आनुवंशिकता व आसमंत: मानवी व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत आनुवंशिकता व आसमंत या दोहोंनाही महत्त्व असते. एकाच मातापित्याची मुले पूर्णपणे समान व्यक्तिमत्त्वाची असतात, असे क्वचितच आढळून येते त्याचप्रमाणे समान परिस्थितीत वाढलेली मुले समान बुद्धिमत्तेची वा समान स्वभावाची झालेली क्वचितच दिसून येतात. वाईट संगतीमुळे माणसे बिघडतात हे जितके खरे आहे, तितकेच वाईट परिस्थितीतही न बिघडणारी माणसे आढळतात हेही खरे आहे. एकाच ठिकाणच्या आणि एकाच कुळातील व्यक्तिव्यक्तींमध्येदेखील शरीरबांधा, वर्ण इ. बाबतींत तसेच मनाच्या कार्यशक्ती, बुद्धिमत्ता, आवडीनिवडी इ. बाबतींत लक्षणीय भिन्नता आढळून येते. हे असे का होते, व्यक्तिमत्त्वाची भिन्नता कोणत्या कारणांमुळे निर्माण होते – आनुवंशिकतेमुळे की आसमंतामुळे – या साध्या दिसणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही.

अपत्यांमध्ये प्रगट होणारे गुणधर्म हे काही अचानक शून्यामधून उद्भवत नसतात. त्या गुणधर्मांची बीजे अर्भकांमध्ये त्यांच्या मातापित्यांकडूनच आलेली असतात. प्रत्यक्ष शारीरिक वा मानसिक गुणांचे नव्हे, तर त्या गुणांत विकसित होऊ शकणाऱ्या बीजांचे अथवा बीजरूप मूळ प्रवृत्तींचे परिवाहन मातापित्यांकडून बालकांमध्ये होत असते. या परिवाहित होणाऱ्या मूळ प्रवृत्ती म्हणजेच अनुवंश होय आणि या अनुवंशाच्या विकसनकार्यास पोषक वा बाधक ठरणारी परिस्थिती म्हणजे आसमंत अथवा परिसर होय. आनुवंशिकता आणि आसमंत या दोन प्रमुख घटकांनी व्यक्तिमत्त्वाची घडण होते. व्यक्तीच्या कोणत्या अंगभूत गुणधर्माचा किती प्रमाणात विकास होईल, हे या दोन घटकांच्या प्रभावावर अवलंबून असते. अनुवंशवादी विचारवंत व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत आनुवंशिकतेचा प्रभाव अधिक मानतात तर आसमंतवादी विचारवंतांच्या मते, आसमंताचा प्रभाव अधिक महत्त्वाचा असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे, की व्यक्तिमत्त्वाच्या विकासात आनुवंशिकता आणि आसमंत या दोन्ही घटकांची अन्योन्यक्रिया अनुस्यूत असते.

अमुक एक विशिष्ट गुणधर्म अथवा कार्यशक्ती ही व्यक्तीमध्ये अनुवंशामुळे येते, की परिस्थितीमुळे येते, असा प्रश्न विचारला जातो. त्यामागे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे अनुवंशदत्त गुणधर्म आणि परिस्थितिजन्य गुणधर्म यांचे जणू मिश्रण असते, असा समज असतो तथापि तो बरोबर नाही. ‘व्यक्तिमत्त्व = आनुवंशिकता + आसमंत’ हे समीकरण बरोबर नसून ‘व्यक्तिमत्त्व= आनुवंशिकता X आसमंत’ हे समीकरणच वस्तुस्थितिदर्शक आहे, असे म्हटले पाहिजे. आनुवंशिकता आणि आसमंत या दोन घटकांची परस्परांशी अविरत अन्योन्यक्रिया चालत असते आणि या आंतरक्रियेतूनच व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकारत असते, व्यक्तिमत्त्व, आनुवंशिकता आणि आसमंत यांच्यामधला परस्परसंबंध पुढील आकृतीच्या आधारे दाखविता येण्यासारखा आहे.

आनुवंशिकता

बाजूच्या आकृतीवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही, की एखाद्या व्यक्तीच्या आनुवंशिकतेत कमतरता असली, तरी तिला जर आसमंत अनुकूल असेल, तर तिचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होऊ शकते (आ. ३). आनुवंशिकतेची कमतरता आसमंताच्या अनुकूलतेने भरून काढता येते. तसेच उत्कृष्ट आनुवंशिकता असलेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व प्रतिकूल परिस्थितीतही प्रभावी होऊ शकते (आ. १). पण आनुवंशिकता आणि आसमंत या दोहोंच्याही बाबतीत जर कमतरता असेल, तर व्यक्तिमत्त्व बेतानेच संपन्न होते (आ. २).

आनुवंशिकतेचे स्वरूप : जीवांचे (प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे) शरीर कोशिकांनी बनलेले असते. लहानमोठ्या सर्व जीवांचा जीवनारंभ अवघ्या एका कोशिकेपासून होत असतो. कोशिका विभाजनक्षम असतात. विभाजनाच्या प्रक्रियेतून नव्या कोशिकांची निर्मिती होत असते. कोशिकांच्या बाबतीत विभाजन हेच जनन असते. परंतु बहुकोशिकांची जननप्रक्रिया जटिल स्वरूपाची असते. मानव हा बहुकोशिक प्राणी आहे.

मानवप्राण्याच्या जीवनाचा आरंभ हा निषेचित अंड्यापासून होत असतो. मातेचा अंडाणू आणि पित्याचा शुक्राणू यांच्या संयोगाने गर्भकोशिका निर्माण होते. ती एक संयुक्त कोशिकाच असते. तिचे पोषण आणि वाढ मातेच्या गर्भाशयात होते. तेथे तिचे झपाट्याने विभाजन होत जाते. एकीच्या दोन, दोहांच्या चार, चारांच्या आठ, अशा प्रकारे कोट्यावधी कोशिकांच्या स्वरूपात गर्भ वाढत जातो. आरंभी सर्व कोशिका एकाच प्रकारच्या, समान स्वरूपाच्या असतात. परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये कार्यदृष्ट्या विशेषीकरण होऊन, त्यांतील काही तंत्रिकाकोशिका, काही अस्थिकोशिका, तर काही स्‍नायुकोशिका होतात.

भ्रूणशास्त्रज्ञांनी गर्भाच्या प्रारंभिक अवस्थेत त्यांतील काही कोशिकांचे स्थानांतर करून पाहिले असता असे दिसून आले, की त्या कोशिका नव्या जागी रुजतात आणि त्यांच्यामध्ये त्या स्थानाला योग्य अशाच गुणधर्मांची वाढ होते. याचा अर्थ असा, की नवजात गर्भाच्या सर्व कोशिकांत आनुवंशिकतेचे घटक समान प्रमाणात सामावलेले असतात. पण गर्भाचा जसजसा विकास होतो, तसतसे त्या त्या कोशिकांत त्या त्या स्थानास अनुरूप असे गुणधर्म प्रगट होतात. अमुक एका जागी जर एखाद्या कोशिकेची वाढ झाली, तर तिचे मेंदू-घटकात रूपांतर होईल. अन्यत्र वाढ झाल्यास तिचे दृक्पटलात रूपांतर होईल वगैरे. अशा प्रकारे प्राण्याच्या शरीरातील भिन्नगुणधर्मयुक्त अवयव उत्पन्न होतात. प्रत्येक कोशिकेच्या केंद्रामध्ये आनुवंशिकतेचे परिवाहन करणारी गुणसूत्रे असतात. ही गुणसूत्रे कधीच एकाकी नसतात. ती नेहमी युग्मांनी असतात. म्हणून मानवी कोशिकेत ४६ गुणसूत्रे असतात असे म्हणण्याऐवजी गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात, असे म्हणणेच योग्य होईल. गर्भधारणेच्या क्षणी मातेच्या अंडाणूतील २३ आणि पित्याच्या शुक्राणूतील २३, अशी ४६ गुणसूत्रे एकत्र येतात. अशा प्रकारे प्रत्येक गर्भकोशिकेत गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात आणि प्रत्येक जोडीमधील एक गुणसूत्र मातेकडून, तर दुसरे पित्याकडून आलेले असते.

