मणिलाल नभुभाई द्विवेदीमणिलाल नभुभाई द्विवेदी : (१० सप्टेंबर १८५८ – १ ऑक्टोबर १८९८). गुजराती साहित्याच्या पंडितयुगातील (१८८५ – १९१५) एक श्रेष्ठ अष्टपैलू लेखक व आधुनिक गुजराती गद्याचे शिल्पकार, जन्म नडियाद येथे. शिक्षण नडियाद आणि मुंबई येथे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भावनगर येथील शामळदास कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्यांचे नडियाद येथे निधन झाले. तथापि ह्या चाळीस वर्षांच्या अल्प आयुर्मर्यादेत त्यांनी गुजराती साहित्याची विविध प्रकारे मौलिक सेवा करून गुजराती साहित्यावर आपला कायम ठसा उमटविला. ते आर्य संस्कृतीचे व शंकराचार्यप्रणीत अद्वैत वेदान्ताचे कडवे पुरस्कर्ते होते. इतर धर्म व संस्कृतींपेक्षा स्वधर्माची व अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानाची श्रेष्ठता त्यांनी सतत प्रतिपादन केली. गुजरातीत तसेच इंग्रजीतही त्यांनी विपुल लेखन केले आहे. मणिलाल यांचे खाजगी जीवन डागळलेले होते आणि त्याची त्यांना जाणीवही होती. आपल्या दैनंदिनीमध्ये त्यांनी आपल्या खाजगी जीवनातील ह्या सर्व गोष्टी प्रांजळपणे लिहून ठेवल्या आहेत. धीरूभाई ठाकर यांनी त्यांची ही दैनंदिनी संपादून १९७९ मध्ये मणिलाल नमुभाई द्विवेदीनुं आत्मवृत्तान्त ह्या शीर्षकाने प्रसिद्ध केली आहे. मणिलालांचे खाजगी जीवन आणि वाङ्‍मय यांच्यातील परस्परसंबंधांचा विचार करण्याच्या दृष्टीने ते अभ्यासनीय ठरेल.

कान्ता (१८८२), प्राणविनिमय (१८८८), सिद्धांतसार (१८८९), बाल विलास आत्मनिमज्‍जन (१८९५), प्रेमजीवन (१८९७), गुलबसिंह (१८९७), सुदर्शन गद्यावलि (१९०९) इ. त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ होत. त्यांनी विविध नियतकालिकांतून धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य इ. विविध विषयांवर जे अनेक पांडित्यपूर्ण लेख लिहिले, ते सुदर्शन गद्यावलीमध्ये संगृहीत आहेत. इंग्रजीत त्यांनी लिहिलेले प्रमुख ग्रंथ राजयोग (१८८५), मोनिझम ऑर अद्वैतिझम (१८८९), द अद्वैत फिलॉसॉफी ऑफ शंकर (१८९१) हे होत. भारतात तसेच यूरोप – अमेरिकेतही त्यांच्या या इंग्रजी ग्रंथांचे चांगले स्वागत झाले.

आत्मनिमज्‍जन आणि प्रेमजीवन हे त्यांच्या कवितांचे संग्रह असून त्यांत प्रामुख्याने प्रेम हा विषय हाताळला आहे. त्यांचा तात्त्विक अद्वैतवादी दृष्टिकोन त्यांच्या या प्रेमपर कवितांतूनही चांगल्या तऱ्हेने व्यक्त झाला आहे. भावनेची खोली व तीव्रता, उत्कृष्ट वर्णनशैली व आकर्षक अभिव्यक्ती यांमुळे या संग्रहांतील काही कविता अतिशय कलात्मक उतरल्या आहेत. त्यांनी फार्सी सूफी कवींच्या धर्तीवर गुजरातीत काही गझलही लिहिले आहेत. त्यांचा तात्त्विक अद्वैतवादी दृष्टिकोन आणि सूफी काव्याचे अंतःसत्त्व यांचा सुंदर मेळ त्यांच्या काही गझलांतून झालेला दिसून येतो. गुजरातीमधील त्यांची ही गझलरचना वैशिष्ट्यपूर्ण व मूलभूत महत्त्वाची मानली जाते.

कान्ता हे त्यांचे उत्कृष्ट नाटक असून त्यात संस्कृत व पाश्चात्त्य (शेक्सपिअरच्या) नाट्यतंत्राचा व शैलीचा सुरेख संगम झालेला आहे. नाटकात काही पदेही असून त्या पदांत श‌ृंगार, वीर, करुण, बीभत्स इ. रसांचा परिपोष त्यांनी केला आहे. या नाटकाचे कथानक वस्तुतः ऐतिहासिक असले, तरी त्यांनी त्यात काही बदल करून त्याला नाट्यानुकूल साज चढवला आहे.‘मुंबई गुजराती नाटक कंपनी’ ने हे नाटक कुलीन कांता या नावाने १८८९ मध्ये मुंबई येथे प्रथम रंग भूमीवर सादर केले आणि त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. गुजराती साहित्यातील रंगभूमीच्या आरंभीच्या काळातील हे एक उत्कृष्ट नाटक म्हणून गौरविले जाते. १८९७ मध्ये त्यांनी ‘मुंबई गुजराती नाटक कंपनी’ च्या विनंतीवरून नृसिंहावतार हे दुसरे नाटक लिहिले. संस्कृत पौराणिक नाटकांच्या धर्तीवर ते लिहिले असून १८९९ मध्ये मणिलाल यांच्या मृत्यूनंतर ते रंगभूमीवर आले. त्यांचे कान्ता हे नाटक आजही पहिल्या दर्जाचे नाटक समजले जाते.

