प्राणि – ध्वनि : स्वतःचे मनोगत किंवा भावना व्यक्त करण्यासाठी प्राणी विशिष्ट प्रकारच्या आवाजाचे माध्यम वापरताना आपण पुष्कळ वेळा पाहतो. अर्थात निरनिराळे प्राणी वेगवेगळे आवाज काढतात व ध्वनिनिर्मितीसाठी त्यांची साधने पण विविध प्रकारची असतात. निरनिराळे प्राणी ध्वनिनिर्मिती कशी करतात याची स्थूल माहिती खाली दिलेली आहे.

 

आ.१. टोळाच्या मागल्या पायाची ऊर्विका : (१) खुंटांची ओळ, (२) तीन खुंट अतिशय मोठे करून दाखविले आहेत.अपृष्ठवंशीप्राणी : अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांमध्ये ध्वनी निर्माण करण्याची कला फक्त ⇨ आर्थ्रोपोडा (संधिपाद) प्राणिसंघात दिसून येते. ⇨ मॉलस्का (मृदुकाय) प्राणिसंघात हालचालीच्या वेळी स्नायुमय पादांचा (पायांचा) चूषकासारखा (शोषून खेचून घेण्याचे कार्य करणाऱ्या अवयवासारखा) उपयोग करताना होणारा ध्वनी किंवा अन्नग्रहणाच्या वेळी रेत्रिकेने (मागे पुढे करता येणाऱ्या व अनेक सूक्ष्म, शृंगमयय दात असलेल्या कायटिनमय पट्ट्याने) अन्न किसताना किंवा खरवडताना होणारा ध्वनी ते हेतुपुरस्सर करीत असतील, असे म्हणवत नाही.

 

आर्थ्रोपोडा संघामध्ये कीटकांची ध्वनी-उत्पादनाची क्रिया वेगवेगळ्या पद्धतींची असते. काही जातींचे कीटक आपल्या शरीराचा एखादा भाग बाह्य पदार्थावर आपटून आवाज उत्पन्न करतात. अशा प्रकारच्या ध्वनिनिर्मितीचे एक चांगले उदाहरण झेस्टोबियमरूफोव्हिलोसम या भुंगेऱ्याचे होय. हा आपल्या बिळाच्या भिंतीवर डोके आपटून आवाज उत्पन्न करतो. हा आवाज म्हणजे मादीला दिलेली हाक असते, असा समज आहे. पुष्कळ जातींच्या वाळवीचे (उधईचे) शिपाई वारुळात थोडासा जरी यांत्रिक प्रक्षोभ दिसून आला, तरी वारुळांच्या भागांवर आपली डोकी आपटून आवाज करतात. सबंध निवहाला (वसाहतीला) संकटाची सूचना देण्याकरिता असा आवाज करतात की काय, हे नीटसे कळलेले नाही.

 

पुष्कळ प्रकारचे कीटक आपल्या शरीराचा एखादा भाग दुसऱ्या भागावर घासून आवाज उत्पन्न करतात. अशा रीतीने विविध प्रकारचे आवाज उत्पन्न झालेले दिसून येतात. आखूड शृंगिका (सांधेयुक्त स्पर्शेंद्रिय) असलेले टोळ आपल्या मागच्या पायाच्या ऊर्विकेच्या (पायाच्या पहिल्या भागाच्या) आतल्या बाजूवर ओळीने असलेले बारीक खुंट वक्षाच्या आच्छदाच्या (आवरणाच्या) जाड व टणक बाह्य पृष्ठावर घासून कर्कश आवाज काढतात. रातकिड्याच्या प्रत्येक वक्षाच्छदावर कानशीसारखा एक भाग (फाइल) व एक टणक जागा (स्क्रेपर) असते. एका वक्षाच्छदाची फाइल समोर असणाऱ्या दुसऱ्याच्या स्क्रेपरवर घासल्याने त्या वक्षाच्छादाच्या विशिष्ट भागाचे कंपन होऊन कर्कश आवाज निर्माण होतो. सिकाडा या कीटकात ध्वनी उत्पन्न करण्याचे साधन फक्त नरात असून ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याच्या उदराच्या तळावर ढोलकीसारख्या दोन रचना असून त्यांना ‘टिंबल’ म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या पत्र्याच्या मोठ्या डब्याचे झाकण हाताने दाबले म्हणजे व हात काढून घेतल्यावर जसा आवाज होतो त्याप्रमाणे टिंबलांचे पातळ पटल स्नायूंच्या साहाय्याने जलद आतबाहेर होऊन बराच मोठा आवाज होतो.

