हिलारे : सामान्य नाव ग्रीन स्टिंक बग (हिरवे दुर्गंधी कीटक) . हा कीटक पेंटाटॉमिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्रोस्टर्नम हिलारे असे आहे. डॉ. डेव्हिड राइडर यांच्या मते या कीटकाच्या प्रजातीचे नाव चुकीचे आहे. ॲक्रोस्टर्नम हे नाव जुन्या जगातील (आफ्रिका व आशिया खंड) लहान व फिकट हिरव्या दिसणाऱ्या कोरड्या आणि रखरखीत भागात राहणाऱ्या प्रजातींना दिले जाते. जुन्या व नव्या जगात (अमेरिका, लॅटिन अमेरिका व यूरोप) राहणाऱ्या मोठ्या आणि गडद हिरव्या दिसणाऱ्या प्रजातींचे नाव शिनॅव्हिया हे असून कीटकाचे शास्त्रीय नाव शिनॅव्हिया हिलॅरिस असे आहे. या कीटकाचा प्रसार पूर्व-उत्तर अमेरिकेत, क्वीबेक ते न्यू इंग्लंडपासून दक्षिण कॅनडापर्यंत, उत्तर अमेरिका ते पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यापर्यंत आणि फ्लॉरिडा ते कॅलिफोर्नियापर्यंत सर्वत्र आहे. 

 

हिलारे (ॲक्रोस्टर्नम हिलारे) : (१) उदर, (२) वक्ष, (३) शीर्ष, (४) शृंगिका, (५) नेत्रिका, (६) पुष्कादनी.
 

हिलारे हा कीटक अर्भक व प्रौढावस्थेत बिया, धान्य, दाणे आणि फळे यांना उपद्रव करून मोठ्या प्रमाणात पिकांची हानी करतो. हे कीटक खूप आश्रयी वनस्पती असलेले व मोठ्या प्रमाणावर बहु-कोशिकाभक्षी असून ते भक्षणाच्या वेळी खूप नुकसान करतात. अन्नासाठी लांबवरचे अंतरपार करण्याची क्षमता या कीटकांत असते. वनस्पती वाढीच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना ते तिच्यावर हल्ला करतात. 

 

उत्तर अमेरिकेत हे किटक सर्वत्र फळबागांत, शेतातील पिकांवर तसेच लाकडाच्या गाभ्यांमध्ये आढळतात. मे महिन्या-पासून हिमतुषार पडण्याच्या काळापर्यंत विविध प्रकारच्या वनस्पतींवर हे कीटक वाढतात. तोंडाकडील सुईसारख्या अवयवांनी ते वनस्पतींचा रस शोषून त्यावर उपजीविका करतात. प्रौढ कीटकांची वाढ बिया तयार होताना त्यांच्यावर (उदा., टोमॅटो, घेवडा, वाटाणा, कापूस, मका, सोयाबीन इ. वनस्पतींवर) होते. बिया नसतील तेव्हा झाडाचे (पिकाचे) खोड आणि पानांवरही त्यांची वाढ होते. त्यामुळे पिके व फळबागा यांचे अधिक प्रमाणात कीड लागून नुकसान होते. 

 

सामान्यतः हिलारे कीटकाचा रंग गडद हिरवा असून त्याच्या शरीरावर पिवळसर नारिंगी किंवा लाल रंगाच्या छटा असतात. त्याचा आकार मोठा व ढालीसारखा असून लांबी १३–१८ मिमी. असते. काळ्या रंगाच्या त्रिखंडीय शृंगिकांमुळे ते नेझारा व्हिरिड्युला या जातीपासून वेगळेओळखले जातात. वनस्पतीचा रस शोषून घेण्याकरिता अर्भक तसेचप्रौढ कीटकांच्या मुखात कुरतडण्यासाठी व शोषण्यासाठी चूषके असतात. अर्भक व प्रौढ यांच्या शरीरात छातीच्या वरच्या भागाच्या आतील बाजूस मोठ्या दुर्गंध ग्रंथी असतात. जेव्हा ते विक्षोभ अवस्थेत असतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी द्रव शरीराबाहेर विसर्जित करतात म्हणूनच याप्रजातीस हिरवे दुर्गंधी कीटक असे संबोधिले जाते. 

 

हिलारे कीटकाचे जीवनचक्र साधारणतः ३०–४५ दिवसांचे असते. ते पानाच्या दोन्ही बाजूंना दोन ओळींत लंबगोल आकाराची लहानलहान बारा-बारा अंडी घालतात. सुरुवातीला अंडी पिवळ्या ते हिरव्या रंगाची असतात. नंतर ती गुलाबी ते करड्या रंगात बदलतात. त्यांचा आकार १.२–१.४ मिमी.पर्यंत असतो. अंड्यांचे प्रौढात रूपांतर होण्यास जवळ-जवळ ३५ दिवस लागतात. अंड्यांतून एक आठवड्यांनंतर बाहेर आलेली अर्भके गडद काळ्या रंगाची असतात आणि जसजसे ते प्रौढ होतात तसतसा त्यांचा रंग हिरवा, पिवळा व लाल होतो. तथापि, त्यांच्या अपक्व अवस्थेत उदराच्या खंडांमध्ये पांढरे ठिपके असतात. हे हिरवे दुर्गंधी कीटक वीण झाल्यानंतर वसंत ऋतूतील पहिल्या उबदार दिवसांत सक्रिय होतात. 

 

पक्षी, टोड, कोळी व इतर कीटकभक्षी प्राणी तसेच मोठे कीटक हे हिलारे कीटकाचे नैसर्गिक शत्रू आहेत. हिरवे दुर्गंधी कीटक त्यांच्या संदेशवहन प्रणालित मिथिल-२, ४, ६-डेका ट्राय इनोएट या फेरोमोनाचा वापर करतात. कीटकांना पिकांपासून दूर घालविण्याकरिता अशा संश्लेषित फेरोमोनाचा वापर केला जातो. विविध खात्रीशीर कीटकनाशकांचाही पिकांवर फवारा करून त्यांच्यावर नियंत्रण राखले जाते. 

 

पहा : पिकांवरील ढेकूण. 

एरंडे, कांचन