हात : मानवी शरीराच्या वरच्या उपांगाचा अंतिम भाग हात (पंजा) या नावाने ओळखला जातो. मनगटानंतर सुरू होणाऱ्या या भागाततळहात (करतल) व पाच बोटे यांचा समावेश होतो. शरीररचनाशास्त्र दृष्ट्या खांद्यापासून कोपरापर्यंतच्या भागाला बाहू (दंड) आणि कोपरापासून मनगटापर्यंतच्या भागाला प्रबाहू म्हणतात. मराठी विश्वकोशा त ‘बाहु’ व ‘मनगट’ या विषयांवर स्वतंत्र नोंदी आहेत.

 

आदिमानव हे प्राणिवर्गातील अरण्यवासी प्राणी झाडांच्या फांद्यांना पकडून उड्या मारीत. पुढे जाण्याच्या हालचालीतून (बाहुचलन) हाताच्या लांब बोटांचा व अंगठ्याचा विकास झाला आहे. सस्तन प्राण्यांच्या वानरेतर वर्गातील पुढच्या पायाच्या पंजाशी हात समतुल्य म्हणता येईल. त्याच्या अनेकविध हालचाली आणि सूक्ष्म तारतम्यकारी संवेदनक्षमता या गुणांमुळे मानवी शरीरास प्राणिजगतात एक वेगळेच स्थान प्राप्त झाले आहे.

 

हाताच्या स्नायूंची रचना : (१ व ४) दीर्घ अपवर्ती हस्तांगुष्ठ, (२) लघू प्रसारक हस्तांगुष्ठ, (३) पृष्ठस्थ अरीय अपवर्ती, (५) दीर्घ प्रसारक हस्तांगुष्ठ, (६) अरीय अपवर्ती पृष्ठीय शाखा, (७) अपवर्ती लघू हस्तांगुष्ठचे प्रसरण, (८) अपवर्ती हस्तांगुष्ठ, (९) प्रथम पृष्ठीय अस्थ्यंतर, (१०) पृष्ठीय अंगुल प्रसरण, (११) मध्यवर्ती सर्पण, (१२) पार्श्विक पट्टा, (१३) प्रसारक इन्डीसिस, (१४) लघू अंगुल प्रसारक, (१५) प्रसारक अंगुल समूह, (१६) लघू अंगुल अपवर्ती, (१७) दीर्घ व लघू अरीय मणिबंधीय प्रसारक, (१८) पृष्ठ त्वचीय प्रबाहू शाखा, (१९) परिवाहक प्रसारक, (२०) मणिबंधीय प्रसारक प्रबाहू, (२१) लघू अंगुल प्रसारक, (२२) प्रसारक अंगुष्ठ समूह, (२३) प्रसारक इन्डीसिस.

रचना : मनगटास जोडलेली तळहाताची पाच हाडे (करभास्थी) आणि प्रत्येकाच्या टोकाशी जोडलेली तीन (अंगठ्यात दोन) हाडांची साखळी अशा एकूण १९ हाडांनी हाताचा अस्थिकंकाल बनलेला असतो. त्याच्या आधारे हातातील अंतस्थ स्नायू व बहिस्थ स्नायू (प्रबाहूमध्ये असलेले दीर्घस्नायू) यांच्या कंडरा, त्वचेखालील मऊ संयोजी ऊतकांचे आवरण आणि बोटांच्या टोकांशी असलेल्या नखशय्या व नखे आपापल्या जागी स्थिर असतात. अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका व करंगळी या नावांनी पाच बोटे ओळखली जातात. तळहाताची पुढच्या भागाची त्वचा जाड, अधिक संवेदनशील आणि सूक्ष्म रेषांनीयुक्त असते. या सूक्ष्म रेषा व तळहातावरील मोठ्या रेषा व्यक्तिभिन्नता दर्शवितात.

