वरट : या विलक्षण कीटकाचा समावेश हायमेनॉप्टेरा गणाच्या चॅल्सिडॉयडीया अधिकुलातील अगॅओनिडी (अगॅओंटिडी) कुलात होतो. ब्लॅस्टोफॅगा प्रजातीतील जाती वरट म्हणून ओळखल्या जातात व त्या अंजीर, उंबर, वड, पिंपळ इ. वृक्षांच्या फळांत आढळतात.

वरट (ब्लॅस्टोफॅगा सेनेस) : (१) पंख पसरलेली प्रौढ मादी, (२) गाठीमध्ये असलेली मादी, (३) व (४) प्रौढ नर.

वरट हे सूक्ष्म ते अगदी बारीक, एकदम विशेषत्व पावलेले, २-३ मिमी. लांब व अंजिरासारख्या फळांत राहून आपली पिले बियांमध्ये वाढविणारे कीटक आहेत. नर व मादी दिसण्यास सारखे नसतात. मादी काळी, सपक्ष असून तिच्या डोक्यावर मध्याच्या खाली किंवा शृंगिकेभोवती (सांधेयुक्त स्पर्शेद्रियांभोवती) खाच असते. तिची शृंगिका ९१३ खंडांची (भागांची) असून तिच्या तळाचा खंड खोडासारखा असतो. डोळे किंवा अक्षिका असतात. गुल्फ (घोटा) सामान्यतः पाच खंडांचा असतो. नर दिसण्यास विलक्षण व फिकट रंगांचा, पंखहीन, अगदी बारीक, नेत्रहीन असून त्यांच्या शृंगिका ३-९ खंडांच्या असतात. बारीक अविकसित मधले पाय काही जातींत अजिबात नसतातही. घोटे ३- ६ खंडांचे असतात. फलनासाठी योग्य अवस्थेतील फळांच्या शोधात मादी या झाडावरून त्या झाडावर उडत असते, तर नर मात्र ज्या बियांमध्ये लहानाचे मोठे झाले असतील तेथेच राहतात व मरून जातात. यांच्या काही प्रकारांत बियांतून बाहेर पडण्यापूर्वी निदान माद्यांचे तरी नरांकडून फलन होते. अशा नराला बियाला छिद्र पाडण्यासाठी बळकट जबडे असतात, तसेच समागमासाठी शरीराखाली सामान्यतः वाकडे, लांब, विस्तार पावू शकणारे उदर असते.

 

वरट हा कीटक अंजिराच्या विविध प्रकारांच्या फळांत राहतो व त्यांच्या फुलांच्या परागणाचे महत्त्वाचे कार्य करतो. विक्रीयोग्य फळांच्या उत्पादनासाठी परागण ही क्रिया आवश्यक असते. परागण न झाल्यास फळे न होता गळून पडतात. वरटाची मादी फुलांच्या तळामध्ये अंडी घालते. वरटाच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेल्या गाठीमध्ये अळीचा विकास होतो [⟶अंजीर]. अंजीर व वरट यांच्यामधील सहजीवनाविषयी बरेच आश्चर्यकारक संशोधन करण्यात आलेले आहे.  

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये वरटाच्या दोन जाती आढळतात. त्यांपैकी ब्लॅस्टोफॅगा सेनेस ही जाती कॅलिफोर्निया व ॲरिझोना राज्यांत आढळते. ती तेथे बाहेरून आणली गेली आहे. सेकंडसेनिया मेक्सिकाना ही जाती फ्लॉरिडा राज्यात आढळते. ब्लॅ. सेनेस ही जाती अंजिराच्या स्मिर्ना प्रकाराशी निगडित आहे. फिलिपीन्समधील ब्लॅ. नोटॅट ही जाती अंजिराच्या फायकस नोटॅटा जातीच्या फळांमध्ये सापडते. भारतात भारतात ब्लॅ. ब्रेव्हीव्हेंट्रिस ही वरटाची जाती खाद्य अंजिराच्या फळांत सापडते. अगॅओनिडी कुलातील युप्रेस्टिना मॅसनी ही जातीही भारतात आढळते. हिच्या मादीच्या डोक्यावर खाच असते. तसेच सायकोस्कॉटा इंसिग्निससायकोफिला सॉडर्सी या जातींचे वरट खाद्य अंजिरांत आढळतात.  

जमदाडे, ज. वि.