वेलिंग्टन-२ : तमिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्याच्या कुन्नूर तालुक्यातील एक गिरिस्थान व कॅंटोनमेंट. मेट्‌टुपालयम्‌-उदकमंडल (ऊटकमंड) अरुंदमापी लोहमार्गावर हे स्थानक आहे. हे कुन्नूरच्या उत्तरेस २·४ किमी. तर ऊटकमंडपासून १४·५ किमी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १,८५९ मी. उंचीवर वसले आहे. भारतीय सेनेच्या नवव्या (सिकंदराबाद) तुकडीतील सदर्न ब्रिगेडचे वेलिंग्टन हे मुख्य ठाणे आहे. येथील लष्करी आरोग्यधामही प्रसिद्ध आहे. येथील बराक १८५२ ते १८६० या दरम्यान बांधण्यात आली. जवळच असलेले एक खेडेगाव व दोडाबेट्टा श्रेणीची सोंड यांवरून सुरुवातीला हे `जगताला’ या नावाने संबोधले जाई. ब्रिटिश पायदळ तुकडीतील सैन्य येथे असे. येथुनच कननोर, कालिकत व मल्लापुरम्‌ (होस्पेट) या ठाण्यांना फौजफाटा पुरविला जात असे. येथील मद्रास विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये लष्करी अधिकाऱ्यांना शिक्षण दिले जाते.

विषुववृत्तापासून केवळ ११२२’ उत्तर अक्षांशावर असूनही येथील हवामान अतिशय आरोग्यवर्धक आहे. याच्या परिसरात शोभिवंत वृक्षांची भरपूर लागवड केलेली असल्यामुळे तेथील सृष्टिसौंदर्य आकर्षक झाले आहे. आसमंतातील दऱ्या, टेकड्यांचे उतार व पठारी प्रदेशातील जमीन सुपीक असून तेथे समशीतोष्ण कटिबंधीय अरण्याची वाढ झालेली दिसते. येथे विविध प्रकारचा भाजीपाला व फळांचे उत्पादन घेतले जाते. येथील घोड्यांच्या शर्यतीचे मैदान अतिशय सुंदर, परंतु लहान आहे. त्याच्या तिन्ही बाजूंना वनाच्छादित टेकड्या आहेत. अँग्लिकन व रोमन कॅथलिक चर्च येथे आहेत.

                                       

चौधरी, वसंत