दीनबंधु मित्र

मित्र, दीनबंधु: (? १८३०–१ नोव्हेंबर १८७३). प्रसिद्ध बंगाली नाटककार. प्रहसनकार म्हणून ते विशेष प्रसिद्ध असून त्यांची काही काव्यरचनाही लोकप्रिय आहे. नडिया जिल्ह्यातील चौबेडिया गावी (बंगाली पंचांगानुसार १२३६ सालच्या चैत्र महिन्यात) जन्म. पिता कालाचाँ द मित्र. कलकत्त्यास प्रथम हेयर स्कूलमध्ये त्यांनी शिक्षणास आरंभ केला आणि पुढे हिंदू कॉलेजमधून १८५० मध्ये ते ‘ज्युनियर’ परीक्षाही पास झाले. यानंतर १८५३ मध्ये ते अध्यापक परीक्षा पास झाले. १८५५ सालापासून नोकरीच्या निमित्ताने बिहार,ओरिसा,डाक्का,नडिया इ. प्रदेशात भ्रमण. १८५५ मध्ये प्रथम पाटण्यास पोस्टमास्तर म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८७० मध्ये कलकत्त्यास अधिसंख्य निरीक्षक (सुपरन्युमरी इन्स्पेक्टिंग) पोस्टमास्तर असताना त्यांना ‘राय बहादूर’ ही पदवी मिळाली.

बंगालमध्ये १८५५ च्या सुमारासच ‘नीळकर’ साहेबांचे अत्याचार प्रकाशात येऊ लागले होते. या विषयावर दीनबंधूंनी त्यांचे नील दर्पण(१८६०) हे पहिले नाटक लिहिले. यात त्यांनी भारतातील तत्कालीन शासन-शासित संबंधांना वाचा फोडून नीळीच्याव्यवसायातील स्वदेशी कामगारांच्या दुःखाबद्दल सहानुभूती दर्शविल्यामुळे राजकीय परिसरात बरीच खळबळ उडाली. नील दर्पण नाटकाचा इंग्रजी अनुवाद मायकेल मधुसूदन दत्त यांनी केला  असावा,असा अंदाज आहे. या नाटकात मुख्यतः  करु ण रसावर भर आहे. पण दीनबंदू हे प्रहसनकार म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. सधवार एकादशी (१८६६), बिये पागला बुडो(१८६६), जामाई बारिक (१८७२) या लोकप्रिय प्रहसनांमधून त्यांच्या व्यंगपूर्ण विनोदबुद्धीचा हातखंडा जाणवतो.

शिकत असतानाच दीनबंधूंनी गद्य-पद्यलेखनास प्रारंभ केला होता. या प्राथमिक रचना ⇨ ईश्वरचंद्र गुप्त (१८१२–५९) यांच्या संवाद प्रभाकरसंवाद साधुरंजन या पत्रकांमधून प्रसिद्ध होत.नवीन तपस्विनी नाटक (१८६३),लीलावती (१८६७),सुरधुनी काव्य (१८७१),द्वादश कविता(१८७२),कमले कामिनी नाटक (१८७३)इ. त्यांच्या नाटक व काव्यरचना प्रसिद्ध असूनही ते बंगाली साहित्यविश्वात प्रहसनकार म्हणूनच विशेष नावाजले गेले. बंगाली नाटकक्षेत्रात त्यांचे स्थान लक्षणीय आहे. त्यांच्या नाटक व प्रहसनांचे प्रयोग ‘नॅशनल थिएटर’ मध्ये होत. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

आलासे, वीणा.