प्रत्येक गुणसूत्र हे मणी ओवलेल्या धाग्यासारखे दिसते. त्यावर मण्याप्रमाणे दिसणारा कण हाच वस्तुतः आनुवंशिक गुणधर्माचा वाहक असतो. त्याला जनुक म्हणतात. सर्व जनुकांचे रासायनिक स्वरूप सारखेच असते. ती सारी प्रथिनांची बनलेली असतात परंतु त्यांची आंतररचना मात्र विभिन्न असते. त्यांच्या रचनाभिन्नतेमुळेच व्यक्तिव्यक्तींचे भिन्नभिन्न शारीरिक आणि मानसिक गुणधर्म प्रगट होतात. मानवी कोशिकोतील जनुकांची संख्या सहस्रांहूनही अधिक असते. ४६ गुणसूत्रांत ते असमान प्रमाणात  विभालेले असतात. काही गुणसूत्रांत ते थोडे, तर काहीत ते जास्त असतात. गुणसूत्रांप्रमाणे तेही जोड्यांनीच वावरतात. जोडीतील एक जनुक मातेकडून, तर दुसरे पित्याकडून आलेले असते.


आनुवंशिकतेने अर्भकांना केवळ समानताच प्राप्त होते असे नव्हे, तर त्यांच्या विभिन्नतेचेही मूळ आनुवंशिकतेतच असते. उदा., मनुष्याच्या गर्भबीजामध्ये गुणसूत्रांच्या ज्या २३ जोड्या असतात, त्यांतील एक जोडी ही लिंगभेद निर्माण करणारी असते. स्त्रियांच्या अंडाणूत ‘क्ष-क्ष’ अशी जोडी असते, तर पुरुषांच्या शुक्राणूत ‘क्ष-य’ अशी जोडी असते. ‘क्ष-य’ ही गुणसूत्रे लिंगनिश्चिती करणारी असतात. ‘य’ हे गुणसूत्र अतिशय तोटके असते व ते फक्त पुरुषांच्या शुक्राणूतच आढळते. ते पुल्लिंगदायी असते. गर्भधारणेच्या प्रसंगी पित्याकडून जर ‘क्ष’ हे गुणसूत्र उतरून मातेच्या ‘क्ष’  या गुणसूत्राशी संयोग पावले, तर ‘क्ष-क्ष’ अशी गुणसूत्रांची जोडी होऊन मुलीचा जन्म होतो आणि पित्याकडील ‘य’ हे गुणसूत्र मातेच्या ‘क्ष’ या गुणसूत्राशी संयोग पावले, तर ‘क्ष-य’ अशी गुणसूत्रांची जोडी होऊन मुलगा जन्मास येतो.

मातेच्या अंडाणूतील कोणती २३ गुणसूत्रे, पित्याच्या शुक्राणूतील कोणत्या २३ गुणसूत्रांशी संयोग पावतील, हे केवळ योगायोगावरच अवलंबून असते. केवळ गुणसूत्रांचाच विचार केला, तरी त्यांच्या मिश्रणाचे लक्षावधी पर्याय संभवतात, असे गणिताधारे दाखवून देता येते. त्यातही हजारो प्रकारच्या जनुकांची भर घातली, की गर्भबीजात आनुवंशिकतेच्या घटकांच्या मिश्रणाचे पर्याय अक्षरशः परार्धकोटी होतात. गर्भधारणाप्रसंगी नेमक्या कोणत्या आनुवंशिक जनुकांचा संघात जमून येईल, हे सांगता येणे केवळ अशक्यप्रायच असते.

एकबीज जुळे आणि व्दिबीज जुळे : जुळ्यांचे दोन प्रकार आहेत : (१) एकबीज अथवा एकांडज जुळे. (२) व्दिबीज अथवा व्दिअंडज जुळे. जेव्हा एका गर्भबीजाच्या प्रथम विभाजनात दुभंगलेल्या कोशिका एकत्र न राहता अलग होऊन स्वतंत्रपणे वाढू लागतात, तेव्हा मातेच्या उदरात दोन स्वतंत्र गर्भ तयार होऊन, दोन स्वतंत्र अर्भके जन्मास येतात. त्यांना एकबीज अथवा एकांडज जुळे म्हणतात. याच्या उलट, दोन स्वतंत्र शुक्राणूंशी एकाच वेळी संयोग होऊन, दोन स्वतंत्र गर्भबीजे मातेच्या उदरात वाढतात, तेव्हा जन्मास येणाऱ्या जुळ्यांना व्दिबीज अथवा व्दिअंडज जुळे म्हणतात.

एकांडज जुळे आणि व्दिअंडज जुळे या दोहोंमध्ये पुढीलप्रमाणे भिन्नता आढळते : (१) एकांडज जुळे हे समलिंगी असते. म्हणून जुळ्यापैकी एक जर मुलगा आणि दुसरी जर मुलगी असेल, तर ते जुळे व्दिअंडज म्हटले पाहिजे. (२) एकांडज जुळ्याचा रक्तगट समान असतो. ज्याचा रक्तगट भिन्न असतो, ते जुळे द्विअंडज असते. (३) एकांडज जुळ्याच्या नेत्रांचा रंग, केसांचा रंग आणि हातांचे ठसे समान असतात. द्विअंडजाचे तसे नसते. (४) एकांडज जुळ्यावर शस्त्रक्रिया करून, एकाची त्वचा दुसऱ्याच्या अंगास लावली, तर ती तेथे बरोबर चिकटून बसते. तसे व्दिअंडजाच्या बाबतीत घडत नाही. सारांश, एकांडज जुळ्याच्या शारीरिक आणि मानसिक गुणधर्मांमध्ये विलक्षण साम्य असते. व्दिअंडजात इतपत साम्य असेलच, याची शाश्वती नसते. म्हणून आनुवंशिकतेच्या अभ्यासात एकांडजाचे निरीक्षण करणे जितके फलदायी ठरते, तितके व्दिअंडजाच्या बाबतीत ठरत नाही.

मेंडेलचा सिद्धांत : ð ग्रेगोर मेंडेल (१८२२-१८८४) या ऑस्ट्रियन धर्मोपदेशकाने शोधून काढलेला जनुकविषयक सिद्धांत सुप्रसिद्ध आहे. केवळ वनस्पती आणि मानवेतर प्राणी यांच्याच बाबतींत नव्हे, तर मानवप्राण्याच्याही बाबतीत त्याची सत्यता प्रत्ययास येते. या सिद्धांतानुसार जनुके ही दोन प्रकारची असतात : प्रभावी जनुके आणि अप्रभावी जनुके. ज्या जनुकांनी प्रादुर्भूत होणारे गुणधर्म व्यक्तीच्या देहात प्रत्यक्ष दृश्यमान होत नाहीत, पण त्या व्यक्तीच्या जननकोशिकांत ते अप्रभावी स्वरूपात नांदतात, ती जनुके अप्रभावी असतात. उदा., ज्या जनुकामुळे डोळ्यांना कृष्णवर्ण प्राप्त होतो, त्या जनुकास ‘अ’ म्हणू आणि ज्याच्यायोगे डोळ्यांचा रंग निळा होतो, त्यास ‘आ’ म्हणू. गर्भबीजात जर मातापित्यांकडून ‘अ-अ’ अशी जनुके येऊन संयोग झाला, तर बालकाचे डोळे काळे होतील आणि जर ‘आ-आ’ अशी जनुके संयोग पावली, तर त्याचे डोळे निळे होतील. परंतु जर ‘अ-आ’ असे जनुकांचे मिश्रण झाले, तर जी जनुके प्रभावी ठरली असतील, त्यावर बालकाच्या डोळ्यांचा रंग अवलंबून राहील. जर ‘अ’ या जनुकाचे प्रभुत्व प्रस्थापित झालेले असेल, तर बालकास कृष्णवर्ण डोळे लाभतील आणि ‘आ’ हे जनुक त्याच्या जननकोशिकेत अप्रभावी अवस्थेत नांदत राहील. परंतु त्याच्या जननकोशिकेत ‘आ’ हे जनुक प्रभावी ठरले व ‘अ’ हे अप्रभावी राहिले, तर त्याच्या डोळ्यांचा रंग निळा होईल.

