रुचि: तोंडात घातलेल्या कोणत्याही पदार्थाची चव म्हणजे रुची. दृष्टी, श्रवण, गंध या विशिष्ट संवेदनांप्रंमाणेच रुची ही एक विशिष्ट संवेदना आहे. ही संवेदना विशिष्ट ग्राहकामार्फत रासायनिक उद्दीपनातून निर्माण होत असल्यामुळे तिला ‘रासायनिक संवेदना’ म्हणतात. सर्व विशिष्ट संवंदनांची ग्राहक क्षेत्रे मेंदूत असून त्यांचे वहन मस्तिषक तंत्रिकांमार्फत होते [ 

⟶ तंत्रिका तंत्र].

रुची ही जटिल संवेदना आहे. तिच्या निर्मितीत तोंडातील उष्णता, स्पर्श व वेदना या संवेदनांशिवाय नाकातील गंध संवंदनाही भाग घेते. अन्नाची रुची व स्वाद या दोन भिन्न संवेदना आहेत. स्वादात गंध व रुची या दोन्हींचे मिश्रण असते [⟶ स्वाद].  

प्रस्तुत नोंदीचे दोन भाग केलेले आहेत : (१) रुचिनिर्मिती आणि (२) रुचिसंवेदनावहन.  

रुचिनिर्मिती : प्रथम रुचीच्या प्रकारांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. 

रुचीचे प्रकार : रुचीचे चार प्रमुख प्रकार आहेत: (१) आंबट, (२) खारट, (३) गोड व (४) कडू.

 

(१) आंबट : ही रुची पदार्थातील अम्लामुळे उत्पन्न होते. तिची तीव्रता अम्लातील हायड्रोजन आयनांच्या (विद्युत् भारित अणूंच्या) संहतीच्या (सांद्रतेच्या) लॉगरिथमाच्या सम प्रमाणात असते म्हणजे अम्ल जेवढे प्रबल तेवढी रुचीही अधिक तीव्र असते.

 

(२) खारट : ही रुची आयनीभूत लवणांमुळे उत्पन्न होते. या रुचीची गुणवत्ता निरनिराळी असते कारण लवणे खारटाशिवाय इतर संवेदनाही उद्दीपित करतात. लवणांतील ऋणायन (धनविद्युत् भारित अणू वा अणुगट) रुचीस कारणीभूत असेल, तरी धनायनही (ऋण विद्युत् भारित अणू वा अणुगटही) अल्पप्रमाणात सहभागी असतात.

 

(३) गोड : ही रुची कोणत्याही एका विशिष्ट रसयनाच्या वर्गामुळे उत्पन्न होत नाही, ही रुची उत्पन्न करणाऱ्या रसायनांचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:शर्करा, ग्लायकॉले, अल्कोहॉले, आल्डिहाइडे, कीटोने, अमाइडे, एस्टरे, ॲमिनो अम्ले, सल्फॉनिक अम्ले, हॅलोजनिकृत अम्ले आणि शिसे व बेरिलियम यांची अकार्बनी लवणे. गोड रुची उत्पन्न करणारे बहुतांशी पदार्थ कार्बनी आहेत हे यावरून दिसून येते.

 

(४) कडू : ही रुचीही गोड रुचीप्रमाणेच कोणत्याही एकाच प्रकारच्या रसायनामुळे निर्माण होत नाही. ही रुची निर्माण करणारे पदार्थही बहुतांशी कार्बनी असतात. दोन विशिष्ट वर्गातील पदार्थ खास करून कडू रुचिसंवेदना निर्माण करण्याची शक्यता असते: (अ) दीर्घ शृंखलांचे नायट्रोजनयुक्त पदार्थ व (आ) अल्कलॉइडे. अल्कलॉइडांमध्ये वैद्यकीय वापरण्यात येणाऱ्या क्किनीन, कॅफीन, स्ट्रिकनीन, निकोटीन यांसारख्या अनेक औषधांचा समावेश होतो [⟶ अल्कलॉइडे].

काही पदार्थ प्रथमतः गोड लागतात पण मागाहून त्यांच्यामुळे कडू रुची निर्माण होते. सॅकॅरिनाच्या बाबतीत ही गोष्ट खरी असून त्यामुळे काही लोकांना ते आवडत नाही. काही पदार्थ जिभेच्या पुढच्या भागात गोड रुची, तर मागील बाजूस कडू रुची निर्माण करतात.

