क्रस्टेशिया : (कवचधर वर्ग). आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील प्राण्यांचा एक फार मोठा वर्ग. खेकडे, शेवंडे, चिमोरे, झिंगे,कोळंब्या, काष्ठयूका, पाणपिसवा, बार्नेकल आणि ज्यांना लौकिक नावे नाहीत अशा इतर असंख्य प्राण्यांचा या वर्गात समावेश होतो [→ आर्थोपोडा]. काही वैशिष्ट्यांमुळे या वर्गातले प्राणी आर्थोपोडा संघातील इतर प्राण्यांहून भिन्न आहेत हे ओळखता येते. या वर्गातील बहुतेक प्राणी जलचर आहेत, त्यांचे श्वसन क्लोमांनी (कल्ल्यांनी) होते किंवा कित्येकांत शरीराची त्वचा ते कार्य करते. मुखाच्या पुढे शृंगिकांसारख्या (सांधे असणाऱ्‍या लांब स्पर्शेंद्रियांसारख्या) उपांगांच्या (अवयवांच्या) दोन जोड्या व मुखाच्या मागे जंभाचे (भक्ष्य पकडण्याकरिता किंवा त्याचे तुकडे करण्याकरिता असणाऱ्‍या संरचनांचे) कार्य करणाऱ्‍या उपांगांच्या निदान तीन जोड्या असतात. या वर्गात आकाराची आणि संरचनेची अतिशय विविधता आढळते.

आ. १ कवकधारी प्राण्याचे (होमेरस) बाह्यस्वरूप : (१) शिरोवक्ष, (२) उदर, (३) पुच्छखंड, (४) पुच्छव्यंजन, (५) पुच्छपाद, (६) प्लवपाद, (७) चलनपाद (चिमटा). (९) तिसरा जभपाद. (१०) शृंगिका, (११) लघुशृंगिका, (१२) डोळा, (१३) पृष्ठवर्म.

कवचधर वर्गातील बहुतेक प्राणी समुद्रात राहणारे आहेत, पण बरेच गोड्या पाण्यातही राहतात. काही जाती जमिनीवरही राहणाऱ्‍या आहेत. कवचधर हे मुबलक आढळणारे प्राणी आहेत. ज्यांची माहिती आहे अशा यांच्या २५,००० पेक्षा जास्त जाती आहेत आणि कित्येक जातींच्या व्यक्तींची संख्या तर अगणित आहे. कवचधर सगळीकडे आढळतात. ध्रुवीय प्रदेशात बर्फाखाली, ५०° से. तापमान असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्‍यात आणि समुद्रात सु. सहा किमी. खोलीवर ते आढळले आहेत. भूचर कवचधर चार किमी. पेक्षाही जास्त उंचीवर अँडीज पर्वतात सापडले आहेत आणि आंधळ्या कवचधरांचे कित्येक प्रकार गुहांत व भूपृष्ठाखालील खोल विहिरीत राहत असल्याचे दिसून आले आहे. यांच्या परजीवी (अन्न किंवा आश्रय मिळविण्याकरिता दुसऱ्‍या प्राण्यांच्या शरीरात वा शरीरावर राहणाऱ्‍या) जाती तर जवळजवळ इतर सर्व प्राण्यांच्या शरीरांवर अथवा शरीरांत राहतात. आकारमानाच्या दृष्टीने काही इतके लहान असतात की, ते फक्त सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच दिसू शकतात, तर काही फार मोठे असतात. उदा., मॅक्रोकीइरा हा जपानी खेकडा पाय पसरलेले असताना चार मी. लांब असतो. 

कवचधर अनेक रंगांचे असतात. प्लवकांतील (पाण्यांत तरंगणाऱ्‍या जीवांतील) पुष्कळ कवचधरांचे शरीर पारदर्शक असून त्यात वर्णक (रंगद्रव्य) फारच थोडा असतो किंवा मुळीच नसतो. खोल पाण्यात राहणाऱ्‍या कोळंब्या बहुधा झगझगीत तांबड्या असतात. स्वयंदीप्तिमान (प्रकाश उत्पन्न करणारी इंद्रिये असलेले) कवचधर ऑस्ट्रॅकॉडा उपवर्गात व कोपेपोडा, अँफिपोडा, डेकॅपोडा इ. गणांत आढळतात. फक्त सागरी जातीच स्वयंदीप्तिमान असतात. 

आ.२. कवचधारी प्राण्याच्या शरीराच्या अनुप्रस्थ छेदाचे व्यवस्थाचित्र : (१) पृष्ठक, (२) आहारनाल, (३) पार्श्वक, (४) आदिपादांश, (५) तंत्रिका रज्जू, (६) अधरक, (७) अंतःपादांश, (८) बहिःपादांश, (९) हृदय.

