसिना फ्लाव्हिपीस या माश्यांच्या अळ्या दक्षिण भारतात आल्याच्या गड्ड्यांत सापडतात. त्यामुळे आले सडते मात्र आले सडण्याचे हे प्राथमिक कारण असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. यांपैकी पहिल्या माशीमुळे वेलदोड्याचे नुकसान होते. दोन्ही माश्या क्लोरोपिडी कुलातील आहेत. (३) सेलिफस प्रजातीच्या माश्या सेलिफिडी कुलातील असून त्या उत्तर भारतात आल्याचे गड्डे खाताना आढळतात.

ऱ्हायझोम माश्यांचा उपद्रव कमी करण्याकरिता किडलेले बियाणे लागणीसाठी वापरू नये. झाडांचे वाळलेले शेंडे काढून अळ्यांचा नाश केल्यास पुढील हंगामात गड्ड्याला होणारा किडीचा उपद्रव टाळता येतो. शिवाय ३ ते ४ आठवड्यांच्या अंतराने डायझिनॉनाच्या दोन फवारण्या व त्यानंतर एक महिन्याने पुन्हा ३-४ आठवड्यांच्या अंतराने तीन वेळा डायझिनॉन फवारणे उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. तसेच लागवडीनंतर आंबवण्याच्या (दुसऱ्या पाण्याच्या) वेळी हेक्टरी २.५ लिटर डायझिनॉन किंवा एंडोसल्फान पाण्यातून दिल्यास अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्यांचे प्रमाण घटते असे आढळले आहे. तसेच पाऊस उघडल्यावर उभ्या पिकामध्ये दोन झाडांच्या मधील जागेत १०% बीएचसी भुकटीची रांगोळी घातल्यास अळ्यांच्या प्रसारास आळा बसतो.

तलगेरी, ग. मं. रामुडकर, वा. ब.