प्राणविनिमय हा त्यांचा योगशास्त्रावरील ग्रंथ असून त्यात जडवादापेक्षा चिद्‍वादाची श्रेष्ठता त्यांनी प्रतिपादन केली आहे. सिद्धांतसारमध्ये त्यांनी भारतीय दार्शनिक विचारांच्या विकासाचा आढावा घेतला असून त्यात प्राचीन आर्यधर्मच खरा विश्वधर्म होण्याच्या योग्यतेचा आहे, असे प्रतिपादन केले. शाळेतील मुलींसाठी धर्म व सदाचार या विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या फुटकळ निबंधांचा बालविलास (१८९३) हा संग्रह आहे.

ते कुशल संपादक होते. १८८५ मध्ये त्यांनी प्रियंवदा मासिक सुरू केले. त्यात मुख्यत्वे स्त्रीविषयक लेखन प्रसिद्ध होत असे. नंतर त्यांनी सुदर्शन सुरू केले. सुदर्शन मासिकाचे ते १८९० – ९८ पर्यंत संपादक होते. धर्म, समाज, अर्थशास्त्र, राजकारण, समाजसुधारणा, साहित्य, संगीत, शिक्षण इ. विविध विषयांवर त्यांनी या मासिकातून लिहिलेले दर्जेदार लेख त्यांच्या सुदर्शन गद्यावलीमध्ये संगृहीत आहेत. मणिलाल यांच्या विद्वत्तेचा, सखोल चिंतनाचा व चमकदार गद्यशैलीचा उत्कृष्ट परिचय त्यांतून घडतो. सुदर्शन गद्यावलीतील त्यांचे लेख गुजराती गद्याचा उत्कृष्ट व अमोल ठेवा मानले जातात.

गुलाबसिंह हे बुल्वर लिटन यांच्या झेनोनी (१८४२) चे गुजराती रुपांतर आहे. झेनोनीतील गूढवादामुळे मणिलाल त्याचे गुजराती रुपांतर करण्यास उद्युक्त झाले. हनुमन्नाटक, चतुःसूत्री, वृत्तिप्रभाकर इ.ग्रंथांचीही त्यांनी गुजरातीत भाषांतरे केली आहेत.

मालतीमाधव (१८८०), उत्तररामचरित (१८८१) ही त्यांनी संस्कृत नाटकांची गुजरातीत केलेली उत्कृष्ट भाषांतरे होत. इंग्रजी लेखक सॅम्युएल स्माइल्स यांच्या कॅरॅक्टर (१८७१) ह्या कृतीचा त्यांनी चारित्र (१८९४) नावाने गुजरातीत अनुवाद केला. सामाजिक स्थितीबाबत त्यांनी सखोल चिंतन केले होते. स्त्रियांच्या बाबतीतही त्यांचा दृष्टिकोन अतिशय उदार होता. त्यांनी लिहिलेले नारीप्रतिष्ठा (१८८४) व चारित्र (अनु.) हे ग्रंथ या प्रकारच्या लेखनाचे उत्तम नमुने होत.

त्यांनी विविध वाङ्‍मयप्रकार हाताळले असले, तरी गुजराती गद्याचे एक चिंतनशील शिल्पकार म्हणूनच ते प्रख्यात आहेत. गहन विषयांच्या समर्थ अभिव्यक्तीसाठी त्यांनी उत्कृष्ट गुजराती भाषा घडविली. असाधारण विद्वत्ता, जीवनव्यापी बहुविध विषयांतील रूची, विशाल व सखोल दृष्टी, काटेकोरपणा, अचूक तुलनाशक्ती, ओजस्वी व प्रभावी भाषा इ. त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होत. पंडितयुगातील एक श्रेष्ठ लेखक म्हणून त्यांचे नाव गुजराती साहित्यात चिरंतन राहील. धीरूभाई ठाकर यांनी मणिलाल यांच्यावर मणिलाल नभुभाई : साहित्यसाधना व मणिलाल नभुभाई : जीवनरंग हे दोन गुजराती ग्रंथ तसेच साहित्य अकादेमीसाठी ‘मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर’ मालेत १९८३ मध्ये इंग्रजीतून मणिलाल द्विवेदी हा ग्रंथ लिहिला असून त्यांत त्यांच्या जीवनाचा व साहित्याचा उत्तम परिचय घडविला आहे. अंबालाल बालकृष्ण पुराणी यांनीही मणिलाल नभुभाई द्विवेदीनु जीवनचरित्र (१९५१) हा ग्रंथ लिहिला आहे.

संदर्भ : Thakar, Dhirubhai, Manilal Dvivedi, New Delhi, 1983.

पेंडसे, सु, न.