संरचना : कवचधराच्या शरीराचे खंड (भाग) पडलेले असतात. काही जिवंत कवचधरांचे शरीर ६० पेक्षाही जास्त खंडांचे बनलेले असते, पण बहुतेकांमध्ये ते १६–२१ खंडांचे असते. शरीराचे शीर्ष (डोके), वक्ष (छाती) आणि उदर (पोट) असे तीन भाग पडतात, पुष्कळदा शीर्ष आणि वक्ष यांच्या सायुज्यनाने (एकीकरणाने) शिरोवक्ष हा एकच भाग बनतोशीर्षात पाच सायुज्यित खंड असतातवक्षात २–६० देहखंड असून ते अलग असतात किंवा त्यांचे अनेक प्रकारे सायुज्यन झालेले असते

आ. ३. चिमोऱ्‍याची उपांगे, खालून पाहिली असता : (अ) लघुशृंगिका, (आ) शृंगिका, (इ) जंभ, (ई) पहिली जंभिका, (उ) दुसरी जंभिका, (ऊ) पहिला जंभपाद, (ए) दुसरा जंभपाद, (ऐ) तिसरा जंभपाद, (ओ) चौथा चलनपाद. (१) आदि-पादांश, (२) अंतःपादांश, (३) बहिःपादांश, (४) अधिपादांश, (५) उत्सर्जन-रंध्र, (६) कायटिनी तंतू.

उदरखंड साधारणपणे अरुंद व बहुधा स्पष्टपणे निराळे असून उदराच्या शेवटावर पुच्छखंड असतो. शीर्षाचा अगदी पुढचा भाग आणि गुदद्वार असणारा उदराचा अगदी मागचा भाग हे खरे देहखंड नाहीत, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

सर्व शरीरावर कठीण कवच असते. या कठीण कवचाची खंडवलये पडून ती लवचिक कलांनी (पातळ पटलांनी) एकमेकांना जोडलेली असल्यामुळेच या प्राण्यांना हालचाली करणे शक्य होते. शीर्ष व वक्ष या भागांवर पृष्ठवर्म (पाठीचा सगळा भाग झाकणारी कायटिनमय ढालीसारखी संरचना) असते.


आ.४. कवचधारी प्राण्याच्या (होमरेस) शरीराचा अनुदैर्घ्य छेद : (१) लघुशृंगिका, (२) शृंगिका, (३) तुंड, (४) डोळा, (५) मेंदू, (६) उपह्रद जठर, (७) निजठर, (८) हृदय, (९) वृषण, (१०) पचन ग्रंथी, (११) आंत्र, (१२) स्नायू, (१३) गुदद्वार, (१४) पुच्छखंड, (१५) अधर तंत्रिका रज्जू, (१६) शुक्रवाहक, (१७) पहिले उदरीय उपांग (शुक्राणू मादीच्या शरीरात नेणारे), (१८) परिग्रसिका संयोजक, (१९) मुख, (२०) हरित-ग्रंथी.

शरीराच्या प्रत्येक भागावर कित्येक उपांगे असतात आणि प्रत्येक उपांगात कित्येक पेरी अथवा खंड असतात. बुडाजवळच्या पेऱ्‍याला आदि-पादांश (प्रोटोपोडाइट) म्हणतात. याचे दोन भाग असून शरीराला जोडलेल्या भागाला कक्षी-पादांश (कॉक्सोपोडाइट) आणि त्याच्या पुढच्या भागाला दूर-पादांश (बेसिपोडाइट) म्हणतात. विशेषतः उपांगांना दूर-पादांशापासून निघणाऱ्‍या दोन शाखा असतात.आतल्या शाखेला अंतःपादांश (एंडोपोडाइट) व बाहेरच्या शाखेला बहिःपादांश (एक्झोपोडाइट) म्हणतात. कित्येक कवचधरांत काही उपांगांना या दोहोपैंकी एक शाखा नसते. 

शीर्षावर उपांगांच्या पाच जोड्या असतात: (१) लघुशृंगिका, (२) शृंगिका, (३) जंभ, (४) पहिली जंभिका आणि (५) दुसरी जंभिका. प्रारूपिकतया (नमुनेदार प्राण्यात) लघुशृंगिकेला शाखा नसतात, पण मॅलॅकोस्ट्रॅकांमध्ये त्यांना दोन शाखा असतात. लघुशृंगिका आणि शृंगिका मुख्यत्वे संवेदी (संवेदनाक्षम) असतात, परंतु त्यांची इतर कार्येही असू शकतात. जंभ अन्नाच्या चर्वणाचे कार्य करतात, परंतु त्यांच्यावरील स्पर्शक (संवेदी उपांगे) चलनाच्या अथवा अन्नप्रवाह उत्पन्न करण्याच्या कामी मदत करू शकतात. जंभिकांच्या दोन्ही जोड्या अन्न जंभाकडे नेण्याचे कार्य करतात.

