तूलूझ–लोत्रेक, आंरी द : (२४ नोव्हेंबर १८६४–९ सप्टेंबर १९०१). प्रख्यात फ्रेंच चित्रकार व आरेख्यक कलावंत. पूर्ण नाव आंरी मारी रेमाँ द तूलूझ–लोत्रेक माँफा. आल्बी येथे एका उमराव घराण्यात जन्म. लहानपणापासूनच त्याने चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. १८७८–७९ च्या दरम्यान झालेल्या दोन अपघातांमुळे तो पांगळा झाला. पुढे वयोमानानुसार त्याच्या शरीराची वाढ झाली तरी पाय मात्र आखुड व खुरटलेलेच राहिले. या शारीरिक व्यंगाने त्याचा आयुष्यभर पाठपुरावा केला, तरी त्यामुळेच त्याची कलाप्रवृत्ती अधिक तीव्र झाली. त्याने सुरुवातीचे कलाशिक्षण प्रँसेतो व बॉना यांच्याकडे घेतले व पुढे काही काळ कॉर्‌माँ याच्या स्टुडिओत उमेदवारी केली. दगा, माने यांसारख्या चित्रकारांचा तसेच जपानी मुद्रांचा त्याच्या चित्रांवर प्रभाव जाणवतो. १८८६ पासून त्याने माँमार्त्र येथे वास्तव्य केले. तो अत्यंत स्वैर व स्वच्छंदी आयुष्य जगला. पॅरिसमधील उपहारगृहे, नृत्य–नाट्यगृहे, जुगारगृहे, कॅबरे, निशागृहे, दारूचे गुत्ते, कुंटणखाने, रेसमैदाने, सर्कसचे जग यांतील वातावरणाविषयी त्याला आकर्षण होते व हे वातावरण त्याने आपल्या चित्रांतून रंगविले. पॅरिसमधील निशाजीवन व त्या जीवनाची अनेक अंगोपांगे त्याच्या चित्रांतून विलक्षण प्रत्यकारीपणे रूपास आलेली आहेत. त्याच्या काळातील जेन ॲव्हरिल, आरीस्टीड ब्रुआंट, सेअरा बर्नहार्ट, ल्यूस्यँ गीत्री, ईव्हेत गील्बेअर, ऑस्कर वाइल्ड यांसारखे ख्यातनाम लेखक, नटनट्या, गायक, नर्तकी, खेळाडू आदींनी व्यक्तिचित्रे त्यांच्या सूक्ष्म मानसशास्त्रीय बारकाव्यांनिशी त्याने रेखाटली. १८९१ पासून त्याने रंगीत शिलामुद्रणाच्या क्षेत्रात विविध तांत्रिक प्रयोग केले. या माध्यमाचा कलात्मक आविष्कारासाठी त्याने कौशल्यपूर्ण उपयोग करून घेतला. त्याने भित्तिपत्रकांसाठी आकृतिबंध निर्मिले. त्यांत ‘मोलां रूज’साठी त्याने केलेली भित्तिपत्रके उत्कृष्ट मानली जातात. पुस्तकांसाठी आणि नियतकालिकांसाठी त्याने चित्रसजावटही केली. त्यांत झ्यूल रनारचे Histoires Naturelles, झॉर्झ क्लेमांसोचे Au pied du Sinai व ग्यूस्ताव्ह झेफ्र्‌वाचे ईव्हेत गील्बेअर यांचा समावेश होतो. ठळक, ठसठशीत बाह्य रेषांकन, झगमगीत रंगसंगती, गतिशील हालचालींचे सहज व प्रवाही रेखन, उत्कट भावाभिव्यक्ती ही त्याच्या चित्रनिर्मितीची काही ठळक वैशिष्ट्ये होत. चित्रविषयाचे आदर्शीकरण करण्यापेक्षा त्याच्या वास्तवदर्शी व कित्येकदा औपरोधिक अभिव्यक्तीकडे त्याचा कल दिसून येतो. पिकासोसारख्या आधुनिक कलावंतांवर त्याचा प्रभाव पडला. मद्यपानाच्या अतिरिक्त व्यसनामुळे त्याची प्रकृती ढासळली व १८९९ पासूनचा काही काळ त्याला आरोग्यधामात कंठावा लागला. माल्‌रॉम येथे त्याचे अकाली निधन झाले.

संदर्भ : Mack, Gerstle, Toulouse-Lautrec, New York, 1938.

इनामदार, श्री. दे.

‘ॲट द मोलांरूज' (१८९२)—तूलूझ-लोत्रेक.