एखाद्या पदार्थामुळे कडू रुची जेव्हा अतिशय तीव्रतेने निर्माण होते तेव्हा माणूस वा प्राणी बहुधा तो पदार्थ टाळतो. हे कडू रुचीच्या संवंदनेचे एक निःसंशयपणे महत्त्वाचे कार्य आहे कारण विषारी वनस्पतींत आढळणारी अनेक मारक विषे अलकलॉइडे आहेत व ती तीव्र कडू रुची निर्माण करतात.

रुचींची तलसीमा : आंबट रुचीचे हायड्रोक्लेरिक अम्लाने उद्दीपन करण्याची तलसीमा सरासरीने ०.०००९ (प्रसामान्य विद्राव), सोडियम क्लोराइडाने खारट रुचीच्या उद्दीपनाची तलसीमा ०·०१ मोल, सुकोजाने गोड रुचीच्या उद्दीपनाची ०·०१ मोल आणि क्किनिनाने कडू रुचीच्या उद्दीपनाची ०·०००००८ मोल इतकी असते (‘प्रसामान्य विद्राव्य’ व ‘मोल’ यांच्या स्पष्टीकरणासाठी ‘विद्राव’ ही नोंद पहावी). यावरून कडू रुची संवेदना ही इतर रुचीपेक्षा किती जास्त संवेदनशील आहे, हे दिसून येते. ही रुची महत्त्वाचे संरक्षक कार्य करीत असल्याने वरील गोष्ट अर्थातच अपेक्षित आहे.

कोष्टकामध्ये विविध पदार्थाचे सापेक्ष रुची निर्देशांक (रुची तलसीमांचे व्यस्तांक) दिलेले आहेत. रुचीच्या चार प्रमुख प्रकारांच्या संवेदनंच्या तीव्रता अनुक्रमे हायड्रोक्लोरिक अम्ल, क्विनीन, सुक्रोज व सोडियम क्लोराइड यांच्या संदर्भाने दिलेल्या आहेत. या चार पदार्थाचे रुची निर्देशांक १ धरलेले आहेत.

विविध पदार्थांचे सापेक्ष रुची निर्देशांक

आंबट पदार्थ

निर्देशांक

कडू पदार्थ

निर्देशांक

हायड्रोक्लोरिक अम्ल               

क्विनीन

फॉर्मिक अम्ल

१·१

ब्रूसीन

११

क्लोरॲसिटिक अम्ल

०·९

स्ट्रिक्नीन

३·१

ॲसिटिल ॲसिटिक अम्ल

०·८५

निकोटीन

१·३

लॅक्टिक अम्ल

०·८५

फिनिल थायोयूरिया

०·९

टार्टारिक अम्ल

०·७

कॅफीन   

०·४

मॅलिक अम्ल

०·६

व्हेराट्रीन

०·२

पोटॅशियम H टार्टारेट

०·८५

पायलोकार्पीन

०·१६

ॲसिटिक अम्ल

०·५५

ॲट्रोपीन

०·१३

सायट्रिक अम्ल

०·४६

कोकेन

०·०२

कार्‌बॉनिक अम्ल

०·०६

मॉर्फीन   

०·०२

                               