वक्षीय उपांगे निरनिराळ्या प्राण्यांत वेगवेगळी कार्ये पार पाडतात. वक्षीय उपांगांच्या पहिल्या तीन जोड्यांचे रूपांतर होऊन ती अशनक्रियेत (अन्न खाण्याच्या क्रियेत) मदत करतात, त्यांना जंभपाद (मॅक्झिलिपीड) म्हणतात. बाकीच्या उपांगांचे पकड घेण्याकरिता व चलनाकरिता अनुकूलन झालेले असते. पुष्कळदा पश्च वक्ष-उपांगांचे अथवा अग्र उदर-उपांगांचे जनन-कार्यात उपयोगी पडण्याकरिता रूपांतर होते. कवचधरांच्या पुष्कळ गटांत उदर-उपांगे नसतात, पण असली तर पोहण्याकरिता, पाण्यात प्रवाह उत्पन्न करण्याकरिता किंवा अंडी आणि पिल्ले नेण्याकरिता त्यांचा उपयोग होतो.

उपत्वचा : कवचधरांच्या सर्व शरीरावर बाह्यत्वचेचे (कातडीच्या बाहेरच्या स्तराचे) आवरण असते. बाह्यत्वचा-कोशिकांच्या (पेशींच्या) स्रावापासून उपत्वचा (बाह्यत्वचेवर असणारा निर्जीव संरक्षक स्तर) अथवा बहिःकंकाल (बाहेरचा सांगाडा) तयार होतो. उपत्वचा मुख्यतः प्रथिन आणि ⇨कायटिन  यांची बनलेली असून काही ठिकाणी ती पातळ आणि लवचिक असते, तर काही ठिकाणी कॅल्शियम लवणांच्या निक्षेपणाने (साचण्याने) ती जाड व ताठ झालेली दिसते. उपत्वचेचे प्रक्षेप (पुढे आलेले भाग) आणि घड्या शरीरात शिरलेल्या असतात. त्यांचा उपयोग स्नायूंच्या आसंजनाकरिता (चिकटण्याकरिता) होतो. बाहेरच्या बाजूला बहिःकंकालावर लहानमोठे कंटक व पोकळ शूक (ताठ, उभे केस) असतात. उपत्वचेमध्ये चार स्तर असतात. बाहेरचा स्तर अतिशय पातळ व कायटिनरहित असतो. बाकीचे तीन स्तर कायटिनमय असतात. बाहेरच्या स्तराखालचा स्तर वर्णंकित (रंगद्रव्य असलेला) असतो. या चार स्तरांपैकी अगदी खालचा स्तर सोडून बाकीचे सर्व स्तर कॅल्शियम लवणांनी युक्त असतात.

आ. ५. कवचधारी प्राण्याच्या (पॅन्युलिरस) वक्षाचा अनुप्रस्थ छेद, क्लोम कक्ष आणि इतर संरचना दाखविण्याकरिता : (१) उरोकोटर, (२) परि-आंतरांग कोटर, (३) उरोंतर्वर्ध-कंकाल, (४) हृदय, (५), (६) व (७) अनुदैर्घ्य स्नायू, (८) अग्र वक्षीय गुच्छिका, (९) अधर वक्षरोहिणी, (१०) यकृत-अग्निपिंड, (११) मध्यांत्र, (१२) जननग्रंथी, (१३), (१४) व (१५) क्लोम.

पचन तंत्र : (पचन संस्था). आहारनाल (तोंडापासून गुदापर्यंतचा अन्नमार्ग) सरळ असून त्याचे अग्रांत्र, मध्यांत्र आणि पश्चांत्र (पुढचे, मधले व मागचे आतडे) असे तीन भाग असतात. अग्रांत्राला आणि पश्चांत्राला आतून कायटिनाचे अस्तर असते व निर्मोचनाच्या (कात टाकण्यासारख्या क्रियेच्या) वेळी ते गळून पडते आणि त्याच्या जागी नवे तयार होते. पुष्कळ कवचधारांच्या अग्रांत्रात मुख, ग्रसिका (घसा आणि जठर यांच्यामध्ये असणारा आहारनालाचा भाग), जठर अथवा पेषणी (ज्यात अन्न बारीक केले जाते तो आहारनालाचा स्नायुमय भाग) आणि निजठर- कोष्ठ (पेषणीचा पश्च विभाग) हे भाग असतात. अगदी आखूड ग्रसिकेतून अन्न जठरात जाते. जठराच्या आतल्या पृष्ठावर कंगोरे, कॅल्शियममय अस्थिका (अगदी लहान हाड अथवा हाडासारखी कठीण रचना) आणि त्यांवर मजबूत दात असतात. यांची हालचाल स्नायूंमुळे होते. या संरचनांच्या योगाने जठरात अन्न दळले जाते म्हणून याला जठर-पेषणी म्हणतात. दळलेले अन्न गाळले जाऊन निजठर कोष्ठात जाते व तेथून मध्यांत्रात जाते. मध्यांत्रात

