भारतीय अवतार कल्पना : हिंदू धर्मात अवतार कल्पनेस अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. भगवंताचे अवतार पृथ्वीवर प्रत्येक युगात होत असतात, अशी कल्पना निदान गेल्या दोन-अडीच हजार वर्षांपासून हिंदू धर्मात रूढ असून तिचे मूळ वेदकालापर्यंत पोचविता येते. तथापि कल्पनेचे व्यवस्थित पण संक्षिप्त विवरण प्रथम भगवद्‌गीतेतील ‘यदा यदा हि धर्मस्य ग्‍लानिर्भवति भारत…संभवामि युगे युगे.’ (४.६-७) ह्या श्लोकांत मिळते. हरिवंशामध्ये (१.४१.११) अवतार शब्दाला ‘प्रादुर्भाव’ हा पर्यायी शब्द वापरला आहे.

दृष्टसंहार व धर्मसंस्थापना किंवा यांपैकी एक कार्य जो जो करतो तो तो अवतार होय, ही गीतेतील अवताराची कल्पनाच रामदासांपर्यंतही रूढ असल्याचे दिसते. दासबोधात रामदासांनी म्हटले आहे, की ‘धर्मस्थापनेचे जे नर। ते ईश्वराचे अवतार। झाले आहेत, पुढे होणार। देणे ईश्वराचे।।’ धर्मस्थापनेकरिता आम्ही ऋषिमुनी पुन्हा पुन्हा जन्म घेतो, असे तुकारामांनीही म्हटले आहे.

शिव व विष्णू हे गेल्या अडीच हजार वर्षांतील हिंदू धर्माचे मुख्य देव होत. वैष्णव पुराणांमध्ये वमहाभारतात ðविष्णूच्या अवतारांच्या कथा आणि शैव पुराणांत व महाभारतात शिवाच्या अवतारांच्या कथा आहेत. हरिवंश, विष्णुपुराण, श्रीमद्भागवत  इ. वैष्णव पुराणे होत. वायुपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराण  इ. पुराणे शैव पुराणांत समाविष्ट होतात. शैव व वैष्णव म्हणून नसलेली मार्कण्डेयादी पुराणेसुद्धा शिवाचे व विष्णूचे अवतार सांगतात. केवळ शिवाचे किंवा विष्णूचेच अवतार पुराणे सांगत नाहीत, तर गणेशादी देव, ऋषिमुनी, गंधर्व, अप्सरा इत्यादिकांचेही अवतार पुराणांत वर्णिले आहेत. शापभ्रष्ट होऊन किंवा काही विशिष्ट उच्च उद्देशांनी देव, ऋषी, गंधर्व, अप्सरा इ. भूतलावर जन्म घेतात, असे त्यांमध्ये सांगितलेले आहे. असे असले तरी हिंदू धर्मात अवतार कल्पना प्रामुख्यने शिव व विष्णू यांच्याच संबंधात विशेष महत्त्व पावलेली आहे. शिवापेक्षाही विष्णूच्या अवताराच्या कल्पनेचा प्रभाव हिंदुमनावर सर्वांत अधिक आहे.

हिंदू धर्मात विष्णूच्या मत्स्य-कूर्मादी ðदशावतारांची कल्पना अत्यंत रूढ आहे. दशावतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह व वामन या चार अवतारांचे मूळ वेदांमध्ये सापडते. वामनाचे मूळ स्वरूप ऋग्वेदातही सापडते. तीन पावलांत त्रैलोक्य व्यापणारा त्रिविक्रम विष्णू ऋग्वेदात वर्णिला आहे. ऋग्वेदोत्तर काळात विष्णू हा यज्ञरूप व सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ म्हणून मान्यता पावला. ऐतरेय ब्राह्मणात देवांमध्ये अग्नी सर्वांत खालचा व विष्णू हा सर्वांत वरचा असे म्हटले आहे.