गोड पदार्थ

निर्देशांक

खारट पदार्थ

निर्दशांक

सुक्रोज

सोडियम क्लोराइड

१-प्रोपॉक्सी-२-ॲमिनो-४-नायट्रो

५,०००

सोडियम फ्लुओराइड

बेंझीन सॅकॅरीन

६७५

कॅल्शियम क्लोराइड

क्लोरोफॉर्म

४०

सोडियम ब्रोमाइड

०·४

फ्रुक्टोज

१·७

सोडियम आयोडाइड

०·३५

ॲलॅनीन

१·३

लिथियम क्लोराइड

०·४

ग्लुकोज

०·८

अमोनियम क्लोराइड

२·५

माल्टोज

 ०·४५   

पोटॅशियम क्लोराइड

०·६

गॅलॅक्टोज

०·३२

लॅक्टोज

०·३

रुचि-उद्दीपक विद्रावाच्या तापमानाचा तलसीमेवर परिणाम होतो. २०°ते ३०°से. तापमान असल्यास ती सर्वांत कमी आणि त्यापेक्षा जास्त तापमानात वाढते. रक्तातील विशिष्ट पदार्थांची संहती रुचिकलिकांवरही (जिभेवरील रुचिसंवेदनाग्राहकांवरही) परिणाम करते व त्यामुळे तलसीमेवर परिणाम होतो. ⇨अधिवृक्क ग्रंथीच्या स्त्रावाच्या न्यूनतेमुळे रक्तातील सोडियमाचे प्रमाण घटते. ⇨ॲडिसन रोग   या विकृतीचे रोगी अधिक मीठ सेवन करतात. प्राकृतिक (सर्वसाधारण) उंदीर सोडियम क्लोराइडाचा १:२,००० चा विद्राव पसंत करतात परंतु अधिवृक्क ग्रंथी काढून टाकलेले उंदीर १:३३,००० चा विद्राव अधिक पसंत करतात.

वरील प्रमुख रुंची प्रकारांशिवाय आणखी दोन रुची प्रकार ओळखता येतात : (१) धातवीय व (२) क्षार-धर्मीय (अल्कधर्मीय).

कोणत्याही रुचि-उत्पादक पदार्थामध्ये जलविद्राव्यता (पाण्यात विरघळण्याची क्षमता) हा गुणधर्म असावाच लागतो. वसा विद्राव्यता (स्निग्ध पदार्थात विरघळण्याची क्षमता) पूरक असावी. याशिवाय त्या पदार्थाला विशिष्ट रासायनिक संरचना असावी लागते. रुचिग्राहकाला उद्दीपित करण्याची क्षमता विशिष्ट रासायनिक गटांमुळे (सॅफ्रोफोअर) पदार्थाला प्राप्त होते. हे रासायनिक गट नष्ट झाले व त्यांत अत्यल्पही बदल झाले, तर ते पदार्थाची रुची बदलण्यास कारणीभूत असतात किंवा त्यास बेचव करण्यास पुरेसे असतात.


रुचिकलिका : इतर संवेदनांप्रमाणेच रुचिसंवेदनेकरिता ग्राहक आवश्यक असतात. त्यांना आ. १. जिभेवरील रुचिक्षेत्रे : (रोमन आकडे मस्तिप्क तंत्रिकांचे क्रमांक दर्शवितात).रुचिकलिका म्हणतात. रासायनिक उद्दीपनामुळे त्या उद्दीपित होतात म्हणून त्यांना ‘रासायनिक ग्राहक’ असेही म्हणतात.

मानवात प्रौढामध्ये जवळजवळ १०,००० रुचिकलिका असतात. चाळिशीनंतर रुचिकलिकांचा जलद नाश होतो व परिणामी संवेदना अधिक विवेचक बनते.

रुचिकालिका विशिष्ट रुचिसंवेदना उत्पन्न करीत असल्या, तरी अलीकडील संशोधनावरून असे आढळले आहे की, त्यांचे अभिवाही (मेंदूकडे संवेदना वाहून नेणारे) तंत्रिका तंतू एकाच प्रकारची संवेदना वाहून नेत नाहीत. एका रुचिकलिकेस एकामागून संवेदना वाहून नेत नाहीत. एका रुचिकलिकेस एकामागून एक प्रमुख रुचिउत्पादकांनी उद्दीपित केल्यास ती एकापेक्षा अधिक प्रमुख रुचिसंवेदना निर्माण करू शकते, असे आढळले आहे. यांपैकी एखादी संवेदना अधिक प्रभावी असते.