आ. ६. कवचधारी प्राण्याचे परिवहन तंत्र : (१) अग्र महारोहिणी, (२) हृदय, (३) परिहृदय, (४) उदर-महारोहिणी, (५) अधर रोहिणी, (६) शिरा-कोटरे (अशुद्ध रक्त गोळा करणारी), (७) क्लोम (अभिवाही शिरेसह).

नलिकाकार पाचक अंधनाल (टोकाशी बंद असलेले पिशवीसारखे भाग) उघडतात व तेथे अन्नाचे पचन व  शोषण होते. उच्च श्रेणीच्या कवचधरांमध्ये यकृत अग्निपिंड (यकृत आणि अग्निपिंड या दोहोंचे कार्य करणारी पचन ग्रंथी) असून त्याचा पाचक स्त्राव दोन वाहिन्यांतून मध्यांत्रात येतो आणि अन्नपचन होते. डेकॅपोडांसारख्या काही कवचधरांत जठरात दातेरी संरचना नसतात, पण त्यांच्या जंभांवर तीक्ष्ण दात असल्यामुळे अन्नाचे बारीक तुकडे करता येतात. 


आ. ७. कवचधारी प्राण्याचा संयुक्त नेत्र : (अ) डोळा : (१) डोळ्यांचा वृंत (देठ), (२) डोळा (आ) डोळ्याचा अनुदैर्घ्य छेद : (१) नेत्रिका, (२) स्वच्छमंडल, (३) तंत्रिका-तंतू, (४) दृक् गुच्छिका, (५) स्नायू, (६) दृक्‌तंत्रिका (इ) चौकोनी स्वच्छमंडल-फलक दाखविण्याकरिता स्वच्छमंडलाचा मोठा करून दाखविलेला एक भाग (ई) एक नेत्रिका : (१) स्वच्छमंडल-फलक, (२) स्वच्छमंडलजन कोशिका, (३) स्फटिकरूप शंकू, (४) शंकु-कोशिका, (५) बाह्य-वर्णक-कोशिका, (६) आंतर वर्णक-कोशिका, (७) वेतसिका, (८) तंत्रिका तंतू (९) दृक्प टल-कोशिका.

श्वसन : अगदी लहान कवचधरांमध्ये शरीराच्या सर्व पृष्ठावरून श्वसन चालू असते. सामान्यतः क्लोमांनी श्वसन होते. बहुधा क्लोमांची उपांगांशी सांगड घातलेली असते. मॅलॅकोस्ट्रॅकांमध्ये क्लोम पातळ भित्ती असलेली संरचना असून तिला रक्ताचा भरपूर पुरवठा असतो. वक्षीय पादांच्या बुडापासून क्लोम निघतात. भूचर आणि अर्धभूचर कवचधरांचे वायुश्वसनाकरिता अनुकूलन झाल्यामुळे त्यांच्या क्लोमांची संख्या व आकारमान कमी कमी होत जाते.

परिवहन तंत्र : परिवहन तंत्र (रुधिराभिसरण तंत्र) ठराविक नमुन्याचे नसते. त्याचे परिपूर्ण स्वरूप मॅलॅकोस्ट्रॅकात आढळते. या तंत्रात ह्रदय, साहाय्यक हृदये, रोहिण्या, केशिका (केसासारख्या बारीक नलिका) आणि शिराकोटरे यांचा समावेश होतो. काही निकृष्ट कवचधरांत हृदय किंवा रोहिण्या अथवा दोन्हीही नसतात. शरीराच्या हालचालींनी रुधिरपरिवहन होते. 

