गोमाशी : हिचा समावेश डिप्टेरा गणाच्या टॅबॅनिडी कुलात करतात. या कुलात सु. २,५०० जाती असून त्यांचा प्रसार मुख्यतः उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे. तथापि बऱ्याच जाती समशीतोष्ण कटिबंधातही आढळतात. त्या आकाराने मध्यम ते मोठ्या, बळकट, लवदार, सामान्यतः गर्द आणि मंद रंगांच्या असून पंख स्वच्छ किंवा धूसर असतात. डोके मोठे, अर्धवर्तुळाकार किंवा काहीसे त्रिकोणी डोळे मोठे, संलग्न किंवा काही नरांत वरच्या बाजूला जुळणारे (होलोप्टिक) किंवा पूर्णपणे भिन्न असलेले (डायकॉप्टिक) असतात. शृंगिका (सांधे असलेली लांब स्पर्शेंद्रिये) लांब किंवा आखूड, प्रक्षेपी असतात. मुखांगे वेधक (भोके पाडणारी) व शोषक प्रकारची असून जंभिकांची (भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता असणाऱ्या संरचनांची) रुंद कर्तक पाती असतात. चिबुकास्थी (चर्वण करण्याचे अवयव) बळकट, भाल्यासारखी अधरोष्ठ (खालचा ओठ) सरळ, आखूड व

गोमाशी

बळकट किंवा लांब व सडसडीत असतो. वक्ष मोठे व बहुधा लवदार असते. पंख मोठे व काचेसारखे पाय बळकट, केसाळ किंवा केशहीन. उदर लवदार, रुंद, फुगीर किंवा खोलगट. अंड्यांचे पुंजके संयोजक द्रव्याने (सिमेंटने) झाकलेले दिसतात. डिंभ (अळी) क्वचितच स्थलवासी, बहुधा बरेच अर्धजलवासी वा जलवासी असतात.

प्रौढ गोमाश्या उत्तम उडणाऱ्या असून पाण्याच्या जवळपास उडताना भरपूर आढळतात. काही गोमाश्या फुलातील मध किंवा वनस्पतीतून वाहणारा रस खातात, परंतु बहुसंख्य जाती रक्तशोषक व खूप चावणाऱ्या आहेत. त्या घोडे व गुराढोरांच्या जाड कातडीला जलद भोके पाडतात व त्यामुळे रक्तस्राव होतो. तो शोषून माद्या टच्च फुगतात. माणूस व इतर नियततापी (शरीराचे तापमान कमीअधिक स्थिर असणाऱ्या) प्राण्यांनाही त्यांचा फार उपद्रव होतो. विशिष्ट जाती गुरेढोरे व मेंढ्यातील संसर्गजन्य काळपुळीचा [→ काळपुळी, संसर्गजन्य] प्रसार करतात. इतर जाती ट्रिपॅनोसोम या प्रजीवांमुळे (एकच पेशी असणाऱ्या जीवांमुळे, प्रोटोझूनमुळे) होणाऱ्या घोड्यांच्या सरा या गंभीर रोगाचा प्रसार करतात. 

नियंत्रण : गोमाश्यांवर परिणामकारक उपाय उपलब्ध नाही. साचलेल्या डबक्यात क्रूड ऑइल टाकतात. जनावरांच्या अंगावर पायरेथ्रिनाचा फवारा मारतात. गोमाश्यांच्या दलदलीतील प्रजननस्थानी डिंभनाशक म्हणून हेक्टरी ७५० ग्रॅ. ५% दाणेदार डायएल्ड्रिन टाकल्यास नियंत्रण होते. 

जमदाडे, ज. वि.