 

काहींमध्ये (उदा., डास) पंखांची बुडे एकमेकांवर घासून ध्वनिनिर्मिती होते. ‘डेथ्‌स हेड हॉक’ नावाचा पतंग मुख-गुहिकेतील (तोंडाच्या पोकळीतील) एका विशिष्ट दुमडीला कंपित करून अतिशय कर्कश आवाज करीत असतो व त्याची अळी डिवचली गेल्यास ती आपले दोन जंभ (जबडे) एकमेकांवर आपटून व घासून तडतड असा आवाज काढते. मधमाश्या व इतर काही माश्या यांचा गुंजारव किंवा गुणगुण पंखांच्या कंपनांमुळे उत्पन्न होते.

 

वरील सर्व प्रकारांत ध्वनिनिर्मिती नरापुरतीच मर्यादित असते किंवा प्रामुख्याने नरामध्येच अधिक विशेषत्त्वाने दिसते.

 

नराची मादीस हाक, एका कीटकाची दुसऱ्यास भयाची सूचना, स्वसंरक्षण इ. गोष्टींसाठी कीटकांत ध्वनिमाध्यम वापरले जाते.

 

पृष्ठवंशी प्राणी : बहुतेक मासे ध्वनी उत्पन्न करू शकत नाहीत पण साईनिडी या मत्स्यकुलातील डिंडिम-मत्स्य (ड्रमफिश), हिम्युलोनिडी मत्स्यकुलातील डुरके मासे (ग्रंटर) आणि इतर काही याला अपवाद आहेत. हे मासे वाताशयाच्या (हवेच्या पिशवीच्या) साहाय्याने ध्वनी उत्पन्न करू शकतात. डिंडिम-मत्स्याच्या वाताशयाला मस्क्युलस सॉनिफिकस हा स्नायू जोडलेला असतो. या स्नायूच्या आकुंचनाने उदराच्या भित्ती, इंद्रिये व विशेषतः वाताशय कंपित होतात आणि ढोलाच्या आवाजासारखा विशिष्ट आवाज उत्पन्न होतो. डुरक्या माशांमध्ये वाताशय गुंतागुंतीच्या रचनेचा असतो. त्याच्या एका भागातून हवा जोराने दुसऱ्या भागात शिरताना डुरकण्यासारखा आवाज उत्पन्न होतो.

 

आ. २. बेडकाचा ध्वनिकोश :(१) ध्वनिकोश.उभयचरांमध्ये (जमिनीवर व पाण्यातही राहणाऱ्या प्राण्यांमध्ये) बेडूक, भेक (टोड) आणि वृक्षमंडूक (हायला) हे (विशेषतः या प्राण्यांचे नर) ध्वनी उत्पन्न करू शकतात. प्राणिसृष्टीत ध्वनितंतूंच्या साहाय्याने आवाजाची निर्मिती प्रथम बेडकांनी केली. गलद्वाराजवळील स्वरयंत्रात दोन स्वरतंतू असतात. ज्या वेळी फुप्फुसातील हवा कंठातून जोराने बाहेर पडते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनी उत्पन्न होतो. नर बेडकामध्ये घशाच्या खालच्या बाजूस दोन पिशव्या असतात. त्या बारीक छिद्रांनी मुखगुहेत उघडतात. भेक आणि वृक्षमंडूक यांच्या नरांमध्ये एकेकच पिशवी असते. या पिशव्यांना ध्वनिकोश म्हणतात. ध्वनिकोशांचा उपयोग आवाज मोठा करण्याकरिता सहस्पंदकासारखा होतो.

 

 सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गातील सर्प, कासवे ही मुकीच असतात. सर्प फिसकारतात परंतु तसे करताना ते फुप्फुसातील हवा नासापुटातून जोराने बाहेर टाकतात. सरीसृपांत कंठ अगदीच मामुली स्वरूपाचा असल्यामुळे स्वरनिर्मिती अशक्यच असते. अशा प्राण्यांना आवाज काढता आला, तर तो इतर पद्धतीने काढलेला असतो. याचे एक चांगले उदाहरण खडखड्या साप (रॅटल स्नेक) होय.