आ. २. (अ) रुचिकालिका : (१) रुचिकेस, (२) रुचिछिद्र, (३) रुचिकोशिका, (४) अधिस्तर कोशिका (आ) रुचिकलिका रचना : (१) अधिस्तर कोशिका, (२) रुचिछिद्र, (३) तंत्रिका तंतू. (४) रुचिकेस, (५) रुचिकोशिका.बहुसंख्य रुचिकलिका जिभेवरील निरनिराळ्या प्रकारच्या पिंडिकांवर (लहानलहान उंचवट्यांवर) असतात [⟶ जीभ]. याशिवायत्या तालू, गिलायू (टॉन्सिल) स्तंभ आणि नासाग्रसनी (नाकाच्या पश्चभागी व मृदुतालूच्या वर असलेला घशाच्या भाग) या भागांतही विखुरलेल्या असतात. जिभेवरील रुचिकलिकांचे वितरण ठराविक तऱ्हेने झालेले असते. मागील बाजूकडे वरच्या पृष्ठभागावरीलरुचिकलिका कडू रुचीला जबाबदार असतात. जिभेच्या पार्श्व भागावरील रुचिकलिका खारट व आंबट रुचींना, तर टोकाशी असलेल्या गोड रुचीला जबाबदार असतात. मानवात चार मुख्य रुची प्रकार असले, तरी रुचिसंवेदनाग्राहकांत रचना व संघटन या दृष्टींनी फरक असल्याचे आढळत नाही. निरनिराळे रुचि-उद्दीपक पदार्थ वापरून केलेल्या मानसशास्त्रीय तपासणीतून असे सिद्ध झाले आहे की, एकाच रुचि- उद्दीपकामुळे संवेदित होणारी रुचिकलिका निरनिराळ्या दोन तीन वा चारही प्रमुख रुचिसंवेदना निर्माण करू शकते परंतु त्यांमध्ये एक किंवा दोनच वरचढ अथवा प्रधान असतात.

रुचिकलिकेचा व्यास सु. ०·०३३ मिमी. व लांबी सु. ०·०६२५ मिमी. असते. जवळजवळ चाळीस रुपांतरित अधिस्तर कोशिका (पेशी) मिळून ती बनते. यांपैकी काही आधारकोशिका व काही रुचिकोशिका असतात. अधिस्तर कोशिकांच्या समभाजनातून [⟶ कोशिका] नव्या रुचिकोशिका सतत तयार होतात व त्या जुन्या कोशिकांची जागा घेतात. जुन्या कोशिका रुचिकालिकेच्या केंद्राजवळ येत असतात व तेथे विघटित होतात. कनिष्ठ सस्तन प्राण्यांमध्ये या कोशिकांची आयुर्मर्यादा दहा दिवस असते पण मानवाच्या बाबतीत ती अज्ञात आहे.

एका सूक्ष्म छिद्राभोवती (रुचिछिद्राभोवती) रुचिकोशिकांची बाह्य टोके रचलेली असतात. या टोकांपासून सूक्ष्म रसांकुर (यांना रुचिकेस म्हणतात) छिद्राबाहेर डोकावत असतात. प्रत्येक केस २ ते ३ मायक्रॉन (१ मायक्रॉन = १० मीटर) लांब व ०·१ ते ०·२ मायक्रॉन रुंद असतो. मुखगुहेत डोकावणारे हे केस रुचिकलिकांचा ग्राहक पृष्ठभाग असतात.

रुचिकोशिकांमध्ये रुचितंत्रिकांच्या शाखांचे जाळे पसरलेले असते. काही सूक्ष्म तंत्रिका कोशिका पटलाच्या घड्यांत घुसलेल्या असतात. यामुळे अतिनिकट संपर्क साधला जातो. रुचितंत्रिका कोणत्याही कारणाने नाश पावल्यास रुचिकलिकांचा अपकर्ष होतो. नवनिर्मित तंत्रिका तंतू जसजसे अधिस्तर कोशिकांत तयार होतात तसतशा त्यांपासून नव्या रुचिकलिका बनतात.

बहुसंख्य रुचिकलिका जिभेच्या अग्र दोनतृतीयांशाच्या पृष्टीय भागावर असतात. सेवन केलेला पदार्थ द्रव स्वरुपात रुचिछिद्रात प्रविष्ट होऊन रासायनिक उद्दीपनाचे कार्य करतो.

रुचिनिर्मितीमध्ये तोंडातील स्पर्श व उष्णता या संवेदनांचाही सहभाग असतो. उदा., सुंठ किंवा आल्याची रुची. रुचिकलिकांशिवाय तोंडातील इतर तंत्रिकांमार्फत वाहून नेल्या जाणाऱ्या भाजण्याच्या संवेदनेतूनही रुची निर्माण होते.

रुचिसंवेदनावहन : रुचिकलिकांत निर्माण झालेली संवेदना मेंदूतील रुचिक्षेत्रापर्यंत वाहून नेणारी विशेष यंत्रणा आहे.

