छिद्रपाट व धारक पकड : (जिग व फिक्स्चर) यांत्रिक हत्यारावर काम करताना निरनिराळ्या आकारांच्या वस्तूंना अगदी ठराविक ठिकाणी भोके किंवा खाचा पाडण्यासारख्या वेळ घेणाऱ्या व अवघड क्रिया सामान्य कामगाराकडून अगदी सहजपणे व माफक वेळात करवून घेण्यासाठी बनविलेली साधने. ही अनेक प्रकारची असतात पण ह्यांत छिद्रपाट आणि धारक पकडी ही विशेष महत्त्वाची आहेत.

आ. १. छिद्रणासाठी वापरावयाचा छिद्रपाट : (१) भोके पाडावयाची वस्तू (पट्ट), (२) छिद्रपाट, (३) खुंट्या, (४) अखंड पोलादी नळीचा मार्गणक, (५) भोके पाडावयाच्या जागा.

छिद्रपाट : मोठ्या वस्तूवर अनेक भोके पाडताना छिद्रपाट वापरला नाही, तर प्रत्येक भोकाच्या जागेवर मापे घेऊन खूण करावी लागते व त्या खुणेवर पोलादी पंच (टोकदार जाड खिळ्यासारखे साधन) ठोकून लहानशी खळगी करावी लागते. नंतर या खळगीवर छिद्रक (छिद्र पाडण्याचे कर्तक हत्यार) आणून तो दाबून फिरवू लागले की, तो बाजूला सरकत नाही व आपणास हव्या त्याच ठिकाणी भोक पडते. मोठ्या वस्तूवर मापे घेऊन भोकांच्या खुणा करण्यासाठी उत्तम कारागीर लागतो व त्यालाही पुष्कळ वेळ खर्च करावा लागतो. छिद्रपाट वापरल्याने मापे घेऊन खुणा करणे व खळग्या पाडणे ही कामे करावी लागत नाहीत आणि त्यामुळे मजुरीचा खर्च पुष्कळ कमी होतो कामासाठी लागणारा वेळ वाचतो व सर्व काम अगदी अचूक होते परंतु प्रत्येक नवीन कामासाठी त्याला जुळेल असा स्वतंत्र छिद्रपाट बनवावा लागतो. छिद्रपाट बनविण्यासाठी बराच खर्चही करावा लागतो. त्यामुळे छिद्रपाटाचा उपयोग किरकोळ कामासाठी करावा किंवा नाही, हे सर्व बाजूंनी विचार करूनच ठरवावे लागते. महोत्पादनात (मोठ्या प्रमाणावरील उत्पादनात) मात्र छिद्रपाट वापरणे नक्कीच फायद्याचे होते. छिद्रपाटाचे एक साधे उदाहरण आ. १ मध्ये दाखविले आहे. एका पट्टाच्या (धातूच्या जाड पत्र्याच्या) तुकड्यावर दिलेल्या ठिकाणी दोन भोके पाडण्यासाठी हा छिद्रपाट बनविलेला आहे. तो पट्टावर योग्य तऱ्हेने बसविला म्हणजे दोन्ही भोके पाडावयाच्या जागा (४) या मार्गणक (योग्य ठिकाणी नेणाऱ्या) नळ्यांच्या खाली आपोआप अचूक येतात. या नळ्यांतून छिद्रक आत दाबून फिरविला म्हणजे पट्टावर अगदी दिलेल्या ठिकाणी भोके पडतात. भोकांची जागा छिद्रपाटावर बसविलेल्या अनेक पोलादी खुंट्यांनी निश्चित केली जाते. त्यामुळे अगोदर पट्टावर भोकांच्या मध्यबिंदूवर मापून खूण करणे व त्या जागी पंचने खळगी करणे या गोष्टींची जरुरी उरत नाही. छिद्रपाट कधी वरीलप्रमाणे अगदी साधे असतात, तर काही कामांसाठी ते संयुक्त प्रकारचेही करावे लागतात. हे दोन किंवा तीन भागांचेही असतात.

आ.२. साध्या धारक पकडी : (अ) वस्तू ठेवण्यासाठी अचूक मापाचे दोन सारखे ठोकळे, (आ) पकडीचा कोनी ठोकळा, (इ) दंडगोल भाग ठेवण्याचे ठोकळे.

धारक पकड : ज्या वस्तूला भोके पाडावयाची असतात किंवा इतर यांत्रिक क्रिया करावयाच्या असतात ती वस्तू यंत्राच्या मंचावर योग्य प्रकारे चांगली धरून ठेवावी लागते, नाहीतर हत्यार तुटते किंवा वस्तू खराब होते. लेथवर काम करताना वस्तू चकमध्ये नीट धरून ठेवतात. लेथचा चक हा धारक पकडीचा एक सामान्य प्रकार आहे, परंतु जटिल आकाराची वस्तू चकमध्ये बरोबर धरून ठेवण्यासाठी तिला पुष्कळ ठिकाणी टेकू द्यावे लागतात व या कामी पुष्कळ वेळही खर्च होतो. तो वेळ वाचविण्याकरिता प्रत्येक वस्तूसाठी तिच्या आकाराला जुळेल अशी स्वतंत्रधारक पकड बनवावी लागते. तिचा वापर केल्याने कोणत्याही आकाराची वस्तू अगदी योग्य स्थितीत सहज धरून ठेवता येते.