सारांश, देहाने सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींच्या जननकोशिका जनुकांच्या बाबतीतही समान असतील, असे सांगता येणार नाही. काळे डोळे असलेल्या एखाद्या मनुष्याच्या जननकोशिकेत ‘अ-अ’ अशी जनुकरचना असेल, पण तसलेच डोळे असलेल्या दुसऱ्या एखाद्याच्या जननकोशिकेत ‘अ-आ’ अशी जनुकरचना असू शकेल. दृश्य शारीरिक साधर्म्य हे व्यक्तींमधील जनुकीय साधर्म्य दर्शविते, असे मानण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे एखाद्या पिढीत प्रभावी झालेला गुणधर्म नंतरच्या पिढ्यांत ओळीने प्रभावी होईलच, असेही हमखास म्हणता येणार नाही. कदाचित पुढल्या एकदोन पिढ्यांत तो गुणधर्म प्रभावी न होता अप्रभावीत राहील आणि एकदोन पिढ्या उलटल्यानंतरच तो प्रभावी होईल, अशी शक्यता असते.

आसमंत : आनुवंशिकतेवर जन्मानंतरच्याच वातावरणाचा प्रभाव पडतो, असे नाही. ज्या क्षणी गर्भबीज हे गर्भाशयाची वाटचाल करू लागते, त्या क्षणापासूनच ते एका विशिष्ट आसमंतात वावरू लागते. त्याच्या प्रारंभिक अवस्थेत त्यास जो आसमंत लाभतो, तो निश्चितच महत्त्वाचा असतो. इतकेच नव्हे, तर त्याच्यातील कोशिकाद्रव हाच मुळी अंतःकोशिकी आसमंत होय असे म्हटले पाहिजे कारण त्याचा जनुकांवर प्रभाव पडत असतो. जनुकांना धक्का न लावता जर कोशिकाद्रवात बदल घडवून आणला, तर नवजात प्राण्याचे रूप अन्य सजातीय बांधवाच्या रूपाहून वेगळे होते, असे आढळून आले आहे.

गर्भधारणा झाल्याक्षणापासून मातेच्या शरीरातून गर्भाला जे पोषण मिळते, ते अर्थातच महत्त्वाचे असते. मातेच्या उदरांतर्गत एकूण परिस्थितीवरच गर्भाची वाढ अवलंबून असते. उदरामधल्या वातावरणात जर महत्त्वपूर्ण बदल घडून आला, तर त्याचे भलेबुरे परिणाम जन्मास येणाऱ्या बालकावर होतात. डब्ल्यू. आर्. टॉम्पसन याने उंदरांवर केलेल्या प्रयोगांत हेच आढळून आले आहे. गर्भवती उंदीर-माद्यांना जर भीतिदायक परिस्थितीत जगावे लागले, तर भीतीमुळे त्यांच्या शरीरामधल्या रसायनद्रवात बदल होतो आणि पर्यायाने त्यांच्या गर्भावर व पिलांवरही परिणाम होतो. भयप्रद अनुभवांनी अतिशय भेकड बनलेल्या मादीची पिले जन्मतःच भेकड बनतात, असे या प्रयोगांत दिसून आले आहे.

जन्मानंतर मूल ज्या परिसरात वाढते आणि वावरते, तो परिसर म्हणजेच बाह्य आसमंत होय. यात घरचे वातावरण, सामाजिक परिसर, भाषा, चालीरीती, मालमत्ता, नातेवाईक आणि अन्य मंडळी, गावाचे, शहराचे, प्रदेशाचे एकंदर भौगलिक आणि आर्थिक स्वरूप अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. हा सामाजिक व भौगलिक परिसर आणि वर उल्लेखिलेले कोशिकांतर्गत व गर्भाशयांतर्गत वातावरण या सगळ्यांचा ‘आसमंत’ या पदाने निर्देश होतो.

ज्या व्यक्तीचे संगोपन आणि संवर्धन समान आसमंतात होते, त्या व्यक्ती सर्वथा समानधर्मी होतात, असे म्हणता येत नाही. त्यांची आनुवंशिकता जर भिन्न असेल, तर त्यांच्या अंगी, समान वातावरणातही, भिन्न गुण प्रगट होतील. उदा., गाढव आणि घोडी यांच्या संकराने जे खेचर जन्मास येते, त्याचे भ्रूणावस्थेत घोडीच्या उदरात जरी संगोपन होत असले आणि पुढे जन्मानंतरही त्याला घोड्याला लाभते, तसल्या वातावरणात वाढविले, तरीही त्याला घोड्याचे रूपगुण संपूर्णपणे प्राप्त होत नाहीत. कारण त्याची अर्धी आनुवंशिकता गाढवाकडून आलेली असते.


सामान्यतः आनुवंशिकतेने घालून दिलेल्या चाकोरीत आसमंताचा प्रभाव सीमित होतो त्याचबरोबर विलक्षण वातावरणाच्या प्रभावाने आनुवंशिक गुणांत आश्चर्यकारक बदल घडून येतात, हेही तितकेच खरे आहे. भ्रूणावस्थेच्या काळात जर उदरांतर्गत वातावरण विपरीत केले, तर गर्भाच्या गुणधर्मांमध्ये फार मोठे फरक घडून येतात. उदा., पक्षी आणि मासे यांची अंडी जर अतिशीत किंवा अत्युष्ण तपमानात उबविली, तर त्यांच्यातून बाहेर पडणारी पिले विद्रूप होतात. तसेच जनुकांच्या विद्रवात जर क्ष-किरण किंवा प्रारण यांच्या मदतीने ढवळाढवळ केली, तर नवजात प्राण्याचे गुणधर्म पार बदलतात आणि हे बदल पुढील पिढ्यांतही उतरतात, असे आढळून आले आहे. जनुकांत घडवून आणलेल्या या बदलास ‘जननिक बदल’ असे म्हणतात. काही वेळा जननिक बदल यदृच्छेनेही घडतो. त्यास ‘उत्परिवर्तन’  असे म्हणतात.

ए. व्हाइसमान (१८३४-१९१४) आणि टी. एच्. मॉर्गन (१८६६-१९४५) यांची, उपार्जित गुणधर्म आनुवंशिकतेने संक्रमित होत नाहीत, अशी उपपत्ती आहे. आरंभीच्या संशोधकांनी काही पिढ्यांतील उंदरांच्या शेपट्या सातत्याने तोडून पाहिल्या, तरीही प्रत्येक नव्या पिढीतील उंदीर सपुच्छच जन्मास आले म्हणजेच त्यांचे उपार्जित गुण संक्रमित झाले नाहीत. जे गुणधर्म मनुष्याने वा प्राण्याने स्वप्रयत्नांनी आत्मसात केलेले असतात, त्यांचा जननकोशिकांतील जनुकांवर कसलाच परिणाम होत नाही. गर्भबीजामध्ये मातापित्यांच्या जननकोशिका उतरतात, देहकोशिका उतरत नाहीत. उपार्जित गुणांमुळे शरीरात बदल घडून येतो खरा, पण जननकोशिकांवर त्यांचा कसलाच प्रभाव पडत नाही. म्हणून ज्याने पहिलवानासारखे शरीर कमावलेले आहे, अशा पित्याच्या पोटी कधीकधी हाडकुळी मुले जन्मास येतात. तसेच जन्मभर अभिनयकलेची आराधना करणाऱ्या नटनट्यांची अपत्ये अभिनयशून्य निपजण्याची शक्यता असते. जननकोशिकांचा जैवप्रवाह एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहत जातो. या प्रवाहाच्या मार्गात असंख्य देहाकृती उदयास येऊन नाना प्रकारांनी विकसित होतात परंतु त्यांच्या विकसित स्वरूपांचा त्या जैवप्रवाहाच्या दिशेवर कसलाच परिणाम होत नाही, असे दिसते.

