ग्रॅप्टोलाइट : पुराजीव महाकल्पात (सु. ५४ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात), विशेषतः त्या महाकल्पाच्या पूर्वार्धात पृथ्वीवरील सागरात राहणाऱ्या प्राण्यांच्या एका गटाचे नाव. मृण्मय खडकांत, विशेषतः काळ्या रंगाच्या कार्बनयुक्त शेलात [→ शेल] यांचे विपुल जीवाश्म (अश्मीभूत अवशेष) आढळतात. वालुकाश्मात किंवा चुनखडकात ते विरळाच आढळतात. ग्रॅप्टोलाइटे ही संयुक्त म्हणजे निवह-प्राणी (एकत्र वसाहत करून राहणारे प्राणी) असत. त्यांच्या शरीरांचे मऊ भाग एका बाह्य कंकालाने (परित्वचेने) झाकलेले असत. कंकाल कायटिनी पदार्थाचा [→ कायटिन] बनलेला असे. ग्रॅप्टोलाइटांच्या म्हणजे त्यांच्या निवहाच्या एकूण कंकालास रॅब्डोसोम किंवा पॉलिपेरी म्हणतात.

शेलात जीवाश्मरूपाने आढळणारे जे कंकाल (सांगाडे) असतात ते खडकांच्या भाराखाली दाबले गेल्यामुळे चापट व पातळ कागदासारखे झालेले असतात. कंकालाच्या मूळच्या कायटिनी द्रव्याचे कार्बनी (सेंद्रिय) पदार्थात, सामान्यतः ग्रॅफाइटात परिवर्तन झालेले असते. न दाबले गेलेले व विरूप न झालेले जीवाश्म क्वचित पण अगदी विरळाच आढळतात. कधीकधी कंकाल दाबला जाण्यापूर्वी त्याच्या घटकद्रव्याच्या जागी पायराइट हे यदृच्छ्या स्थापित झालेले असते. त्यामुळे कंकाल विरूप न होता त्याचे स्वरूप टिकून राहू शकते. अशा विरूपण न झालेल्या व अप्रतिष्ठापित किंवा प्रतिष्ठापित जीवाश्मांचे परीक्षण करून ग्रॅप्टोलाइटांच्या कंकालांचे आकार, आकारमान व संरचना यांविषयी माहिती मिळविण्यात आलेली आहे.

आ. १. मोनोग्रॅप्टस एकच दांडा, एक श्रेणी : (१) व्हर्ग्युला, (२) चषक-प्रावार, प्रत्येक चषक-प्रावार करवतीच्या दातासारखा दिसतो, (३) सामायिक नाल, (४) सिक्यूला.

पेल्याच्या किंवा पंचपात्राच्या आकाराच्या अनेक कोशिका (पेशी) एका दांड्यावर

आ. २. डिप्लोग्रॅप्टस एकच दांडा, द्विश्रेणी : (१) व्हर्ग्युला, (२) चषक-प्रावार, (३) सामायिक नाल, (४) सिक्यूला.

बसविल्यासारखा ग्रॅप्टोलाइटांचा कंकाल तयार झालेला असे. काही वंशांतल्या कंकालात दांड्याच्या एकाच बाजूस (आ. १) तर काही वंशांतल्या कंकालात दांड्याच्या दोन विरुद्ध बाजूंस (आ. २) कोशिका बसविलेल्या असत. कोशिकांची एकच रांग असणाऱ्या प्रकारास एकश्रेणी (आ. १) व दोन रांगा असणाऱ्या प्रकारास द्विश्रेणी (आ.२) प्रकार म्हणतात. चार एकश्रेणी दांड्यांच्या पाठी एकमेकींस जोडून तयार झालेला कंकाल क्वचित आढळतो (आ.३). हा चौधारी शेंगेसारखा दिसतो. काही कंकाल एकेरी तर काहींना दोन वा अधिक शाखा फुटलेल्या असत. ग्रॅप्टोलाइटे ही निवहजीवी हायड्रोझोआंच्या वर्गांतील असावीत असे कित्येकांचे मत आहे. कंकालातील प्रत्येक कोशिका म्हणजे एक चषक-प्रावार (आवरणाचा पेल्याच्या आकाराचा विस्तार) असावा व तिच्यात एक पॉलिप (निवहातील व्यक्तिगत प्राणी) बसविलेला असावा अशी कल्पना आहे. चषक-प्रावाराचा वरचा भाग उघडा असे व त्याच्या खालच्या भागात एक छिद्र असून त्या छिद्राच्या द्वारे तो चषक एका सामायिक नालाच्या पोकळीशी जोडलेला असे. त्या पोकळीतील एका योजक (जोडणाऱ्या) नालाने सर्व पॉलिप जोडले गेले असावेत.