 

मनगटातून हातात प्रवेश करणाऱ्या हाताच्या दोन प्रमुख रोहिणींच्या (अरीय व अंतरास्थीय) शाखांचे तळहातात दोन कमानींत रूपांतर होते. पृष्ठीय व गभीर अशा या कमानीमधून तळहातास आणि प्रत्येक बोटास रक्त पुरविणाऱ्या उपशाखा निघतात. अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नीलांचे जाळे हातात सर्वत्र पसरलेले असले तरी हाताच्या मागील बाजूची त्वचा अधिक पातळ व सैल असल्यामुळे तेथील नीलास्पष्ट दिसतात. या सर्व नीलांमधून रक्तप्रवाह कोपरातील शीर्षी वबाहु-नीलांमध्ये जाऊन अंतर्बाहु-नीलेमार्गे अखेर अधोजनुकीय नीलेस मिळतो. लसीकांचे जाळे साधारणपणे नीलांप्रमाणे पसरलेले असते. त्यामधून वाहणारा लसीकाद्रव काखेतील ग्रंथींमधून पुढे जातअसल्यामुळे हाताच्या इजेमुळे (दाहयुक्त सूज) किंवा जंतुसंसर्गा-मुळे काखेत गाठ वाढलेली जाणवते. तसेच काखेतील किंवासमीपच्या ग्रंथी शस्त्रक्रियेने काढून टाकल्या तर हातास सूज येते (लसीकाशोफ). [→ बाहु].

 

रोहिणींप्रमाणेच मनगटातून प्रवेश करणाऱ्या तीन तंत्रिका हाताच्या हालचाली व संवेदनांचे कार्य आपल्या अनेक सूक्ष्म शाखांकरवी घडवून आणतात. अरीय तंत्रिका अंगठा व त्याच्या शेजारील तीन बोटे तसेच तळहाताचा पृष्ठीय भाग यासाठी कार्य करते. अंतरास्थीय तंत्रिका करंगळी व अनामिकेचा लगतचा अर्धा भाग आणि तळहाताचा पुढचा (उताणा) भाग यात कार्यरत असते. मध्यस्थ तंत्रिका अंगठा व तीन बोटांचा पुढचा भाग आणि सर्व बोटांच्या नखशय्या व करतलाचा काही भाग यांना शाखा पोहोचविते. अंगठ्याच्या हालचाली (तळहातापासून दूर नेणे, दुमडणे, अंगठ्याचे टोक इतर बोटांना टेकविणे) घडविणाऱ्या स्नायूंना ही तंत्रिका नियंत्रित करते.

 

हाताचे कार्य व हालचाली : चतुष्पाद प्राण्यांमध्ये पुढच्या पायांना शरीराचा भार सहन करणे व चालताना जमिनीवरील कठीण किंवा अणकुचीदार पदार्थांचा सामना करणे ही कामे करावी लागत. वानर वर्गात ती कमी झाली. द्विपाद झाल्यावर त्यांची आवश्यकताच उरली नाही. त्यामुळे तळहाताची त्वचा हळूहळू अधिक मऊ, पातळ आणि नाजुक झाली. जड वस्तू ढकलणे किंवा उचलणे ही कामे अजूनही मानवी हात करू शकतात परंतु या कामातील मुख्य भार मनगट, बाहू आणि प्रबाहूची हाडे, सांधे व स्नायू यांच्यावर पडतो. त्याऐवजी अधिक तारतम्यकारी हालचाली (तर्जनीने वस्तू किंवा दिशा दाखविणे, अंगठा व एक बोट यांच्या साहाय्याने बारीक वस्तू उचलणेकिंवा निवडणे, काठीसारखी वस्तू सर्व बोटांच्या मदतीने पकडणे) करण्याची क्षमता विकसित झाली. शेती किंवा शिकार यासारख्या तंत्र-ज्ञानास ती उपयुक्त ठरली.

 

हाताच्या प्रमुख हालचाली : (अ) मनगट व करभास्थींच्या सांध्यात होणारे अंतर्नमन आणि प्रसारण : यासाठी प्रबाहूतून निघणारे दीर्घ स्नायू व त्यांची कंडरा उपयोगी पडते. (आ) याच ठिकाणी होणारे अभिवर्तन व अपवर्तन : यासाठी स्वतंत्र स्नायू नसून वर दिलेल्यांपैकी काही हे कार्य घडवितात. (इ) बोटे मिटण्याची क्रिया : करभास्थींची टोके व बोटांची पहिली हाडे यांमधील सांध्यात ही हालचाल होते. तसेच बोटांच्या हाडांमधील सांध्यात अशीच हालचाल होऊन मूठ मिटण्याची क्रिया पूर्ण होते. (ई) बोटे एकमेकांजवळ घेणे किंवा दूर करून पंजा पसरणे : या क्रियांमध्ये मुख्यतः हातातील लहान स्नायू आणि मनगटाच्या हाडांपासून निघणारे स्नायू काम करतात. या स्नायूंची टोके अंगठा, करंगळी व इतर बोटांच्या पहिल्या हाडाच्या प्रारंभी जोडलेली असतात. (उ) हात उताणा किंवा पालथा करणे : ही क्रिया सर्वस्वी प्रबाहूच्या अरीयास्थी व अंतरास्थी या हाडांच्या कोपर आणि मनगट यांजवळील सांध्यांमध्ये घडून येते. बाहू व प्रबाहूंमधील स्नायू यासाठी उपयोगी ठरतात.