काही मानसशास्त्रीय निरीक्षणे : आनुवंशिकता आणि आसमंत यांचे व्यक्तिमत्त्वावर होणारे परिणाम स्पष्टपणे जाणून घेण्याकरिता मानसशास्त्रज्ञांनी या दोन घटकांतील एक घटक स्थिर आणि दुसरा चल ठेवून काही निरीक्षणे केली आहेत ती अशी :

( अ ) आनुवंशिकता स्थिर घटक : एकांडज जुळ्याची आनुवंशिकता समान असते. अशी जुळी मुले पालनपोषणासाठी निरनिराळ्या कुटुंबांत घेतलेली असली, की आनुवंशिकतेचा घटक स्थिर आणि आसमंताचा घटक भिन्न, अशा वैज्ञानिक निरीक्षणाला अनुरूप वस्तुस्थिती प्राप्त होते. अशी २०-२२ जुळी मुले शोधून काढून, मानसाशास्त्रज्ञांनी त्यांची बौद्धिक आणि वर्तनविषयक चाचणी घेतली. त्याचप्रमाणे स्वतःच्या मातापित्यांच्याच घरी वाढलेल्या जुळ्याची आणि भावंडांचीदेखील त्यांनी पाहणी केली. तीत असे आढळून आले: (१) समान आसमंतात वाढलेल्या एकांडज जुळ्याचा बुद्धिगुणांक जवळजवळ सारखाच असतो. व्दिअंडज जुळ्याच्या गुणांकात समान वातावरणातही ५ ते १० गुणांचे अंतर पडते, तर भावंडांच्या गुणांकात १५ गुणांचे अंतर पडते. सारांश, द्विअंडज जुळ्यामध्ये आनुवंशिक तफावत निश्चित असते आणि भावंडांमध्ये तर ती अधिकच असते. ( २ ) भिन्नभिन्न वातावरण वाढविलेल्या एकांडज जुळ्याच्या व्यक्तिमत्त्वांत तफावत पडते. उदा., दोन जुळ्या बहिणांपैकी एकीला महाविद्यालीन शिक्षण मिळाले होते, तर दुसरीला अगदीच मागासलेल्या वातावरणात जगावे लागत होते यामुळे पहिलीचा बुद्धिगुणांक ११६ भरला, तर दुसरीचा ९२ भरला. इतरही पाच एकांडज जुळ्यांच्या बाबतीत असाच शैक्षणिक परिस्थितीतील फरक होता आणि परिणामी त्यांच्या बुद्धिगुणांकांतही फरक दिसून आला. यावरून शिक्षणाने अथवा शिक्षणानुकूल वातावरणाने व्यक्तीच्या बुद्धिगुणांकात लक्षणीय सुधारणा होते  म्हणजेच आसमंताचा व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो हे उघड आहे.                   (३) बुद्धिमत्तेखेरीज अन्य मानसिक गुणांवर आसमंताचा काय परिणाम होतो, याबाबत प्रयोगांवरून असे दिसून येते, की भिन्न आसमंतामुळे जुळ्या मुलांचा सामाजिक दृष्टिकोन व वर्तनपद्धती भिन्न होते परंतु त्यांच्या चंचलता, रागीटपणा इ. मूळ स्वभावगुणांत फारसा फरक पडत नाही.

( आ ) आसमंत स्थिर घटक:  एकाच कुटुंबातील तसेच एकाच अनाथाश्रमातील वातावरण सापेक्षतः समान असते.  तेथे सर्वसाधारणपणे आसमंताचा घटक स्थिर व आनुवंशिकतेचा घटक भिन्न अशी वस्तुस्थिती असते. तेथल्या मुलांची मानसशास्त्रीय पाहणी करून निघालेले निष्कर्ष असे : (१) एकाच कुटुंबातील अथवा अनाथाश्रमातील मुले बुद्धीने वा व्यक्तिमत्त्वाने समान असत नाहीत. त्यांच्यात निश्चितच भिन्नता असते. बहुधा प्रत्येक कुटुंबातील मूल हे आपल्या आईवडिलांहून आणि इतर भावंडांहून अधिक भिन्न असते. (२) सामान्यतः इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान असलेल्या मातापित्यांची अपत्ये अधिक बुद्धिमान असतात.  मातापिता आणि अपत्ये यांच्यामधील बौद्धिक सहसंबंध सरासरीने ५८ पर्यंत असतो. या सहसंबंधाचे कारण असे, की बुद्धिमत्ता ही मेंदूतील मज्जापेशींच्या संख्येवर व संघटनेवर अवलंबून असते केवळ एका जनुकाचा गुणधर्म असत नाही. आता मेंदूतील मज्जापेशींशी संबंधित असणारी जनुके एखाद्या व्यक्तीमध्ये जितक्या प्रमाणात उतरलेली असतात, तितक्या प्रमाणात त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता प्रखर असते. मातापित्यांमध्ये जर अशा जनुकांची संख्या अधिक असेल, तर त्यांच्या मुलांनाही जनुकांचा भरपूर पुरवठा होण्याचा अधिक संभव असतो. म्हणून सामान्यतः बुद्धिमान मातापित्यांची मुले इतरांच्या मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. (३) सामान्यतः अतिशय बुद्धिमान व्यक्तींची अपत्ये बुद्धिमत्तेत आपल्या मातापित्यांच्या तोडीची असत नाहीत. याउलट अतिमंद मातापित्यांची मुले बहुधा आपल्या आईवडिलांपेक्षा बुद्धिमत्तेने सरस असतात. याचे कारण असे, की जेव्हा एखाद्या माणसामध्ये बुद्धिप्रद जनुकांचा साठा अत्याधिक होतो, तेव्हा ती जनुके तेवढ्याच वा त्याहून अधिक संख्येने त्याच्या अपत्यांत उतरण्याचा संभव फारच थोडा असतो. म्हणून अतिबुद्धिमंतांची मुले त्यांच्याहून सरस ठरण्याचा संभव फारच कमी असतो. याउलट जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये बुद्धिदायी जनुकांची संख्या फारच थोडी असते, तेव्हा त्याच्या अपत्यात ती जनुके काहीशा अधिक संख्येने उतरण्याचा संभव अधिक असतो. (४) एकाच कुटुंबातील भावंडांची आनुवंशिकता भिन्न असते, म्हणूनच त्यांच्या गुणधर्मांत भेद दिसून येतो, हे म्हणणे तितकेसे काटेकोर नाही. कुटुंब जरी एक असले, तरी त्यातील वातावरण सर्व भावंडांना समान असतेच असे नाही कारण समान वातावरण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिच्या अनुवंशास साजेल आणि अनुरूप ठरेल, असे वातावरण होय. प्रत्येक कुटुंबात त्यातल्या प्रत्येक बालकाच्या आनुवंशिकतेला साजेसे वातावरण असते, असे कोणालाही म्हणता येणार नाही.


