कातरा कीड: ह्या किडीच्या अळ्या (ॲमसॅकाच्या जाती) ज्वारी, मका, कपाशी, एरंड इ. पिकांवर व सर्व प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करतात. त्या ३.८-५ सेंमी. लांब असून त्यांच्या सर्वांगावर उदी रंगाचे दाट केस असतात. त्यांच्या पतंगांचे साधरणतः तीन प्रकार दिसून येतात. पहिल्या प्रकारच्या पतंगांचे शरीर किरमिजी रंगाचे असून त्यावर काळे पट्टे व ठिपके असतात. पंखांच्या पहिल्या जोडीच्या बाह्य कडा शेंदरी असतात. दुसऱ्या प्रकारचा पतंग नारिंगी असून त्याच्या अंगावर काळे पट्टे व ठिपके असतात. तसेच पंखांची पहिली जोडी पांढरी व त्यांच्या पुरस्थ (मागील) कडा लाल असतात. पंखांची मागची जोडी पांढरी असून त्यांवर काळे ठिपके असतात. तिसऱ्या प्रकारच्या पतंगाचे शरीर पिवळे असून पंखांच्या पहिल्या जोडीच्या बाह्य कडा पिवळ्या असतात.

कातरा कीड : (१) सुरवंट, (२) कोश, (३) पतंग.

त्यांच्या माद्या गवताच्या किंवा झाडाझुडपांच्या पानांच्या खालच्या बाजूवर पिवळसर पांढरी अंडी घलतात. साधारणतः पाच दिवसांत अंडी उबून त्यांतून अळ्या बाहेर पडतात व तेथेच पाने खाऊ लागलात व नंतर पिकांवर आक्रमण करतात.

तीन आठवडयांत त्यांची पूर्ण वाढ होते व त्या जमिनीत शिरुन कोश तयार करतात व पुढील पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत राहतात. त्यांची वर्षभरात एक पिढी तयार होते. ते फार अधाशीपणाने खातात व सर्व पीक नष्ट करतात. त्यामुळे पुनःपुन्हा पेरणी करावी लागते. या किडीवर निश्चित उपाय माहीत नाहीत. तथापि एक हेक्टर क्षेत्रावर ३.७५-५ किग्रॅ. पायरेथ्रम चारशे लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास उपयुक्त ठरते.

  

बोरले, मु.नी.