 

संवेदन : स्पर्श, दाब, तापमान, कंपन इ. त्वचेतील संवेदक हातातही असतात. बोटांच्या टोकांच्या त्वचेत विकसित झालेले पॅसिनियन दाब संवेदक हाताच्या स्पर्शज्ञानास विशेष साह्य करतात. जवळजवळच्या दोन बिंदूंमधील संवेदन स्वतंत्रपणे जाणवण्याच्या दृष्टीने हाताची त्वचा अधिक तारतम्यकारक असते. त्यामुळे वस्तू हाताळण्याचे कौशल्य विकसित झाले आहे.

 

विकृती व विकार : बाहुकलिकेपासून विकास होत असताना भ्रूणातील दोषांमुळे हातामध्ये पाचपेक्षा अधिक बोटे असणे, बोटे एकमेकास चिकटलेली असणे यांसारख्या विकृती निर्माण होऊ शकतात. हे दोष आनुवंशिक असू शकतात. गर्भिणीने घेतलेल्या काही औषधांमुळे हाताची वाढ थेट खांद्यापासून होणे यासारखे दुष्परिणाम (आता क्वचित) संभवतात. हाताच्या बहुविध वापरामुळे रसायनजन्य त्वचाशोथ, निकेल किंवा अन्य धातूंच्या संपर्कामुळे त्वचाशोथ, वनस्पतींची किंवा प्लॅस्टिकची ॲलर्जी असल्यामुळे पुरळ येणे यांसारख्या दुष्परिणामांची शक्यता असते. अतिशय थंड वातावरणात दीर्घ काळ उघडे पडलेले हात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा स्नायू गोठल्यामुळे कायमचे निष्क्रिय होऊ शकतात. हिमदाह व शीतशोथ या नावाने हे विकार ओळखले जातात.

 

कंपनशील उपकरणे हाताळणाऱ्या व्यक्तींच्या हातातील तंत्रिका व वाहिन्यांना इजा झाल्यामुळे त्यांच्या हातांना मुंग्या येणे, बधीरता, विवर्णता व दुर्बलता यांसारख्या दोषांना बळी पडावे लागते. इतर व्यवसायजन्य दोषांमध्ये टंकलेखनिक व लेखनिक यांच्यातील वेदनायुक्त पेटके आणि मध्यमा तंत्रिकेवर मनगटामध्ये दाब पडून अंगठा व शेजारच्या बोटात वेदना निर्माण करणारा मणिबंध विवरजन्य दोष यांचा उल्लेख करता येईल.

 

हातापासून दूरस्थ कारणांमुळे किंवा सार्वदेहिक विकारांमुळे हातात काही विकृती दिसू शकतात. उदा., कुबडीच्या दाबामुळे काखेत अरीय तंत्रिकेस इजा होऊन हाताचे मनगटाखाली प्रसारण न होणे, शिसे किंवा पारा यांच्या विषाक्ततेमुळे इतर तंत्रिकांमध्ये दोष होऊन अशीच परिस्थिती निर्माण होणे, पार्किनसन विकारात हाताचे होणारे कंपन, अल्कोहॉल व्यसनाधीनतेमुळे होणारे कंपन, मादक पदार्थ घेणाऱ्या व्यसनी व्यक्तीमध्ये औषध न मिळाल्यामुळे होणारी स्थिती, संधिवात विशेषतः संधिवाताभ संधिशोथ यामुळे होणारे व्यंग, वृद्धावस्था इत्यादी.

 

उपचार : वाहिन्या किंवा तंत्रिकांवरील दाबामुळे होणारे दोष शस्त्रक्रियेने काढून टाकता येतात. अपघातामुळे तुटलेल्या ऊतकांची किंवा हाडांची दुरुस्तीही काहीशा क्लिष्ट शस्त्रकर्मांनी करता येते. या क्षेत्रातील प्रगत तंत्रांमुळे आता पूर्ण तुटलेला हात व्यवस्थित सांभाळून त्वरित रुग्णालयात आणला तर तोही समाधानकारक रीत्या जोडता येतो. तसेच दुसऱ्या व्यक्तीचा हातही जोडता येतो.

श्रोत्री, दि. शं.