आनुवंशिक आणि आसमंतजन्य विकृती : देहामनाच्या काही विकृती आनुवंशिक असतात, तर काही आसमंतजन्य असतात, असे सामान्यतः मानण्यात येते. परंतु आनुवंशिकता आणि आसमंत यांच्यामधली अन्योन्यक्रिया इतकी जटिल स्वरूपाची असते, की कोणता गुणधर्म अथवा विकृती केवळ आनुवंशिकतेमुळे प्रगट होते आणि कोणती निव्वळ आसमंतीय कारणांनी निर्माण होते, हे काटेकोरपणे सांगता येणे अशक्यप्रायच असते. आनुवंशिकता हे वर्तनविकृतींचे प्रधान कारण असते असा समज पूर्वी प्रचलित होता. परंतु अशा विकृती निर्माण करण्याच्या बाबतीत आनुवंशिकतेचा प्रभाव आपण समजतो त्यापेक्षा फारच मर्यादित असतो, असे अलीकडील संशोधनात आढळून आले आहे. ज्यांना आपण सामन्यतः आनुवंशिक मानतो, त्या विकृती मातेच्या उदरातील अंतर्गत आसमंतामुळे उत्पन्न झालेल्या नसतीलच, असे म्हणता येणार नाही. काही विकृती विशिष्ट घराण्यातच पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या दिसून येतात हे जरी खरे असले, तरी तेवढ्यावरून त्या विकृती केवळ जनुकीय किंवा आनुवंशिक कारणांनीच उत्पन्न होत असल्या पाहिजेत, असे सिद्ध होत नाही. घरातील वातावरण, बालपणीचे अनुभव, मातापित्यांची वागणूक इत्यादींच्या समानतेमुळे अथवा आसमंतीय सादृश्यामुळे, त्या घराण्यातील प्रत्येक नव्या पिढीतील बालकांमध्ये तीच ती विकृती प्रगट होऊ शकेल. सारांश, ती विकृती परंपरागत असली, तरी ती आनुवंशिक नसून आसमंतजन्य आहे, असेच म्हटले पाहिजे.

अपसामान्य मानसशास्त्रज्ञांच्या मते निव्वळ आनुवंशिकतेने उत्पन्न होणाऱ्या विकृती थोड्याच आहेत. मूढमतित्व नामक मनोदौर्बल्य आणि ‘हर्टिंग्टन कोरिया’ अथवा ‘आकडी’ या विकृती जनुकीय दोषांमुळे प्रगट होतात. तसेच रंगांधता, टक्कल, यूरोपातील काही जुन्या राजघराण्यांत आढळून येणारी बहुरक्तस्राव नामक विकृती इ. आनुवंशिकतेने प्राप्त होतात असे दिसते.

एफ्. जे. कॅल्‌मान, आरॉन रोझॅनॉफ, डब्ल्यू. जी. लेनक्स या शास्त्रज्ञांनी केलेल्या एकबीज जुळ्यांच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे, की  ð छिन्नमानस,  ð उद्दीपन-अवसाद चित्तविकृती आणि अपस्मार या वर्तनविकृतींचे मूळ आनुवंशिकतेत असते. म्हणजे जनुकीय कारणांमुळे व्यक्ती या विकृतींना बळी पडण्याची शक्यता असते. अर्थात आनुवंशिकता हे या विकृतींचे दूरवर्ती कारण ठरते. तशीच तापदायक, प्रभावी व तात्कालिक कारणे घडून आली नाहीत, तर व्यक्तीला या विकृती, त्यांचे मूळ त्यांच्या आनुवंशिकतेत असूनदेखील बाधतीलच असे नाही.

जनुकीय उत्परिवर्तनामुळे कधी कधी एखादी व्यक्ती अधिकांगुलीय निपजते, तर एखाद्या व्यक्तीला हाताचा पंजाच नसतो. अशी शारीरिक वैगुण्ये त्या व्यक्तीच्या अपत्यांनाही आनुवंशिकतेमुळे प्राप्त होतात. अर्थात पुढील पिढीतील प्रत्येक व्यक्तीमध्ये ही वैगुण्ये उतरतात असे नाही. ज्या गुणसूत्रांमधल्या जनुकांत ही वैगुण्याची बीजे साठवलेली असतात, ती गुणसूत्रे नवजात गर्भबीजात जर प्रविष्ट झाली, तरच ही वैगुण्ये नव्या पिढीतील अर्भकांना भोवतात.

काही विकृती अंतःस्रावी ग्रंथींच्या सदोष कार्यपद्धतीमुळे निर्माण होतात. तसेच रोगराईमुळे अथवा अपघातादींनी व्यक्तीच्या इंद्रियांना अथवा अवयवांना इजा झाल्यास वर्तनविकृती उद्‍भवतात. या विकृती अर्थातच आसमंतजन्य असतात. व्यक्तीची जनुकीय व्यवस्था त्यांना जबाबदार नसते. अशा प्रकारच्या आसमंतजन्य विकृती केवळ त्या त्या व्यक्तीलाच भोवतात. त्या विकृतींचा त्यांच्या अपत्यांना कसलाच जाच होत नाही. परंतु कळत नकळत घडणाऱ्या अनुकरणापोटी मातापित्यांना जडलेल्या अनेक वर्तनविकृती बालकांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उतरू शकतात. [à अपसामान्य मानसशास्त्र].

सामूहिक भेद : (१) लैंगिक भेद : ‘क्ष’ – ‘य’ या गुणसूत्रांनुसार मानवी अर्भकाचे लिंग ठरत असते. गर्भोत्पत्तीच्या बाबतीत पुल्लिंगी गर्भ व स्त्रीलिंगी गर्भ यांचे प्रमाण १२० : १०० असे असते. तथापि प्रत्यक्ष जन्मास येणाऱ्यामुलामुलींचे प्रमाण १०५ : १०० असे पडते. पुढे काही वर्षांनी तर समाजातील एकूण पुरुष आणि स्त्रिया यांची संख्या जवळजवळ समान होते. उतारवयात मात्र पुरुषांपेक्षा स्त्रिया संख्येने अधिक भरतात. सारांश, सांख्यिकीप्रमाणे पाहता स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा दीर्घायुषी असतात. पुरुषांत अकाली मृत्यूचे प्रमाण अधिक असते. आर्. एस्. वुडवर्थने (१८६९ – १९६२) म्हटल्याप्रमाणे, कदाचित पुरुषांचे ‘य’ हे गुणसूत्र स्त्रियांच्या ‘क्ष’ या गुणसूत्रापेक्षा जरा अधिक चैतन्यपूर्ण आणि क्रियाशील असले, तरी त्याची जीवनरज्जूवरील पकड मात्र तितकीशी घट्ट नसते. कदाचित जीवनाच्या संघर्षात आणि धकाधकीच्या मामल्यात स्त्रियांपेक्षा पुरुषांनाच अधिक सक्रिय भाग घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना जो शारीरिक शीण आणि मानसिक ताण सोसावा लागतो, त्याचा परिणाम म्हणून त्यांचे आयुर्मान घटत असावे.

मानवी जीवनातील विविध क्षेत्रांत स्त्रियांपेक्षा पुरुषांनीच अधिक कर्तबगारी करून दाखविलेली आहे, असे आजवरचा इतिहास सांगतो. यावरून स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक संपन्न आनुवंशिकता लाभलेली असते, असे मत काही लोक मांडतात. परंतु इतर विचावंतांच्या मते, याचे कारण स्त्रियांची आनुवंशिकतेमधील कमतरता हे नसून आसमंतीय सदोषता हेच असते. वास्तविक पाहता स्त्रियांच्या मनःशक्ती पुरुषांच्या तोडीच्या असतात परंतु त्यांना आपल्या शक्ती विकसित करण्याची आणि तद्‌नुसार कर्तृत्व करून दाखविण्याची पुरेशी संधीच मिळत नाही. सदोष समाजव्यवस्थेमुळे व सांस्कृतिक परंपरेमुळे त्यांच्या गुणांची व कर्तबगारीची गळचेपी होते. मानसशास्त्रदृष्ट्या शारीरिक-मानसिक कार्यशक्ती आणि व्यक्तिमत्त्वाची गुंफण यांचा विचार केल्यास, स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये आपण मानतो तितका मोठा फरक नसतो. प्रमाणित मानसशास्त्रीय कसोट्यांनी मापन केल्यास स्त्रिया आणि पुरुष  यांच्या बुद्धिमत्तेत फरक दिसून येत नाही. मुलगे आणि मुली यांचा सरासरी बुद्धिगुणांक १०० च असतो. तथापि काही कार्यकसोट्यांत मुलगे वरचढ असतात, तर काहींत मुली वरचढ असतात.