ऐतिहासिक दृष्टीने पाहू जात अवताराची मूळ कल्पना विष्णूच्या वासुदेव-भक्तिसंप्रदायापासून सुरू झाली. डॉ. रा. गो. भांडारकरांनी ह्या संप्रदायचा काल इ. स. पू. चौथ्या शतकापर्यंत निश्चितपणे पोचविले आहे. परंतु हा काळ आणखीही मागे नेता येईल. कारण पाणिनीच्या काळी म्हणजे इ. स. पू. पाचव्या-सहाव्या शतकांच्या सुमारास वासुदेव कृष्ण व अर्जुन यांची जोडी प्रसिद्ध होती. वासुदेव हा अधिक पूजनीय म्हणूनही प्रतिष्ठा पावला होता. यावरून हा संप्रदाय यापूर्वीही कित्येक वर्षे आधी अस्तित्वात आला असला पाहिजे, हे उघड आहे. वासुदेव हे नारायणाचे म्हणजे विष्णूचे मानवरूप होय. म्हणून तो ‘विष्णूचा अवतार’ ह्या स्वरूपात पूज्य झाला. बुद्ध व कल्की सोडल्यास बाकीचे अवतार हे विष्णूचे होत, अशी कल्पना प्राचीनतम पुराणांमध्ये आहे. हरिवंशात विष्णूचे आठ अवतार तर महाभारताच्या शांतिपर्वात ते नऊ गणले आहेत. महाभारतात अवतारांची नावे व संख्या निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी दिलेली आहे. ऋषभदेव (आदिनाथ) हे जैन धर्माप्रमाणे चोवीस तीर्थं-करांपैकी पहिले तीर्थंकार होत. भारत, भागवत, स्कंद या पुराणांमध्ये या आदितीर्थं-कराचा अवतार म्हणून समावेश केलेला आहे.

भिन्न भिन्न ही वा उच्च धर्मसंप्रदायांचा, त्यांच्या देवतांचा, धर्मसंस्थापकांचा वा संतांचा एका व्यापक धार्मिक तत्त्वाच्या द्वारे एकत्र समावेश करणे, हे अवतार कल्पनेच्या द्वारे हिंदू धर्माने साधले आहे. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह इ. आदिधर्म संस्थेतील दैवते होत. ती विष्णूचे अवतार म्हणून संगृहीत केली. गीतेतील विभूतिवाद हा अवतारवादाचे व्यापक रूप होय. भारतात प्राचीन काळी उदयास आलेल्या सर्व धर्मांतील आद्य धर्मप्रवर्तकांचा हिंदू धर्मात समावेश करण्याची प्रवृत्ती फार प्राचीन काळापासून दृढमूल झाली आहे, याचे कारण ‘अवतार म्हणजे धर्मसंस्थापक’ हे तत्त्व स्वीकारले गेले हे होय. धर्मसंस्थापना पुन्हा पुन्हा होत असते. त्यामुळेच जैनांचा आद्यतीर्थंकर हा साक्षात भगवानाचा अवतार होय, असे मानले गेले. दुसरा महान धर्मसंस्थापक म्हणजे गौतम बुद्ध होय. बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणूनमत्स्यपुराण (४७.२४७), अग्निपुराण (१६.१-७), नृसिंहपुराण (३६.९), पद्मपुराण (उ. २५७) व् श्रीमद्भागवत यांच्यामध्ये मान्यता दिलेली दिसेत. ही मान्यता इ. स. तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात म्हणजे महायान पंथाच्या प्रसारानंतर प्राप्त झाली असावी. कारण महायान पंथात बुद्ध हा मुळामध्ये परब्रह्माप्रमाणे असलेल्या बोधिसत्त्वाचा जगदुद्धारार्थ व धर्मचक्रप्रवर्तनार्थ झालेला अवतार होय, असा सिद्धांत स्वीकारला गेला होता.

