फ्लोबेअर, ग्यूस्ताव्ह : (१२ डिसेंबर १८२१ – ८ मे १८८०). विख्यात फ्रेंच कादंबरीकार. रूआन येथे जन्मला. त्याचे वडील डॉक्टर असून रूआन येथील इस्पितळात काम करीत. रूआन येथे शालेय शिक्षण घेत असतानाच फ्लोबेअर वाङ्‌मयनिर्मितीकडे वळला. इस्पितळातील नीरस, उदास वातावरणाचा त्याच्या मनावर प्रभाव पडून तो निराशावादी बनला. १८४१ मध्ये कायद्याच्या अभ्यासासाठी तो पॅरिसला आला परंतु अपस्मारासारख्या कसल्यातरी आजारामुळे त्याला कायद्याचे शिक्षण पूर्ण करता आले नाही त्यामुळे १८४३ मध्येच त्याने आपले कायद्याचे शिक्षण सोडून दिले आणि स्वतःला संपूर्णपणे साहित्यास वाहून घेतले. १८४६ मध्ये त्याचे वडील वारले त्याच वर्षी त्याची बहीणही निवर्तली व फ्लोबेअर आपल्या आईसह रूआनजवळील क्र्‌वाझेत ह्या आपल्या इस्टेटीच्या ठिकाणी येऊन राहिला. त्यानंतरचे त्याचे जवळजवळ सारेच आयुष्य तेथे गेले. तेथेच तो निधन पावला.

ग्यूस्ताव्ह फ्लोबेअरफ्लोबेअरच्या पहिल्या कादंबरीची प्रेरणा स्वच्छंदतावादी होती तथापि ही कादंबरी त्याने स्वतःच नष्ट केली आणि तो जाणीवपूर्वक वास्तवादाकडे वळला.

मादाम बोवारी (१८५७), सालांबो (१८६२) आणि लेंदुकासिओ सॉन्तिमेन्ताल (१८६९, इ. शी. ए सेंटिमेंटल एज्यूकेशन) ह्या फ्लोबेअरच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या होत. त्र्या कोन्त (१८७७) हा त्याच्या तीन कथांचा संग्रह.

एका लहानशा गावातील एमा नावाच्या स्त्रीचे शोकात्म जीवन फ्लोबेअरने मादाम बोवारी ह्या कादंबरीत उभे केले आहे. स्वप्नाळू वृत्तीची ही स्त्री. वास्तव जीवनापासून तिची फारकत होते. मनात रंगविलेली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याकरता ती जन्मभर धडपडते आणि अखेरीस आत्महत्या करते. एमाने अनुभवलेली वैफल्याची व एकलेपणाची भावना ही प्रत्यक्ष फ्लोबेअरचीच भावना होय. मादाम बोवारी म्हणजे आपण स्वतःच असल्याचे फ्लोबेअरने एका ठिकाणी म्हटले आहे. ह्या कादंबरीला अमाप कीर्ती मिळाली. कल्पनेत रमणाऱ्या वृत्तीला फ्रेंच साहित्यात ‘बोवारिझम’ हे नाव रूढ झाले आहे. ह्या कादंबरीतून फ्लोबेअरने एका लहानशा गावातील बूर्झ्वा समाजाचे विलक्षण वास्तव चित्र रेखाटले आहे. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे काळजीपूर्वक निरीक्षण करून फ्लोबेअरने ह्या कादंबरीतील प्रत्येक तपशील निवडला आहे.

सालांबो ही कार्थेजच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी. ह्या पार्श्वभूमीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी फ्लोबेअरने त्या स्थळाला भेट दिली होती अनेक ऐतिहासिक कागदपत्रेही अभ्यासिली होती.

लेदुकांसिओ सॉन्तिमेन्ताल ही फ्लोबेअरची मादाम बोवारीइतकीच विख्यात शोकात्म कादंबरी. फ्रेदेरीक मॉरो या तरुणाच्या अपेक्षाभंगाचे आणि त्याच्या वयस्क स्त्रियांशी असलेल्या प्रेमसंबंधांचे विलक्षण नाजूक चित्रण करणारी ही कादंबरी वास्तववादाचे अत्युच्च शिखर मानले जाते. तिच्यातील व्यक्तिरेखा व राजकीय-सामाजिक पार्श्वभूमी ही इतकी वास्तव व जिवंत वाटली की तत्कालीन समीक्षकांनी प्रत्यक्ष जीवनातील माणसांशी त्यांची सांगड घातली. तिचा आत्मचरित्रपर रंग, छायाचित्रणाकडे झुकणारे प्रसंग, तिचा निराश कडवट सूर आजही जाणवतात. लेदुकांसिओ सॉन्तिमेन्ताल या कादंबरीपासून साहित्यिकांच्या अलिप्ततेच्या सिद्धांताची चर्चा सुरू झालेली दिसून येते.

त्र्वा कोन्त हा फ्लोबेअरचा कथासंग्रह. नावाप्रमाणे तो फक्त तीन कथांचा आहे. परंतु तो यूरोपीय वाङ्‌मयात लक्षणीय मानला जातो. यातील दोन कथा ऐतिहासिक आहेत. तर सर्वात गाजलेल्या अँ कर सँप्ल (म. अर्थ – निर्मळ हृदय) ह्या कथेत फेलिसिते या मोलकरणीच्या शोकात्म जीवनाचे विलक्षण नाजूक व वास्तव चित्रण आहे. या कथेत पोपटाचा वापर फ्लोबेअरने प्रतीकात्म तऱ्हेने केला आहे. फ्लोबेअरच्या शैलीची परमावधी या कथेत दिसून येते.

फ्लोबेअरची निर्मिती थोडी असली, तरी फारच मोलाची आहे. मोपासां, डॉस्टोव्हस्की, टॉलस्टॉय, चेकॉव्ह यांच्या तोलामोलाचे साहित्यिक फ्लोबेअरच्या प्रभावाखाली आलेले दिसतात. फ्लोबेअर हा आधुनिक कादंबरीचा जनक मानला जातो. प्रबोधनकाळापासून अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालत आलेल्या स्वैर कल्पनाविलासाला फ्लोबेअरने फाटा दिला. कादंबरीतील व्यक्तिरेखा आणि वस्तुस्थिती यांची वास्तव व जिवंत निर्मिती करण्याची पद्धत त्यानेच खऱ्या अर्थाने रूढ केली. त्याने कादंबरीला आधुनिक भाषा दिली. साधी, सहज, प्रवाही, दैनंदिन जीवनाला जवळ येणारी भाषा त्याने आग्रहाने पण कौशल्याने वापरली.

संदर्भ : 1. Brombert, Victor, The Novels of Flaubert: A Study of Themes and Techniques, Princeton, 1967.

2. Cortland, Peter, Reader’s Guide to Flauber, New York, 1968.

3. Giraud, R. D. Ed. Flaubert: A Collection of Critical Essays, New York, 1965.

4. Thibaudt, albert, Gustave Flaubert, Paris, 1935.

टोणगावकर, विजया कुलकर्णी, अनिरुद्ध