आ. ३. (अ) रुची आवेग मेंदूकडे वाहून नेणारी यंत्रणा : (१) मेंदूतील रुचिक्षेत्र, (२) थॅलॅमस, (३) कर्णपटल तंत्रिका, (४) मस्तिष्क स्तंभातील एकाकी पथ, (५) प्राणेशा (ग्रसनीय रुचिकलिका) तंत्रिका, (६) जिव्हाग्रसनी तंत्रिका, (७) आनन तंत्रिका, (८) परिवृत्त-तटी पिंडिका, (९) जीभ, (१०) जिल्हा तंत्रिका (आ) रुची आबेगांचे वहन पथ : (१) जीभ, (२) कर्णपटल तंत्रिका, (३) जिव्हा तंत्रिका, (४) जिव्हाग्रसनी (५) अधःस्थ लाला-उद्दीपक केंद्रक, (६) ऊर्ध्वस्त लाला- उद्दीपक केंद्रक, (७) लंबमज्जा, (८) मस्तिप्कसेतू, (९) अनुकर्ण लाला ग्रंथीकडे, (१०) अधोजिव्हा आणि अत्र-उतरहनू लाला ग्रंथींकडे. (तुटक रेषांनी अपवाही तंत्रिका तंतू व अखंड रेषांनी अभिवाही तंत्रिका तंतू दाखविले आहेत).

जिभेच्या पुढच्या दोनतृतीयांश भागातून निघणारे आवेग प्रथम पाचव्या मस्तिष्क तंत्रिकेत व नंतर कर्णपटल तंत्रिकेतून आनन तंत्रिकेत जातात, तेथून मस्तिष्क स्तंभावरील एकाकी पथातून जातात व तेथील केंद्रकाशी अनुबंधित होतात [⟶ तांत्रिका तंत्र]. जिभेच्या मागच्या भागामधील परिवृत्त-तटी पिंडिकांतील व तोंडातील इतर पश्च भागातील संवेदना जिव्हाग्रसनी तंत्रिकेतून एकाकी पथातील केंद्रकापर्यंत जातात. जिभेचा आधार भाग व ग्रसनीचे इतर भाग यांतील संवेदना प्राणेशा (दहाव्या मस्तिष्क) तंत्रिकेमार्फत एकाकी पथात जातात.

सर्व रुचितंत्रिका तंतृ एकाकी पथातील केंद्रकाशी अनुबंधित होतात. या केंद्रकापासून दुय्यम तंत्रिका एकके हे आवेग थॅलॅमसातील एका छोट्या क्षेत्रात जातात. या क्षेत्रापासून तृतीय तंत्रिका एकके बाह्यकातील रुचिक्षेत्रात जातात. हे क्षेत्र जिभेच्या कायिक क्षेत्राची संलग्न असते.


रुचीची वैशिष्ट्ये : रुचीसंबंधीच्या प्रतिक्षेपी क्रिया : (बाह्य उद्दीपनामुळे निर्माण होणारे स्नायू यंत्रणेचे अनैच्छिक प्रतिसाद). एकाकी पथातील केंद्राकापासून काही आवेग सरळ ऊर्ध्वस्थ व अधःस्थ लाला-उद्दीपक केंद्रकांकडे जातात. या केंद्रकांपासून निधणारे आवेग अव-उत्तरहून, अधोजिव्हा व अनुकर्ण लाला ग्रंथींकडे जातात. यामुळे पचनक्रिया चालू असताना लाळेच्या स्त्रवणावर नियंत्रण केले जाते [आ. ३ (आ)].

रुचि-अनुकूलन : रुचिसंवेदनाचे जलद अनुकूलन सर्वांच्या अनुभवाचे आहे. सतत उद्दीपनानंतर मिनिटभरातच संपूर्ण अनुकूलन होते. रुचितंत्रिका तंतूच्या विद्युत् शरीरक्रियाविज्ञानात्मक अभ्यासातून असे आढळले आहे की, या अनुकूलनात रुचिकलिका मोठा भाग घेत नसाव्यात. सुरुवातीच्या आवेगांचा भर पदार्थाच्या अत्यल्प संहतीतही रुची समजण्यास पुरतो. पदार्थाची प्राकृतिक संहती क्षीण परंतु काही काळ टिकणारे आवेग उत्पन्न करते. यावरून हळूहळू वाढत जाणारे अनुकूलन बहुधा केंद्रीय तंत्रिका तंत्रामार्फत होत असावे. इतर संवेदनांचे अनुकूलन प्रामुख्याने ग्राहकस्थानीच होते.