आ. ८. संतुलन-पुटी (शेवंड्याची) : (अ)लघुशृंगिकेच्या बुडाचा खंड : (१) संतुलन-पुटीचे द्वार (आ) लघुशृंगिकेच्या बुडाचा खंड. (१) संतुलनपुटी, (२) त्वचा कापून बाजूस केल्यानंतर उघडे पडलेल स्नायू (इ) मोठी करून दाखविलेली संतुलनपुटी : (१) लघुशृंगिकेचा भाग, (२) संवेदी शूक आणि संतुलनाश्म, (३) संतुलन-पुटीची भित्ती, (ई) मोठे करून दाखविलेले तीन संवेदी शूक.

उत्सर्जन : उत्सर्जनांगे (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारी इंद्रिये) दोन असून ती शृंगिकांच्या किंवा दुसऱ्या जंभिकेच्या बुडावर अथवा बुडाजवळ उघडतात. डिंभावस्थेत (भ्रूणानंतच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील असणाऱ्या पूर्व अवस्थेत) शृंगिका-ग्रंथी आणि जंभिका-ग्रंथी या दोन्हीही सामान्यतः असतात. परंतु बहुधा दोहोंपैकी एकच प्रौढावस्थेत शिल्लक राहते. अमोनिया हा मुख्य नायट्रोजनी क्षेप्य (बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी) उत्पाद (उत्पन्न होणारा पदार्थ) असतो परंतु यूरिया, यूरिक अम्ल आणि अमाइने यांचे देखील उत्सर्जन होते. 

आ. ९. कवचधारी प्राण्याची (चिमोरा) जननांगे. (अ) नराची : (१) वृषण, (२) शुक्रवाहक, (३) वृषणाचा अयुग्मित पश्च भाग, (४) पाचव्या चलनपादाचा बुडाचा खंड (आ) मादीची : (१) अंडाशय, (२) अंडवाहिनी, (३) अंडाशयाचा अयुग्मित पश्च भाग, (४) तिसऱ्याु चलनपादाचा बुडाचा खंड.

तंत्रिका तंत्र : (मज्जा संस्था). पुष्कळ बाबतींत तंत्रिका तंत्र गांडुळाच्या तंत्रिका तंत्रासारखे असते. केंद्रीय तंत्रिका तंत्रात मेंदू, दोन परिग्रसिका-संयोजक (ग्रसिकेच्या म्हणजे घशाच्या भोवतालून जाणाऱ्या गुच्छिकांना म्हणजे ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू निघतात अशा तंत्रिकाकोशिकांच्या समूहांना जोडणाऱ्या तंत्रिका) आणि अधर तंत्रिकारज्जू (जाड तंत्रिका) यांचा समावेश होतो. मेंदू शीर्षाच्या वरच्या  भागात असून दोन परिग्रसिका-संयोजकांनी अधर तंत्रिका-रज्जूच्या अग्र टोकाशी असलेल्या अधोग्रसिका गुच्छिकेला (ग्रसिकेच्या खाली असलेल्या गुच्छिकेला) जोडलेला असतो. अधर रज्जू दुहेरी असून प्रत्येक कायखंडात तिच्यावर एक गुच्छिका असते. आदिम (आद्य) जातींमध्ये दोन रज्जू असून प्रत्येक कायखंडात त्यांच्यावर एक एक गुच्छिका असते, पण इतर जातींमध्ये या दोन अधर रज्जू आणि त्यांच्यावरील गुच्छिका सायुज्जित असतात. मेंदू आणि इतर गुच्छिका यांच्यापासून तंत्रिका निघून सर्व भागांना जातात. मुख जठर तंत्राचाही तंत्रिका तंत्रात समावेश होतो. कवचधारांच्या बहुतेक सर्व गटांमध्ये अधर गुच्छिकांचे कमीअधिक प्रमाणात सायुज्यन झाल्याचे दिसून येते. खेकड्याच्या सर्व अधर गुच्छिका अधोग्रसिका-गुच्छिकेशी सायुज्यित होऊन गुच्छिकांचा एक मोठा पुंज तयार होतो. 

ज्ञानेंद्रिये : मुक्तजीवी कवचधारांमध्ये ज्ञानेंद्रियांचा चांगला विकास झालेला असतो. डोळे, श्रवणेंद्रिये, घ्राणेंद्रिये, स्वादेंद्रिये, संतुलनांगे (शरीराचा तोल सांभाळणारी इंद्रिये) इ. ज्ञानेंद्रिये आढळतात. 


आ. १०. कवचधर वर्गात निषेचित अंड्यांचा विकास होत असताना उत्पन्न होणाऱ्या निरनिराळ्या डिंभावस्था : (अ) नॉप्लियस, (आ) मेटॅनॉप्लियस, (इ) सायप्रिस, (ई) प्रोटोझोइया, (उ) मेटॅझोइया, (ए) मेगॅलोपा, (ओ) फायलोसोमा.