शालेय पातळीवर सहसा मुलींना मुलांपेक्षा जास्त गुण पडतात. सर्वसाधारणपणे भाषा, लेखन, गायनादी कला यांत मुली सरस ठरतात तर गणित, भूगोल आणि विज्ञान या विषयांत मुलांना अधिक चांगले गुण मिळतात. वाणीवरील अथवा भाषेवरील प्रभुत्व आणि स्मरणशक्तीची तल्लखता यांत मुलींना अधिक चांगले गुण मिळतात तर अवघड गणिते सोडविणे, यंत्रांवरची कामे करणे, विखुरलेल्या वस्तूंचे परस्परसंबंध हाताळणे या गोष्टी मुलांना अधिक चांगल्या रीतीने साधतात, असे मानसशास्त्रीय कसोट्यांत दिसून आले आहे.

वाचन, शब्दज्ञान, वाक्यपूर्ती, रंगज्ञान तसेच कार्यालयीन कामे इ. कसोट्यांमध्ये स्त्रिया सामान्यतः समवस्क पुरुषांपेक्षा आघाडीवर असतात. लहानपणी तर मुली मुलांपेक्षा एक महिना आधीच बोलू लागतात. कोणतेही नवे शब्द त्या चटकन आत्मसात करतात आणि अल्पावधीतच लांब लांब वाक्यांचा उपयोग करू लागतात. शिवाय मुली या मुलांहून लवकर यौवनावस्थेत प्रवेश करतात. त्यांना कार्य, खेळ आदी बाह्य विषयांपेक्षा व्यक्तींमध्ये जास्त गोडी वाटू लागते. कदाचित त्यांच्याकडे असलेली मातृत्वाची नैसर्गिक प्रेरणा त्यांना व्यक्तींकडे अधिक आकर्षित करीत असली पाहिजे. त्यांच्या हातापायांचे स्नायूही फारसे बळकट नसल्याने त्यांना बैठ्या कामांची अधिक ओढ असते आणि आणि वाचन आणि संभाषण यात त्यांना अधिक गोडी वाटते.

मुलांचा शारीरिक बांधा मुलींपेक्षा अधिक दणकट आणि शक्तिमान असतो. त्यांच्या शरीराचे स्नायू अधिक बळकट असतात. त्यांच्या रक्तात प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता मुलींपेक्षा सुमारे दहा टक्क्यांनी अधिक असते. साहजिकच शक्तीची व मेहनतीची कामे करण्यात मुले अग्रेसर असतात.


(२) वांशिक भेद : भिन्न मानवी वंशांमधील व्यक्तींच्या बुद्धिमत्तादी कार्यशक्ती भिन्न असतात. काही वंश आनुवंशिकतेत अधिक संपन्न असतात, तर काही कमी संपन्न असतात असा एक समज सर्वत्र आहे. आपण ज्या वंशात जन्मलो तो वंश इतरांच्या वंशांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचा वांशिक अहंगंडदेखील काही लोकांच्या मनात असतो. या वांशिक श्रेष्ठतेच्या समजूतीपायी इतिहासकाळात कितीतरी सामाजिक अत्याचार आणि संघर्ष घडून आले आहेत.

वांशिक भिन्नतेची समस्या शास्त्रीय रीतीने सोडविण्याच्या मार्गात तीन महत्त्वाच्या अडचणी आहेत : (१) आनुवंशिकतेच्या दृष्टीने अमुक एका वंशाचे, सर्वस्वी निर्भेळ रक्ताचे लोक पृथ्वीतलावर कोठेही सापडत नाहीत. इतिहासकाळात जेथे जेथे भिन्न वंशांचे लोक एकमेकांच्या संपर्कात आले, तेथे तेथे त्यांचा वंशसंकर घडून आलेला आहे. उदा., अमेरिकेतील श्वेतवर्णीयांपैकी जवळजवळ २० टक्के लोकांत निग्रो मातापित्यांचे रक्त खेळत आहे, असे वंशशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. (२) भिन्न वंशीयांची भिन्नता ही आनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळेच झालेली असते, आसमंताच्या भिन्नतेमुळे झालेली नसते, असे म्हणता येत नाही. उदा., श्वेतवर्णीयांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती जर कृष्णवर्णीयांना मिळाल्या नाहीत, तर त्यांच्यामध्ये आढळून येणारी बौद्धिक वा अन्यभिन्नता ही आसमंतापोटी निर्माण झालेली आहे, की भिन्न आनुवंशिकतेपोटी निर्माण झालेली आहे, हे सांगता येणे अशक्यप्राय आहे. (३) मानसिक व अन्य कार्यशक्तींचे मापन करण्यासाठी ज्या प्रमाणित कसोट्या सध्या उपलब्ध आहेत, त्या खरे म्हणजे एका विशिष्ट संस्कृतीमधील लोकांना लागू पडण्यासारख्या आहेत. त्या जर आपण भिन्न संस्कृतींमधील लोकांना लागू केल्या, तर ते अनुचित ठरेल. भिन्न भिन्न संस्कृतींतील सगळ्या लोकांना सारख्याच प्रमाणात उचित रीतीने लागू करता येतील, अशा कसोट्या अजून तरी तयार करण्यात आलेल्या नाहीत. सध्या प्रचारात असलेल्या बुद्धिमापन कसोट्या प्रस्तुत समस्येच्या संदर्भात विश्वासार्ह आहेत, असे म्हणता येत नाही.

एच्. ए. टॅन्सर याने कॅनडामधील केंट परगण्यातील निग्रो आणि श्वेतवर्णीय मुलांची जी अत्यंत काळजीपूर्वक चाचणी घेतली, तिचे निष्कर्ष असे: (१)कितीतरी निग्रो मुलांना श्वेतवर्णीयांइतके गुण मिळाले आहेत. (२) श्वेतवर्णीय मुलांना पडलेल्या बुद्धिगुणांकाची सरासरी १०३·६ होती, तर निग्रो मुलांना पडलेल्या बुद्धिगुणांकाची सरासरी ८९·२ होती. यावरून सरासरीने पाहता, श्वेतवर्णीय मुलांचा बुद्धिगुणांक निग्रो मुलांच्या बुद्धिगुणांकापेक्षा जास्त होता, हे जरी खरे असले, तरी काही निग्रो मुलांचा बुद्धिगुणांक २०० होता, ही गोष्टदेखील विचारात घेण्यासारखी  आहे. म्हणून कोणत्याही वंशातील मुलांच्या बौद्धिक कार्यशक्तीविषयी कसलेही काटोकोर विधान करणे शक्य नाही. (३) निग्रो मुलांना जसजशी शिक्षणाची अधिकाधिक संधी मिळत जाते, तसतसा त्यांचा बुद्धिगुणांकही वाढत जातो. सारांश, निग्रो आणि श्वैतवर्णीय मुलांमध्ये दिसून येणारी बौद्धिक वा अन्य तफावत, ही बहुतांशी आसमंतातील तफावतीतून निर्माण झालेली असते, असे म्हणावयास हरकत नाही.

(३) सामाजिक भेद: प्रत्येक समाजात नोकरीधंदा, शैक्षणिक पात्रता, सांपत्तिक स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादींनुसार निरनिराळे वर्ग असतात. वरच्या वर्गातील अथवा गर्भश्रीमंत लोक, मध्यमवर्गातील अथवा पांढरपेशे लोक आणि खालच्या वर्गातील अथवा शेतकरी-कामकरी लोक, अशी सामान्यतः प्रत्येक समाजातील व्यक्तींची वर्गवारी असते. त्या त्या वर्गातील लोकांचे सामान्यतः आपापसातच रोटीबेटी व्यवहार चालतात. एका वर्गातील व्यक्तींचा दुसऱ्या वर्गातील व्यक्तींशी, विशेषतः वरच्या वर्गातील लोकांशी, निकटचा संबंध क्वचितच येतो. हिंदुसमाजात तर जातिव्यवस्थेमुळे आणि भाषांच्या विविधतेमुळे समाजाचे कितीतरी विभाग आणि पोटविभाग पडलेले आहेत.

