मियासिस : माशीच्या काही जातींमध्ये त्यांच्या जीवनचक्रातील डिंभ किंवा अळी अवस्थांचे मनुष्य आणि पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या त्वचा आणि इतर इंद्रियांमध्ये आक्रमण होते, त्याला मियासिस म्हणतात. शरीराच्या ज्या भागावर हे आक्रमण होते त्यावरून आंत्र (आतडे) मियासिस, त्वचेचे मियासिस, व्रण मियासिस, डोळ्याचे मियासिस असे प्रकार मानले जातात.

म्युसिडी, सर्कोफॅजिडी, कॅलिफोरिडी, गॅस्टेरोफिलिडी (गॅस्ट्रोफिलिडी), क्युटेरेब्रिडी, ऑस्ट्रिडी इ. कुलांतील माश्यांच्या अळ्यांमुळे असे आक्रमण होते. माशी अंडी घालते. अंडी उबवली गेली म्हणजे अळी बाहेर पडते, त्यानंतर कोषावस्था पुरी होऊन कोषाचे रुपांतर माशीमध्ये होते. काही माश्यांच्या अळ्या सजीव प्राण्यामध्येच वाढतात, तर काही कधीमधी सजीवावर वाढतात, तर आणखी काही अपघाताने अंडी पोटात गेल्यामुळे आतड्यामध्ये वाढतात.

घोड्याच्या पोटाच्या अस्तर त्वचेला लटकलेल्या गॅस्टेरोफिलस प्रजातीच्या माशीच्या अळ्या.

घरमाशीची अंडी अपघाताने मनुष्याच्या पोटात जातात व अळ्या त्याच्या आतड्यामध्ये वाढतात. माश्यांच्या अंड्यामुळे दूषित झालेल्या कुरणात चरणाऱ्या किंवा इतर अनेक मार्गांनी पाळीव प्राण्यामध्ये हे नेहमीच घडत असते. गॅस्टेरोफिलस (गॅस्ट्रोफिलस) प्रजातीच्या माश्यांची अंडी घोड्याच्या केसावर घातली जातात. ही उबविण्यासाठी लागणारी आर्द्रता आणि उष्णता घोड्याच्या चाटण्यामुळे मिळते आणि अंडी घोड्याच्या पोटात जातात. अळ्यांची संख्या भरमसाठ वाढली, तर पोटाचे आतड्याकडील तोंड बंद होण्याची भीती असते. अशी घोडी खंगत जातात.

घरमाशीपेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या इस्ट्रस ओव्हिस या माश्या जगभर आढळतात. माश्या मेंढ्यांच्या नाकापाशी फिरत फिरत नाकपुड्यांच्या तोंडाशी अंडी घालात. अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या नाकातून वर सरकतात व कवटीतील नाकाच्या हाडाच्या पोकळीमध्ये पोहोचतात व तेथे त्यांची वाढ पूर्ण होते. मेंढ्यांना शिंका येतात व त्याबरोबर अळ्या बाहेर पडतात.

कॅलिफोरिडी कुलातील ल्युसिलिया सेरिकाटा, क्रिसोमिया बेझियाना, कॅलिट्रोगा अमेरिकना, फॉर्मिया रेजिना वगैरे जातींच्या माश्या जनावरांवरील जखमा व तोंड, नाक, गुदद्वार, योनी यासारख्या नैसर्गिक पोकळ्यांच्या तोंडाशी अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या मांसामध्ये घुसतात (काही वेळा मांस खाल्ल्यामुळे आतील हाडे दिसू लागतात) आणि मांस व लोकर यांची खराबी होते व लोकर गळून पडते. यातील ल्युसिलिया सेरिकाटाफॉर्मिया रेजिना या माश्यांच्या अळ्या जखमांमधील मृत ऊतक (पेशींचा समूह) खाऊन जगतात. यामुळे त्यांचा अस्थिमज्जाशोथावर (हाडांच्या पोकळ भागातील एक प्रकारच्या मऊ पदार्थाला – मज्जेला येणाऱ्या दाहयुक्त सुजेवर) व पू झालेल्या जखमांवर उपचार म्हणून वापर केला गेला. यात मृत ऊतकाबरोबर निरोगी ऊतक खाण्याचा धोका मात्र पतकरावा लागण्याची शक्यता असते. जंतुविरहित वातावरणात अळ्या वाढवीत असत व उपयोगात आणीत. अळ्यांचा असा वैद्यकीय उपयोग करीत असताना असे आढळून आले की, अळ्यांच्या सूत्रात ॲलॅन्‌टॉइन नावाचे द्रव्य असते व ते क्षत (लवकर बरे न होणारे व्रण) बरे करण्यास उपयोगी पडते.

हायपोडर्मा बोव्हिस, हा. लिनीएटम आणि हा. क्रासाय या भारतामध्ये आढळणाऱ्या जातींच्या माश्या गाईगुरांमध्ये प्रत्येक केसाच्या बुंध्याशी एक एक अंडे घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या त्वचेमध्ये घुसतात आणि काही काळाने जनावराच्या पाठीच्या कातड्याखाली येतात. पाठीच्या कातड्यावर लहान मोठ्या गाठी येतात. आतून गाठीला भोक पाडून त्या श्वासोच्छ्‌वास करतात आणि या भोकावाटे जमिनीवर पडतात. शरीरामध्ये फिरणाऱ्या या अळ्यांमुळे ग्रस्त झालेल्या गाईचे दूध १० ते २०% कमी होते. मांसाची नासाडी होते व भोके पडलेल्या कातड्यांची प्रत कमी होऊन आर्थिक नुकसान होते. अमेरिकेमध्ये तर यामुळे वर्षाला २० लक्ष रुपयांचे नुकसान होते. शस्त्रक्रिया करुन गाठ कापून तीतून अळी बाहेर काढतात पण अशा वेळी अळी आतल्या आत न चिरडण्याची काळजी घेतात. अन्यथा अळीतून निघणारे विष जनावराच्या अंगात भिनल्यास जनावर दगावण्याची भीती असते.

या संदर्भात माणसाच्या त्वचेवर येणाऱ्या काठी गाठींची उत्पत्ती मनोरंजक आहे. पाण्याच्या डबक्यात डासांचे प्रजनन होते. त्या ठिकाणाहून बाहेर पडत असताना डासांच्या पोटावर माश्या अंडी घालतात. डास मनुष्याचे रक्त शोषतो. त्यावेळी ही अंडी माणसाच्या त्वचेला चिकटतात. शरीराच्या उष्णतेमुळे ती उबविली जातात व बाहेर पडणाऱ्या अळ्या त्वचेमध्ये घुसतात व त्वचेवर त्यामुळे फोड येतात.

संदर्भ : 1. I. C. A. R., Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.

             2. Miller, W.C. West, G. P. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

जमदाडे, ज. वि. दीक्षित, श्री. गं.