रुचीचा भाववृत्तीशी संबंध : प्रिय अथवा आवडता आणि अप्रिय अथवा नावडता ही पदार्थांना लावण्यात येणारी विशेषणे रुचीचा भावनेशी असणारा संबंध दर्शवितात. प्रमुख रुचींचे संहतिनुरूप होणारे भावनिक परिणाम आ. ४ मधील आलेखावरून स्पष्ट होतात. गोड रुची कमी संहतीला अप्रिय परंतु उच्च संहतीला अतिशय प्रिय असण्याची शक्यता असते याउलट इतर रुचींच्या बाबतीत कमी संहतीला त्या प्रिय, तर उच्च संहतीला अतिशय अप्रिय असण्याची शक्यता असते. विशेषत्वाने कडू रुचीच्या बाबतीत हे सत्य आहे.

रुचिहीनता : रुचिसंवेदनांमध्ये अनेक वैयक्तित फरक आढळतात. काही व्यक्तींना कोणातही रुची जाणवत नाही. अशा व्यक्ती पूर्ण ‘रुचिहीन’ आहेत असे म्हणतात. सर्वच पदार्थांच्या रुचीची तीव्रता कमी होण्याला ‘रुचि-अल्पता’ म्हणतात. कोणताही पदार्थ नसताना किंवा चुकीची रुची जाणवल्यास ‘रुचि-अल्पता’ म्हणतात. कोणताही पदार्थ नसताना किंवा चुकीची रुची जाणवल्यास ‘रुचि-विरुपण’ म्हणतात.

बहुतेक व्यक्ती ०·४१% सुक्रोज विद्रावाची गोड रुची ओळखतात. काहींना १०% विद्रावही रुचिहीन असतो. एथिल अल्कोहॉल ५०% विद्रावात काहींना रुचिहीन, तर १०% किंवा कमी संहतीचा याचाच विद्राव बहुतेकांना अप्रिय असतो.

काही रासायनिक संयुगांच्या रुचिसंवेदनेबद्दलचा निरनिराळा अनुभव १९३१ मध्ये लक्षात आला. काही विशिष्ट संयुगे (उदा., p−एथॉक्सिफिनिलथायोयूरिया) बहुतेकांना कडू लागतात, तर काहींना रुचिहीन असतात. p−एथॉक्सिफिनिलथायोयूरिया व इतर काही संयुगे [उदा.,फिनिलथायोकार्बामाइड (पीटीसी) व त्यापासून बनविलेली इतर संयुगे, ही सर्व कडू आहेत] रुचीतील न्यूनता तपासण्यासाठी वापरतात. पीटीसीची तलसीमा पुष्कळच बदलते, असे दिसून आले आहे. काहींचा बाबतीत ते पाण्यापासुन भिन्न आ.४. निरनिराळ्या रुची उद्दीपनांची संहती व भावनिक परिणाम यांचा संबंध दर्शविणारा आलेख.असल्याचे ओळखण्यासाठी किमान संहती ०·०००००५ % असू शकते, तर काहींच्या बाबतीत ही संहती ०·१ % असते. कमाल वारंवारता ०·०००३% करिता आढळते. काही विशिष्ट प्रमाणातील (३% ते ५%) लोक या पदार्थाच्या बाबतीत व्यवहारातः रुचिहीन असतात. स्त्रियात तलसीमा पुरुषांपेक्षा थोडीशी कमी असलेल्या आढळून आले आहे. रुची समजण्याच्या बाबतीत मेंडेल यांचे आनुवंशिकतेचे नियम लागू असल्याचेही लक्षात आले. पतिपत्नी दोघेही रुचिहीन असल्यास सर्व अपत्ये रुचिहीन असतात. दोघांपैकी एक रुचिहीन असल्यास अपत्ये रुचियुक्त किंवा रुचिहीन असतात किंवा रुचियुक्त असल्यास अपत्ये बहुधा रुचियुक्त असतात. युरोप व उत्तर अमेरिकेत ७०% गारे लोक पीटीसीची रुची ओळखतात. अरवांनध्ये ६३% ऑस्ट्रेलियन आदिवासींमध्ये ५१%, चिनी लोकांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक, अमेरिकन इंडियनांमध्ये ९८% लोक या पदार्थाची रुची ओळखतात.