पॉलिपेरीची वाढ ज्या टोकापासून सुरू झाली त्या टोकाशी लहानशा शंकूसारखा एक भाग असतो, त्याला सिक्यूला म्हणतात. पॉलिपेरीच्या सिक्यूला असलेल्या टोकाला समीपस्थ व त्याच्या विरुद्ध टोकाला दूरस्थ टोक म्हणतात. कित्येक वंशांच्या चषक-प्रावाराच्या विरुद्ध बाजूकडील कंकालाच्या भिंतीत एक कायटिनी काडी किंवा धागा असे. त्याला व्हर्ग्युला म्हणतात.

आ. ३. फायलोग्रॅप्टस : (अ) चार एकश्रेणी दांड्यांच्या पाठी जोडून तयार झालेली पॉलिपेरी, (आ) पॉलिपेरीचा आडवा छेद.निवह सशाख आहे की अशाख आहे, तो एकश्रेणी आहे की द्विश्रेणी आहे, चषक-प्रावाराचा आकार कसा आहे इ. गोष्टी लक्षात घेऊन ग्रॅप्टोलाइटांचे निरनिराळे वंश व जाती केल्या जातात. त्यांच्यापैकी काही महत्त्वाच्या जातींच्या आकृत्या सोबत दिल्या आहेत.

ज्याच्याकरवी पॉलिपेरी ही समुद्राच्या तळाशी असलेल्या मातीत चिकटविली किंवा तिच्यात रुतविली 

 आ. ४. डिडिमोग्रॅप्टस दोन एक श्रेणी दांडे जुळून तयार झालेली चिमट्याच्या आकाराची सममित पॉलिपेरी : (१) सिक्यूला.जाईल असा कोणताही अवयव ग्रॅप्टोलाइटांना नसतो. हे प्राणी स्थानबद्ध नसून प्लवक (तरंगणारे) असत. ते सागरातील शेवाळांना चिकटून राहत किंवा पाण्यात पोहत राहत. त्यांच्यापैकी काहींना तरंगणाऱ्या फुग्यासारखे किंवा  आ.५. क्लोनोग्रॅप्टस अनेक शाखा असलेली पॉलिपेरी प्रत्येक शाखेला फाटे फुटलेले बत्तिसापर्यंत किंवा अधिक अग्र-शाखा.

तबकडीसारखे अवयव असत (आ. ६ व ७) आणि त्या अवयवांना चिकटून ते पाण्यात लोंबत राहत असत. ग्रॅप्टोलाइटांच्या अशा राहणीमुळे त्यांची कोणतीही जाती घेतली तरी जिचे जीवाश्म विस्तृत क्षेत्रात पसरलेले आढळतात. म्हणून दूरदूरच्या क्षेत्रातील खडकांमधील सहसंबंध ठरविण्यास ग्रॅप्टोलाइटांचा अतिशय उपयोग होतो. ग्रॅप्टोलाइटांचा क्रमविकास (उत्क्रांती) वेगाने झाला. त्यांच्या जाती अल्पकाल टिकून लवकरच निर्वंशही झाल्या. म्हणून खडकांचे वय ठरविण्यासाठी, विशेषतः (भूवैज्ञानिक) काळाचे लहान लहान विभाग ओळखून काढण्यासाठी त्यांच्या जातींचा अतिशय उपयोग होतो.

आ. ६. डिप्लोग्रॅप्टस द्विश्रेणी दांडे व्हर्ग्युला लांब व्हर्ग्युल्याच्या दूरस्थ टोकाने अनेक पॉलिपेऱ्या प्लवाला जोडलेल्या असत : (१) प्लव (तरंगत ठेवणारा फुगा).

ग्रॅप्टोलाइटांचा अवतार कँब्रियन कल्पाच्या अखेरीस (सु. ५१ कोटी वर्षांपूर्वी) झाला व ऑर्डोव्हिसियन कल्पात (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) ते विपुल असत. ते सर्व सशाख असून सर्वांत जास्ती शाखा असणारे वंश आधीचे व उत्तरोत्तर कमी शाखा असणारे वंश नंतरच्या काळातले होते. सिल्युरियन कल्पात (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) अशाख वंश, विशेषत: मोनोग्रॅप्टस  

 आ. ७. टेट्राग्रॅप्टस चार एकश्रेणी व अरीय दिशेने जाणारे दांडे मध्य तबकडीने जोडले गेलेले असत : (१) मध्य तबकडी.

हा वंश प्रमुख व विपुल होता. सिल्युरियन कल्पाच्या अखेरीस सामान्य ग्रॅप्टोलाइटे निर्वंश झाली. पण डेव्होनियन कल्पात (सु. ४o ते ३६·५ कोटी वर्षापूर्वीच्या काळात) आणि कार्‌बॉनिफेरस कल्पाच्या (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) अखेरीपर्यंत वृक्षाभ (झाडांसारख्या) ग्रॅप्टोलाइटांचे काही वंश जिवंत होते.