भिन्न सामाजिक वर्गांतील लोकांची बौद्धिक चाचणी घेतल्यास असे दिसून येते, की ज्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बऱ्यापैकी आहे, अशा लोकांचा बुद्धिगुणांक अधिक असतो. पांढरपेशा वर्गातील अथवा बौद्धिक व्यवसायात गुंतलेल्या माणसाचा आणि त्याच्या मुलाचा बुद्धिगुणांक, हा कामगार आणि त्याचा मुलगा यांच्या बुद्धिगुणांकापेक्षा अधिक असतो.

निरनिराळ्या वर्गामधील व्यक्तींच्या मनःशक्तींतील भिन्नता आनुवंशिकतेमुळे निर्माण होते की आसमंतामुळे, या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही. जन्मजात बुद्धीची वा कर्तृत्वाची देणगी असलेला मनुष्य आर्थिक दृष्ट्या वरच्या वर्गात पदार्पण करू शकतो हे जितके खरे आहे, तितकेच ज्याची सामाजिक व आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्याला आपली पात्रता वाढविण्याचे नाना पर्याय उपलब्ध असतात, हेही खरे आहे. केवळ जन्मजात बुद्धिमत्तेच्या अथवा कर्तबगारीच्या देणगीमुळेच नव्हे, तर परिस्थितीच्या अनुकूलतेमुळे आणि प्रोत्साहनामुळेदेखील माणसाच्या बुद्धीचा आणि एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊ शकतो यात शंका नाही.

सारांश, कर्तृत्वसंपन्न व्यक्ती समाजाच्या कोणत्या थरातून उदयास येईल हे कोणीही सांगू शकणार नाही. यास्तव प्रत्येक मनुष्याला, मग तो कोणत्याही परिस्थितीत, जातीत अथवा कुटुंबात जन्मास आलेला असो, त्याच्या अंगभूत सुप्त शक्ती विकसित करून, जास्तीत जास्त कर्तृत्व दाखविण्याचे स्वातंत्र्य आणि संधी मिळेल, अशा प्रकारची समाजरचना अस्तित्वात आल्यास मानवी गुणसंपत्तीचा अपव्यय अथवा नाश थांबेल.

(४) राष्ट्रीय भेद : निरनिराळ्या राष्ट्रांमधील लोकांचा स्वभाव वैशिष्ट्यपूर्ण असतो, असे सामान्यतः मानण्यात येते. उदा., ज्यू लोक पैशाचे अत्यंत लोभी असतात. पौर्वात्य लोक स्वभावाने अनाकलनीय व आतल्या गाठीचे असतात. आयरिश लोक लढाऊ वृत्तीचे असतात. इटालियन लोक सहज भावनेच्या आहारी जातात. अमेरिकन लोकांना व्यावहारिक यशाचे आकर्षण असते. जपानी लोक नेहमी समाजात आपले स्थान कोणते, ते ओळखून चालण्याची दक्षता घेतात. जर्मन लोक कामातील व्यवस्थितपणा, आज्ञाधारकपणा, अधिकारी व्यक्तीविषयी आदरभावना, स्वदेशप्रीती, वंशश्रेष्ठत्वाची भावना या गुणांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय लोक धर्मभोळे, परलोकपरायण, इहलोकाविषयी उदासीन, शांतताप्रिय, सहिष्णू असतात. ही वर्णने केवळ सरासरीने अथवा सर्वसामान्यपणे लागू पडण्यासारखी आहेत. तथापि त्यांना अनेक अपवाद असतात. ही स्वभाववैशिष्ट्ये कशामुळे निर्माण झाली, या प्रश्नाचे उत्तर शोधताना सामाजिक मानसशास्त्रज्ञ आनुवंशिकतेवर बोट न ठेवता सामाजिक परिस्थिती, रूढ लोकाचार, बालपणातील अनुभव, मातापिता व अपत्ये यांच्यातील संबंध आदी आसमंतीय गोष्टींचा उल्लेख करीत असतात.

सुप्रजाजननशास्त्र : परस्परांनुरूप नरमादींची जोडपी निवडली, की त्यांच्यापासून अधिकाधिक हुशार वा अधिकाधिक मंद पिलांची निपज करता येते,ही गोष्ट प्राणिशास्त्रज्ञांच्या चांगलीच परिचयाची आहे. अलीकडील आर्. सी. ट्रायन, एल्. व्ही. सर्ल आदी शास्त्रज्ञांच्या प्रयोगांनीही ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. यावरून मानवजातीतही सशक्त, देखण्या, हुशार, निरोगी, कर्तृत्ववान अपत्यांची उत्पत्ती होण्यासाठी कोणते उपाय योजणे आवश्यक आहे, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. या प्रश्नाचा सुप्रजाजननशास्त्रात खल करण्यात येतो. सशक्त,बुद्धिमान आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या प्रजोत्पादनास अनुमती देणे आणि अशक्त, रोगग्रस्त, निर्बुद्ध,कर्तृत्वशून्य व्यक्तींचे प्रजोत्पादन मर्यादित (क्वचित प्रसंगी पूर्णपणे स्थगित) करणे इष्ट आहे, अशा या शास्त्राच्या शिफारशी आहेत पण मानवी समाजव्यवस्थेत या शिफारशी अमलात आणणे जवळजवळ अशक्यप्राय आहे. त्याची कारणे अशी :


(१) प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेस समाजसंमत अथवा कायदेशीर स्वरूप देणाऱ्या लग्नसंस्थेविषयी लोकांच्या मनात अनेक नाजुक भावना आणि नैतिक व धार्मिक कल्पना गुंतलेल्या असतात, त्या दूर करता येणे शक्य नाही. प्रजोत्पादनाचा अथवा लैंगिक सहवासाचा विज्ञानाप्रणीत कार्यक्रम आखून तदनुसार वागावयास माणसे प्रवृत्त होणे कठीण दिसते.

(२) प्रजोत्पादनास पात्र आणि अपात्र कोण, ते ठरविण्याच्या वस्तुनिष्ठ कसोट्या कोणत्या, यांविषयी सामाजिक विचारवंतांतच नव्हे, तर वैज्ञानिकांतदेखील एकवाक्यता आढळत नाही. ज्यांना एका समाजात अपात्र मानण्यात येते, त्यांना दुसऱ्या समाजात पात्र गणले जाते. जे स्त्रीपुरुषसंबंध एका समाजात वंशवृद्धीसाठी निषिद्ध मानले जातात, तेच दुसऱ्या समाजात निषिद्ध तर नव्हेच, पण विहितही समजण्यात येतात.

(३) इतिहासप्रसिद्ध थोर, कर्तृत्ववान आणि बुद्धिमान लोकांची जीवनचरित्रे न्याहाळून पाहिल्यास, त्यांना शारीरिक वा मानसिक व्याधी जडलेल्या होत्या, असे वारंवार आढळून येते. तथाकथित पात्रतेच्या काही कसोट्या वापरल्या, तर या लोकांना अपात्र ठरवावे लागेल. या व्यक्ती स्वतः व्यंगग्रस्त होत्या इतकेच नव्हे, तर त्यांच्या मातापित्यांना, त्यांच्या घराण्यांना व्याधींचा शाप होता, असे आढळून येते. तथाकथित पात्रतेच्या कसोट्यांची जर त्यांना कात्री लागली असती, तर त्या इतिहासप्रसिद्ध व्यक्ती जन्मालाच आल्या नसत्या.

(४) निवडक अव्यंग जोडप्यांनीच प्रजोत्पादन करावे, या पद्धतीने शारीरिक व मानसिक व्यंगांचे मानवजातीमधून उच्चाटन करावयाचे म्हटले, तरी त्यासाठी कितीतरी पिढ्या उलटाव्या लागतील, तेव्हा कुठे अत्यल्प प्रमाणावर या कार्यक्रमाचे परिणाम दृग्गोचर होऊ लागतील.

