हॅमिल्टन – २ : ब्रिटिशांकित बर्म्यूडा द्वीपाची राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या ११,५३५ (२००९ अंदाज). हे न्यूयॉर्क शहराच्या आग्नेयीस सु. १,३०० सागरी किमी.वर बर्म्यूडा बेटाच्या उत्तर किनारी वसलेले आहे. हे येथील प्रमुख दळणवळण केंद्र असून पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. १७९३ मध्ये हे बर्म्यूडा अधिनियमाद्वारे वसविण्यात आले. गव्हर्नर हेन्री हॅमिल्टन याच्या गौरवार्थ याचे हॅमिल्टन असे नामकरण करण्यात आले. १८१५ मध्ये ब्रिटिशांकित बर्म्यूडा द्वीपाची येथे राजधानी करण्यात आली व १८९७ मध्ये यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. उद्योग व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने १९५६ मध्ये हे मुक्त बंदर करण्यात आले. येथील अर्थव्यवस्था उच्च विकसित असून जागतिक दर्जाच्या आर्थिक सेवा पुरविण्यात हे शहर अग्रेसर आहे. १९४६ पासून शहरात मोटारगाडी चालविता येते मात्र शहरात याचा ताशी वेग २४ किमी. पर्यंत सीमित करण्यात आला आहे.

 

हॅमिल्टनचे आल्हाददायक हवामान, निसर्गसौंदर्य, मनोरंजनाच्या सुविधा यांमुळे पर्यटन हा येथील महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. येथे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा आणि यूरोपीय देशांतून हजारो पर्यटक येतात.कांदे, बटाटे, आरारूट, लेट्यूस यांचे येथे उत्पादन घेतले जाते. येथे मासेमारीही करण्यात येते.

 

शहरातील शासकीय हॅमिल्टन सिटीहॉल, हॅमिल्टन किल्ला, व्हिक्टोरियाउद्यान इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.