डोळे : डोळे दोन प्रकारचे असतात मध्य नेत्र आणि संयुक्त नेत्र. मध्य नेत्र हा नॉप्लियस डिंभाचा (सुरुवातीच्या डिंभाचा) डोळा होय आणि तो बहुतेक प्रौढांमध्ये टिकून राहतो. पण मॅलॅकोस्ट्रॅकामध्ये मात्र साधारणपणे अवशेषी असतो. मध्य नेत्रात तीन वर्णकित वाट्या असून त्यांपैकी एक मध्य आणि दोन पार्श्व (बाजूला) असतात. प्रत्येक वाटी दृक्‌पटल-कोशिकांनी (डोळ्यातील प्रकाशसंवेदी स्तराच्या कोशिकांनी) भरलेली असते. या कोशिकांची बाहेरची टोके तंत्रिका तंतूशी अखंड असतात. कधीकधी प्रत्येक वाटीत भिंग असते. काही कोपेपोडांमध्ये पार्श्व वाट्या मध्य वाटीपासून अलग होऊन त्यांची स्वतंत्र पार्श्व डोळ्यांची एक जोडी बनते. संयुक्त नेत्राची संरचना कीटकाच्या संयुक्त नेत्रासारखीच असते. संयुक्त नेत्र अनेक नलिकाकार चाक्षुष (दृष्टिविषयक) एककांचा बनलेला असतो. या एककांना नेत्रिका म्हणतात व त्यांची मांडणी अरीय (वर्तुळाच्या केंद्रापासून निघून परिघाकडे जाणाऱ्या रेषांप्रमाणे) असते. नेत्रिकेच्या बाह्य पृष्ठावर पारदर्शक स्वच्छमंडल-फलक (नेत्रिकेचा बाहेरचा पारदर्शक भाग) असतो.त्याच्या खाली दोन बाह्यत्वचा कोशिका असतात. यांच्या स्रावापासून स्वच्छमंडल बनलेले असते. या कोशिकांच्या खाली एक स्फटिकरूप शंकू असून तो भिंगाचे कार्य करतो. शंकू ज्या चार कोशिकांनी वेढलेला असतो त्यांच्या स्रावापासूनच तो तयार झालेला असतो. या कोशिकांना शंकु-कोशिका म्हणतात. शंकु-कोशिका आतल्या बाजूकडे निमुळत्या होत गेलेल्या असतात आणि त्यांची खालची टोके पाच दृक्‌पटल-कोशिकांनी वेढलेली असतात. दृक्‌पटल-कोशिकांच्या आतल्या बाजूला एक तर्कूच्या आकाराचा प्रणमनशील (ज्याच्यामुळे किरणांचे वक्रिभवन होते) काय (वेतसिका) असतो. प्रत्येक दृक्‌पटल-कोशिकेचे समीपस्थ टोक दृक्‌तंत्रिकेच्या (डोळ्याकडे जाणाऱ्‍या तंत्रिकेच्या) एका संवेदी तंत्रिका तंतूला जोडलेले असते. सगळ्या नेत्रिका एकमेकींपासून वर्णक-कोशिकांच्या दोन स्तरांनी अलग झालेल्या असतात. एक स्तर स्फटिकरूप शंकूच्या भोवती आणि दुसरा दृक्‌पटल-कोशिकांच्या सभोवार असतो. प्रत्येक नेत्रिका पुढे असणाऱ्‍या वस्तूचा जेवढा भाग तिच्या अगदी समोर असेल तेवढ्याच भागाची प्रतिमा उत्पन्न करते. अशा तऱ्‍हेने एखाद्या वस्तूची सबंध प्रतिमा तिच्या निरनिराळ्या भागांच्या लहान लहान प्रतिमांचे तुकडे एके ठिकाणी जुळून बनलेली असते. अशा प्रतिमेला चित्रन्यास-प्रतिमा व दृष्टीला चित्रन्यास-दृष्टी म्हणतात. 

इतर ज्ञानेंद्रिये : खास श्रवणेंद्रिय नसते, परंतु शरीरावर आणि उपांगांवर असलेल्या अनेक पोकळ शूकांना तंत्रिका जोडलेल्या असतात. ह्यांच्यामुळे स्पर्शज्ञान व सर्व प्रकारच्या कंपनांचे आणि ध्वनितरंगांचे ज्ञान होणे शक्य आहे. कवचधरांना रसायनग्राहिता (रासायनिक उद्दीपने ग्रहण करण्याची क्षमता) अतिशय महत्त्वाची आहे. रासायनिक उद्दीपकांना ते अतिशय संवेदी असतात. लघुशृंगिका आणि शृंगिका यांच्यावर असणाऱ्या असंख्य रसायनग्राही केसांमुळे त्यांना वास येतो व चव समजते. 