आ.८. टेट्राग्रॅप्टस चार दांडे एकमेंकाना जोडले गेलेले असत पण मध्य तबकडी नाही.ग्रॅप्टोलाइटांच्या शरीराचे मऊ भाग उपलब्ध झालेले नाहीत आणि प्राण्यांच्या कोणत्या वर्गात त्यांना घालावे हे निश्चित सांगता येत नाही. ग्रॅप्टोलाइट हे निवह-प्राणी होते व त्यांचे कंकाल स्थूल मानाने आजच्या हायड्रोझोआ वर्गातल्या काही प्राण्यांच्या कंकालांसारखे, उदा., कॅलिप्टोब्लास्टिया या गणातील सर्टुलॅरिया  किंवा प्ल्युम्युलॅरिया  या वंशातील प्राण्यांच्या कंकालासारखे होते. म्हणून ते हायड्रोझोआंपैकी असावे अशी कल्पना होती. परंतु ग्रॅप्टोलाइटांची वाढ होण्याची पद्धती हायड्रोझोआंच्या वाढीच्या पद्धतीहून वेगळी असल्यामुळे ते हायड्रोझोआंपैकी नसावेत असे कित्येकांचे मत आहे. ग्रॅप्टोलाइटांच्या वाढीची पद्धती, विशेषतः देहांकुरांच्या (नलिकाकार वाढींच्या) द्वारे त्यांना शाखा फुटण्याची पद्धती हेमिकॉर्डेटा (टेरोब्रँकिया) गटातील प्राण्यांच्या वाढीच्या पद्धतीसारखी (उदा. ऱ्हेब्डोप्ल्यूरा  वंशातील प्राण्यांच्या वाढीसारखी) असते म्हणून ग्रॅप्टोलाइटे ही टेरोब्रँकियाच्या गटातील असावीत, असे मत मांडण्यात आलेले आहे. या मताला निश्चित पुरावा नाही, पण असंभवनीय नाही. टेरोब्रँकिया हे कशेरुकी (पाठीचे मणके असलेल्या) प्राण्यांपैकी सापेक्षतः नीच स्थान असणारे प्राणी होत. ग्रॅप्टोलाइटे ही ज्या काळात राहत होती त्या काळात कशेरुकी प्राण्यांचा उदय होत होता व त्या काळात कशेरुकी प्राण्यांचे असे नीच गट अस्तित्वात असणे क्रमविकासवादाशी विसंगत ठरणार नाही.

आ. ९. डिक्टिओनेंमा अनेक अरीय शाखा व त्यांना जोडणारे लहान लहान आडवे दांडे.

डेंड्रॉइड ग्रॅप्टोलाइटे : ग्रॅप्टोलाइटाशी संबंधित अशा सागरी व निवह-प्राण्यांच्या गटाचे नाव. यांचा कंकाल बराच शाखित (फांद्या असलेला) व दिसण्यात एखाद्या वृक्षासारखा असतो म्हणून त्यांना डेंड्रॉइड म्हणजे वृक्षाभ ग्रॅप्टोलाइट म्हणतात. या गटातील कित्येक जातींच्या कंकालांच्या सिक्यूलाला मुळासारखा अवयव जोडलेला असतो व त्याच्या करवी तो कंकाल समुद्राच्या तळाला चिकटविलेला असतो. इतर कित्येक जाती प्लवक असत. त्यांच्या सिक्यूलापासून नेमा नावाचा एक धागा निघत असे व त्याच्या करवी तो कशाला तरी टांगला जात असे. या गटातील मुख्य वंश म्हणजे डिक्टिओनेमा  किंवा डिक्टिओग्रॅप्टस (आ. ९). याच्या कंकालात पुष्कळ फांद्या असून त्या अरीय पण एकमेकींस जवळजवळ समांतर असत व त्यांना जोडणारे लहान लहान आडवे दांडे असत. कंकालाच्या मूळचा आकार नसराळ्यासारखा असे. पण दगडात आढळणाऱ्या जीवाश्मांचा आकार चापट व त्रिकोणी पंख्यासारखा झालेला असतो. कंकालांच्या शंकूच्या आतल्या पृष्ठावर अनेक चषकप्रावार असतात. ते सर्व सारखे नसून तीन प्रकारचे असतात. या वंशातील काही जातींच्या कंकालात नेमा नसे, तर काहींचा नेमा जाड होऊन त्याचे मूळ झालेले असे आणि त्यांचे कंकाल स्थानबद्ध असत. या वंशाचा आयुःकालावधी कँब्रियन कल्पाच्या अखेरीपासून तो कार्‌बॉनिफेरस कल्पापर्यंत होता. डेंड्रॉइड ग्रॅप्टोलाइटे ही ग्रॅप्टोलाइटाशी संबंधित होती असे मानले जाते. पण प्राण्यांच्या वर्गीकरणात त्यांना कोणते स्थान द्यावे हे निश्चित सांगता येत नाही.

केळकर, क. वा.