आ. ३. खडखड्या सापाचा खुळखुळा

हा साप आपल्या शेपटीच्या टोकावरील कातीपासून बनलेल्या खुळखुळ्यामुळे (रॅटलमुळे) ‘खडखड’ असा आवाज काढू शकतो. कात टाकताना प्रत्येक वेळी शेपटीच्या टोकावर कातीचे एक कडे तसेच चिकटलेले राहून वाळते. अशा तऱ्हेने शेपटीवर कित्येक कडी तयार होतात. ती वाळलेली, पोकळ आणि अगदी सैलपणे एक दुसऱ्यावर अशी बसविलेली असतात. शेपटीचे कंपन वेगाने सुरू झाले म्हणजे या कड्यांचे (रॅटलचे) कंपन होऊन विशिष्ट प्रकारचा आवाज उत्पन्न होतो. सरीसृप वर्गात खरी स्वरनिर्मिती फक्त पालींमध्ये आढळते.

 

 


  

आ. ४. कस्तूर पक्ष्याच्या कूजित्राचा उभा छेद :(१) श्वासनाल (२) स्नायुदंड (पेस्स्युलस), (३) श्वसनी, (४) आंतर-पटहाकार कला, (५) अंतराजत्रुक वायुकोश, (६) अर्धचंद्राकार कला,(७) स्नायूकाही अपवाद वगळल्यास पक्ष्यांमध्ये सर्वसाधारणपणे स्वरनिर्मिती आढळते पण पक्ष्यांचे स्वरयंत्र ऱ्हास पावलेले असून त्यात स्वरतंतू नसतात. त्याच्याऐवजी श्वासनाल आणि त्याच्यापासून निघणाऱ्या दोन श्वसन्या यांच्या सांध्यावर कूजित्र नावाचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरयंत्र असते व त्याच्या योगाने स्वरनिर्मिती होते. [⟶ श्वसन तंत्र]. या स्वरयंत्रामध्ये दोन आंतर-पटहाकार कला (पातळ पटले) असतात. फुप्फुसातील हवा जोराने बाहेर टाकताना या कला कंप पावतात व आवाज उत्पन्न होतो. गाणाऱ्या पक्ष्यांमध्ये एक अर्धचंद्रकार कला असते व तिला हाडाच्या कंगोऱ्याने खालून आधार दिलेला असतो. स्नायूंच्या साहाय्याने कूजित्राचा आकार निरनिराळ्या रीतींनी बदलता येत असल्यामुळे अनेक प्रकारची स्वरनिर्मिती शक्य होते. 

 

स्तनी वर्गातील प्राण्यात बोलणे, हसणे, रडणे, डरकाळ्या, चीत्कार, खिंकाळणे, हंबरणे, भुंकणे इ. अनेक प्रकारचे आवाज कंठातील स्वरयंत्रात निर्माण होतात. घोड्यांचे फुरफरणे, माणसाचे शिंकणे वगैरेंसारखे आवाज अन्य तऱ्हेने निर्माण होऊ शकतात. एकच प्राणी अनेक प्रकारचे आवाज काढतानाही आपणास पहावयास मिळतो. याचे कारण हवा बाहेर जाताना कंठपोकळी, गलद्वार यांचा आकार बदलल्याने आवाज बदलू शकतो. उदा., माणसांमध्ये मुखगुहा, लवचिक गाल व जीभ यांच्या साहाय्याने कंठ व गलद्वार यांचा आकार बदलता येतो व त्यामुळे आवाज पण बदलला जातो. यांचे आवाज बहुतांशी विशिष्ट प्रकारच्या भावना व मनोविकार व्यक्त करण्यासाठी केलेले असतात. एखाद्या प्राण्याचे उत्साहदर्शक ओरडणे हे त्याच्या सान्निध्यात राहणाऱ्या इतर प्राण्यांना पण कळू शकते.

 

पहा : ध्वनिविचार पक्षिगान प्राण्यांमधील संदेशवहन वाचा स्वरयंत्र.

 

संदर्भ : 1. Walter, H. E Sayles, L. P. Biology of the Vertebrates, New York, 1957.

            2. कर्वे, ज. नी. प्राणिशास्त्रप्रवेश, पुणे, १९६२.

 

पाटील, शि. ज्ञा.