बाराव्या शतकातील संस्कृत कवी जयदेव याने आपल्या गीतगोविंदात (१.१-१२) दशावतार सुंदर शैलीत वर्णिले आहेत भागवतात कृष्णाच्या विविध लीला वर्णन करून सर्वोत्तम भक्ती म्हणजे कृष्णभक्ती म्हणून कृष्णाला श्रेष्ठ स्थान प्राप्त करून दिले आहे. त्यात दशावतार सांगितले नसून बावीस अवतार सांगितले आहेत व कृष्ण हा सर्वश्रेष्ठ पूर्णावतार म्हणून वर्णिला आहे. जय देवाने कृष्ण हा साक्षात भगवानच होय, तो अवतार नव्हेच, असे गृहीच धरून दशावतार वर्णले आहेत त्यात बलराम हा आठवा अवतार मानला आहे. वैष्णव पंथातðराम व ðकृष्ण ह्या विष्णूच्या दोन अवतारांचे माहात्म अतिशय मोठे असून राम व कृष्ण मुख्य उपास्य दैवते झाली आहेत. ह्या दोन अवतारांना ðवैष्णव संप्रदायात पूर्णावतार मानतात. रामाची किंवा कृष्णाची उपासना मूळ विष्णुस्वरूपात न होता ती त्या त्या अवतार स्वरूपातच होते. शिवाने [ → शिवदेवता] ðभैरव, शरभ, एकादश रुद्र, महाकाळ, यज्ञेश्वर, ðहनुमान, अवधूतेश्वर इ. अवतार घेतल्याचे शैवपुराणांतून सांगितले असले, तरी ðशैव संप्रदायात शिवाची मूळ स्वरूपातच म्हणजे लिंगरूपात उपासना केली जाते. शिवाची पत्‍नी दक्षकन्या सतीच पुढे पार्वतीरूपाने अवतरली. शिवाच्या अर्धांगीस ‘आदिमाया’ किंवा ‘आदिशक्ती’ असे नाव असून तिची अनेक रूपांत उपासना होते. ðकाली, रेणुका, कामाख्या, अंबिका इ. भारतातील बावन्न शक्तिपीठांच्या संदर्भात पार्वतीच्या अनेक अवतारकथा प्रचलित आहेत. दक्षिण भारतातील बारा ðआळवार संत हे विष्णूच्या आयुधांचे अवतार मानले आहेत. वायुपुराणाप्रमाणे ðदत्त संप्रदायातही ðदत्तात्रेयाला विष्णूचाच अवतार मानतात.दत्ताचे श्रीपाद, श्रीवल्लभ, ðनरसिंहसरस्वती, ðअक्कलकोटकर स्वामी हे अवतार होत, अशी दत्तभक्तांची समजूत आहे.

बौद्ध धर्मातील महायान पंथात अवतार कल्पनेस मान्यता आहे. दहाव्या शतकाच्या सुमारास महायान पंथात बुद्ध हा अवतार म्हणून सर्वत्र मान्यता पावला. ð बोधिसत्त्व हे बुद्धाचेच अवतार होत, अशी कल्पना रूढ झाली. बुद्धाचे निर्वाण झाले असले तरी तो पुढे ðमैत्रेय बुद्धाच्या रूपाने अवतरणार आहे, अशी महायान पंथाची श्रद्धा आहे. तिबेटमधील ðलामा धर्मात महालयाच्या शरीरात देवतेचे सदैव वास्तव्य असते असे मानतात. परंपरेने निरनिराळ्या रूपांत एकाच देवतेचे सातत्य लामा-पद्धतीत गृहीत धरले आहे. दलाई लामा हा अवलोकितेश्वराचाच अंशावतार होय, अशी आख्यायिका आहे.

जैन धर्मात हिंदूंप्रमाणे अवतार कल्पना मानीत नाहीत, तथापि ðतीर्थंकर मोक्षमार्ग दाखविण्याकरिता मनुष्यरूपाने जन्म घेतता व तप करून देवत्व पावतात, अशी कल्पना जैनांत आढळते. अवतार कल्पनेचेच हे थोडे भिन्न स्वरूप म्हणता येईल. (चित्रपत्र ७९)

जोशी, लक्ष्मणशास्त्री

संदर्भ : 1. Frazer, J. G. The Golden Bough, London, 1963. 2. Hastings, James, Ed.Encyclopaeðia of Religion and Ethics-Vol. VIII, New York, 1959. ३. पांडेय, कपिलदेव, मध्यकालीन साहित्य में अवतारवाद, वाराणसी, १९६३.