संतुलन-पुटी : मॅलॅकोस्ट्रॅकांमध्ये सामान्यतः लघुशृंगिकेच्या बुडाच्या पेऱ्यात अथवा कधीकधी पुच्छपादात (पुच्छखंडाच्या अलीकडच्या उदर खंडातील उपांगात) अथवा पुच्छखंडात संतुलन-पुटी असते. हे शरीराचा तोल सांभाळणारे इंद्रिय होय. हे द्रवाने भरलेल्या वाटोळ्या पिशवीसारखे असते. पिशवीला संवेदी कोशिकांचे अस्तर असून त्यांच्या पृष्ठावरुन केसांसारखे प्रक्षेप निघालेले असतात. पिशवीत केसांना चिकटलेले बरेच संतुलनाश्म (संतुलन-पुटीत असणारे कॅल्शियम कार्बोनेटाचे किंवा वाळूचे कण) असतात. शरीर एका बाजूला कलले, तर ज्या बाजूला ते कलले असेल त्या बाजूला संतुलन-पुटीतील संतुलनाश्म गोळा होऊन त्यांचा केसांवर दाब पडतो आणि प्राण्याला शरीर कलल्याची जाणीव होऊन तो शरीर समतोल करतो. 

आ. ११. काही कवचधारी प्राणी : (१) ब्रँकिपस (२) एपस काँक्रिफॉर्मिस, पृष्ठीय दृश्य (३) डॅपिनया (४) सायक्लॉप्स (मादी), पृष्ठीय दृश्य (५) गूझ बार्नेकल (लेपस) (६) मायसीस (७) ॲसेलस, पृष्ठीय दृश्य (८) कॅप्रेला (मादी) (९) सिलेरस, पृष्टीय दृश्य (१०) स्क्विला, पार्श्व दृश्य.

जनन तंत्र : बहुतेक कवचधरांत लिंगे भिन्न असतात, पण पुष्कळ बार्नेकल उभयलिंगी (नर व मादी यांची  जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारे) असतात. परजीवी आयसोपोडा आणि कोळंब्यांच्या पँडॅलस  वंशात लिंग-विपर्यय (लिंगात बदल होणे) फार मोठ्या प्रमाणावर आढळतो. व्यक्ती आधी नर असतात आणि मादी होतात. टॅनेस स्टॅनफोर्डाय (टॅनेडॅसिया) आणि सायाथूरा कॅरिनेटा (आयसोपोडा) या जातींत आधी मादी असलेली व्यक्ती नंतर नर होते. निषेचित (फलन झालेल्या) अंड्यांच्या विकासाने बहुतेक कवचधर तयार होतात, परंतु काही प्रकारांत अनिषेकजनन (शुक्राणूचा अंड्याशी संयोग न होताच अंड्यापासून नवीन प्राणी तयार होणे) नियमितपणे आढळते. अंड्यातून बाहेर पडलेले पिल्लू प्रौढासारखे असणे शक्य असते, परंतु बहुधा त्याचे स्वरूप भिन्न असते. सुरुवातीच्या डिंभाला नॉप्लियस म्हणतात, याचे शरीर अखंड असते. एक मध्य नेत्र असतो आणि उपांगांच्यालधु-शृंगिका, शृंगिका व जंभ यांच्यातीन जोड्या असतात. नंतर शरीर लांब होते, त्याच्या पश्च भागाचे खंडीभवन होते आणि जास्त उपांगांची भर पडते. या अवस्थेत डिंभाला मेटॅनॉप्लियस म्हणतात. बार्नेकलामध्ये मेटॅनॉप्लियसाचे सायप्रिस डिंभात रूपांतर होते. हा डिंभ एखाद्या पदार्थाला चिकटतो आणि नंतर त्याचे प्रौढात रूपांतर होते. डेकॅपोडांमध्ये (कोळंबी, शेवंडा, खेकडा) मेटॅनॉप्लियस डिंभानंतर झोइया डिंभ तयार होतो. खेकड्यांमध्ये झोइयाच्या रूपांतराने मेगॅलोपा अवस्था आणि कोळंब्यामध्ये मायसीस अवस्था उत्पन्न होते. पुष्कळदा या अवस्थांपैकी एक किंवा अधिक नाहीशा होतात. बहुतेक डेकॅपोडांमध्ये नॉप्लियस अवस्था अंड्यातच पार पडते व अंडी फुटून झोइया डिंभ बाहेर पडतो. गोड्या पाण्यातील डेकॅपोडांमध्ये डिंभावस्था नसतेच. अँफिपोडा, आयसोपोडा आणि मायसिडॅसियामध्ये वक्षीय कोष्ठात पिल्लांची वाढ होते [→ डिंभ].