(५) अशक्त, रोगग्रस्त व्यक्तींची अपत्ये अशक्त आणि रोगग्रस्त होण्याची जितकी शक्यता असते, तितकीच निरोगी आणि सशक्त व्यक्तींनाही होणारी मुले अपंग निपजण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या शरीराकृतीमध्ये जरी बाह्यतः व्यंग दिसत नसले, तरी तिच्या जननकोशिकांत व्यंगजनक जनुक अप्रभावी स्वरूपात राहिलेले नसतीलच, याची शाश्वती देता येत नाही. त्याचप्रमाणे तथाकथित देहदुर्बलांच्या पोटी अलौकिक कर्तृत्ववान व्यक्ती जन्मास येणारच नाहीत, असेही म्हणता येणार नाही.

सुप्रजाजननशास्त्राच्या अभ्यासाचा प्रारंभ सर फ्रान्सिस गॉल्टन (१८२२-१९११) याने केला. त्याने अनेक इतिहासप्रसिद्ध बुद्धिमान व्यक्तींच्या जीवनचरित्रांचा अभ्यास करून, कर्तृत्ववान व्यक्तींच्या वंशांत कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म संभवतो म्हणजेच कर्तृत्वसंपन्नता अथवा अलौकिक बुद्धिमत्ता ही काही ठराविक घराण्यांतच नांदत असते, अशा अर्थाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांताने प्रभावित होऊन एच्. एच्. गॉडर्ड, आर्. एल्. डग्डेल, ए. ई. विन्‌शिप्‌, जी, व्हास आदी संशोधकांनी कॅलिकॅक्, ज्यूक, एडवर्ड आदी घराण्यांतील व्यक्तींचा विस्तृत कुलवृत्तांत वर्णन केला आणि एकाच पित्यापासून सदाचरणी पत्‍नीला होणारी मुले प्राधान्येकरून सदाचरणी होतात, तर दुराचरणी पत्‍नीला झालेली अपत्ये दुराचरणी होतात पिढ्यांमागून पिढ्या उलटल्या तरी ही सदाचरणाची व दुराचरणाची परंपरा अखंड चालत रहाते, असे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला.

ही कुलवृत्तांतपद्धती वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत सदोष आणि आक्षेपार्ह आहे कारण एकाच कुलामधील अर्भकांची, विशिष्ट जनुकरचना पिढ्यान् पिढ्या कायम रहाते, फारशी बदलत नाही, असे या पद्धतीत गृहीत धरलेले असते. हे गृहीततत्त्व अर्थातच चुकीचे आहे. वास्तविक पाहता प्रत्येक पिढीमध्ये अर्भकांची जनुकरचना ही सातत्याने बदलत असते. प्रत्येक नव्या पिढीत वंशाबाहेरील काही जनुके उतरलेली असतात आणि मातापित्यांच्या जननकोशिकांतील काही जनुके बाद झालेली असतात. वंशविशिष्ट जनुकांचा अखंड प्रवाह त्या त्या घराण्यात पिढ्यान् पिढ्या वाहत असतो, या समजुतीला वंशशास्त्रात आधार नाही. कुलवृत्तांत पद्धतीने आनुवंशिकतेचे प्रभावित्व आणि पर्यायाने वंशश्रेष्ठात्वाचे तत्त्व यांस दुजोरा मिळतो. परंतु ही पद्धतीच मुळात सदोष आणि अवैज्ञानिक आहे [→ सुप्रजाजननशास्त्र].

रशियन आसमंतवाद : रशियात आसमंतवादाला सरकारी धोरणात महत्त्वाचे स्थान देण्यात आले. व्यक्तीची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती जर सुधारली, तर त्याचे इष्ट ते परिणाम व्यक्तीच्या जीवनात तसेच अपत्यांच्या आनुवंशिकतेतही घडून येतात. शिक्षणादी संस्कारांनी व्यक्तीमध्ये नवे गुणधर्म विकसित होतात व तिची बाह्य स्थिती सुधारते हे तर खरेच, पण त्याचसोबत व्यक्तीच्या जनुकरचनेतही महत्त्वाचे फेरफार घडून येतात, अशा अर्थाची उपपत्ती रशियन राज्यकर्त्यांच्या तत्त्वप्रणालीत नीट बसण्यासारखी होती. म्हणून उपार्जित गुणधर्म आनुवंशिकतेने पुढील पिढ्यांत परिवाहित होत नाहीत, ही व्हाइसमान आणि मॉर्गन यांची उपपत्ती त्यांनी झिडकारली आणि आसमंतवादी आनुवंशिकीस त्यांनी प्रोत्साहन दिले.

पी. कॅमरर आणि इव्हान पाव्हलॉव्ह यांनी आसमंतीय बदलाने जनुकीय बदल घडवून आणता येतात, अशा अर्थाचे विचार मांडले होते पण ते त्यांना वैज्ञानिकरीत्या सिद्ध करून दाखवता आले नाहीत. जे. बी. लांमार्क याच्या मताप्रमाणे जिराफ या प्राण्याची मान लांब होण्याचे कारण असे, की या प्राण्याला पिढ्यांमागून पिढ्या, वैराण प्रदेशात झाडाच्या शेंड्यावरची पाने खाण्यासाठी आपली मान एकसारखी ताणावी लागली. सतत मान लांब करण्याचा हा गुणधर्म त्या प्राण्याच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत परिवाहित होत होत लांब मानेचे जिराफ जन्मास येऊ लागले. या लामार्कच्या उपपत्तीला सदृश अशी एक उपपत्ती आय्. व्ही. मिच्युरिन आणि टी. डी. लायसेंको या शास्त्रज्ञांनी रशियात प्रतिपादन केली. १९३५ साली रशियन राज्यकर्त्यांनी मिच्युरिन व लायसेंको यांच्या विचारांना अधिकृतपणे पाठिंबा दिला  आणि उपार्जित गुण परिवाहित होत नाहीत, असे प्रतिपादन करण्याऱ्या व्हाइसमान व मॉर्गन यांच्या मताचा भांडवलशाही विचारसरणी म्हणून उपहास केला. १९४८ साली रशियन कम्युनिस्ट पक्षाने मिच्युरिन-लायसेंको उपपत्ती अधिकृत राष्ट्रीय उपपत्ती म्हणून उद्‍घोषित केली. १९५३ साली स्टालिनचा मृत्यू झाल्यानंतर या उपपत्तीचा दबदबा कमी होऊ लागला. ती सिद्ध करावयास उपलब्ध असलेला पुरावा पुरेसा नाही. लायसेंकोचे प्रयोग विज्ञानदृष्ट्या सदोष आहेत, असे आढळून आले. अखेर १९६४ मध्ये ही उपपत्ती अधिकृतपणे धिक्कारण्यात आली. आनुवंशिकीच्या संशोधनास वाहिलेले एक वे नियतकालिक सुरू करण्यात आले आणि राजकीय वा अन्य कसलेही पूर्वग्रह वा प्रभाव मनात न बाळगता, एतव्दिषयक विशुद्ध वैज्ञानिक संशोधनास रशियात पुन्हा प्रारंभ करण्यात आला.

पहा : परिस्थितिविज्ञान

संदर्भ : 1. Anastasi, A. &amp Foley, J. P. Differential Psychology, New York, 1958.

2. Galton, F. Hereditary Genius, London, 1869.

3. Garn, S. M. Human Races, 1935.

4. Kallmann, F. J. Heredity in Health and Mental Disorders, New York, 1953.

5. Klineberg, O. Race Differences, New York, 1935.

6. Newman, H. H. &amp Others, Twins: A study of Heridity and Environment, New York, 1937.

7. Race, R. R. &amp Sanger, R. Blood Groups in Man, 1962.

8. Stern, C. Principles of Human Genetics, San Fransisco, 1949.

9. Tyler, L. E. The Psychology of Human Differences, New York, 1956.

10. World Health Organization, The Effect of Radiation on Human Heredity, 1957.

 

केळशीकर, शं. हि.