धारक पकडी साधारणतः ओतीव लोखंडाच्याच बनवितात व त्यांचे पृष्ठभाग यंत्रणाने अगदी सपाट करतात. या पकडी मुद्दाम मजबूत घडणीच्या केलेल्या असतात. त्यामुळे त्यांवर भार पडला, तरी त्यांचा आकार बदलत नाही व कामाच्या अचूकपणात फरक पडत नाही. मोठ्या आकाराच्या वस्तूला धरून ठेवण्यासाठी अनेक पकडी वापरल्या, तर त्या एकमेकींपासून शक्य तितक्या दूर ठेवल्या म्हणजे वस्तू चांगली स्थिर राहते व कलत नाही. धारक पकडीमध्ये छिद्रपाटाप्रमाणे हत्याराच्या मार्गणाची सोय केलेली नसते. धारक पकडींचा उपयोग मुख्यतः लेथ, छिद्रण यंत्रे व चक्रीकर्तन (मिलिंग) यंत्रांमध्ये होतो.

आ. ३. चक्रीकर्तन यंत्रात वापरण्याची एक नमुनेदार धारक पकड : (१) गाळा पाडावयाचा दंड, (२) दंड दाबून धरण्याचा चाप.

धारक पकडीचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारात वस्तूवर काम करताना तिच्यावर येणाऱ्या दाबानेच ती पकडून ठेवण्याचे कार्य साध्य होते. अशा साध्या धारक पकडी आ. २ मध्ये दाखविल्या आहेत. मधील पकड म्हणजे सारख्या उंचीचे दोन नुसतेच ठोकळे आहेत. त्यांचा उपयोग वस्तूला सम (एकाच पातळीतील) बैठक पुरविणे एवढाच असतो. मधील पकडही याच तऱ्हेची आहे, पण ती खास करून दंडगोल छेदाच्या वस्तूंसाठी आहे. मधील पकड मात्र खरी पकडच असून कोनाच्या उभ्या भागाला बोल्ट लावून त्यांनी वस्तू धरून ठेवता येते. दुसऱ्या प्रकारात काम करावयाची वस्तू योग्य स्थितीत चांगली धरून ठेवता यावी म्हणून अनेक चापांचा उपयोग करतात. चक्रीकर्तन यंत्रावर वापरण्याची अशी एक धारक पकड आ. ३ मध्ये दाखविली आहे. ही पकड एकावेळी दोन दंड धरू शकते. या पकडीत दंड धरून ठेवण्यासाठी स्क्रू व नटाने आवळता येणारे तीन चाप दाखविले आहेत. या पकडीतील डावीकडील भागात दंडावर पहिला गाळा उकरण्याचे काम करतात व त्याच दंडावर १८०° सोडून दुसरा गाळा उकरावयाचा असला, तर तो दंड उजवीकडील भागात ठेवतात. उजवीकडील भागात खालच्या बाजूला एक चावी बसवलेली असते. तिच्या साहाय्याने एक गाळा काढलेला दंड अगदी बरोबर जागी सहज धरून ठेवता येतो.

आ.४ तीन बिंदू आधार पद्धत : (१) काम करावयाची वस्तू, (२) आधार, (३) वस्तूचा गुरुत्वमध्य, (४) पकडी, (५) फलित दाब.

कोणत्याही पद्धतीच्या पकडीत काम करावयाची वस्तू नीट धरण्यासाठी तीन बिंदू आधार पद्धत ही आदर्श असते. आधाराचे तीन बिंदू निवडताना पकडलेल्या वस्तूवर चापांच्या दाबांचा फलित दाब संबंधित पृष्ठभागाच्या गुरुत्वमध्यातून जाईल असे पहावे लागते. आ. ४ मध्ये ही पद्धती दाखविली आहे. तीत चौकोनी तुकड्यावर चारी बाजूंनी चाप आवळले, तरी त्या तुकड्याचा गुरुत्वमध्य आधारांच्या मध्यावरच राहील.

चिमटे : छिद्रपाट किंवा धारक पकडींचा वापर करताना निरनिराळ्या प्रकारचे चाप किंवा चिमटे वापरावे लागतात. काही वेळा काम करावयाची वस्तू विद्युत् चुंबकाने, द्रवीय दाबाने किंवा संपीडित (दाबाखालील) हवेच्या दाबानेही धरून ठेवता येते परंतु या तिन्ही पद्धती खर्चिक आहेत व त्या फक्त महोत्पादनातच वापरतात. साधारण कामासाठी आ. ३ मध्ये दाखविलेले नटाने आवळण्याचे चापच वापरतात. चापांचे इतरही काही प्रकार आहेत. काम करावयाच्या वस्तूचा आकार व कामाचा प्रकार पाहून योग्य होईल असा चिमटा निवडावा लागतो. 

संदर्भ : Tuplin, W. A. Modern Engineering Workshop Practice, Vol.II, London, 1959.

गोखले, श्री. पु.