सिकाडा : होमोप्टेरा गणातील कीटक. बहुतेक जाती सिकाडिडी कुलातील आहेत. परंतु टेट्टिगॅरेटिडी कुलाच्या दोन केसाळ जाती ऑस्ट्रेलिया व त्याच्या दक्षिणेस टास्मानियात आढळतात. हे मध्यम ते मोठ्या आकारमानांचे कीटक असून त्यांच्या शरीराची लांबी सामान्यपणे २–५ सेंमी. असते. सिकाडांची जास्तीत जास्त लांबी १५ सेंमी. पर्यंत असते. बोर्निओ सिकाडा सु. ७ सेंमी. लांबीचा असून त्याच्या पंखांचा विस्तार साधारणत: २० सेंमी. असतो. हे कीटक धष्टपुष्ट असून त्यांचे डोके रुंद असते. त्यांना दोन ठसठशीत डोळे असून त्यांच्या दरम्यान तीन अक्षिका असतात. तसेच पटलयुक्त पंखांच्या दोन जोड्या असून पंखांमध्ये अनेक शिरा असतात. बहुतेकांचा रंग सौम्य वा गडद असून पंख सुंदर व रंगी-बेरंगी असतात. उदा., १७ वर्षांचे जीवनचक्र असलेल्या नियतकालिक सिकाडाचे डोळे आणि पंखांमधील शिरा गडद तांबड्या असतात.

सिकाडा कीटकांत फक्त नरामध्ये ध्वनी निर्माण करणारा वैशिष्ट्यपूर्ण अवयव असतो. त्याच्या उदराच्या तळावर ढोलकीसारख्या त्वचेच्या दोन रचना असतात. या पटलासारख्या रचनांना टिंबल म्हणतात. या टिंबलांच्या कंपनाद्वारे मोठा आवाज निर्माण होतो. टिंबलाचे पातळ पटल लहान स्नायूच्या मदतीने जलदपणे आतबाहेर होऊन कंप पावते आणि आवाज निर्माण होतो. अशा आवाजाला प्राणि-ध्वनी म्हणतात.नियतकालिक  सिकाडाचे जीवनचक्र : (१) काष्ठमय ऊतकांतील अंडी, (२) १७ वर्षे जमिनीखाली राहून मुळांतील रस शोषणारा अर्भक, (३) कात टाकत असताना अर्भक, (४) प्रौढ कीटक.

सिकाडांच्या अनेक जाती त्यांचे प्राणि-ध्वनी, वर्तन आणि आकारविज्ञान यांच्यातील फरकांद्वारे सहज ओळखता येतात. कारण प्रत्येक जातीच्या नराचे ध्वनी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचे ठळक असे पुढील तीन प्रकारचे ध्वनि-प्रतिसाद असतात : (१) हवामानातील दैनिक चढ-उतार आणि इतर नरांनी निर्माण केलेले ध्वनी यांनी नियंत्रित होणारा समूहगानासारखा प्रतिसाद (२) सर्वसाधारणपणे मैथुनापूर्वी निर्माण होणारा प्रियाराधनाचा ध्वनि-प्रतिसाद आणि (३) अडकलेल्या, पकडून ठेवलेल्या किंवा उड्डाणातील व्यत्ययामुळे अस्वस्थ झालेल्या एकट्या नराकडून दिला जाणारा कर्कश किंकाळीच्या रुपातील प्रतिसाद. डबल ड्रम सिकाडा कानठळ्या बसविणारा ध्वनी निर्माण करतो. त्याच्या टिंबलांवर जादा आच्छादन असते.

सिकाडाची मादी ४००– ६०० अंडी काष्ठमय ऊतकांत घालते. अंडी ६-७ दिवसांत उबतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अर्भकाला पंख नसतात. अर्भक पुढील मोठ्या पायांनी बीळ पाडून वा जमीन पोखरुन जमिनीत शिरते. तेथे अर्भक बारमाही वनस्पतींच्या मुळांतून रस शोषून त्यावर जगते. अर्भकांना प्रौढावस्था प्राप्त व्हायला सामान्यपणे २–५ वर्षे लागतात. काही सिकाडांना १३ अथवा १७ वर्षे लागतात. या कालावधीत अर्भक पाच ते सात वेळा कात टाकते. या काळात ते भूमिगत असते. प्रौढ कीटक हळूहळू कोशातून बाहेर पडतो. दिवसभराच्या काळात पंख कठीण व शरीर कोरडे झाले की, तो उडायला सज्ज होतो. प्रौढ कीटक काही आठवडे किंवा काही महिने जगतात. अनेक प्रकारचे सिकाडा मेणचट स्राव स्रवतात. त्यामुळे ते आपल्या दमट व ओल्या अधिवासात कोरडे राहतात. सिकाडांना राठ केसांसारख्या शृंगिका असतात, त्यांद्वारे त्यांना संवेदना जाणवते. सर्वसाधारणपणे सिकाडा हे पीडक जीव मानीत नाहीत. परंतु माद्यांची संख्या जास्त झाल्यास अंडी घालण्याच्या काळात त्यांच्यामुळे रोपांचे नुकसान होऊ शकते.

सिकाडां च्या सु. १,५०० जाती माहीत असून बहुतेक जाती उष्णकटिबंधीय, वाळवंटी व गवताळ प्रदेशांत आणि वनांमध्ये आढळतात. काही जाती उपोष्ण कटिबंधातही आढळतात. जुलै ते सप्टेंबर महिन्याची सुरुवात या काळात आढळणाऱ्या डॉग-डे सिकाडां शिवाय (टिबिसेन व इतर जाती) नियतकालिक सिकाडांच्या जातीही आढळतात. यांपैकी १७ वर्षे सिकाडा (मॅगिसिकाडा) व १३ वर्षे सिकाडा या जाती सुंदर असून ज्ञात आहेत. या जातींची अर्भके मोठ्या संख्येने निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशांत आढळतात आणि वर्षाच्या निरनिराळ्या कालावधींत विकसित होतात. १७ वर्षे सिकाडा अमेरिकेच्या ईशान्य भागात तर १३ वर्षे सिकाडा अमेरिकेच्या आग्नेय भागात आढळतात.

पहा : डिंभ प्राणि— ध्वनी.

ठाकूर, अ. ना.