प्राण्यांत नरवानर (प्रायमेट्‌स) गणातील प्राणी बहुतांश रुचियुक्त आढळतात. ब्रिटिश प्राणिसंग्रहालयातील २८ चिपँझींपैकी २० जण पीटीसीची अप्रिय कडू रुची ओळखू शकले.

रुचीच्या बाबतीत ‘थकवा’ लवकर उद्‌भवतो. दीर्घ उद्दीपनामुळे विशिष्ट उद्दीपित रुचीची संवेदना कमी होते. त्याच वेळी इतर रुचिग्राहकांची संवेदनशीलता वाढते, असा काही पुरावा आढळलेला आहे.

रुची विविधता : रुचीतील व्यक्तिगत भिन्नता पुढील प्रयोगांती स्पष्ट झाली आहे : शास्त्रज्ञांच्या एका बैठकीत एक अज्ञात पदार्थ (प्रत्यक्षात माल्टोज) रुची घेऊन नोंद करण्यासाठी वाटण्यात आला. त्याच पुढील रुची नोंदल्या गेल्या : (१) गोड, (२) कडू, (३) अम्ल, (४) स्वारट, (५) बेचव व (६) जटिल म्हणजेच शक्य तेवढे सर्व रुचिप्रकार सांगितले गेले. यावरून ‘रुचिर्मित्रा:लोके’ ही संस्कृत म्हण अगदी यथार्थ आहे.

रुचीचे शरीरक्रियाविज्ञान दृष्ट्या महत्त्व : रुचिग्राहकांचे उद्दीपन लाळेचे स्त्रवण, जटर स्त्रावोत्पादन आणि इतर पचनावश्यक आत्र स्त्रावांना (आतड्यात होणाऱ्या स्त्रावांना) चालना देते व जठरांत्र हालचालींना उत्तेजन देते. यामुळे रुची प्राकृतिक पचनक्रियेत महत्त्वाचे कार्य करते. अन्नसेवनातील नियंत्रणामुळे शरीराच्या अंत:स्थ स्थतीचे संतुलन ठेवण्यास मदत होते.

रुचीसंबंधीच्या विकृती : रुचीतील बिघाडास पदार्थाचे रुचिकलिकापर्यंत न पोहोचणे (वहननाश), रुचिकलिंकाना इजा होणे (संवेदनानाश) व अभिवाही तंत्रिक तंतूचा नाश (तंत्रिकानाश) कारणीभूत असतात. वहननाश हा मुखशुष्कता, टी. स्येग्रेन यांचा लक्षणसमूह (श्लेष्मकलांची−बुळबुळीत अस्तरांची−शुष्कता), भारी धांतुंची विषारी परिणाम किंवा रुचिकलिकांतील रुचिछिद्रांतील असामान्य सूक्ष्मजंतू वाढ यांमुळे उत्पन्न होतो. पुष्कळ वेळा लाला ग्रंथीचा बिघाडही रुचीविकृतीस कारणीभूत असतो. संवेदनानाशास निरनिराळे मुखरोग, अनेक औषधे व वृद्धावस्था कारणीभूत असतात.

रुचिनाश संपूर्ण, आंशिक, विशिष्ट किंवा रुचिन्यूनता या प्रकारांचा असतो. रुचीविकृतीस पुष्कळ वेळा मानसिक विकृतीही कारणीभूत असतात. अमेरीकेतील जवळजवळ २० लक्ष प्रौढ व्यक्ती रुची व गंध विकृतींना ग्रस्त असल्याचे आढळले आहे.

रुचिविकृतींवर मर्यादित उपचार उपलब्ध आहेत. काहींना कृत्रिम लाळेपासून फायदा होतो. हानिकारक औषधांचे सेवन टाळणे उपयुक्त ठरते. संवेदनानाश किंवा तंत्रिका बिघाडजन्य रुचिविकृतींवर कोणताही उपचार उपलब्ध नाही.

संदर्भ : 1. Best, C. H.: Taylor, N. B .The Living Body. Bombay 1958.

     2. Braunwald, E. and others, Ed., Harrisons’ Principles of Internal Medicine, New York, 1987.

    3. Gorman W. Flavor. Taste and Psychology of Smell, Springfield, 1964,

    4. Guyton, A.C. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1986,

     5. Houssay, B. A. and others, Ed. Human Physiology, Tokyo, 1955.

भालेराव, य. त्र्यं.