निर्मोचन : कवचधरांचे शरीर कठीण बहिःकंकालाने वेढलेले असल्यामुळे शरीराची वाढ होण्याकरिता हा कंकाल मधूनमधून निघून जाणे आवश्यक असते. साप वगैरे प्राण्यांच्या कात टाकण्यासारखीच ही क्रिया असून तिला निर्मोचन म्हणतात. निर्मोचनानंतर आणि तयार होत असलेला नवा कंकाल मऊ आणि ताणला जाण्याच्या स्थितीत असतानाच शरीराचे आकारमान वाढू शकते. पिल्लांमध्ये वर्षातून अनेकवेळा निर्मोचन होते, पण प्रौढांत ते थोड्या वेळा होते. निर्मोचनापूर्वी काही अकार्बनी लवणे बहिःकंकालातून काढून घेतली जातात आणि नवा मऊ बहिःकंकाल जुन्या कंकालाखाली तयार होऊ लागतो व त्याच्यापासून अलग होतो. पृष्ठवर्म आणि उदर यांच्यामधील पाठीवरची उपत्वचा फाटते आणि प्राणी हळूहळू जुन्या कवचातून बाहेर पडतो. एका गुंतागुंतीच्या प्रवर्तक तंत्राने (अंतःस्रावी ग्रंथीपासून उत्पन्न होणाऱ्या उत्तेजक स्रावांच्या तंत्राने) निर्मोचन चक्राचे नियंत्रण केले जाते.

वर्गीकरण : कवचधर वर्गाचे पाच उपवर्ग केलेले आहेत : (१) उपवर्ग ब्रँकिओपोडा : हे मुक्तजीवी कवचधर असून त्यांची वक्ष-उपांगे चपटी व पानांसारखी असतात. या उपांगांचे कार्य श्वसन हे असते, सामान्यतः पृष्ठवर्म असते. या उपवर्गात ॲनोस्ट्रॅका, नोटोस्ट्रॅका, काँकोस्ट्रॅका, क्लॅडोसेरा हे चार गण आहेत. उदा., ब्रँकिपस, एपस, एस्थेरिया, डॅफ्निया. (२) उपवर्ग ऑस्ट्रॅकोडा : मुक्तजीवी असून पृष्ठवर्म द्विपुटी असते. संयुक्त नेत्र असतात किंवा नसतात, दोन वा दोहोंपेक्षा कमी वक्ष-उपांगे, जंभ-स्पर्शक सामान्यतः द्विशाखी असतो. उदा., सायप्रिस, सायथेरे. (३) उपवर्ग कोपेपोडा : मुक्तजीवी किंवा परजीवी संयुक्त नेत्र आणि पृष्ठवर्म नसतात प्रारूपिकतेने वक्ष-उपांगांच्या सहा जोड्या असतात. उदा., सायक्लॉप्स, अर्‍गॅसायलस (परजीवी). (४) उपवर्ग सिरिपेडिया : प्रौढावस्था स्थानबद्ध प्रौढावस्थेत संयुक्त नेत्र नसतात शरीर पृष्ठवर्माने वेढलेले असते बहुधा उभयलिंगी असतात. या उपवर्गात थोरॅसिका, ॲक्रोथोरॅसिका आणि ऱ्हायझोसेफॅला हे तीन गण आहेत. उदा., लेपस, ॲलसिप्पी आणि सॅक्युलायना (परजीवी). (५) उपवर्ग मॅलॅकोस्ट्रॅका : या उपवर्गातील प्राणी बहुधा मोठे असतात शीर्षात ५, वक्षात ८ आणि उदरात ६ खंड असतात जठरात जठर-पेषणी असते. या उपवर्गात नेबॅलिॲसिया, ॲनॅस्पिडॅसिया, मायसिडॅसिया, क्यूमॅसिया, आयसोपोडा, अँफिपोडा, डेकॅपोडा आणि स्टोमॅटोपोडा असे आठ गण आहेत. उदा., नेबॅलिया, ॲनॅस्पिडीस, मायसीस, डायॅस्टायलिस ॲसेलस, गॅमॅरस, कँबॅरस, स्क्विला इत्यादी.

पहा : अशन यंत्रणा, प्राण्यांची आर्थ्रोपोडा.

संदर्भ : 1. Green, J. Biology of Crustacea, Chicago, 1961.

           2. Schmitt, W. L. Crustaceans, Ann Arbor, 1964.

कर्वे, ज. नी.