राखालदासबंदोपाध्याय, राखालदास : (१२ एप्रिल १८८५–? १९३०). बंगालमधील प्रख्यात पुरातत्त्ववेत्ते, इतिहासकार व ऐतिहासिक विषयांवर कादंबरीलेखन करणारे साहित्यिक. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेऱ्हमपूर येथे जन्म व प्राथमिक शिक्षण. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ते १९०५ मध्ये बी.ए. व इतिहास घेऊन कलकत्ता विद्यापीठातून १९०९ मध्ये एम.ए.झाले. प्रसिडेन्सी कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक हरप्रसाद शास्त्री यांचा सहवास त्यांना लाभला व त्यांच्याकडेच संस्कृत, भाषाशास्त्र व लिपिशास्त्राचे अध्ययन त्यांनी केले. राजेंद्र प्रसाद व शरत्चंद्र बोस हे त्यांचे वर्गबंधू होते. कलकत्त्याच्या म्यूझीयममध्ये भारतीय पुरातत्त्वविभागात सहायक अधीक्षक म्हणून नेमणूक १९१७ मध्ये ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ च्या पश्चिम विभागाचे अधीक्षक म्हणून पुण्यास नियुक्ती. १९२२ मध्ये मोर्हे-जो-दडो व हडप्पा येथील उत्खननानेच काम व संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या संशोधनामुळे ‘गुप्त’ व ‘पाल’ राजघराण्यांच्या कारकीर्दीतीलही पुष्कळ गुंता उलगडला गेला. या संशोधनकार्यामुळे राखालदसांना भारतातीलच नव्हे तर जगातील एक अग्रगण्य इतिहासकार मानले जाते. १९२४ मध्ये पूर्वे विभागाचे अधीक्षक म्हणून ते कलकत्यास आले व १९२६ मध्ये राजीनामा देऊन सेवामुक्त झाले. त्यानंतरही १९२८ मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले होते. या जागेवर ते अखेरपर्यंत होते. कलकत्ता येथे ते निधन पावले.

पक्षातंर (१९२४), व्यक्तिक्रम (१९२४) व अनुक्रम (१९३१) या तीन कौटुंबिक स्वरूपाच्या कादंबऱ्यांखेरीज राखालदासांनी दोन ऐतिहासिक व्यक्तिचित्रणे व सात ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ऐतिहासिक चित्रणे-हेमकथा (१९११-१२ मध्ये प्रचासीत क्रमशः प्रसिध्द) व पाषाणेर कथा (१९११ मध्ये आर्यावर्त नियतकालिकात प्रसिध्द)−पुस्तकरूपाने अप्रकाशित आहेत. एकूण सात ऐतिहासिक कादंबऱ्यांपैकी पहिल्या तीन गुप्त वंशाच्या अखेरच्या कालखंडावर आहेत. शशांक (१९१४) या कादंबरीत गुप्तयुगाची अखेर व करूणा (१९१७) मध्ये गुप्तयुगाचा विध्वंस चित्रित केलेला आहे. धर्मपाल (१९१५) ही पाल साम्राज्याचे वैभव दर्शविणारी कादंबरी असून मयूख (१९१६) मध्ये शाहजहानच्या कारकीर्दीतील बंगालमधील पोर्तुगीजांचे अत्याचार वर्णिलेले आहेत. असीम (१९२४) मध्ये बादशाह फरूखसियरच्या कारकीर्दीतील बंगालचे चित्रण आहे. ध्रुवा (१९५९) ही सम्राट समुद्रगुप्ताच्या कालावरील अपूर्ण कादंबरी राखालदासांच्या मृत्यूनंतर जवळ जवळ ३० वर्षांनी पुस्तकरूपाने प्रसिध्द झाली. त्या अगोदर १९३१ मध्ये ती प्रवासी प्रत्रकात क्रमशः प्रसिध्द झाली. लुत्फुल्ला ही राखालदासांची शेवटची कादंबरी १९२७ ते २९ या काळात वसुमती मासिकातून क्रमशः प्रसिध्द झाली. तीत नादिरशाहच्या कारकीर्दीचे चित्रण आहे. कादंबऱ्यांतव्यतिरिक्त बांगलार इतिहास (दोन खंड–१९१४,१९१७) हा अभ्यापूर्ण ग्रंथ लिहून राखालदासांनी कीर्ती संपादन केली. हिस्टरी ऑफ ओरिसा (२ खंड) एज ऑफ द इंपीअरिअल् गुप्ताज (१९३३) आणि ईस्टर्न इंडियन स्कूल ऑफ मेडिईव्हल स्कल्प्चर (१९३३) हे त्यांचे इंग्रजी ग्रंथ विशेष महत्त्वाचे होत. त्यांच्या साहित्यात गाढ विद्याव्यासंग व कल्पनाशक्ती यांचे मनोहर मिश्रण आढळते.

शशांक–वी.सी.गुर्जर (१९१६) करूणा–वि.वि. केळकर (१९२२) मयूख–द. भि. रणदिवे (१९२३) या त्यांच्या कादंबऱ्यांचे मराठीत अनुवाद झाले आहेत. याशिवाय त्यांच्या काही कादंबऱ्यांचे हिंदी व तमिळमध्येही अनुवाद झाले.

आलासे, वीणा