हायडल्‌बर्ग विद्यापीठ : जर्मनीतील प्रख्यात विद्यापीठ. मुख्यालय हायड्लबर्ग येथे. १३८६ मध्ये जर्मनीचा पहिला रूप्रेक्ख्ट याने ख्रिस्ती धर्मगुरूकडून परवानगी मिळवून या विद्यापीठाची स्थापनाकेली. मानवी संस्कृतीच्या सातत्यपूर्ण विकासास आवश्यक असणारे संशोधन करणे, यावर या विद्यापीठाने प्रारंभापासून भर दिला आहे. ख्रिस्ती धर्ममतांचा जबरदस्त पगडा असणाऱ्या या विद्यापीठाने अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकापासून मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. विद्यापीठीय शिक्षणात वैज्ञानिकता आणताना लोकशाहीवादी, आदर्शवादी मूल्यांचा अवलंब करीत शिक्षणासाठी खुले धोरण ठेवले. त्यामुळे मध्ययुगीन काळापासून या विद्यापीठात अनेक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यास आकृष्ट झाले. विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतरच्या काळात विद्यापीठाने अनेक अनुकूल-प्रतिकूल स्थित्यंतरे अनुभवली आहेत. मार्टिन ल्यूथर याच्या धर्मसुधारणावादी आंदोलनाने या विद्यापीठाचे विचारविश्व ढवळून निघाले होते. एकोणिसाव्या शतकात विद्यापीठाची आर्थिक स्थिती ढासळली होती. या वेळी बाडेनचा ड्यूक कार्ल फ्रीड्रिख याने आर्थिकदृष्ट्या नवसंजीवनी देऊन विद्यापीठास सक्षम केले. त्यामुळेच नंतरच्या काळात स्थापनकर्त्या रूप्रेक्ख्ट आणि कार्ल फ्रीड्रिख यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नामकरण रूपेर्टो-कारोला विद्यापीठ असे करण्यात आले होते. नाझीकाळात या विद्यापीठाचे अतोनात नुकसान झाले. वंशवादी धोरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना निलंबित केले गेले. ज्यू आणि कम्युनिस्ट प्राध्यापकांनी या विद्यापीठातून पलायन केले. या सर्व स्थित्यंतरांतही विद्यापीठाने अध्ययनाचा आणि संशोधनाचा दर्जा कायम ठेवला. जर्मनीतीलच नव्हे, तर जगातील एक अग्रगामी संशोधन विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाचा आज लौकिक आहे.

 

विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक आहे. निसर्गविज्ञान, गणित, संगणकविज्ञान, कला, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, सामाजिक विज्ञान या विषयांच्या विद्याशाखा विद्यापीठात कार्यरत आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय विद्यापीठात उपलब्ध आहे. पदवी परीक्षांचा कालावधी षठमासी असतो. ही परीक्षा लेखन, ज्ञानोपयोजन, प्रात्यक्षिक, प्रशिक्षण या स्वरूपात विभागलेली असते. पदवीच्या अंतिम परीक्षेस विद्यार्थ्यांना संशोधनात्मक प्रबंध सादर करणे अनिवार्य असते. पदव्युत्तर पदवी परीक्षा साधारणतः चार वर्षांर्धांत विभागली जाते. कोणत्याही एका विषयात उच्चतम अध्ययन आणि संशोधन करून ही पदवी प्राप्त केली जाते. पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची शिस्त लावली जाते. विद्यापीठाचा भर हा संशोधनावर असल्यामुळे त्या अनुषंगाने १८ केंद्रीय संशोधन संस्थांची स्थापना विद्यापीठाने केली आहे. अंतरिक्षविज्ञान, सामाजिक अध्ययन, जैवरसायनशास्त्र यांसारख्या विषयांस या संस्था वाहिलेल्या आहेत. या संशोधन केंद्रांच्या आधारेच विद्यापीठात कायदा, तत्त्वज्ञान, मानवी वैद्यक, अर्थशास्त्र, जीवशास्त्र या विषयांतून आचार्य पदवी मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या विद्यापीठामधील वैद्यकशास्त्रातील प्रजनन-शास्त्राच्या संशोधनास जगभरात महत्त्व प्राप्त आहे. मनोदोषचिकित्सा, औषधमानसशास्त्र, जननशास्त्र, पर्यावरणशास्त्र भौतिकी व आधुनिक समाजशास्त्र या विषयांत येथे प्रगत संशोधन केले जाते. येथील संशोधनाचा दर्जा अत्युच्च असल्यामुळे येथील ५५ शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिके प्राप्त झाली आहेत. सातशे वर्षांची परंपरा असणारे विद्यापीठाचे ग्रंथालय अद्ययावत असून सुमारे चार लाख पुस्तके, सात हजार हस्तलिखिते आणि पाच लाख ध्वनिचित्रफिती एवढे तंत्रज्ञानीय साहित्य येथे असून सुमारे ८०,७३० ई-मासिके विद्यार्थ्यांना वाचनासाठी सदैव उपलब्ध असतात. विद्यापीठाचे प्रशासन हे परंपरागत विद्यापीठाप्रमाणेच असून कुलगुरू हा विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो. आजमितीस विद्यापीठात ५०० प्राध्यापक कार्यरत असून २६,७४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यात ५,११८ विदेशी विद्यार्थ्यांचा समावेश होता (२०१३).

भटकर, जगतानंद