गुरुद्वारा श्री हुजूर साहेब, नांदेड.

गुरुद्वारा : शिखांचे उपासनामंदिर. ‘गुरुद्वारा’चा शब्दशः अर्थ ‘गुरूचे निवासस्थान’. ‘ईश्वराच्या निवासाचे प्रवेशद्वार’ अशीही गुरुद्वाराबाबत शीख लोकांची श्रद्धा आहे. गुरुद्वारात कोणतीही देवमूर्ती नसते, तर तेथे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ग्रंथसाहिब  याची स्थापना केलेली असते. शिखांची दैनंदिन व सामुदायिक उपासना तेथेच होते. दैनंदिन उपासनेत ⇨ ग्रंथसाहिबातील उताऱ्यांचे पठन तसेच प्रार्थना, प्रवचने, कीर्तने (म्हणजे शास्त्रीय संगीतातील राग-तालात बद्ध अशी ग्रंथसाहिबातील पदे म्हणणे) इत्यादींचा अंतर्भाव असतो. अखेर प्रसाद वाटला जातो. बहुतेक प्रमुख गुरुद्वारांमधून मुक्त व मोफत अन्नछत्रे (लांगर) चालविली जातात. उघड्या डोक्याने गुरुद्वारात प्रवेश करू नये, असा कडक निर्बंध आहे.

स्थानिक गुरुद्वाराचे व्यवस्थापन त्या गुरुद्वाराच्या सभासदांतून निवडून आलेले मंडळ पाहते. गुरुद्वाराची दैनंदिन व्यवस्था व पौरोहित्य ‘ग्रंथी’कडे म्हणजे नेमलेल्या पगारी पुरोहिताकडे असते. त्याच्या हाताखाली इतर पगारी नोकरवर्गही (सोहांदर) दिलेला असतो. काही ऐतिहासिक महत्त्वाच्या गुरुद्वारांचे व्यवस्थापन पूर्वी वंशपरंपरने महंतांकडे असे व ते पुष्कळदा भ्रष्ट असत. तेव्हा त्यांच्या हातांतून गुरुद्वारांचे व्यवस्थापन काढून घेण्यासाठी १९२१ मध्ये शिखांनी संघटित रीत्या मोठी चळवळ सुरू केली. प्रदीर्घ अशा लढ्यानंतर अखेर १९२५ मध्ये ‘गुरुद्वारा व्यवस्थापन अधिनियम’ मंजूर झाला व प्रमुख ऐतिहासिक गुरुद्वारांचे व्यवस्थापन ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ या लोकनियुक्त संस्थेच्या हाती आले. हेच मध्यवर्ती मंडळ या गुरुद्वारांचे व्यवस्थापन पाहते. केंद्र सरकारच्या ‘गुरुद्वारा व्यवस्थापन अधिनियमा’नुसार गुरुद्वारांतील सभासदांत निवडणूक होते व हे मध्यवर्ती मंडळ निवडले जाते.

शिखांच्या धार्मिक व सामाजिक जीवनात गुरुद्वाराला अतिशय महत्त्व आहे. धर्मग्रंथातील उताऱ्यांसंबंधी जे वादग्रस्त मुद्दे असतील, त्यांबाबतचे निर्णयही येथील धर्मप्रमुखांकडून घेतले जातात. शिखांचे प्रमुख गुरुद्वारा पुढीलप्रमाणे होत : (१) ‘हरिमंदिर साहेब’ किंवा ‘दरबार साहेब’, अमृतसर (पंजाब). पाचवे गुरू ⇨ अर्जुनदेव  यांनी हे स्थापन केले. (२) ‘हुजूर साहेब’, नांदेड (महाराष्ट्र). येथील हरिमंदिर राजा रणजितसिंगांनी बांधले. (३) ‘पटणा साहेब’, पाटणा (बिहार). येथील हरिमंदिरही राजा रणजितसिंगांनीच बांधले. १९५४–६० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. (४) ‘केशगढ साहेब’, आनंदपूर (पंजाब). नववे गुरू तेगबहादुर यांनी हे स्थापन केले.

या चार गुरुद्वारांना शिखांच्या धार्मिक व सामाजिक जीवनात पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून अग्रस्थान आहे. शिखांचे धार्मिक आदेश येथूनच निघतात. या गुरुद्वारांना ‘तख्ते’ असेही संबोधले जाते. ‘शीशगंज’ हे दिल्ली येथील गुरुद्वाराही इतिहासप्रसिद्ध आहे. यांशिवाय कर्तारपूर, हरिगोविंदपूर इ. भारतातील (पंजाब) तसेच लाहोर, सियालकोट, पंजासाहेब, एमिनाबाद इ. पाकिस्तानातील गुरुद्वाराही शिखांची तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत.

आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) पोरे, प्रतिभा (म.)